मन वढाय वढाय (भाग ५० आणि अंतिम भाग ५१)

Submitted by nimita on 9 May, 2020 - 21:56

नमस्कार माझ्या वाचक मित्र मैत्रिणींनो.. आज माझ्या 'मन वढाय वढाय' या कथेचे शेवटचे दोन भाग तुमच्यासमोर ठेवते आहे. गेले चार महिने मी जितक्या प्रेमानी आणि मनापासून ही कथा लिहिली, तितक्याच प्रेमानी आणि तितकीच मनापासून तुम्ही सगळ्यांनी माझ्या या कथेला दाद दिलीत. प्रत्येक भाग वाचल्यानंतर माझ्या कितीतरी मित्र मैत्रिणींनी, आप्तेष्टांनी त्यांची पसंती मला कळवली..कोणी मेसेज करून तर कोणी चक्क फोन करून ! यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली - माझ्या इतकीच तुम्हीही ही कथा अनुभवली ...या कथेतल्या पात्रांबरोबर माझ्याइतकेच तुम्हीही भावनेनी बांधले गेलात. जर कधी कथेचा एखादा भाग पोस्ट करायला उशीर झाला तर मला त्याची आठवण करून देणारे वाचक बघितले आणि यातूनच तुमचं माझ्यावर आणि माझ्या लिखाणावर असलेलं प्रेम माझ्यापर्यंत पोचलं !

यापुढेही माझ्यावर, माझ्या लिखाणावर असंच प्रेम करत रहा... तुमच्याकडून मिळालेली ही पोचपावती मला नवनवीन लिहायला स्फूर्ती देते ! धन्यवाद !!

!मन वढाय वढाय (भाग ५०)

दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा जेव्हा सगळ्यांसाठी चहा करायला स्वैपाकघरात गेली तेव्हा तिच्या आई आणि मावशीनी पूर्णपणे स्वैपाकघराचा ताबा घेतला होता. तिला आत येताना बघून तिच्या आईनी सांगितलं," आज तुला इथे प्रवेश नाहीये. आज आम्ही दोघी सगळा स्वैपाक करणार आहोत. तुझी लुडबुड नकोय आम्हांला मधेमधे...." स्नेहाच्या हातात चहाचा कप देत वंदना म्हणाली," आज इतक्या दिवसांनंतर आम्हांला चान्स मिळालाय... आज आम्ही तुमच्या तिघांच्या आवडीचे पदार्थ बनवणार आहोत... त्यामुळे आज तुला सुट्टी !" त्या दोघींचा तो उत्साह बघून स्नेहाला खूप बरं वाटत होतं. रजतचा एकत्र राहण्याचा निर्णय योग्यच असल्याची परत एकदा खात्री पटली तिला.

त्या दिवशी घरात एखादा सण असल्यासारखा उत्साह आणि चैतन्य जाणवत होतं. आपल्या आयुष्याला, त्यातल्या नात्यांना आता पूर्णत्व आल्यासारखं वाटत होतं स्नेहाला. ती आता सर्वतोपरी तृप्त होती. आणि त्यासाठी मनोमन देवाचे आभार मानत होती. रजतच्या मनाची अवस्था पण तशीच होती. काल रात्रीनंतर त्याला त्याची स्नेहा पुन्हा नव्यानी मिळाल्यासारखी वाटत होती....गेले काही महिने जी अपूर्णत्वाची भावना जाणवत होती ती आता नाहीशी झाली होती. त्याच्यासाठी महत्वाची असणारी सगळी माणसं आज त्याच्या आसपास होती आणि यापुढेही राहणार होती.

दुपारची जेवणं होऊन सगळे गप्पा मारत बसलेले असतानाच रजतला त्याच्या ऑफिसमधून फोन आला. दोन दिवसांनंतर असणारी एक महत्वाची मीटिंग काही कारणानी prepone करावी लागत होती आणि त्यासाठी थोडा वेळ तरी त्याला ऑफिस मधे जाणं भाग होतं. खरं म्हणजे आज घरातून बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती रजतची. सगळ्यांबरोबर इतका छान दिवस घालवला होता त्यानी. सकाळपासून आई आणि नीलामावशी कडून खाण्यापिण्याचे खूप लाड करवून घेतले होते त्यानी ; चहाचे कप रिचवत बाबा आणि काकांबरोबर खूप गप्पा मारल्या होत्या- अगदी क्रिकेट पासून राजकारणापर्यंत सगळे विषय चघळून झाले होते. कितीतरी वर्षांनंतर आज श्रद्धाबरोबर scrabble खेळायला वेळ मिळाला होता. आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे- आज कितीतरी दिवसांनंतर त्याला त्याच्या स्नेहाच्या डोळ्यांत ती आधीची चमक पुन्हा दिसत होती. हे सगळं सोडून मीटिंग साठी जायचं अगदी जीवावर आलं होतं त्याच्या!

