वादी

Submitted by Theurbannomad on 26 May, 2020 - 20:42

अली आणि फाझल आपल्या उंटांना शक्य तितक्या वेगात दौडवत होते. तीन दिवसांपूर्वी मिस्र देशातल्या बाजारात त्यांनी आपला माल चांगल्या चढ्या किमतीला विकला होता. खिशात अपेक्षेपेक्षा जास्त माल खुळखुळत होता. या वेळच्या व्यापारात त्यांना चांगलाच धनलाभ झाल्यामुळे त्यांनी हात सैल सोडून खरेदी केली होती. परतीच्या वाटेवर ठराविक अंतरावर असलेल्या वस्त्या त्यांच्या परिचयाच्या होत्या. सवयीप्रमाणे पहाटे तांबडं फुटल्या फुटल्या प्रवासाला सुरुवात करायची, दुपारी खाण्यापिण्यासाठी वाटेतल्या माहितीच्या वस्तीत थांबायचं, पुन्हा दुपारपासून संध्याकाळपर्यंत प्रवास आणि रात्री पुढच्या वस्तीत रात्र काढायची असं त्यांच्या प्रवासाचं आयोजन असायचं.

प्रवासातल्या शेवटल्या टप्प्यात आपल्या गावापासून सहा-सात तासांच्या अंतरावरची सवयीची वस्ती त्यांना जरा जास्त प्रिय होती. ती वस्ती चार-पाच गावांपासून जवळ असल्यामुळे तिथे खाण्यापिण्याची आणि आरामाची सुरेख सोय होती. तिथल्या गावकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन व्यापाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या वस्तीवर अवलंबून असल्यामुळे त्या गावात पाहुण्यांची चोख बडदास्त ठेवली जाई. अशा या गावातल्या आपल्या आवडत्या खानावळीत दुपारी भरपेट जेवण झाल्यावर तासाभराची वामकुक्षी घ्यायच्या उद्देशाने पहुडलेले अली आणि फाझल सुस्तावून चांगले तीन-चार तास झोपले. जाग आल्यावर घाईघाईत त्यांनी आवराआवर केली आणि ती वस्ती सोडली. वस्तीच्या आणि त्या दोघांच्या गावाच्या मध्ये असलेली वादी त्यांना सूर्यास्तापूर्वी पार करायची होती. अनेक बुजुर्गांकडून त्या वादीच्या सुरस आणि गूढ गोष्टी ऐकल्या असल्यामुळे त्या दोघांना वादीची भीती बसलेली होती. अनेक वर्षांपासून कोरडी पडलेली आणि भेगाळल्या जमिनीवर प्राण्यांच्या हाडांचा आणि कवट्यांचा खच पडलेली ती वादी दिवसासुद्धा भयाण आणि भीतीदायक वाटत असे. वाटसरू कधीही दिवस मावळल्यावर त्या वादीच्या आसपास फिरकत नसत.रात्री दूरवरून बघितल्यावर वादीतून कसलासा चमकदार प्रकाश तेव्हढा दृष्टीस पडत असे. ज्या ज्या लोकांनी त्या प्रकाशाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, ते रहस्यमयरित्या गायब झाले होते. अली आणि फाझल हे सगळं माहित असल्यामुळे चांगलेच घाबरले होते.

वादी तशी लांब आणि विस्तीर्ण होती. त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उंटांवरून जायला सुद्धा तासभर सहज लागत असे. वाटेत खुरटी काटेरी झुडपं आणि एखादा सरपटणारा वाळवंटी साप दर्शन देत असे. आजूबाजूच्या खडकांमध्ये असंख्य गुहा दिसत असल्या, तरी त्यांच्या आत काय आहे हे कोणालाही माहित नव्हतं. गावातले बुजुर्ग त्या गुहांमध्ये जिन्ना आणि फरिश्ते रात्रीच्या वेळी उतरतात अशी दंतकथा सांगत असत. अर्थात त्या दंतकथांमधलं खरंखोटं शोधून काढणं अशक्य होत, कारण विषाची परीक्षा घ्यायला कोणाची छाती धजावत नसे.

