पडघमेट्स~३

Submitted by ज्येष्ठागौरी on 21 May, 2020 - 06:45

पडघमेट्स ~३

आता पडदा पूर्ण उघडतो, रमेश मेढेकर -एक शाळेतील शिक्षक मुलांची प्रार्थना घेतआहेत आणि अचानक प्रेक्षगारातून २० -२५ तरुण तरुणी धावत गात प्रेक्षकातून रंगमंचावर येतात आणि जोशपूर्ण गाणं म्हणतात "आम्ही नवे पुढारी" Prelude सुरु होतं ,प्रेक्षक उत्सुकतेनी पाहताहेत,रसरशीत prelude संपतं मग आत धमाल सुरू होते.आपापल्या भूमिकेनुसार कपडे बदलणं, प्रवेशाच्या वेळी आवश्यक त्या साहित्यासकट विंगेत तयार उभं असणं आणि मुख्यतः आपल्या भूमिकेत असणं, वाक्य न विसरणं हे सगळं थिएटर अकॅडमीच्या शिस्तीनुसार पार पडायचं.कधीही कुठेही चूक नाही. आता नाटक चालू राहतं.आता आतमध्ये सगळी मंडळी रमली आहेत आपापल्या भूमिकांमध्ये ,तोवर त्यांची ओळख करुन घेऊयात.
या संचामध्ये सगळीच भारी भारी व्यक्तित्व होती.काहीच साधे सरळ आणि बाकी सगळे अगदी पक्के ,इरसाल म्हणावे असें, पण अगदी सच्चे आणि खरेखुरे ,कुठलाही अभिनिवेश न बाळगणारे.
नाटकात चार lead गायक होते राहुल रानडे ,राहुल घोरपडे ,नरेंद्र कुलकर्णी आणि नीलेश गोसावी.चौघेही अतिशय उत्तम गायचे.फार मजा यायची ती गाणी ऐकताना.राहुल रानडेला काय यायचं नाही?सगळी वाद्य वाजवायचा,सगळ्या प्रकारची गाणी म्हणायचा,एकदम कलंदर आणि अतिशय गुणी कलाकार. राहुलनी मला पडघमची सर्व गाणी शिकवली.तो गाण्यांच्या रेकॉर्डिंगपासून या सगळ्या प्रक्रियेत असल्यामुळे त्याला काहीच कठीण नव्हतं. राहुलचं माझ्यावर एक फार मोठं ऋण आहे ते म्हणजे त्यानी पहिल्या दिवशी त्याच्या सुंदर घरात म्युझिक सिस्टीमवर 'मिराज ए गज़ल'ऐकवली आणि मी अक्षरशः खुळावले. काहीतरी आगळं वेगळं होतं त्या स्वरांमध्ये.माझ्या या प्रिय मित्रानी ,सुरांचं फार वेगळं जग त्यांनी मला दाखवलं माझा कॅनव्हास बदलला ,मोठा झाला, वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मजा यायला लागली.तो इतका जवळचा मित्र आहे की त्याला धन्यवाद पण म्हणता येत नाहीयेत मला.मोहनचा तो लाडका होताच पण थिएटर अकॅडमीतल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होता, बापूही त्याच्या आवाजावर खूष असायचे. तेंव्हा राहुलची होणारी बायको मीना गानू आताची मीना रानडे ही शाळेत माझ्यापुढे होती आणि छान ओळखीची होती ,त्यामुळे सगळ्या बाजूंनी राहुलची मैत्री झालीआणि राहुलची आई एकदा आमच्याकडे आल्यावर आमची आई आणि बापू आणि त्यांच्या, ज्या गप्पा झाल्या की विचारता सोय नाही ,विषय कलंदर मुलांचं संगोपन आणि पालकत्व यापलीकडे असूच शकत नाही.राहुलचं आणि माझं मैत्र, आम्ही फार क्वचित भेटत असूनही तसंच राहिलंय.
राहुल घोरपडेचा आवाज फार छान आणि शास्त्रीय संगीताची फार छान बैठक असणारा, इतरांच्या तुलनेत कमी पण शेलकं बोलणार अगदी गंमतशीर .चेहऱ्यावर कायम मिश्किल भाव, राहुल संगीत क्षेत्रात काय छान काम करतोय खूप वर्षं.राहुलचे वडील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत घोरपडे हे बापूंचे घट्ट मित्र आणि एकेकाळचे सहकारी.राहुलला छान legacy आहे.
