पडघमेट्स पुढचा भाग

Submitted by ज्येष्ठागौरी on 23 May, 2020 - 23:59

पडघमेट्सची स्वतःची एक भाषा होती. हंते तंटे बणते,जी बहुदा अजूनही मला समजणार नाही . काही विवक्षित वाक्प्रचार होते.गरिबांचा/ची म्हणजे दिसण्यात साम्य.जशी मेघना गरीबांची किरण वैराळे,तशी मजल गरीबांच्या लीला गांधीपर्यंत जायची.प्रयोगाला येणाऱ्या चांगल्या दिसणाऱ्या मुली असतील तर कुठल्याही बाराखडीत न बसणारा आँठछे असा एक कोडवर्ड होता जो नंतर आम्हा मुलींनाही माहिती झाला. अजून एक शब्दच्छल करायची मंडळी म्हणजे उकाडा वाढलाय याला औकाड्य वाढलंय म्हणायचं,मग कधी कोणी शर्ट काढला की औघाड्य वाढलंय असं म्हणायचं किंवा मृदुलाला म्रौदुल्य म्हणायचं.तशी नावं बरीच ठेवली जायची,
कोणाला बॉनेट म्हणायचं कोणाला पांड्या अशी सगळी धमाल अर्थातच स्टेजबाहेर चालू असायची.प्रत्येक प्रयोगानंतर जेवण असायचं.छान साधं आणि भरपूर.मटकीची उसळ हा त्यातला अविभाज्य घटक होता.त्यामुळे "धागा धागा अखंड विणूया" या चालीवर "ताटे वाट्या अखंड भरुया , उसळ पोळी मुखे भरुया"हे गाणंही बसवलं होतं आणि जेवणानंतर backstage च्या लोकांचं जेवण होईपर्यंत जवळ फेरफटका मारुन यायचो. NCPA च्या समोर समुद्राच्या समीप रात्री दोन वाजता बसायची मजा शब्दात नाही सांगता येणार.
दौऱ्यांसाठीच्या प्रवासात पत्ते अखंड खेळले जायचे.मिळेल त्या साधनांवर बडवून गाणी म्हणली जायची बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये तुफान नाचलं जायचं पण हे आमच्याआमच्यातच बरं,दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास नसायचा.इथे प्रेमप्रकरणं विशेष झाली नाहीत याचं महत्वाचे कारण म्हणजे डॉक्टरांचं लक्ष ,त्यांचा अदृश्य पण निश्चित धाक आणि दुसरं म्हणजे इतर पडघमेट्सचं लक्ष.कुठेतरी धुनी पेटली असेलही पण लगेच विझत असणार कारण सगळे जागरुक असायचे.आमच्या आईवडिलांनी उगाच इतक्या विश्वासावर सोडलं नव्हतं थिएटर अकॅडमीमध्ये .दौऱ्यात खूप मजा मजा व्हायच्या. दिल्लीच्या दौऱ्याला गेलो होतो तेंव्हा इंदिरा गांधींची हत्या होऊन चार पाच महिनेच झाले होते , वातावरण तंग होतं. कुतुबमिनारपाशी काक्या आणि अतुल पेठे गुल झाले ते साधारण अर्ध्या तासांनी आले तोपर्यंत डॉक्टरांचा जीव घाबरा झाला होता , आल्यावर त्यांची शाळा झाली आणि कुठं गेले होते याची चौकशी केली गेली तेंव्हा ते दोघं कुतुब मिनारच्या बाहेर नागाचे खेळ करणाऱ्या माणसाला पटवून त्याच्या नागाला थम्स अप पाजत होते.अशी टेप त्यांनी लावली.ह्याच दौऱ्याहून परत येताना पहाटे तीन वाजता भोपाळ स्टेशनवर गाडी थांबली असताना काक्या खाली उतरला आणि गाडी सुरु झाली तरी आला नाही, सगळेजण चिंतेत,ह्या मुलाच्या अंगावर झोपायचे कपडे त्यामुळे खिशात दमडी नाही.मग असा ठरलं की या परिस्थितीत जर का काक्या पुण्यात पोचला तर तो आयुष्यात प्रचंड पुढे जाणार,पण पुढच्याच स्टेशनला काक्या दुसऱ्या डब्यातून आला ,त्यामुळे त्याची प्रगती थांबली असं अनेक दिवस ragging काक्यानी सहन केलं, शारीरिक फटके खाल्ले ते वेगळेच. मणिबेन पटेलही आमच्याबरोबर दौऱ्याला असायच्या.त्यामुळे वेडंवाकडं वागायची हिम्मत नव्हतीच कोणाची.अगदी घरगुती वातावरण होतं. मुलं आम्हा मुलींना अगदी तोंडावर बिनदिक्कत "काय चोची रंगवल्यात ,कमी करा लिपस्टिक" असंही म्हणायची आणि आज तू छान दिसते आहेस असंही म्हणायची त्यामुळे टीका आणि दाद दोन्ही गोष्टी स्वीकारायची सवय झाली, तसा दुसरा पर्यायच नव्हता म्हणा.