चारचौघात शालजोडीतले मारणारी गाणी

Submitted by MazeMan on 17 May, 2020 - 06:24

५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी. 
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग... 

एखादे राजेशाही घर असते, ऐपतीप्रमाणे ते सजवलेले असते, चिरुट किंवा सिगार ओढणारे [हिं.चि. नियम क्र.१ श्रीमंत माणसे सिगारेट ओढत नाहीत, फक्त चिरुट/सिगार.] पिताजी/डॅडी/चाचाजी असतात, प्रसंगानुरुप सजलेली नायिका असते, तिच्या मैत्रिणी असतात, एक रुबाबदार (विलायतसे लौटा हुआ डॉक्टर/इंजिनीअर/कारखानदार/गेला बाजार पिताजी/डॅडी/चाचाजी के बचपनके दोस्त का बेटा) तरुण असतो, आणि पुढे घडणार्या प्रसंगांना साक्षीदार व्हावेत म्हणुन की काय ५-५० पाहुणे आलेले असतात. अशावेळी उंची पोशाख केलेला एक आगंतुक येतो, नायिकेची आता चुळबुळ सुरु होते. तिची एखादी जिवश्चकंठश्च मैत्रिण तिचा अलगद येउन खांदा दाबते. चाणाक्ष वाचकांनी आतापर्यंत ओळखले असेलच की हा नायक आहे. [हिं. चि. नियम २ तुम्ही नायक असाल तर तुम्ही डॉक्टर/कारकुन/ड्रायव्हर/बेरोजगार काहीही असा, तुम्ही मैफिलीत येताना सुटबुटातच येता.] त्याची जणु वाट बघत असल्याप्रमाणे पिताजी/डॅडी/चाचाजी त्याची आधीच्या तरुणाशी ओळख करुन देतात आणि बॉम्ब टाकतात की मैने अपनी प्यारी बेटी/भांजी की शादी/ सगाई इसके साथ तय की है. आलेला नायक जर दिलीपकुमार कॅटेगरीमधला असेल तर तो डोळ्यावर अचानक प्रकाशझोत पडलेल्या हरणासारखा जागच्याजागी स्तब्ध होतो. आणि तो जर प्रदीपकुमार, मनोजकुमार कॅटेगरीतील असेल तर आपण सुटकेचा निश्वास टाकतो की बरं झालं बाई, नायिकेने अशोक कुमार, प्राण किंवा किंवा असाच कुणीतरी सेन्सिबल माणुस गाठला. 

इथपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं. तेवढ्यात जमलेल्या ५-५० जणांपैकी कुणालातरी आत्तापर्यंत आपल्याला स्क्रीनटाइम आणि डॉयलॉग न मिळाल्याचे वैषम्य येते. तो डिक्लेअर करतो की इस खुशीके मौकेपर गाना हो जाना चाहिये. [हिं. चि. नियम ३ तुम्ही स्त्री/पुरुष/इतर काहीही असा, तुमचा पोटापाण्याचा उद्योगधंदा काहीही असो, तुम्ही शीघ्रकवी+गायक असणे गरजेचे आहे.]

ऑन दॅट क्यु, नायक स्टॅच्यु पोझिशनमधुन बाहेर येतो अन काय आश्चर्य, गायला सुरुवात करतो. (नायिकेचे लग्न ठरत असण्याच्या/त्याच्या बेकारीच्या काळात त्याने घरी बहुधा सराव केला असावा. या काळात नायिकेच्या पि/डॅ/चा ना पटवण्याचा प्रयत्न केला असता तर ये नौबत न आती. असो.) 

बरं गाणे वगैरे एक वेळ ठीक आहे, पण तुझे नायिकेवर प्रेम आहे ना, मग तिला सर्वांसमोर शालजोडीतले कशाला? कोपर्यात घेउन विचार ना की अचानक का बुवा बेत बदलला? हवे तर पुढे काय करायचे याची हींट दे. पण छे! अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत असतो, तसा त्याला आता नायिकेचा पाणउतारा दिसत असतो. 