नरेंद्र कुलकर्णी उर्फ नकु ( सतत गाणी म्हणून नकु नकु करतो म्हणून नकु)सतत हसणारा आणि अप्रतिम नाट्यसंगीत म्हणणारा. त्याचबरोबर गाण्यांची तुफान दर्जेदार विडंबन करून म्हणणारा. बगळ्यांची माळ सारखं "सगळ्यांची लाळ गळे अजूनी अंथरुणात" हे गीत मी फक्त पडघमेट्सच्या सहवासात ऐकलंय मी.नकु खूप हुशार होता, आज तो अमेरिकेत उत्तम काम आणि गाणं दोन्ही करतोय.
नीलेश गोसावीच्या आवाजात काळीज चिरत जाणारी अजान ऐकण्यातला आनंद शब्दातीत होता.त्यावेळी मी अजान कधी आधी ऐकली नव्हती. व्यवसायानी आर्किटेक्ट असणारा नीलेश फार छान गायचा आणि सगळ्यांना चुका झाल्या की झापायचा खूप.
आणि देखणा आणि रुबाबदार आणि एकदम तल्लख श्रीरंग~रंगा गोडबोले .त्याची शुद्ध वाणी आणि रंगमंचावरचा त्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर बहारदार होता, बघत रहावं असा होता.रंगा हरहुन्नरी होताच आणि आज त्यानी सिने/नाट्य/दूरदर्शन क्षेत्रात जे काम केलं आहे ते बघून खूप अभिमान वाटतो.टीव्हीवरचे नक्षत्रांचे देणेपासून ते विविध धारवाहिकांची शीर्षक गाणी लिहिणे अशा सर्व क्षेत्रात त्यांनी कारकीर्द गाजवली आहे.
नाटकाचा हिरो प्रसाद पुरंदरे;त्याला आपोआप एक वलय होतं, बाबासाहेबांचा मुलगा आणि माधुरीचा भाऊ म्हणून आणि अधिक त्याची स्वतःची एक गूढ प्रतिमा होती , थोडक्यात तो "The "प्रसाद पुरंदरे होता, शक्यतो सगळे जरा बिचकून हाताच्या अंतरावर असायचे पण काही लोकांवर त्याची खास मर्जी असायची. प्रसादची मला आठवतंय ती गोष्ट म्हणजे आमच्या दौऱ्यावरून येताना रात्री गाडीत सगळं जग झोपायचं पण एक ड्रायव्हर आणि प्रसाद हे दोघंच जागे असायचे, तो ही खट्ट उघड्या डोळ्यांनी.त्याचं सगळं वेगळंच असायचं.छान काम करायचा तो ,नंतर त्यांनी सिनेमात काम केलं पण त्याचं सगळं आगळं असल्यानं त्यानी enduro सारख्या साहस खेळांचं आयोजन अप्रतिमरीत्या करण्याचं शिवधनुष्य लीलया पेललं आहे.
तालमीच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी मोहननी मला सांगितलं की हा राया भावे ,तुला घरी सोडेल,तालीम संपल्यावर माझी चुळबूळ चालू ,पण राया गप्पात रमलेला. बरं मला समजेना अगदी अनोळखी अशा माणसाला "राया मला घरी सोडा असं कसं म्हणायचं" नवीन असल्यानं काही माहितीच नव्हती कोणाची! तरी जरा उसनं अवसान आणून म्हणलं "मला घरी सोडता का? मोहननी सांगितलंय ना तुम्हाला आणि दुसरं म्हणजे तुमचं दुसरं काही नाव आहे का राया सोडून? त्यावर त्याचे मोठ्ठे घारे डोळे रोखून तो खणखणीत आवाजात म्हणाला "माझं नाव "श्रीधरप्रसाद लक्ष्मण भावे"आहे. सगळे मला रायाच म्हणतात तू सुद्धा तेच म्हण, मी संजयच्या ओळखीचा आहे सतीश कात्रेचा मित्र आहे आणि तुला फ्रॉक मध्ये बघितलंय मी इतक्या लहानपणापासून तर घाबरू नकोस , बिनधास्त राया म्हण.आज रायाला टीव्ही वर काम करताना बघून हा किस्सा हमखास आठवतो.रायाची अजून एक गंमत आठवतीये.तो आसपास असला की हमखास समोरचा बोलताना"पडायचा" स्टेजवरसुद्धा.त्यामुळे कोणीही बोलताना 'पडलं' की राया जवळ आहे का असं बोललं जायचं.बाहेरही राया आसपास असला की ऑर्डर देताना लोकं चार प्लेट "वरम गडे द्या "असं म्हणायचे गरम वडे ऐवजी! किंवा मसार टुसळ मटार उसळ ऐवजी!माझा नवराही रायाला चांगला ओळखत असल्यानी घरीही कोणी बोलताना पडलं की आम्ही म्हणतो नक्की राया या भागात आला असणार.