वादीत प्रवेश करताना दोघांनी आकाशाकडे नजर टाकली. नुकताच सूर्य मावळतीला आला होता. आसमंतात हळू हळू लाली पसरायला लागलेली होती. उंटांना पूर्ण वेगाने धावडवल, तर अर्ध्या ते पाऊण तासात आपण वादी पार करू अशा आशेने त्यांनी पुढे जायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी गावाची मुख्य पंचायत असल्यामुळे त्यांना कसंही करून गावात पोचणं भाग होतं.उंट आता वेगाने धावायला लागले होते. अली आणि फाझलची सामान सांभाळता सांभाळता तारांबळ उडत होती. वादीच्या मध्यावर ते पोचले आणि आजूबाजूच्या टेकड्यांमधल्या त्या गुहा त्यांच्या नजरेला दिसू लागल्या. अजून आकाश गडद लालसर झालेलं नव्हतं. दोघांनी एकमेकांकडे आनंदाने बघितलं आणि अचानक एका काटेरी झुडपात अडखळून अलीचा उंट जमिनीवर कोसळला आणि त्याच्या पाठीवर बांधलेलं सामान जमिनीवर इतस्ततः विखुरलं. अली धडपडत कसाबसा उठला आणि त्याने उंटाला उभा करायचा प्रयत्न केला. त्या धडपडीत त्याला उंटाच्या पायावर झालेली जखम दिसली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली.

" अली, उठ..." अलीच्या तोंडावर पाण्याचे हबके मारत फाझल त्याला सावरायला लागला. अली कसाबसा उठला आणि त्याने थोडं पाणी प्यायलं. तोंडात चार खजूर ठेवले आणि डोक्याचं मुंडासं सैल केलं. थोड्या वेळाने त्याला तरतरी अली. पूर्ण भानावर आल्यावर तो ताडकन उभा राहिला. आता त्याला कमी कमी होतं जाणारा प्रकाश आणि वादीच्या मधोमध उभे असलेले तो आणि फाझल या भयकारी परिस्थितीची जाणीव झाली.

" फाझल, अब क्या? माझा उंट चालू शकेल फार फार तर...आणि तुझ्या उंटावर आपल्या दोघांचं सामान आणि आपण दोघे बसलो तर त्याला ते झेपणार नाही...आपण सामान टाकून तुझ्या उंटावर बसून आत्तापुरतं इथून जाऊया...उद्या पुन्हा येऊन सामान घेऊन जात येईल..."

" ठीक है...तुम्हारा सुझाव दुरुस्त है...सामान काढूया..मला वाटत ती समोर जी गुहा आहे ना, त्या गुहेत ते ठेवलेलं बरं...इथे रस्त्यात ठेवलं आणि उद्या यायला आपल्याला उशीर झाला तर कोणीतरी घेऊन जाईल...' फाझलने सुचवलं.

दोघांनी सामान उंटांच्या पाठीवरून उतरवलं. एकेक करून सामान त्या गुहेच्या तोंडाशीच एका घळीत व्यवस्थित ठेवून त्यावर खूण म्हणून त्यांनी एका काठीला आपल्याकडचं कापड बांधून ती काठी त्या घळीच्या एका खाचेत रोवली. खाली उतरल्यावर त्यांनी घाम टिपून पाणी प्यायलं आणि आपल्या उंटांना सावध केलं. अलीने आपल्या उंटाचा लगाम तिथल्या एका दगडाला बांधला आणि त्याच्यापुढे पुरेसा कडबा टाकला. त्या उंटाला तिथेच सोडून दोघांनी फाझलच्या उंटावर बुडं टेकवली आणि उंटाला उठून चालायचा इशारा केला. उंट उठला आणि त्याने वेग पकडला. चार-पाच मिनिटांनी तो उंट आणि त्याच्यावरचे हे दोघे ' शहाणे ' दोन बाजूंच्या गुहांनी भरलेल्या टेकड्यांमधल्या वाळूच्या पायवाटेवर आले.

" अली, कुछ सुना?" फाझलने अलीला घाबरत घाबरत प्रश्न केला.