वानगीदाखल ही गाणी पहा.... 
भिगी रात मधे मीनाकुमारी आणि उमद्या अशोक कुमारच्या भावी लग्नाची पार्टी आहे. तिथे येउन टपकलाय प्रदीप कुमार आणि म्हणतोय काय तर, "दिल जो न कह सका वही राज-ए-दिल कहने की रात आयी"
का? ज्योतिष्याने मुहुर्त काढुन दिला होता का आजचा? बरं, एखादं कडवं म्हणुन झाल्यावर थांबावं, जरा आजुबाजुच्या परीस्थितीचा अंदाज घ्यावा, कुठलं? इकडे अशोक कुमारची भुवई चढलेय, मीनाकुमारीला रडु कोसळतयं आणि हा आपला गातोय "मुबारक तुम्हे किसी की लरजती सी बाहों में रहने की रात आयी". अरे असं नसतं, छान रांगा-बिंगा लावुन, स्टेजवर जाउन, फोटो-बिटो काढुन मुबारकबात दयायची असते. 

नाहीतर हा मनोजकुमार आदमीमध्ये. दिलीपकुमार सुटाबुटात पियानो आळवत वहिदा रेहमानला सांगतोय 
"कैसी हसीं आज बहारों की रात है, एक चांद आसमा पे है, एक मेरे साथ है"
तिला जरा अटेन्शन एन्जॉय करु दे ना. तु कशाला मध्ये तोंड घालतोयस? तुझा मित्र किती आनंदी आहे, बघवत नाहीये का? त्यालाच सांगतोय "मेरी खुशी भी आप के दामन मे आ गयी". तरी बरं दिलीप कुमार आपल्याच धुंदीत आहे आणि त्याचं मनोजकुमारकडे लक्ष नाहीये. 

आणि आदमीमध्ये वहिदाला पुरेसा त्रास नाही दिला वाटतं, पत्थर के सनम मध्ये परत तेच? 
"तुझे हमने मोहोब्बत का खुदा जाना, बडी भूल हुई" झाली ना चुक, मग सुधार आता. एवढी छान मुमताज घुटमळतेय आजुबाजुला. मैफिलीत छद्मी हसणारा प्राण आणि ललिता पवार आहेत. जीव नकोसा करतील ना ते वहिदाचा. वरतुन मानभावीपणा आहेच. "शीशा नही सागर नही, मंदीर सा एक दिल ढाया है

गेल्यावेळी दिलीपकुमारच्या मैफिलीत रंगाचा बेरंग झाला होता, त्यावरुन तो काही शिकेल? नाव नका काढु. राम और श्याम मधे तोही तेच करतोय. "कल तेरी बज्म से दीवाना चला जायेगा". अरे मग वाट कशाची बघतोयस? काय तर म्हणे "तुने लेकिन ना मेरा राज-ए-मोहोब्बत समझा, तेरी आंखोने मेरे प्यार को नफरत समझा" अरे बाबा नक्की ठरव काय ते तिने तुला सोडलय का तिला काही समजत नाही म्हणुन तु जातोयस. 

प्रेमीजनांमधे थोडेफार गैरसमज असंतील तर एक वेळ क्षम्य. पण जब जब फुल खिले मधल्या या शशी कपुरचं काय करावं? स्वतःच्या घरातल्या पार्टीत हा गातोय की 
"तेरी बाहों में देखु सनम गैरो की बाहें, मै लाउंगा कहा से भला ऐसी निगाहे"
अरे बायको ना ती तुझी. थोडातरी विश्वास ठेव. निदान घरातले पाहुणे-बिहुणे गेल्यावर तरी बोल काय बोलायचे ते. 

