भरतवाक्य

Submitted by ज्येष्ठागौरी on 25 May, 2020 - 01:12

भरतवाक्य

माझ्या आयुष्यात पडघमचे दिवस अगदी मंतरलेले होते.काय दिलं नाही त्या दिवसांनी! माझ्या आयुष्यातला तो एक फार रसरसता होता. कारण या नाटकाबरोबर रग्गड उद्योग असायचे, कुठे एका जर्मन माणसानी केलेलं फोटोशूट असेल किंवा नसिरुद्दीन शाह यांनी घेतलेलं एक जबरदस्त शिबिर असेल ,काहीतरी चालू राहायचं,सतत कुठंतरी! किती मजा केली या सगळ्या काळात , किती शिबिरं, किती फिल्म फेस्टिव्हल्स, किती नाटकं बघितली.
लहानपणी बापूंनी थिएटरमध्ये संगीत नाटकं दाखवली ,तशीच नाटकं मुद्दाम विंगेतूनही दाखवली.प्रभाकर पणशीकर यांचं 'तो मी नव्हेच 'प्रेक्षकातून एक प्रयोग आणि विंगेतून एक असे पाहिले.ते आपली भूमिका बदलताना कपडेच काय पण बाकी किती गोष्टी काय झपाट्याने बदलायचे आणि त्या फिरत्या रंगमंचावर काय संमोहून टाकायचे हेही दाखवलं होतं ,पण स्वतः त्यात असण्याची मजा काही औरच होती. या निमित्तानी जर्मन एम्बसीमध्ये खास जेवण, एन सी पी ए मध्ये नाटक सादर करायची संधी आणि एन एस डी मध्ये नाटक करायची संधी तसंच कलकत्त्याच्या नांदीकार महोत्सवात सहभागी होऊन, शंभूमित्रा यांच्यासारख्या दिग्गजांशी बोलायची संधी मिळाली हे परम भाग्यच म्हणावं लागेल .एरवी ह्या केवळ स्वप्नातल्याच गोष्टी असू शकतात. पडघम ,दिवंगत विठ्ठलराव गाडगीळांपासून ते काशीनाथ घाणेकरांपर्यंत आणि सईद मिर्झा यांच्यापासून शंभू मित्रांपर्यंत अनेकांनी पाहिलं, त्यांना आवडलं.त्यातल्या गाण्यांची मोहिनी बराच काळ लोकांच्या मनात राहायची ,तिथं आमच्यासारख्यानी ज्यांनी काम केलं त्यांच्या मनात कायमची घर करुन बसली नसती तरच नवल.अजूनही कधीतरी अचानक न कळत ती गाणी ओठावर येतात .किती मनापासून छान वाटतं.आनंद मोडकांचं केवढं ऋण आहे हे. पडघमनंतर मला कधीही स्टेजची भीती वाटली नाही. मी नुकतीच मुलींच्या शाळेतून आणि घरच्या उबदार वातावरणातून बाहेर आले होते पण पडघममध्ये इतक्या मुलांमध्ये काम केलं, वावरले म्हणून माझ्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा आत्मविश्वास वाढला.मुंबईत खूप फिरले ,दिल्ली ,कलकत्ता यासारख्या ठिकाणी खूप बघायला मिळालं. चक्क ट्रेनमध्ये दारात बसून गप्पा मारल्या,पहाटे तीन वाजता थंडीत थम्सअप प्यायलं.संगीत, नृत्य ,साहित्य अशा खूप सुंदर गोष्टी कळल्या ,मला माझी जाणीव झाली ,माझी मला मी सापडायला लागले आणि मुख्य म्हणजे मैत्र समजलं.खरं तर खूपच छोटं काम केलं मी या प्रांतात आणि आयुष्यात नंतर कधीही या क्षेत्रात काम केलं नाही परंतु अगदी सहभाग नसला तरी प्रत्येक कलाकृतीच्या प्रत्येक कलाकाराची त्या मागची मेहनत, कष्ट आणि गुणवत्ता ही जाणवत राहिली आणि खरं सांगायचं तर नाटक फक्त सादरीकरणापुरतं कुठं मर्यादित असतं? नाटक नेहमी माझ्या हृदयात आणि डोक्यात असतंच की.माझ्या मनात अनेकदा संवाद रचले जात असतात,कधी नकला असतात,कधी गाणी असतात , एखाद्या प्रसंगात कुमारांचा आर्त सूर आठवतो, कधी सतार झंकारते,घरात रचना बदलताना नेपथ्य,प्रकाशयोजना मनात असते.नाटक माझ्या मनात असतं,सतत, सदैव!
माझ्या बरोबरच्या मित्रमंडळींना या क्षेत्रात काम करुन पुढे जाताना मी बघते, ऐकते तेंव्हा मनोमन आनंद आणि अभिमान या दोन्ही गोष्टी दुथडी भरुन वाहतात आणि विशेष म्हणजे कधीही असूया किंवा हेवा वाटत नाही किंवा या क्षेत्रात असते तर कधीही जीवघेणी स्पर्धा केली नसती हे या खऱ्या मैत्रीचं द्योतकंच नाही का.त्यांच्या सगळ्यांच्या यशाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांचा मला नेहमी आनंद झाला. खरंतर इतक्या वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय. प्रत्येकजण आपापलं आयुष्य वाहतोय अन वागवतोय. तरीसुद्धा आजही अनेक अनेक वर्षांनी भेटलेला पडघमेट मला तितक्याच प्रेमानी भेटतो हे त्या नाटकाचे उपकारच नाहीत का.
सामान्यतः आपण अतिशय सहजपणे तो/ती नाटक करतेय हे फार वेगळया अर्थानी म्हणतो म्हणजे खरं तर उपहासानी किंवा कुचेष्टेनीच किंवा रागानीच.पण खरं तर नाटक खूप वेगळं असतं, कथा, संवाद,विषय,कला,कलाकार, संगीत,नृत्य,प्रकाशयोजना, नेपथ्य अशा सर्व बाजूंचा विचार करुन केलेलं असतं आणि कलाकार (पडद्यामागचेही) , दिग्दर्शक ,संगीतकार,लेखक यांच्या अपार मेहनतीचा परिपाक असतं. ते एक वचन असतं रंजनाचं आणि वास्तवाचं. मखमली पडद्यामागे जादूचं एक विश्व असतं आणि मुख्य म्हणजे ते खूप खरं असतं ,परमेश्वराच्या पूजेसारखं असतं. हर प्रयोगागणिक नाटक करणारा , समृद्ध होत जातो.
कोणी म्हणेल की पडघम ही एक छोटी गोष्ट आहे, असेलही पण त्या छोट्या गोष्टीच्या रुपानी झालेल्या बदलांना आणि त्या निमित्ताने भेटलेल्या मित्र मैत्रिणींना एकवार पुनःश्च झिलई मिळाली.अगदी चकचकीत!
बापू सांगायचे पूर्वी प्रत्येक नाटकाच्या शेवटी एक भरतवाक्य असायचं, त्यात नाटकाचं सार आणि रंगदेवतेचा आशीर्वाद असायचा, माझ्या पडघमेट्सच्या शेवटच्या लेखाचं हेच भरतवाक्य आहे की एकदा चेहऱ्यावर प्रकाश पडला की आतून उजळून येतं, चेहऱ्याला रंग लागला की मनातून रंगाची उधळण सुरु होऊ लागते आणि मग नंतर नाटक करा किंवा न करा, तुम्ही तुमचे रहात नाही,नाटक तुमची सतत पाठराखण करत राहतं.कधी खुले आम तर कधी छुपं. तुमच्या मनात तुम्हाला साथ देत राहतं ,कधीच हात सोडून जात नाही. तुमची परवानगी असो व नसो ते तुमच्या मनात अखंड तेवत राहतं नंदादीपासारखं आणि एकदा नाटकाकडे वळलेलं पाऊल कधीच परतून येत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय समृद्ध अनुभवाबद्दल इथे लिहिल्याबद्दल मनापासून आभार.
शेवटचा परिच्छेद तर अगदी भिडला.
पुढेही असंच छान काही वाचायला मिळेल,‌ अशी आशा आहे.