रजतनी त्याच्या सेक्रेटरीला फोन करून मीटिंग पुढे ढकलायला सांगितलं पण काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य नव्हतं. शेवटी नाईलाजानी रजत तयार झाला.तसंही दोन तीन तासांचाच तर प्रश्न होता. निघताना त्यानी सगळ्यांना सांगितलं,"आम्हांला - म्हणजे मला आणि स्नेहाला - तुमच्याशी एका खूप महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलायचं आहे. मी परत आलो की सविस्तर बोलूया." सगळ्यांना 'बाय' म्हणून तो गेला.

आता सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा स्नेहावर खिळल्या होत्या. ती हसत हसत म्हणाली," मी आत्ता काही नाही सांगणार... जे काही सांगायचंय ते रजत आल्यावरच!" तेवढ्यात तिच्या फोनवर कोणाचा तरी मेसेज आला...तिनी बघितलं तर रजतनी मेसेज पाठवला होता - 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय दिवस आहे. आणि त्यासाठी राणीसरकारांना या सेवकाकडून पुन्हा एकदा खूप मोठ्ठं थँक्स ... love you.' स्नेहासाठी रजतचा तो मेसेज कोणत्याही प्रेमपत्रापेक्षा कमी नव्हता. तिनी लगेच त्या मेसेजला स्टार करून ठेवलं... अगदी एखादं प्रेमपत्र जपून ठेवावं तसं ! त्याच्या त्या मेसेजच्या उत्तरात तिनी लिहिलं-' love you too. लवकर परत ये. मी वाट बघतीये.' मेसेज पाठवून झाल्यावर फोन पुन्हा जागेवर ठेवत असताना तिला अजून एक मेसेज दिसला....नाही ; एक नाही तर दोन तीन मेसेजेस होते- सलीलचे ! 'नेहेमीचेच गुड नाईट, गुड मॉर्निंग चे असणार. नंतर बघते.' असा विचार करत ती घरातल्या इतर कामांत मग्न झाली.

जसजशी संध्याकाळ होत आली तसे स्नेहाला रजतच्या परतीचे वेध लागले. खरं तर आता सगळेच त्याची वाट बघत होते. तो परत आल्यावर नेमकं काय सांगणार आहे याची खूप उत्सुकता होती सगळ्यांना. वंदना आणि नीलानी तर सगळ्यांचं तोंड गोड करायला म्हणून आधीच शिरा पण बनवून ठेवला होता. प्रत्येक जण आपापल्या परीनी अंदाज बांधत होता. शेवटी न राहवून श्रध्दा म्हणाली," आई, फोन करून विचार ना बाबांना किती वेळात येणार म्हणून!" स्नेहाला पण वाटत होतं की रजतला फोन करावा ... पण जर तो अजूनही मीटिंग मधेच असेल तर ? असं कामाच्या वेळी फोन केलेलं अजिबात आवडायचं नाही त्याला. त्यामुळे स्नेहानी तो विचार टाळला. सगळ्यांना उद्देशून ती म्हणाली," अजून थोडा वेळ वाट बघूया नाहीतर मग मी त्याच्या सेक्रेटरी ला विचारते." तेवढ्यात स्नेहाचा फोन वाजला... तिनी अक्षरशः धावत जाऊन फोन उचलला... रजतच्या सेक्रेटरीचा फोन होता. 'उशीर होणार असेल यायला," स्नेहा नाराजीच्या सुरात म्हणाली आणि तिनी फोन कानाला लावला. पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलत होतं, पण स्नेहा मात्र काही न बोलता सगळं ऐकून घेत होती. घरातले सगळेच तिच्याकडे अपेक्षेनी बघत होते... पण हळूहळू स्नेहाच्या चेहेऱ्याचा रंग उडाला... तिच्या डोळ्यांत आता सगळ्यांना भीती अगदी स्पष्ट दिसत होती. रजतचे बाबा पुढे झाले आणि त्यांनी स्नेहाला विचारलं," कोण आहे फोनवर आणि काय सांगतायत ते?" पण स्नेहानी काहीच न बोलता फोन त्यांच्या हातात दिला आणि ती होती तिथेच खिळून उभी राहिली. प्रकरण गंभीर असल्याचं सगळ्यांनाच जाणवलं. नीला नी स्नेहाला खुर्चीवर बसवलं. तेवढ्यात रजतचे बाबा म्हणाले," रजतची तब्येत अचानक बिघडली म्हणून इमर्जन्सी मधे त्याला ऑफिस जवळच्याच multi speciality हॉस्पिटल मधे ऍडमिट केलंय. आपल्याला तातडीनी बोलावलंय. चला लवकर सगळे." त्यांचं हे बोलणं ऐकून सगळेच घाबरले. काही क्षण तर कोणालाच काही सुचेना ! पण तेवढ्यात स्नेहानी स्वतःला सावरलं. आत्ता यावेळी असं हातपाय गाळून चालणार नाही हे तिच्या लक्षात आलं.ती लगबगीनी तिच्या खोलीत गेली. पण जाता जाता तिनी सगळ्यांना लवकर जाऊन गाडीत बसायला सांगितलं. श्रद्धाला पाठवून संतोषला बोलावून घेतलं. खोलीतल्या सेफ मधे होती नव्हती ती सगळी कॅश तिनी आपल्या पर्समधे टाकली. तिचं क्रेडिट कार्ड पण बरोबर ठेवलं.आपला मोबाईल घेत ती घराबाहेर पडली. तोपर्यंत संतोषनी गाडी सुरू केली होती आणि सगळे घाईघाईत गाडीत बसतच होते. काहीतरी आठवल्यासारखं तिनी तिच्या बाबांना आणि काकांना विचारलं,"तुमची दोघांची क्रेडिट कार्ड्स, पैसे वगैरे पण आहेत ना तुमच्याकडे? कदाचित गरज पडेल आपल्याला."