आणि ५० वर्षांनंतर याच सिच्युएशनवर राजा हिंदुस्तानीमधे आमिर खान पण तेच करतोय? अरे निदान आधीचा पिक्चर तरी बघायचा रे. 

शशी कपुरला बहुतेक नायिकेला टोमणे मारण्यात मजा येत असावी कारण आ गले लग जा मधेही तेच. म्हणे 
"अपना है क्या, चाहे जिए मरे कुछ हो, तुझ को तो जिना रास आ गया"
शर्मिला कावरीबावरी होउन फिरतेय आणि शत्रुघ्न सिगरेटीवर सिगरेटी फुंकतोय, नशिब ओरडला नाही 'खामोश' म्हणुन. 

त्याचाच भाउ शम्मि. तो ही काही मागे नाही या बाबतीत. 'ब्रह्मचारी'मधे नायिका खुश आहे, त्याला गाणे ऐकवायला सांगतेय तर म्हणे "मत हो मेरी जां उदास"

उरला ज्येष्ठ बंधु राज, त्याने तरी कशाला आवर घालावा आपल्या भावनांना? 'अनाडी'मधे नुसतीच आपली पार्टी आहे, कुठली सगाई नाही, कुणी प्रतिस्पर्धी नाही, नुतनने त्याला सोडलेही नाही. तरी पण हा म्हणतो की "मेरे दुखते दिल से पुछो, क्या क्या ख्वाब सुनहरें देखे" आनुवांशिक रोग आहे का या कपुर घराण्याला? 

एखादीला चारचौघात शालजोडीतले मारण्याचा मोह तरी किती असावा? देव आनंद ज्याने मधुबाला, वहिदा, नुतन यासारख्या सुंदर नायिकांशी प्रणयाराधन केलेय, त्याने गॅम्बलरमधे "दिल आज शायर है" गाउन जाहिदाला जाहिर त्रास द्यावा? 

या रोगाची पुढची अवस्था आहे, स्टेजवरुन प्रेयसीचा (बचपनच्या हं) जीव नकोसा करणे जसे की 
"क्या हुआ तेरा वादा" अरे लहानपणी तू जे तुणतुणे वाजवत होतास, त्यावरुन तिने तुला आत्ता ओळखावे का? ते सुद्धा ऋषी कपुरसारखा प्रॉस्पेक्ट समोर असताना? 

नायिकाही मागे नाहीत बरं का! 

वहिदाला इतक्या जणांनी सुनवलेय की तिने बहुतेक सुड म्हणुन 'रंगिला रे' केले असावे. देव आनंदवर काही परीणाम आहे का त्याचा? त्याच्या चेहर्यावर तर आश्चर्याचे भाव आहेत. जाहिदा वैतागलीय पण तिला विचारतो कोण? 

तेच बहुतेक मीनाकुमारीचे झालेय. तिने तरी किती ऐकुन घ्यावे "रंग और नुर की बारात" वगैरे. मग तिही राजकुमारच्या लग्नाच्या पार्टीत म्हणणारच ना "किसी के इतने पास हो के सब से दुर हो गये" 
राजकुमार मात्र खजिल झालाय. साहजिकच आहे, मीनाकुमारीला सोडुन नादिराशी लग्न केल्यावर दुसरे काय होणार? 

माला सिन्हाचे मात्र नशिबच फुटके. तिने एखादा अशोक कुमार किंवा रहेमान बघुन लग्न करावं, तर सभ्य म्हणुन ओळखले जाणारे सुनिल दत्त किंवा गुरु दत्त तिच्या सासरी जाउन गाणी म्हणणार "चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" आणि "जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
अजनबी बनायचे आहेच तर मग मुळात ओळख का दाखवायची? आणि गुरु दत्त म्हणणार की "उफ्फ न करेंगे लब सी लेंगे आसु पी लेंगे". बोले तैसा चाले वगैरे माहीत नाही का रे तुला? 
मग तिने बिचारीने अशाच एखाद्या वेळी धर्मेन्द्रला सुनावले 
"गैरो पे करम अपनो पे सितम, ऐ जान-ए-वफा ये जुल्म ना कर" तर काय चुकले? 