अशा मजा मजातून प्रयोग आणि प्रवास मस्त व्हायचे.आमच्या सगळ्या प्रयोगांची जबाबदारी अण्णा राजगुरु घ्यायचे आणि तसेच ठकारही. ही माणसं कोणत्या मुशीतली होती माहिती नाही पण फक्त आपल्या कंपनीचं नाटक या एकमेव कारणास्तव सामान उचलायलाही मागे पुढे बघायची नाहीत.एकूण सगळेच जण नाटक चांगलं व्हावं यासाठी धडपडायचे.अजून एक भारी किस्सा सांगते आणि या भागापुरतं थांबते.या नाटकाच्या निमित्तानं नसीरुद्दीन शाह यांचं एक शिबीर झालं.पुरंदरे प्रकाशनाच्या भोपटकर वाड्यात दुसऱ्या मजल्यावर हे शिबीर झालं. त्यात एक स्वाध्याय होता. दोन जणांचा एक गट बनवला होता, त्यातला एक जण गाढ झोपला आहे आणि दुसरा त्या घरात शिरतो.हीच एक situation. त्यात आपली कल्पना वापरायची, जागा असलेला घरात शिरणारा माणूस चोर असू शकतो किंवा रात्री उशीरा घरी आलेला मुलगा असू शकतो ती त्या दोघांनी ठरवायचं आणि सादर करायचं.यात सगळ्यात महत्वाचा भाग होता जी व्यक्ती जागी आहे तिने तिचं काम आवाज न करता करायचं.अगदी चिडीचूप सगळे,पाहणारे, स्वतः नसीर आणि सगळ्यांनी अगदी शांत बसायचं.हा स्वाध्याय होता जो जागा आहे त्याच्यासाठी. त्यानंतर विचार विनिमय व्हायचा.अतुल पेठे आणि त्याचा साथीदार यांनी काहीतरी ठरवलं.ठरल्याप्रमाणे त्याचा साथीदार झोपी गेला, सगळं वातावरण शांत अगदी शांत झालं. आता वाट होती अतुलनी यायची आणि उत्सुकता होती त्यांनी काय situation ठरवली होती आणि ती कशी पार पाडली ह्याची.बराच काळ गेला अतुल आलाच नाही, चुळबूळ करावी तर नासिरची सक्त ताकीद होती.खूप वेळानी अतुल आला डोक्यावर हेल्मेट, खांद्याला शबनम आणि धापा टाकत.पण स्वाध्यायाच्या नियमानुसार तो पूर्ण होईपर्यंत कोणी काही बोलायचं नाही असा दंडक होता.स्वाध्याय संपल्यावर नासिरनी अतुलला विचारलं की काय situation घेतली होतीस.अतुल सांगायला लागला की मी स्कूटरवरुन जात असताना माझा कोणालातरी धक्का लागला असतो त्यामुळे मी जीवाच्या भीतीनं पळत येऊन या घरात लपतो.नसीर त्याच्या अभिनयाबद्दल त्याचं कौतुक करेपर्यंत बाहेर एक आठ दहा जणांचा जमाव जमला.कारण असं की हा स्वाध्याय करण्यासाठी नेहमीप्रमाणे नाटकात घुसलेल्या अतुलनी डोक्यावर हेल्मेट आणि हातात शबनम ह्या अवतारात लिमये टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट पासून धावायला सुरुवात केली ते थेट भोपटकर वाड्यातल्या पुरंदरे प्रकाशनपर्यंत.म्हणजे दोन चौक पुढे.त्यामुळे संशय आलेली काही माणसं त्याच्यामागे पळायला लागली पण अतुलवर नाटक इतकं स्वार होतं की त्याचा वेग अतुलनीय होता आणि तो वाड्यात शिरला पण बाकीच्यांना तो सापडेपर्यंत ५-१० मिनिटं गेली.लोकांना समजावून सांगण्यात कल्याणची बरीच ताकद खर्ची पडली.आम्ही नंतर बराच काळ या विनोदावर हसत राहिलो, पण यातला विनोदाचा भाग सोडला तर अतुलसारखी झपाटलेली माणसं पडघममध्ये होती आणि मला ती जवळून बघायला मिळाली हे किती चांगलं नशीब होतं.ती सगळी जणं खूप छान काम करताहेत अन् कलाक्षेत्रात भर घालताहेत ही फार सुखद गोष्ट आहे,आता शेवटच्या छोट्या भागात भेटू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे भाग आत्ताच वाचले. खूप छान लिहिलं आहे. जणूकाही डोळ्यांसमोर उभं राहिलं सगळं.
पुढील भागांची वाट बघत आहे.