त्यांनी होकार दिल्यावर तिनी पटकन घराला कुलूप लावलं आणि संतोषला हॉस्पिटलचा पत्ता सांगायला म्हणून ती समोरच्या सीटवर जाऊन बसली. पंधरा वीस मिनिटांत ते सगळे हॉस्पिटलमधे पोचले. पण त्या पूर्ण प्रवासात कोणाचंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. नीला आणि वंदना दोघी एकमेकींचे हात हातात धरून देवाचं नामस्मरण करत होत्या. श्रद्धा च्या डोळ्यांतून वाहणारं पाणी थांबतच नव्हतं.. तिचे आजोबा तिला त्यांच्या परीनी धीर द्यायचा प्रयत्न करत होते.. पण खरं म्हणजे ते सुद्धा मनातून तितकेच घाबरले होते. स्नेहानी संतोषला गाडी इमर्जन्सी वॉर्ड पाशी थांबवायला सांगितली. मागे वळून बघत ती श्रद्धाला म्हणाली," श्रद्धा , नीट लक्ष देऊन ऐक. मी पुढे जातीये. तू आजी आजोबांना घेऊन ये. आत गेल्यावर समोर reception counter असेल तिथे विचारलं की ते सांगतील रजत कुठल्या खोलीत, कुठे आहे ते....ok बेटा... सगळ्यांना नीट सांभाळून घेऊन ये राणी. आणि कोणीही कसलंही टेन्शन घेऊ नका... काही होणार नाही रजतला...." तेवढ्यात स्नेहाचा फोन वाजला. घाईघाईत आपला फोन रजतच्या बाबांकडे देत ती म्हणाली," काका, जरा बघता का कोणाचा फोन आहे ते?" त्यांनी बघितलं तर सलीलचा फोन होता. कालपासून स्नेहाचा काहीच मेसेज न आल्यामुळे त्याला जरा काळजी वाटत होती आणि म्हणूनच न राहवून त्यानी शेवटी फोन केला होता. काका त्याच्याशी बोलत असतानाच गाडी थांबली आणि स्नेहा खाली उतरून आत पळाली. समोरच्या reception counter पाशी जाताना तिची नजर मात्र चौफेर फिरत होती. अचानक तिला रजतच्या ऑफिस मधला त्याचा एक मित्र दिसला. त्याच्या बरोबर अजूनही काही सहकारी होते. तिनी सरळ त्यांच्या दिशेनी धाव घेतली. स्नेहाला आलेली बघून रजतचा मित्र पुढे झाला. स्नेहानी काही विचारायच्या आत त्यानी बाजूच्या एका बंद दाराकडे बोट दाखवलं. स्नेहानी त्या दिशेनी बघितलं आणि तिच्या छातीत धस्स् झालं. ICCU ??? स्नेहा लगबगीनी आत जायला निघाली ; पण दारापाशी बसलेल्या गार्डनी तिला अडवलं आणि म्हणाला,"डॉक्टर की परमिशन के बिना अंदर नहीं जा सकते मॅडम।" ती वळून त्या मित्राला काही विचारणार इतक्यात आतून एक डॉक्टर बाहेर आले. त्यांनी तिच्या एकंदर आविर्भावावरून अंदाज लावत विचारलं," आप मिस्टर रजत की रिश्तेदार हैं?" स्नेहानी त्यांना आपली ओळख सांगितली. तोपर्यंत श्रद्धा पण सगळ्यांना घेऊन तिथे पोचली होती. त्या सगळ्यांकडे बघत डॉक्टरनी बोलायला सुरुवात केली...सगळे श्वास रोखून, कानात प्राण आणून ऐकत होते....." देखिये, मैं आपको झूठी तसल्ली नहीं दूँगा । Mr Rajat has suffered a massive heart attack...And we are giving him all the neccesary treatment.... but I must tell you....His condition is very critical."

डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली.... जवळच्या खुर्चीचा आधार घेत ती कशीबशी उभी राहिली. तिनी आजूबाजूला पाहिलं. सगळेच डॉक्टरांचं बोलणं ऐकून स्तंभित झाले होते. कोणालाच काही कळत नव्हतं, काही सुचत नव्हतं.. श्रद्धा तर स्नेहाच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडत होती. वंदना आणि नीलाचे हात नकळत जोडले गेले होते. डोळे मिटून त्या दोघीही महामृत्युंजय चा जप करायला लागल्या.

स्नेहाच्या बाबांनी डॉक्टरना विचारलं," Can we meet him?"

त्यांचा हा प्रश्न ऐकून सगळे भानावर आले. आता डॉक्टर काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.... डॉक्टरांनी एक एक करून सगळ्यांना आत जायची परवानगी दिली....पण एक दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथे थांबता येणार नव्हतं. सगळ्यांनी स्नेहाकडे बघितलं- पण तिनी सगळ्यात आधी श्रद्धाला आत जायला सांगितलं. श्रद्धाचे हात आपल्या हातात घेत ती निर्धारानी म्हणाली,"आत जाऊन अजिबात रडायचं नाही हं ... तू रडलीस की तुझ्या बाबांना खूप त्रास होतो - खूप वाईट वाटतं. त्यामुळे आता त्यांना त्रास होईल असं काही नाही करायचं आपण !"

एक एक करून स्नेहानी सगळ्यांना भेटून यायला सांगितलं. तोपर्यंत ती डॉक्टरांशी बोलत होती. रजत च्या या हार्ट अटॅक मागचं कारण, त्याच्या ट्रीटमेंटची साधारण रुपरेषा, त्यातले धोके..... सगळं काही समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी तरी 'कामाचा नको इतका स्ट्रेस आणि सातत्यानी केलेली प्रकृतीची हेळसांड' ही दोन मुख्य कारणं जाणवत होती. तेवढ्यात वंदनामावशी तिच्याजवळ आली आणि म्हणाली,"स्नेहा, मला एकटीला आत जायची हिम्मत होत नाहीये गं...तू ये ना बरोबर." एकीकडे हे बोलत असताना तिच्या डोळ्यांतून अश्रूंची संततधार लागली होती. स्नेहानी डॉक्टरांकडे बघत विचारलं," हम दोनों एक साथ जा सकते हैं?" डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि स्नेहाकडे आदरानी बघत ते म्हणाले," Mam, you are a brave lady." त्यावर खिन्नपणे हसत स्नेहा उत्तरली," I don't have a choice....do I ?"

स्नेहा आणि वंदना जेव्हा रजतच्या cubicle मधे पोचल्या तेव्हा तिथे एक दोन डॉक्टर्स आणि नर्सेस त्याची शुश्रुषा करत होते. स्नेहानी रजतकडे बघितलं. त्याचे डोळे बंद होते.... जणूकाही अगदी शांत झोप लागावी असा निपचित पडून होता तो....तिच्या चेहेऱ्यावर क्षणभर भीती पसरली. पण वंदनामावशीकडे लक्ष जाताच तिनी स्वतःला सावरलं...पण तिथे कोपऱ्यात उभ्या असलेल्या नर्सनी स्नेहाची मनस्थिती बरोबर टिपली होती...तिनी धीर देत सांगितलं की औषधांमुळे पेशंट गुंगीत आहे... वंदनामावशी काही न बोलता रजतच्या डोक्यावरून हात फिरवत उभी होती. स्नेहानी त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या कानापाशी आपला चेहेरा नेत हळू आवाजात बोलायला सुरुवात केली....ICU च्या त्या शांत वातावरणात स्नेहाचा एक एक शब्द अगदी स्पष्ट उमटत होता..."रजत, तुझं काल रात्रीचं सगळं बोलणं माझ्या लक्षात आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्या मनात जे काही आहे त्याप्रमाणेच होईल सगळं.... पण त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे....आपण दोघं मिळून सगळं ठीक करू.... कारण तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तू आहेस ना माझ्याबरोबर ?....कायम ?....."