" हां...काहीतरी विचित्र आवाज येतोय..." अलीने दुजोरा दिला. दोघांनी घाबरत घाबरत आजूबाजूला नजर फिरवली. आपल्या कमरेला खोचलेला खंजीर त्यांनी हातात घेतला. आता त्यांचा उंट एका भल्या मोठ्या सुकलेल्या सरोवरापाशी आला होता. सरोवर पार केल्यावर पुन्हा गुहांच्या टेकड्यांमधला रस्ता लागणार होता. अचानक दोघांना सरोवराच्या एका बाजूला पांढरा शुभ्र प्रकाश पडलेला दिसला. दोघांनी उंटाला थांबवलं, मागे नेलं आणि चढणीवर नेऊन जवळच्या गुहेत आणलं. तिथे एका दगडाला त्यांनी उंटांचा लगाम बांधला आणि हळूच गुहेबाहेर डोकावायला सुरुवात केली. कानोसा घेत ते दबकत दबकत गुहेबाहेर आले आणि दगडांच्या आडोशाने एका लपण्यायोग्य जागी येऊन सरोवराकडे बघायला लागले.

एव्हाना त्या सरोवरापाशी शरीरातून चंद्रासारखा शीतल प्रकाश पडत असलेल्या पांढऱ्या शुभ्र आकृत्या जमलेल्या होत्या. त्या आकृत्यांना पंख होते. त्या आकृत्यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया स्पष्ट ओळखता येत होत्या. अच्चनक सरोवरात पाणी भरायला सुरुवात झाली आणि बघता बघता त्या सरोवराचा कायापालट झाला. नितळ पाण्यात तरंगणारी कमळं, रंगीबेरंगी मासे आणि पाणवेली यांच्यामुळे ते सरोवर अचानक स्वर्गीय वाटू लागलं. त्या पांढऱ्या आकृत्या आता सरोवरात जलक्रीडा करायला लागल्या. त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नसलं, तरी त्यांच्यात खेळीमेळीचं संभाषण चाललेलं अली आणि फाझलला समजत होतं. आकाशातल्या पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब त्या सरोवराच्या पाण्यात पडलं होतं. काही वेळाने त्या सगळ्यांनी चंद्राच्या त्या प्रतिमेच्या आजूबाजूला गोल करून सरोवरातील पाणी ओंजळीने प्यायला सुरुवात केली. त्यांच्या तेजात आता वृद्धी व्हायला लागली होती. काही वेळाने त्यांनी आपली जलक्रीडा आटोपती घेतली. इतक्यात आकाशातून एक मोठा पक्षी तिथे अवतरला. त्या पक्ष्याच्या अंगावरची पिसं सोन्याची होती. त्या पक्षाकडे बघताच अली आणि फाझल हरखून गेले. त्या पक्ष्यापाठोपाठ त्याच्यासारखेच पण छोट्या आकाराचे अजून काही पक्षी आले. त्यांनी त्या सरोवरात आपला शरीर धुतलं. त्यामुळे त्यःचे काही सोन्याचे पंख सरोवराच्या पाण्यात गळून पडले आणि तरंगत तरंगत इतस्ततः विखरायला लागले. त्यातल्या काही पक्ष्यांनी आजूबाजूच्या गुहांमध्ये अंडी घातली. ती अंडी सुद्धा सोन्याची होती.

काही वेळाने एक एक करत ते पक्षी, त्या पऱ्या आणि ते फरिश्ते उडत उडत आकाशात अंतर्धान पावले. सगळीकडे सामसूम झाल्यावर सरोवराचे पाणी कमी कमी व्हायला लागले. अली आणि फाझलने टुणकन आडोशाच्या दगडावरून उडी मारली आणि पाण्यातल्या सोनेरी पंखांना वेचायला सुरुवात केली. फाझल धावत धावत समोरच्या गुहांमध्ये गेला. तिथल्या सोन्याच्या अंड्यांमधून त्याने काही अंडी उचलली. काही क्षणात सरोवर नाहीस झाल्यावर ती पिसं, ती अंडी आणि सरोवरातली पानंफुलं आपोआप गायब झाली. अली आणि फाझलने जितकी पिसं आणि अंडी गोळा केली तितकी त्यांच्या हातात उरली.