आता नायक-नायिकेचं दोषारोप प्रकरण सुरु असताना, इतर लोक ठोंब्यासारखे उभे असतात आणि गाणं संपल्यावर टाळ्या वाजवतात. मान्य आहे की रफी/लताच्या मखमली आवाजाने एक वेगळीच गुंगी येते. किंवा त्या काळी भारतातली असहिष्णुता वाढली नसावी कदाचित. नाहीतर अशा प्रसंगात जनरली आप्त(मित्र)गण हिंसक प्रव्रुत्तीचे दर्शन घडवायला उत्सुक असतात. 

अलिकडे मात्र अशी गाणी कमी झाली आहेत हे खरं. नायिकाही खमक्या झाल्या आहेत. केलाच कुणी लग्नसमारंभात "अच्छा चलता हुं, दुआओं में याद रखना" म्हणण्याचा प्रयत्न तर सरळ हात धरुन बाहेर काढतात. 

"कालाय तस्मै नमः", दुसरे काय? 

वि. सु. : हा लेख माझ्या पर्सनल ब्लॉगवर पूर्वी प्रकाशित झालेला आहे.

Group content visibility: 
Use group defaults

खुसखुशीत लेख आणि प्रतिक्रिया.
"शीशा नही सागर नही, मंदीर सा एक दिल ढाया है" >> हे असं नुसतं गाऊन पब्लिकला समजणार नाही म्हणून "शीशा नही" नंतर काचेचं झुंबर दाखवतात... मग ओळ पूर्ण करा... पब्लिकला समजलं पाहिजे!
नायिकाही मागे नाहीत बरं का! >> ह्यात सगळ्यांची बाप म्हणजे स्मिता पाटील! आपण जाऊन "दुश्मन न करे दोस्त ने वो" गायचं तर गायचं पण हुकमी अश्रू इ इ आणून राजेश खन्नाला आपला 'व्हिडीयोग्राफर' जॉब प्रोफाईल सोडून 'असिस्टंट सिंगर' व्हायला भाग पाडायचं... कुणा नायकाला पण जमत नाही बरं असं....

किसी बात पर मै किसी से खफा हूं... हे गाणं पण याच कॅटेगरीत येईल का ?

शैली खुसखुशीत आहे. पण ही विरहगीतं आहेत. वाभाडे काढणारी म्हणून खालील गाणी जास्त शोभली असती..

यक चतुर नार , करके शृंगार

राज की बात कह दूं तो... (तेरी औकात क्या है, ये पहले तू बता दे)

कालीरामा का खुल गया पोल, बीच बजरिया फट गया ढोल, हो गया उसका डब्बा गोल

जा जा जा रे, तुझे हम जान गये, कितने पानी मे हो पहचान गये

भाग्यश्री - बहारों ने मेरा चमन लूटकर
या गाण्यातल्या धर्मेंद्र शर्मिला यांचंच
देखा है जिंदगी को कुछ इतना करीब हे
दोन्ही गाण्यात रकीब (स्पर्धक) हा शब्द आलाय

शालजोडीतले न मारता रोखठोक डिस्क्लेमर म्हणायचे तर हरीहरन
ची गझल आहे:
'कोई मौसम हुं तेरे रंग मे ढल जाऊंगा
मै कोई वक्त नहीं हुं जो बदल जाऊंगा..
मै तेरे हाथ की रेखा हुं, मुझे गौर से पढ
कम हुई मोहब्बत तो बदल जाऊंगा'
फुल ऑन नव्या नवऱ्याने आपल्या थोड्या डोमीनेटिंग बायकोला सुनावावे तसे ☺️☺️