स्नेहा बोलताना मधेच थांबली. तिच्या हातात असलेल्या रजतच्या हाताची पकड घट्ट झाल्याची जाणवली तिला.... तिनी चमकून रजतकडे बघितलं- त्याच्या मिटलेल्या डोळ्यांतून दोन अश्रू ओघळले...आणि पुढच्या काही क्षणांत समोरच्या मॉनिटरच्या स्क्रीनवरची - डोंगर दऱ्या पार करत जाणारी त्याची जीवनरेखा अचानक सरळ धावायला लागली..... ते बघून स्नेहा बधीर झाली....तिला आजूबाजूचं काही दिसत नव्हतं, काही कळत नव्हतं..... जाणीव होती ती फक्त तिच्या हातातल्या रजतच्या हाताची... काही क्षणांपूर्वी तिला जाणवलेली ती घट्ट पकड आता सैल पडली होती.....लांबून कुठूनतरी डॉक्टरांचे ते तीन शब्द तिला ऐकू आले... "I AM SORRY....."

क्रमशः

मन वढाय वढाय (भाग ५१...अंतिम भाग)

"अगं स्नेहा, आता पुरे झालं आजचं काम ! ये खाली;चहा तयार आहे." स्नेहाच्या आईनी इंटरकॉम वर फोन करून स्नेहाला बोलावलं. "हो, आलेच," म्हणत स्नेहानी हातातला ब्रश खाली ठेवला. कामाचा सगळा पसारा आवरला आणि स्टुडिओला कुलूप लावून ती खाली गेली. आज संध्याकाळचा चहा तिची आई करणार होती. स्नेहा खालच्या मजल्यावर पोचली तेव्हा वंदनामावशी आणि काका पण आलेच होते. चहा पिता पिता एकीकडे सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या- विषय होता- स्नेहाच्या art work चं exhibition ! हो, रजतची खूप इच्छा होती- हे असं exhibition करायची.... आता तो जरी या जगात नसला तरी त्याच्या आई बाबांनी त्याचं ते स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं होतं ! पुढच्या आठवड्यात रजत च्या जन्मदिवशी त्यांनी शहरातल्या एका प्रसिद्ध art gallery मधे स्नेहाच्या पेंटिंग्ज चं आणि पॉटरी वर्क चं प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यांच्या तर्फे त्यांच्या दिवंगत मुलाला जन्मदिवसाची ही भेट द्यायचं ठरवलं होतं त्यांनी!

रजतला हे जग सोडून आता जवळजवळ दोन वर्षं होत आली होती. स्नेहानी त्याच्या शेवटच्या क्षणांत त्याला दिलेलं वचन पूर्ण केलं होतं. बडोद्याला कायमचा रामराम ठोकून ती आणि श्रद्धा आता औरंगाबादला शिफ्ट झाल्या होत्या. त्यांच्या राहत्या घरातच वर दोन मजले वाढवून घेतले होते तिनी. तळ मजल्यावर रजतचे आई बाबा, स्नेहा आणि श्रध्दा... पहिल्या मजल्यावर स्नेहाचे आई बाबा आणि दुसऱ्या मजल्यावर स्नेहाचा स्टुडिओ! सगळं काही रजतच्या मनाप्रमाणे !! स्नेहानी तर एक पाऊल पुढे जाऊन लिफ्टची पण सोय करून घेतली होती...म्हणजे वाढत्या वयाबरोबर घरातल्या वयस्क मंडळींना त्रास नको ! श्रद्धा चा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही चालू होता. आता हळूहळू सगळ्यांनीच रजत शिवाय जगायची सवय करून घेतली होती. प्रत्येकाला मनातून रजतची उणीव भासत असली तरी आपल्या वागण्या बोलण्यातून कोणी ते जाणवू देत नव्हते. स्नेहा जरी कोणासमोर बोलून दाखवत नसली तरी तिला पदोपदी रजतची आठवण यायची . त्याचा आवाज, त्याचा स्पर्श, त्याचं ते हसणं, त्याचं तिच्या आसपास असणं.... सगळं मिस करत होती ती !! तिच्या दिवसाची सुरुवात रजत च्या फोटोला 'good morning ' म्हणत व्हायची आणि रजतचा तो शेवटचा मेतेज वाचत तिचा दिवस संपायचा...आजपर्यंत किती पारायणं केली होती तिनी त्या मेसेजची....

'आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय दिवस आहे. आणि त्यासाठी राणीसरकारांना या सेवकाकडून पुन्हा एकदा खूप मोठ्ठं थँक्स ... love you.'

हे वाचल्यावर खरंच तिला तिचा दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटायचं.

स्वतःच्या मनाला कुठेतरी गुंतवून ठेवायला म्हणून स्नेहानी स्वतःला तिच्या कामात बुडवून घेतलं होतं. तसं पाहिलं तर रजतनी भविष्याच्या दृष्टीनी सगळी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवली होती. श्रध्दाच्या शिक्षणासाठी, पुढे जाऊन तिच्या लग्नासाठी सुद्धा लागणाऱ्या पैशांची सोय केली होती त्यानी... वेळोवेळी केलेली बचत, investments, life insurance....सगळं कसं अगदी सिस्टिमॅटिक ....त्याच्या स्वभावाला अनुसरून ! त्यामुळे स्नेहाला ती काळजी नव्हती. पण तरीही तिनी तिचं काम चालू ठेवलं होतं....याचं अजून एक कारण म्हणजे - रजतची देखील तीच इच्छा होती !