पडघममधली नृत्य बसवली हाती माणिक अंबिकेंनी आणि पाश्चात्य नृत्य बसवली होती प्रवीण देशपांडे ऊर्फ पव्या देशपांडे.हा पुण्यातल्या बहुतेकांच्या ह्या ना त्या कारणांनी ओळखीचा असतो.अजूनही मागून येऊन मोठया आवाजात जोरात हक्कानी तो हाक मारु शकतो भर रहदारीच्या रस्त्यावर.तो कुणालाही घाबरत नाही लोकं त्याला घाबरतात.फार छान लय होती पव्यात. त्याच्यामुळे मला पाश्चिमात्य नृत्याची मजा कळली. पव्या हा पुढच्या आयुष्यातही तसाच छान मित्र राहिला.तसंच देवकी गजेंद्रगडकर, मृणाल परांजपे आणि शुभदा पेशवा ह्या कथ्थकचे काही तुकडे करायच्या ते बघताना छान वाटायचं. शुभदा मुलांनी अपशब्द वापरु नयेत यासाठी फार जागरूक असायची.कोणी चुकून च्यायला जरी म्हणलं तरी शुभदा लगेच अदृश्य काठी घेऊन मागे लागायची.
सुरेखा दिवेकरला मी,ती आमच्या डॉ वडगावकर यांच्या शेजारी रहात असल्यामुळे आधी थोडी ओळखत होते.तिनी मला वाटतं, उंबरठा मध्ये भूमिका केली होती.सुरेखाचं या काळात लग्न ठरलं ,मेजर काळे यांच्याशी ठरलं , त्यामुळे तिला मायनर सुरेखा दिवेकर असा 'किताब पडघमेट्सकडून मिळाला.
सुषमा आणि गौरी माझ्या स प मधल्या मैत्रिणी होत्या.सुषमानी आधीच्या वर्षी पुरुषोत्तम गाजवलं होतं आणि गौरी तर जागरच्या परंपरेतून आलेली गुणी मुलगी , गौरी लागू म्हणजे गौरी जोशी ,आम्ही खूप वर्षांपूर्वी आनंद मोडकांची शंकर वैद्य यांनी लिहिलेली "पावसाची गाणी" केली होती, त्यात बरोबर असल्यानी माहितीची होतीच,आता गेली कित्येक वर्षे आकाशवाणीचे पुणे केंद्र आणि ती ही अतूट नाते आहेच.आणि काक्या उर्फ राजेंद्र वडके. हे एक अत्यंत इरसाल व्यक्तित्व.कोणाला काय कधी बोलेल ते सांगता येणार नाही पण पारदर्शक! काक्या दिलदारही खूप बरं, त्याचा पाय fracture झाला असताना त्यानी त्याच्या प्लॅस्टरवर लिहायची सगळ्यांना परवानगी दिली होती, त्यावरुन नंतर मारामारी व्हायची शिल्लक होती, जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणं होतात पण प्लॅस्टरच्या जागेसाठीही झाली आणि नंतर त्या प्लॅस्टरवर कणभरही पांढरी जागा शिल्लक राहिली नाही.त्यावर चित्रं, वचनं, graffitti आणि काक्याला उद्देशून काही उपदेशसुद्धा होते.काक्याचं आतबाहेर काही नाही.विनोदाचा दर्जा वरचा आणि जबरदस्त.कोण माणूस कसा आहे आहे एक झटक्यात ओळखणारा, काक्यानी पुढे ग्रीप्सची सुरुवात ज्या नाटकानी झाली ते "छान छोटे वाईट्ट मोठे' अक्षरशः गाजवलं.फार भारी माणूस.काक्याचा एक अजून भारी किस्सा आहे तो नंतर सांगीन.अतुल पेठे हा तर पूर्ण नाटकात घुसलेला माणूस होता ,आहे आणि राहणार.धमाल काम करायचा.वृत्तीनी थोडा गंभीर पण जेंव्हा काहीतरी विनोद करायचा ते एकदम out of the world असायचे.अतुल खरोखर गुणी आहे आणि खूप चांगलं काम करतोय ह्याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे.अरे बघताबघता खूपच जागा व्यापली की आमच्या मित्रांनी, बाकीची मंडळी पुढच्या भागात भेटतील हां!

