गाडी बुला रही है... ४

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मुंबई पुणे प्रवासात प्रत्येक गाडीची वेगळी मजा आहे. पावसाळ्याच्या दिवसात मुंबईतून परतताना सिंहगड पकडायची आणि बदलापूर नंतर दाराशी उभे राहायचे. मग बाजूला शेतांत ते इरले डोक्यावर घेऊन काम करणारे लोक दिसतात, जवळच्या डोंगरांवर ढग व जोरदार पाऊस साठलेला दिसतो. सगळीकडे हिरवेगार असते, गाडीसुद्धा पूर्ण भिजलेली असते. आणि मग कर्जत सोडले की खंडाळा घाट त्याच्या सर्वात देखण्या रूपात दिसू लागतो. आणि गाडी त्या दृश्यांत भर घालते. दारातून बघितले की इन्जीन पुढल्या बोगद्यात आणि मागचे काही डबे आधीच्या बोगद्यात व मधले डबे बाहेर, कड्यांवरून पडणारे पाणी आणि दुसर्‍या बाजूला दिसणारे असंख्य धबधबे. मधेच लोणावळ्यापर्यंत एखादी गाडी ढकलून आलेली नुसतीच १-२ इन्जिने कर्जत च्या बाजूला जातात आणि मग तो शेवटचा लांब बोगदा येतो. बराच वेळ अंधारात गाडी जात असते. अशा वेळेस खिडकीतून किंवा दारातून खाली बघितले की ते रूळांच्या जवळ बोगद्यात घुमून येणारे आवाज एकदा टेप करून आणले पाहिजेत. मी पुण्याला रस्त्याने व रेल्वेने गेलो आहे, पण गाडीतून घाटाची जी मजा येते, ती रस्त्यावरून येत नाही. मुळात रस्ता जरा बाजूने काढल्यासारखा वाटतो, रेल्वेमार्ग एकदम त्या डोंगर दर्‍यांच्या मधूनच जातो. सिंहगड ची तेथून जाण्याची वेळ अगदी सोयीची आहे, कारण डेक्कन तिथे पोहोचेपर्यंत तेवढा उजेड राहात नाही. आणि ते घाटातले 'रिव्हर्सिंग' म्हणजे नक्की काय असायचे ते लक्षात नाही. फक्त १-२ ठिकाणी एकदम उंचावर नेलेले रूळ दिसतात ते त्यासंबंधी असावेत.

या सगळ्या भागात ती 'समुद्र सतहसे उंचाई' किती आहे हे त्या स्टेशनच्या नावाच्या पिवळ्या फलकांवर अवढे आवर्जून का लिहिले आहे ते माहीत नाही. मात्र घाट पार करून आल्यानंतर ती बरीच वाढलेली दिसते. ही सिंहगड पूर्वी 'जनता एक्सप्रेस' होती. मग तिची डबल डेकर 'सिंहगड' झाली. तिच्या डब्यांत तानाजीच्या इतिहासातील काही चित्रे ही होती (आता माहीत नाही). अशी डबल डेकर होणार हे जेव्हा पेपरमधे वाचले तेव्हा बर्‍याच जणांना प्रश्न पडला की अशी दुमजली गाडी बोगद्यातून कशी जाणार, पण त्याची काळजी घेऊनच डब्यांची उंची फार वाढवली नाही रेल्वेने. मग मध्यंतरी या डब्यांचे पेव फुटले. यात वरती बसून जायला छान वाटायचे. त्या काळात डेक्कनला सुद्धा पासधारकांसाठी एक असा 'डबल' डबा लावत असत. महालक्ष्मी एक्सप्रेस, गुजरात कडे जाणारी 'फ्लाईंग राणी' अशा इतर गाड्यांनाही काही डबे तसे होते. मग मधे काय झाले कोणास ठाऊक, सिंहगड पुन्हा एक मजली झाली आणि ते इतर गाड्यांचे डबेही गेले. सिंहगडचा तो जुना 'रेक' पुण्याहून दौंड कडे जाणार्‍या शटलला लावला गेला.

प्रकार: 

पावसाळ्याचे वर्णन वाचून परत एकदा सगळे डोळ्यांपुढे आले!! किती मस्त वाटत तेह्वा रेल्वेने प्रवास करायला! सहीच!

शैलजा +१ ..

पावसाळी ओव्हरकास्ट वातावरणात एखाद्या ओसाड स्टेशनवर नावाची जी पिवळी धम्मक पाटी असते तीही खास दिसते .. Happy

अगदी लहान असताना बोगद्यातून जाताना भिती वाटायची .. मग भिती गेल्यानंतर हाताच्या सावल्या पाडण्याचे आणि जोरात ओरडण्याचे खेळ चालू झाले ..

मुंबई च्या लोकल्स चाही कायम वेस्टर्न चा प्रवास व्हायचा .. सेन्ट्रल बद्दल पहिल्यापासून सोशल कन्डिशनींग मुळे बायस होता .. सेन्ट्रल रेल्वे चं एकमेव अ‍ॅट्रॅक्शन म्हणजे कळव्याचा बोगदा .. तोही बहुतेक फक्त एका दिशेने जातानाच (टोवर्ड्स ठाणे) लागतो ..

जबरी लेख, तेव्हा पुणे-मुंबई प्रवास रेल्वेने केल्यामुळे सगळं चित्र डोळ्यापुढे आलं.

डबल डेकर सिंहगड मधे वरच्या मजल्यावरुन प्रवास केल्यावर येणारं फिलींग सुरेश वाडकरांच्या गाण्याप्रमाणे असे - 'स्वर्ग त्यापुढे फिका पडे' Happy

योगायोग म्हणजे हे गाणंही रेल्वेतलंच आहे Happy

सशल - कळव्याचा बोगदा फास्ट्/एक्सप्रेस ट्रॅक वर जाताना दोन्ही बाजूने लागतो.

वेस्टर्न ला पूर्वी तरी फक्त चर्चगेट ते विरार हा ६० किमीचा ट्रॅक होता (आता वाढवलाय बहुधा). सेन्ट्रल ला कर्जत (खोपोली) - १००+ किमी, कसारा - १२० किमी व पनवेल/ठाणे वाशी ई असे बरेच ट्रॅक्स आहेत, त्यामुळे पसारा बराच मोठा आहे. (कदाचित ठाणे-वाशी, पनवेल ई हार्बर लाईनपैकी असतील, लक्षात नाही).