कधी कधी जेव्हा ती या सगळ्या घडामोडींबद्दल विचार करायची तेव्हा तिला वाटायचं..' रजतला त्याच्या शेवटच्या दिवसांत आतून काही जाणवलं असेल का ? आणि म्हणून त्या दिवसांत तो सारखा सारखा इमोशनल होत होता का?' तिनी एकदा एका पुस्तकात असंच काहीसं वाचलं होतं...की काही लोकांना त्यांचा काळ जवळ आला की एक प्रकारचं intuition होतं .' - रजतच्या बाबतीत पण तसंच झालं असेल का? आणि म्हणूनच त्यानी त्याच्या शेवटच्या रात्री अजाणतेपणी मला त्याची भविष्याची सगळी स्वप्नं सांगितली असतील का?' जेव्हा जेव्हा स्नेहाच्या मनात हे विचार यायचे तेव्हा तिला ते सगळं काही पुन्हा पुन्हा आठवायचं.... त्या दिवशी स्नेहानी त्याला दिलेलं ते सरप्राईज , आपल्या सगळ्या परिवाराला एकत्र बघून रजतला झालेला आनंद .... त्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यांसमोरून जायच्या .. आणि नकळत तिचे डोळे भरून यायचे. पण मग ती स्वतःचीच समजूत काढत म्हणायची...' या सगळ्या वाईटातून काही चांगल्या गोष्टीही घडल्या तेव्हा....एक तर रजतची आणि त्याच्या आई बाबांची भेट झाली होती. रजतचं शेवटचं जेवण हे स्वतः त्याच्या आईनी रांधलं होतं त्याच्यासाठी... त्या माउलीला तेवढंच एक समाधान मिळालं असेल. त्याच्या अंतिम काही क्षणांत त्याचा सगळा परिवार होता त्याच्याजवळ ! म्हणूनच देवानी मला तशी बुद्धी दिली असेल का ? -दोघांच्या आई बाबांना बरोबर घेऊन जायची ? ' असेलही कदाचित God has his own ways of getting things done.' आपण रजतला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो यासाठी सुद्धा ती नेहेमीच देवाचे आभार मानायची. या सगळ्या विचारमंथनातून स्नेहाच्या मनाला थोडा का होईना पण दिलासा मिळायचा.

पण हे सगळं एकटीनी मॅनेज करणं इतकं सोपं नव्हतं. इतक्या सगळ्या आघाड्या सांभाळायच्या - आणि तेही स्वतःचा मानसिक तोल ढळू न देता !घरातल्या सगळ्यांना धीर देत, वेळप्रसंगी त्यांचे अश्रू पुसत त्यांचं मनोबल टिकवून ठेवत स्नेहाची तारेवरची कसरत चालू होती. आणि या सगळ्यात तिला तिच्या आप्तेष्टांची, मित्र मैत्रिणींची पण खूप मदत झाली होती. खास करून सलीलची .... रजतच्या बाबांनी त्या दिवशी त्याला जेव्हा फोनवर बोलताना रजतला ऍडमिट केल्याचं सांगितलं होतं तेव्हा तो पुढची फ्लाईट पकडून बडोद्याला पोचला होता. त्या दुःखद प्रसंगी त्यानीच पुढाकार घेऊन सगळं काही मॅनेज केलं होतं. स्नेहाच्या तोंडून तिच्या घरच्यांनी सलीलचं नाव ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी काही तो अनोळखी नव्हता. आणि म्हणूनच त्याची मदत स्वीकारताना त्यांना फारसं अवघडल्यासारखं नव्हतं झालं. आणि सलीलच्या वागण्या बोलण्यातून त्याचा सच्चेपणा त्यांना जाणवला होता. खरं म्हणजे सलीलला असं अचानक समोर बघून स्नेहा थोडी गोंधळली होती. पण त्या वेळी रजतच्या दुःखापुढे तिला बाकी कशाचंच भान नव्हतं. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी सलील तिच्या परिवाराच्या मदतीसाठी सतत तत्पर असायचा. तिच्या शिफ्टिंग मधे, त्यानंतर घराच्या बांधकामात, एवढंच नव्हे तर श्रद्धाच्या कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळी सुद्धा त्यानी सर्वतोपरी मदत केली होती.