शिवाय दुसरी गझल
'जब कभी बोलना, वक्त पर बोलना..
मुद्दतो सोचना, मुख्तसर बोलना..'
एखाद्या कडक नवऱ्याने बायकोला 'वेळेवर सांगायचं मी गाडी थांबवायची असेल तर.ऐनवेळी भर ट्रॅफिक मध्ये सांगायचं नाही.काय भाजी घ्यायची आधी विचार करून मगच गाडी थांबवायची.लांबड लावलेली चालणार नाही.' अशी तंबी दिल्याप्रमाणे वाटतं.(किंवा कॉल मध्ये एखाद्या कामाची मुदत साहेबाला सांगितल्यावर तो सुनावतो तसं.(काय इश्यू असले तर आधीच बोलायचं.सांगून ठेवतो.डेडलाईन च्या 2 दिवस आधी राडा चालणार नाय.)

छज्जातील बंडीही... ही विरहगीतं आहेत. >>>>

दुःखापेक्षा या गाण्यांमधे दोषारोप जास्त आहेत. किंवा These are the songs to wash your dirty linen publicly. त्यामुळे या गाण्यांना पुर्णपणे विरहगीत नाही म्हणता येणार.
माझ्यालेखी विरहगीत म्हणजे "जिंदगी के सफर में गुजर जाते हैं" किंवा "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही"

तुम्ही दिलेली गाणी वेगळ्या संदर्भात/थीममध्ये वाभाडे काढतात.

मस्त लिहिले आहे अगदी. शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजी आठवण झाली. हे नक्की ऐका Biggrin

"हे लोक खानदान ची इज्जत गेली कि भली मोठी पार्टी देतात आणि मग भर पार्टीत हिरोईनचा बाप हिरोच्या थोबाडीत मारतो आणि विचारतो 'पूछ... पूछ इस भरी मैफ़िल में मैंने थप्पड़ क्यों मारा....'" Lol

>> 'तेरे दर्द से दिल आबाद रहा' पण असेल काय यात.

अगदी अगदी. मला सुद्धा हेच आठवले.

>> कोणाच्या मंगनीमधे जाउन त्यांना "आँसू" चे विविध प्रकार सांगणे, मी कसा येडचाप आहे याचे वर्णन करणे असला आचरटपणा तेव्हाची हिंदी गाणीच करू शकत Happy

विशेष म्हणजे अशा दृश्यातल्या लग्नातल्या वधू(हिरोईन)चे नवरे मात्र बावळटच दाखवले जायचे. तिचा प्रियकर तिला उदेश्यून सरळ सरळ "मी तुला खूप खूप मिस्स करीन" असे गाणे म्हणतोय आणि हा ते ऐकून त्याच्याकडे बघून स्मितहास्य करतोय. प्रेक्षक मनातल्या मनात म्हणायचे "इतका माठ कसा रे तू?" Lol बर गाण्यातून त्याच्या मनातल्या भावना पोचवण्यासाठी निदान फक्त चेहऱ्यावरचे भाव दाखवा ना. पण नाही. इथे ओठांच्या हालचालीसहित तो कोकलून कोकलून गाणे म्हणतोय हे स्पष्ट दाखवलेय Lol Lol प्रत्यक्षात मात्र एखाद्याने प्रेयसीच्या लग्नात जाऊन मै खूष हू मेरे आसूओंपे ना जाना मै तो दिवाना दिवाना असे काही बाही ओरडून गायिले तर त्याला बकोटीला धरून हाणत हाणत बाहेर काढतील Biggrin

हे कसय,

वादा करो कभी छोडोगे ना तुम मेरा साथ, जहा तुम हो, वहा हम भी है
छुवो नही देखो पिचे रखो हात...

नाहितर,
तुम किसि और को चाहोगी, तो मुश्किल होगी

नाहितर,
खुषी कि ये रात आयी है

आणि हे एक,
दिल के झरोखे मे तुझको बीठाकर

हि अजून काही....