Group content visibility: 
Use group defaults

चला बंधूनो रस्त्यावरती
विद्यापीठाच्या उंच उंच भिंतीवरती !

मला आठवतंय की मी पडघमचा पहिला किंवा दुसरा प्रयोग पाहिलाय. आणि हे गाणं छान लक्षात आहे. पण तुम्हाला स्टेजवर पाहिल्याचं काही आठवत नाही बुवा Happy
१९१५ मधे राहूल सोलापूरकर , नकू आणि आम्ही काही जण नकू च्या घरी एलेत जेवायला जमलो होतो तेंव्हा हे गाणं त्याच्या तोंडून बर्‍याच दिवसानी ऐकलं. त्या आधी रंगा २०१३ मधे एका मित्राकडे बोस्टनमधे भेटला होता. तेंव्हाही जुन्या आठवणी निघाल्या होत्या. एकेकाळी मी ही नाट्यकंडू होतो. राहूल, रंगा , गगनविहारी, अभिराम हे एकेकाळी कॉलेजात असताना माझ्या दृष्टीने शत्रूपक्षातले! पण कॉलेज संपल्यावर ते संपलं आणि मग सगळेच वेगवेगळ्या ग्रूपमधून भेटत राहिले. तुम्ही घोंटूल मधे होतात तर विनायक गोगटे आठवतोय का? त्याच्याबरोबर नंतर जागरच्या काही पथनाट्यात ही काम केलंय. तुम्ही दुसर्‍या लेखात म्हटलंय तसं पुण्यात मी भरत, टिळक सगळ्या रंगमंचावर काम केलंय पण गंधर्वला करायची खूप इच्छा असून, अजून तरी पूर्ण झाली नाही.

सुषमा म्हणजे कोंण? ती "सकाळचा अभ्यास" मधे राहुल सोलापुरकर बरोबर काम करायची ती?
तुम्हाला माहित नसेल तर काही गंमती सांगतो. आम्ही काही मित्रांनी मिळून २००१ च्या सुमारास एक गाण्याचा कार्यक्रम केला होता, त्यात मी आणि नकू होतो. तेंव्हा तालमीसाठी दर आठवड्यात भेटायचो. तेंव्हा हे "सगळ्यांची लाळ गळे अजूनी अंथरुणात" त्याच्या कडून ऐकलंय. आम्ही एकदा विडंबन गीतांची जुगलबंदी केली होती. मला वाटते नकू मायबोलीकर आहे पण त्याचा आयडी लक्षात नाही. त्याचा पुतण्या तर नक्कीच खूप अ‍ॅक्टीव मायबोलीकर आहे आणि नकूच्या वडीलांनी लिहिलेली गाणी , नखंचित्रेही मायबोलीच्या जुन्या गणेशोत्सवात पाहता येतील. तुम्ही ज्यांचा पहिल्या लेखात उल्लेख केलात ते रामभाऊ रानडे हे पण मायबोलीकर आहेत. आणि ते अनेक मायबोलीकरांना छान ओळखतात. त्यांची मुलगी आरती ही पण मायबोलीकर आहे. रामभाऊंची मुलाखत पण मायबोलीवर प्रकाशीत आहे.

TA च्या नाटकात काम केलंय ! काय भाग्यवान आहात ! अजून लिहा तुमच्या अनुभवांबद्दल.

अजय तुमचा प्रतिसाद छान आहे,सुषमाची ओळख बरोबर आहे.विनायक चांगला आठवतोय पण नंतर त्याचा काही संपर्क नाही.तुम्हाला त्यातली गाणी आठवताहेत,माझ्या तर मनात मागे चालू असतात.

रामभाऊ कुठे कुठे भेटतात,इतकं छान वाटतं, मोहनचे मित्र भेटले की तो भेटल्याचा भास होतो इतका तो त्यांच्या आठवणीत आहे

हे कुठलं नाटक हा विचार मी मागचे दोन भाग विचार करत होतो. या भागात प्रसादचा उल्लेख आल्यावर नाटक पाहिल्याचं लक्षात आलं. तो 'चला बंधुनो रस्त्यावरती' हे गाणं म्हणायचा. मला वाटतं रंगा पोलिसाचं काम करायचा. इतकंच आठवतंय आता.

फक्त 'चला बंधुनो रस्त्यावरती, नव्या जगाची एकच नीती' इतकंच आठवतंय. त्यामानाने तीन पैशातल्या बर्‍याच गाण्यांचे बरेच शब्द आठवतात.
प्रसादने शाळेत असताना मला आता शिकायचं नाही असं सांगून आईला एक मोठ्ठा धक्का दिला होता. नंतर आईच्या म्हणण्याला मान देऊन फक्त एसेसी पर्यंत शिकला.

नमस्कार, मी विनायक गोगटे. मी घोंटूलमध्ये काम केलं होतं. काही जणांच्या लिखाणात संदर्भ आला म्हणून...