पण हे सगळं करत असताना त्यानी आपल्या मैत्रीच्या नात्याच्या मर्यादा पाळल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत असे कितीतरी प्रसंग आले होते जेव्हा त्याच्या मनातलं स्नेहाबद्दलचं प्रेम उफाळून आलं होतं. बऱ्याच वेळा त्यानी तिला भावनाविवश होऊन रडताना बघितलं होतं... परिस्थितीशी झुंज देताना थकून गेलेली स्नेहा पण बघितली होती त्यानी! अशा वेळी त्याला वाटायचं - तिला सांगावं- 'घाबरू नकोस; मी आहे तुझ्याबरोबर.' तिला आपले अश्रू आवरताना बघितलं की त्याला वाटायचं तिला म्हणावं-' तुला आधार देण्यासाठी मी आहे ; माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तुझं मन मोकळं करून घे...' पण प्रत्यक्षात मात्र तो काहीच न बोलता गप्प राहायचा;आपल्या परीनी स्नेहाला आनंदी ठेवायचा पूर्ण प्रयत्न करायचा. पण घरातल्या इतर सदस्यांशी वागताना मात्र त्यानी असे कुठलेच निर्बंध पाळले नाही.... अगदी मनापासून त्यांना आपलं मानलं; आणि त्या सगळ्यांसाठी पण तो अगदी घरातल्या एखाद्या सदस्यासारखाच जवळचा झाला. खास करून रजतच्या बाबांकरता ! त्या दोघांचं एक वेगळंच भावनिक नातं जुळलं होतं.... बहुतेक त्यांना एकमेकांच्या रुपात आपापली हरवलेली प्रेमाची व्यक्ती सापडली असावी....सलीलला त्याचे बाबा आणि रजतच्या बाबांना त्यांचा मुलगा!!

या पार्श्वभूमीवर विचार करत असताना हळूहळू रजतच्या बाबांच्या मनात एक विचार मूळ धरायला लागला.... स्नेहा आणि सलील च्या लग्नाचा विचार ! त्यांनी आपला हा विचार वंदना आणि स्नेहाच्या आई बाबांजवळ बोलून दाखवला. चौघांनी मिळून त्यावर खूप चर्चा केली. श्रद्धाला विश्वासात घेऊन तिलाही सगळं सांगितलं आणि तिचं मत विचारलं. आपल्या बाबांच्या जागी दुसऱ्या कोणालातरी बघणं हे तिचं मन मान्य करत नव्हतं. पण जेव्हा तिच्या आजी आजोबांनी तिच्या आईच्या भविष्याबद्दल विचार करायला सांगितला तेव्हा तिला त्या निर्णयाचं महत्व कळलं आणि केवळ तिच्या आईसाठी ती या नव्या नात्याचा स्वीकार करायला तयार झाली. जेव्हा सगळ्यांचं या बाबतीत एकमत झालं तेव्हा त्यांनी सलील आणि स्नेहाला आपली ही इच्छा सांगितली. रजतच्या बाबांनी समोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव ऐकून सलीलला काय बोलावं तेच सुचत नव्हतं... त्याचं इतक्या वर्षांचं प्रेम आता सफल होणार होतं. त्याची पूर्ण तयारी होती; पण तरीही तो आधी काहीच बोलला नाही. त्याला स्नेहाची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. स्नेहा शांतपणे तिच्या सासऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत होती. ते अगदी पोटतिडकीनी तिला सांगत होते ," स्नेहा, बाळा आम्हांला सगळ्यांना वाटतंय की तू आणि सलीलनी लग्न करावं. तुम्ही दोघं एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखता. आम्हांलाही सलील सर्व दृष्टीनी तुझ्यासाठी योग्य वाटतोय. हे बघ बेटा, आम्ही चौघं काय - आज आहोत तर उद्या नाही. लवकरच श्रध्दा पण लग्न करून तिच्या आयुष्यात रमून जाईल....पण मग तेव्हा तू मात्र एकटी पडशील. तुझ्यापुढे अजून तुझं सगळं आयुष्य पडलंय.... तुला जर सलीलसारखा जोडीदार मिळाला तर आमची सगळ्यांचीच काळजी मिटेल. " अजूनही बरंच काही सांगत होते ते...स्नेहाला पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. त्यांचं बोलून झाल्यावर स्नेहा म्हणाली," काका, मला कळतीये तुमची काळजी . हा प्रस्ताव मांडताना तुमच्या मनाची किती घालमेल होत असेल हेदेखील जाणवतंय मला. तुम्हांला माझा निर्णय सांगायच्या आधी मला सलीलशी एकट्याशी थोडं बोलायचं आहे.चालेल ना ? " तिच्या डोक्यावर आपला हात ठेवत काका म्हणाले," नीट विचार करून काय ते ठरव बाळा." आणि ते खोलीच्या बाहेर गेले.