खूष रहे तू सदा ये दुवा है मेरी:
(यात संजीवकुमारचे हे गाणे ऐकून शत्रुघ्न आपल्या नववधूच्या कानाखाली हाणतोय का काय असे वाटते इथे, पण तसे होत नाही)
https://youtu.be/ayGc5A6X9Go?t=47

तकदीर का फसाना:
(तरी यात शांतारामानी त्याला सुरवातीला बाहेरच रडत बसवले आहे. पण कसचे काय, नंतर तो "तुम तो रहो सलामत" असे खच्चून ओरडत ओरडत लग्नघरात येतोच)
https://youtu.be/hcZaFMbAb4Y?t=184

बाकी, वरच्या दोन्ही गाण्यांत "रफी/लताच्या मखमली आवाजाने एक वेगळीच गुंगी येते" हे मात्र खरेच अनुभवायला येते. अन्यथा असली दृश्ये बघून प्रेक्षक नक्कीच वैतागले असते.

मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे:
https://www.youtube.com/watch?v=ClOyNlOzBRQ

पत्थर के सन्म तुझे हमने तुझे हमने मुहोब्बत का खुदा जाना:
https://www.youtube.com/watch?v=Ij20-IEUTjg

या दिल की सुनो दुनिया वालों
(हे भारी आहे. सरळ सरळ सांगतोय "मला तोंड उघडायला लावू नका. जे चाललंय त्यात मला ख़ुशी अजिबात नाही")
https://www.youtube.com/watch?v=poXBa76JNKk

तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है:
https://www.youtube.com/watch?v=U0qBRoeQa-g

जुन्या गुमराह मधलं चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो हे गाणे जुने प्रेम प्रेयसीच्या नवऱ्यासमोर उघड करणारे, पण वाभाडे काढणारे नव्हे. उलट प्रेयसीची (आणि स्वतःचीही) समजूत घालणारे.

छुवो नही देखो जरा पिछे रखो हात >>> खरं. तिसरा ॲंगल नाहीये इथे. पण शर्मिलाच्या पाॅईंट ॲाफ व्ह्यू ने सौ फीसदी सच.

मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे >>>
हे एपिक आहे. मी वाट बघत होते कुणी टाकतयं का. एवढ्या शिव्याशाप खाल्ल्यावर पिक्चरमधेच काय, प्रत्यक्षात पण आशा पारेख बोलली नसेल धर्मेंन्द्रशी.

तसंच ते खुश रहे तू सदा.

दिल के झरोखे मे तुझको बीठाकर, पत्थर के सनम .... दिलीत की हो ही गाणी वर.

तुम किसि और को चाहोगी, तो मुश्किल होगी
>>> बोल ऐकून वाटतं की राज कपूर टोमणे मारतोय. पण प्रत्यक्षात लाडीक नोंकझोंक टाइप आहे. नुतन छान एन्जाॅय करतेय.

हमेशा तुमको चाहा , चाहा , चाहा >>> हे ऐश्वर्या मनातल्या मनात गाते ना?

वर्तमान मधलं गाणं
तू जो मेरा यार बने
रुंबा रुंबा रुंबा रुंबा
तेरी मेरी खूब जमे
रुंबा रुंबा रुंबा रुंबा

आणि मग हिरो म्हणतो
मेरे लिये फूल बने
काटे भला कौन चुने ☺️☺️

फुल्ल हटाई.
(मी हे असे पिक्चर लक्षात का ठेवते विचारू नका, रात्रीच्या बस मध्ये पिक्चर लागतात त्यात मध्ये मध्ये ही अशी ट्रेलर्स लागायची.मी नागीन(जितेंद्र च्या डोळ्यात डिजिटल झूम ने खुन्यांच्या एच डी इमेजेस ठेवलेला तो), राम लखन, गँगस्टर, बाहुबली हे सर्व बस मध्येच पाहिलेत.)