दोघे भाऊ आता हरखून गेले होते. त्यांनी ती अंडी फोडून आत काही मौल्यवान आहे का, याची खातरजमा केली. आत साध्या अंड्यांसारखा बलक होता, परंतु त्या अंड्यांच कवच मात्र सोन्याचं होतं. कल्पनेपेक्षा जास्त धनदौलत आज त्यांना मिळाली होती. सकाळ होईपर्यंत त्यांनी तिथेच वेळ काढला. आपलं सामान आणि आपले दोन्ही उंट घेऊन ते गावात परतले. पंचायत झाल्यावर घरी येऊन त्यांनी आपल्या घराच्या जमिनीत एक मोठा खड्डा खणला. त्या खड्ड्याच्या बाजू मातीने सारवून आणि त्या खड्ड्यावर लोखंडी झाकण लावून त्यांनी तिथे एक चोर तिजोरी तयार केली. त्यात सगळं सोनं त्यांनी भरून ठेवलं.आपल्या घरातली मोठी जड संदूक खड्ड्यावर सरकवून त्यांनी ती जागा सुरक्षित केली. आता ते त्या गावातले सगळ्यात श्रीमंत इसम झाले होते.

आपल्या नव्याने मिळालेल्या दौलतीच्या जोरावर त्यांनी आपल्यासाठी एक प्रशस्त घर बांधून घेतलं. थाटामाटात शेजारच्या गावच्या एका बड्या व्यापाऱ्याच्या मुलींशी निकाह केला. हळू हळू त्यांच्या घराच्या मागच्या भागात घोडे, उंट, भेड-बकऱ्या आणि कोंबड्या आल्या, घरासमोर सुरेख अंगण तयार झालं. बाजूच्या खजुराच्या बागेचा ताबा त्यांनी रोख रक्कम देऊन मिळवला. आता ते गावातले प्रतिष्ठित व्यापारी झाले होते.

जवळचा पैसा संपत आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा वादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नेहेमीप्रमाणे व्यापाराच्या आणि खरेदीच्या निमित्ताने मिस्र देशात जातो आहोत, असं त्यांनी आपल्या बायकांना सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी चार-पाच दिवस मिस्र देशात मजा केली. येताना प्रत्येक गावात दौलतजादा केला.अखेर मजा करून मनाचं समाधान झाल्यावर ते संध्याकाळी आपल्या घोड्यावर बसून वादीच्या दिशेने निघाले. तास-दीड तासात ते त्या सरोवराच्या भागापर्यंत पोचले आणि त्यांनी घोड्यांना बाजूच्या एका गुहेत आत नेऊन बांधलं. त्यांना पाणी पाजलं. स्वतः पाणी प्यायले आणि त्याच दगडाच्या आडोशाला दबा धरून बसले.

आज वातावरण थोडं वेगळं जाणवत होतं. अलीने फाझलला त्यासंबंधी विचारल्यावर फाझलसुद्धा अलीच्या बोलण्याशी सहमत झाला. नक्की काय वेगळं आहे, हे शोधून काढायला त्यांनी चारी बाजूला नजर फिरवली. अचानक आलीच लक्ष वर आकाशात गेलं आणि त्याने फाझलला खूण केली.

" भाईजान, उपर देखिये. आज चांद नाही है...आज अमावस्या आहे ना...म्हणून सगळीकडे खूप अंधार वाटतोय..."

" ठीक है, हमें उससे क्या? आपण आपलं काम करून निघायचं..." फाझल हसत हसत उत्तरला.

अचानक आजूबाजूला काहीतरी विचित्र व्हायला लागलं. जमीन थरथरून त्यातून काळ्या रंगाचं पाणी वर यायला लागलं. त्या पाण्यात एकमेकांचे लचके तोडणारे हिंस्र मासे होते. मगरी, साप फिरताना दिसत होते. दोघे भाऊ ते दृश्य बघून गांगरले. तितक्यात आकाशातून काळ्या रंगाच्या काही आकृत्या खाली येताना दिसल्या. त्या आकृत्या भयानक वाटत होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या जागी लाल रंगाचा प्रकाश होता. हातात हाडं आणि कवट्यांपासून बनवलेला दंड होता. त्या सगळ्यावर कडी म्हणजे आकाशातून एक काळा कुळकुळीत गिधाडासारखा दिसणारा पक्षी त्या पाण्यात अवतरला. मागोमाग त्याच्यासारखे त्याचे छोटे नातलग सुद्धा आले. त्या सरोवरात आता ते पक्षी, मासे, मगरी आणि त्या काळ्या आकृत्या यांच्यात घमासान सुरु झालं. एकमेकांचे लचके तोडायची स्पर्धा लागली. अली आणि फाझल ते सगळं बघून घामाघूम झाले. त्यांच्या अंगात हुडहुडी भरली. अलीची तर घाबरून दातखीळ बसली. फाझलने त्याला सावरून हळू हळू मागे सरकायला सांगितलं. आपण गुहेत जाऊन लपूया आणि सकाळ व्हायची वाट बघूया, असा अलीला सांगून फाझल सावध पावला टाकत मागे व्हायला लागला.