खूप छान लिहिले आहे.

नाटक मनात सुरुच रहातं.

मी माझ्या दहावीच्या सुट्टीत नाट्यसंस्कार अकादमीच्या बालनाट्य शिबीरात भाग घेतला होता आणि नंतर मला त्यांच्या दोन नाटकात काम करायची संधी मिळाली होती. एकूण प्रयोग ३- ४ च झाले असतील. पण त्यावेळी बरेचदा अभिमानाने सांगायचो गंधर्व भरतला प्रयोग केलेत मी म्हणून. एक प्रयोग तर चाकणलाही, एका शाळेत झाला होता, त्या वेळी घरी पोचायला दुसर्‍या दिवशीचे पहाटेचे तीन वाजले होते म्हणजे रात्री उशीरा बाहेर राहण्याची परमावधी. म्हणजे दौरा कसा असतो ह्याची झलकही मिळाली. नंतर आयुष्यात आजवर कधीही नाटक केलेले नाही. नोकरी निमित्त बरीच वर्षे पुण्याबाहेर काढल्यामुळे नाटक फारसे बघितलेही गेले नाही पण नाटक आपलंसं वाटतं कुठेतरी मनात रुजलेले आहे.

पडघमेट्स करता मनापासून धन्यवाद

मस्त झाली लेखमाला! आम्ही पण समरस होत गेलो तुमच्या ह्या प्रवासात. लेखमाला संपली तरी इतर लेखन वाचायला आवडेल खूप छान लिहीता तुम्ही!

हे भरत वाक्य म्हणजे संपूर्ण लेखमालेचे सार आहे. उत्कट आणि सखोल.
आयुष्यात एखादा कालखंड अशी काही मानसिक समृद्धी देऊन जातो की ती शिदोरी जन्मभर पुरते.
लिहीत राहावे. आम्ही वाचण्यास अधीर आहोत.

१९७५ ते १९९० हा काळ सांस्क्रुतिक अ‍ॅक्टिविटिज साठी सुवर्णकाळ होता.आणि त्यातल्या त्यात पुणे तर मोठ्या मोठ्या कलाकारांचे वास्तव्य असलेले शहर ! आणि पुरुषोत्तम स्पर्धा, थिएटर अ‍ॅकॅडेमी वगैरे नाट्य क्षेत्राला धुमसवणार्या ठिणग्या इथे होत्या.
यात झपाटला नाही असा त्या काळातला तरूण सापडणार नाही.
तुम्ही तर हे जग जगलात. भाग्यवान आहात.
उत्त म लेख..

खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. पडघमेट्स सोबत तुमचा व्यक्ती म्हणून घडतानाचा प्रवास खूप आवडला.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद.

खूपच सुंदर समारोप केलात!! कित्येक वाक्ये आवडली, इथे अवतरणे टाकली तर पूर्ण लेखच लिहिला जाईल ही भीती Happy

तुमच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे, ह्या लेखमालेतही काही राहून गेले असेल... लिहीत राहा...

सुंदर लेखमालेचा तितकाच सुंदर शेवट.
लेखात उल्लेख झालेले काही कलाकार माहिती होते, काहींबद्दल आवर्जून जालावर शोधलं यानिमित्ताने...