Lol मस्त लेख!
मोठ्या पार्टीमध्ये असे सरळ सरळ आरोप करणारे, नायिकेला ढसाढसा रडवत गाणारे नायक Lol

नायकाला नोकरी धंदा नाही. विधवा आई कपडे शिवून गुजराण करते. पण ह्यांना सराईतपणे पिआनो वाजवता येतो.
इथे 30 dollar per 30 min rate आहे पिआनो शिकवण्यासाठी Lol मी किती दिवस झाले विचारच करत आहे.

मी_अनू >>>
तुम्ही निदर्शनास आणून दिलेल्या “रुंबा रुंबा” या अप्रतिम गीताचा तुनळीवर श्रवणलाभ घेतला. तेव्हापासुन कान आणि मन आनंदसागरात रुंबत, आपलं डुंबत आहेत. अस्मादिकांच्या दुर्दैवाने दृष्यलाभ झाला नाही. अन्यथा मोक्षप्राप्तीची खात्रीच होती.

संगीततज्ञाने ही निर्मीती करताना सोमरसपान केले असणार. त्याशिवाय का एवढी दैवी कलाकृती पृथ्वीतलावर अवतरली?
Proud

Happy इंटरेस्टिंग धागा!

या प्रकारच्या गाण्यांचा उद्गम माझ्यामते "झूम झूम के नाचो" या १९४९ च्या अंदाज चित्रपटातील गीतामध्ये आहे. राज कपूर, नर्गिस आणि दिलीप कुमार अशी तगडी स्टारकास्ट, पॉसिबली पहिला मल्टीस्टारर ब्लॉकबस्टर. राज कपूर-नर्गिस विवाहित जोडपे आणि दिलीप कुमार दोघांत तिसरा. सीन - राज कपूर आणि नर्गिसच्या लग्नाची रात्र. रिसेप्शनची पार्टी आहे. नर्गिसच्या शीला नामक मैत्रिणीचा डान्स होणार आहे - कुकू या प्रसिद्ध कॅबरेनर्तकी नटीचा मणिपुरी डान्स. तिला पियानोवर साथ दे अशी विनंती नर्गिस दिलीप कुमारला करते. तर दिलीप कुमार सूटकेस भरता भरता "मी तुझ्यावर प्रेम करतो" असे सांगून दूर जाऊ बघतो आहे. यावर नर्गिस "तुला फ्रेंडझोनची लक्षणे समजत नाहीत का?" असे दिलीपला सुनावून आली आहे. आणि राज कपूर प्रयत्नपूर्वक चार्ली चॅप्लिनपेक्षा वेगळा काहीतरी अभिनय करण्याची पराकाष्ठा करतो आहे. अशा पार्श्वभूमिवर आधी ढोलकवर कहरव्याची लग्गी वाजते आणि मग पियानो सुरु होतो. एवढी मणिपुरी-कॅबरे-गुजराती-ढोलक-केरवा-पियानो भेळ केल्यानंतर किमान नौशादची पिलू रागातील सुंदर धून ऐकायला मिळेल अशा अपेक्षेने प्रेक्षक सरसावतो. आणि .......

मुकेश विव्हळू लागतो.

"झूम झूम के नाचो आज, नाचो आज, गाओ खुशी के गीत.
आज किसी की हार हुई हैं, आज किसी की जीत, गाओ खुशी के गीत"

पब्लिकली आपले दु:ख जाहीर करून दिलीपचे दु:ख कमी होत नाही.

"कोई किसी की, आँख का तारा,
जीवन साथी, साजन प्यारा
और कोई तक़दीर का मारा,
ढूँढ रहा है दिल का सहारा"

बरं आता तरी थांबावं पण ....

"देखो तो कितना, खुश है ज़माना
दिल में तरंगे लब पे तराना
बन्द आँख आँसू न बहाना
ये तो यहाँ का ढंग पुराना"

यावर राज कपूरसारखा ढ व्यक्ती सुद्धा सिगारेट फुकत संशयाने नर्गिसकडे बघू लागतो आणि पुढचे रामायण प्रेक्षकाला एक तास झेलावे लागते.