अचानक अलीच्या पायाखालचा एक दगड निसटून घरंगळत खाली गेला. त्या काळ्या आकृत्यांचा लक्ष त्या दिशेला गेलं आणि त्यांना अली-फाझल दिसले. त्यांनी लगेच दोघांना पकडून सरोवराच्या मध्यावर आणलं. ते हवेत तरंगत होते आणि खाली मगरींनी आपले अक्राळ विक्राळ जबडे वासून सावज मिळवायला गर्दी केली. दोघांना आपलं शेवट जवळ आल्याची खात्री पटली.

" कौन हो तुम? " त्या काळ्या आकृत्यांपैकी एकीने प्रश्न केला.

अली आणि फाझलने भडाभडा सगळ्याचा खुलासा केला.

" तुम्हाला काय वाटलं? इथे फक्त फरिश्ते आणि पऱ्या येणार? याद रखो, जहां सफेद वहा काला. चांद पूर्ण असतो तेव्हा त्यांचा दिवस आणि नसतो तेव्हा आमचा...ही वादी सुद्धा दोन भागात वाटली गेली आहे. काही गुहांमध्ये इब्लिस आणि त्याचे साथीदार राहतात...आम्ही त्यातलेच आहोत...बाकीच्या गुहांमध्ये ते फरिश्ते आणि पऱ्या राहतात. आम्ही बाहेर पडलो की ते येत नाहीत आणि ते आले की आम्ही बाहेर पडत नाही...यही संतुलन होता है समझे क्या?"

" आमची खूप मोठी चूक झाली..आम्हाला माफ करा..." दोघे कळवळून आयुष्याची भीक मागायला लागले.

" एक अट आहे...इथून जे काही घेऊन गेला आणि त्यातून जे काही मिळवलं ते परत आमच्याकडे येईल...आणि यापुढे इथे तुम्ही आला तर तुम्हाला इब्लिसच्या जहन्नममध्ये टाकलं जाईल...मंजूर?" रक्ताने माखलेले दात विचकट इब्लिस म्हणाला.

" आम्ही तयार आहोत.." दोघांनी लगेच सगळ्या अटी मान्य केल्या. त्यांचा कयास फक्त पैशांचं नुकसान होईल असाच होता, पण बघता बघता त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या बायका, मुलं, पशुधन, घर , खजुराची बाग आणि दागदागिने एक एक करत हवेत तरंगत त्या सरोवराच्या मध्यभागी जमा झाले. अली आणि फाझल ते बघून धाय मोकलून रडायला लागले. त्यांच्या देखत त्यांचं सर्वस्व सरोवराच्या काळ्या डोहात गायब झालं आणि ते दोघे बाजूच्या टेकडीच्या खडकावर पडले. दोघे हमसून हमसून रडत होते.

त्या दिवशीपासून त्या वादीच्या एका टोकाला अली आणि दुसऱ्या टोकाला फाझल आपल्या हाताने त्यांनी तयार केलेल्या चौक्यांमध्ये राहू लागले. दिवस मावळल्यावर कोणीही त्या वादीच्या दिशेला जाणार नाही याची दक्षता ते घ्यायला लागले .उरलेल्या वेळात मशिदीत अल्लाहची खिदमत करायला त्यांनी सुरुवात केली. पैसा , सोनंनाणं, घर यापेक्षा शाश्वत अशी ईश्वरभक्ती त्यांना झाल्या प्रकाराच्या धक्क्यानंतर सावरायला मदत करत होती. पौर्णिमा असो की अमावस्या, तितकी एकाच शक्ती त्या दोघांबरोबर सतत राहत होती.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरस कथा !

वादीचं वर्णन आल आहे पण वादी म्हणजे काय एक्झाटली?

@आसा,
चित्रपट "रोजा", गाणे " ये हसीं वादिया ये खुला आसमाॅ "

छान

वादी शब्दावरून मराठी वाडी शब्द आला आहे म्हणे

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/