ता.क. ट्रॅजेडी म्हणून चित्रपट सुंदर आहे.

मुघल-ए-आझम मध्ये प्रेमाचा त्रिकोण नाहीए. पण प्यार किया तो डरना क्या या गाण्यात अनारकली , सलीम आणि अकबर दोघांना खुले आव्हान देतेय.

परदा नहीं जब कोई खुदा से , बंदो सें परदा करना

इथे शहानशहाला मी तुझी पत्रास ठेवत नाही, असं सुनावलंय.

पायस >>> Rofl
राज कपूरसारखा ढ व्यक्ती Angry

अंदाज सिनेमात दिलीप कुमार पियानोवर गाणी वाजवताना साइड अ‍ॅक्ट्रेसने काहिही संबंध नसलेले नृत्य करणे ही थीम दिसते

दिलने पुकारामध्ये संजय खान जोशात येऊन शशीला सांगतो की असे गाणे गा की तुझ्या प्रेयसीचं चित्र त्यातून दिसायला हवे. हे सांगताना अर्थात शशीची प्रेयसी संजयच्या बाहोंमे असायला हवीच, नैतर काय मजा??

शशी जोशात येऊन गा म्हटल्यावर काय गातो? तर 'वक्त करता जो वफा, आप हमारे होते, हमभी औरोंकी तरह आपको प्यारे होते...' परिणामी दोघांची कॉमन प्रेयसी राजश्री खेटरांनी मारल्यासारखा चेहरा करून त्याच्याकडे बघत बसते आणि जोशात आलेला संजय खान 'हे कसले चित्र रेखाटतोय हा' ह्या विचाराने गोंधळून जातो. पार्टीतले इतर लोक इतके स्तब्ध उभे किंवा बसलेले दाखवलेत की माणसे आहेत की पुतळे कळत नाही.

हे गाणे पार्टीतले नाही पण तिघांचे आहे ज्यात दोघे एकमेकांना शालजोडीतले हाणताहेत आणि तिसरा माठ यातले काहीच न समजून काव्याला दाद देतोय.

प्रेम कहाणी नाव असलेल्या चित्रपटातील फुल आहिस्ता फेको

या चित्रपटावर एक उत्तम लेख पाडता येईल. पायस वगैरे मंडळींनी एकदा हा चित्रपट पाहावा, इथे लिहावे व आम्हाला उपकृत करावे.

ह्या शृंखलेतले हे एक अतिशय असह्य असे गाणे आहे:

तू औरोंकी क्यू हो गयी:
https://www.youtube.com/watch?v=bwgq6y_lA5Q

हे गाणे काहींना आवडत असेलही पण मला हे गाणे ऐकणे म्हणजे नेहमीच कानावर आणि मनावर असह्य अत्याचार वाटत आलाय. अरे किती ते एकाच सुरात Ranting? "तू ऐसी थी, तू वैसी थी, तुझ्यासाठी मी हे केलं, तुझ्यासाठी मी ते केलं" एकाच सुरातली कंटाळवाणी रट थांबतच नाही आणि शेवटी पुन्हा तेच, कि "तू दुसऱ्याची का झालीस". अरे झाली दुसऱ्याची आता सोड ना विषय गेट लॉस्ट. किशोरकुमारने बिचाऱ्याने अक्षरशः रेटले आहे हे गाणे हे जाणवते. ह्याचा व्हिडीओ मी कधी बघितला नव्हता तो ह्या धाग्यामुळे आता बघितला. तिला मध्ये बसवून सभोवती "तू दुसऱ्याची का झालीस?" म्हणत धिंगाणा घातला आहे. कसे सहन केले असेल तिने आणि ते बघणाऱ्या प्रेक्षकांनी देव जाणे.

Pages