काही क्षण दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. शेवटी सलील सुरुवात करणार इतक्यात स्नेहा म्हणाली," हे आयुष्य किती अजीब असतं नाही सलील ! जिथून सुरू होतं तिथेच आणून उभं करतं आपल्याला .... बघ ना - एकेकाळी तुझ्या बाबांना वाटत होतं की मी तुझी बायको होण्याच्या योग्यतेची नाहीये...त्यांना तसं का वाटत होतं हे त्यांनाच माहीत.... तू त्यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाही असशील कदाचित....कारण त्यांच्यापेक्षा तू मला जास्त ओळखून होतास, पण तरीही त्यांचं माझ्याबद्दलचं मत नाही बदलू शकलास तू....आणि बहुतेक त्यामुळेच मला तेव्हा जास्त वाईट वाटलं होतं. कारण माझ्यासाठी तुझ्या बाबांपेक्षा तुझं मत जास्त महत्वाचं होतं ! खैर.....आता मला ते कारण जाणून घ्यायची इच्छाही उरली नाही आणि तशी गरजही वाटत नाही ! पण गंमत म्हणजे आता माझ्या सासऱ्यांना असं वाटतंय की तू त्यांच्या मुलाची जागा घ्यायला योग्य आहेस...आणि पर्यायानी माझ्यासाठीही सर्वतोपरी योग्य आहेस !!"

तिचं बोलणं ऐकून सलील म्हणाला," माझ्यासाठीसुद्धा काकांच्या मतापेक्षा तुझं मत महत्वाचं आहे....तुला काय वाटतंय ? मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय स्नेहा आणि यापुढेही करत राहीन - आणि हे तुलाही माहीत आहे. माझ्या या प्रेमावर जर लग्नाच्या नात्याचं शिक्कामोर्तब झालं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन! पण अर्थात, जर तू या लग्नासाठी तयार असशील तरच !"

त्याचं बोलणं ऐकून स्नेहा खिन्न हसत म्हणाली," म्हणूनच मी मगाशी म्हणाले की - आयुष्य खूप अजीब असतं.....आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा तेच आपण दोघं आणि तोच आपल्या लग्नाचा निर्णय !! पण आज परिस्थिती मात्र पूर्णपणे बदलली आहे....या निर्णयाशी संबंधित असलेले संदर्भ बदलले आहेत....आपल्या दोघांच्या जागा बदलल्या आहेत...त्यावेळी तू लग्नाला नकार दिला होतास.....आज मी नकार देते आहे..."

स्नेहाचं इतकं स्पष्ट बोलणं ऐकून सलील चपापला. त्याचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याला वाटत होतं की स्नेहा हसत हसत त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल - कारण काहीही झालं तरी ते तिचं पहिलं प्रेम होतं ! त्यामुळे तिचा इतका स्पष्ट नकार पचवणं त्याला जड जात होतं... पण अजूनही त्यानी आस सोडली नव्हती. आपली बाजू मांडत तो पुढे म्हणाला," माझ्या तेव्हाच्या नकारामागचं खरं कारण तुला माहितीये स्नेहा... माझ्या बाबांचा शब्द नाही मोडू शकलो मी !"

त्याचं हे वक्तव्य ऐकून स्नेहा पुन्हा एकदा हसली. त्याला मधेच थांबवत ती म्हणाली,"माझं बोलणं अजून संपलं नाहीये सलील.....त्यावेळी तू कोणतंही स्पष्टीकरण न देता, एकतर्फी निर्णय घेऊन मोकळा झालास..... पण मी तसं नाही करणार ! माझा हा निर्णय कसा योग्य आहे हे तुला पटावं म्हणून त्याच्या मागची कारणंही सांगणार आहे मी...

तू जेव्हा मला नकार ऐकवून माझ्या आयुष्यातून निघून गेला होतास ना तेव्हा माझी आजी मला म्हणाली होती - 'प्रेम इतकंही आंधळं नसावं की त्यापुढे आपण आपला आत्मसन्मान हरवून बसू!कारण हरवलेल्या प्रेमाच्या बदल्यात पुन्हा प्रेम मिळू शकतं पण एकदा का आपला आत्मसन्मान गमावला की आपण स्वतःच स्वतःच्या नजरेतून उतरायला लागतो' -"

सलीलकडे बघत ती पुढे म्हणाली,"मला माझा आत्मसन्मान गमवायचा नाहीये... आणि त्याहूनही महत्वाचं कारण म्हणजे - मी जर तुझ्या प्रेमाला स्वीकारलं तर तो रजतच्या प्रेमाचा अपमान ठरेल ... आणि माझ्या नवऱ्याचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य मी करणार नाही. रजत जरी शरीरानी माझ्यापासून कायमचा लांब गेला असला तरी माझ्या मनात, माझ्या विचारांत तो अजूनही माझ्या जवळच आहे आणि नेहेमीच राहील .माझ्यासाठी आत्ता आणि यापुढेही तोच माझा नवरा आहे आणि आमचं हे नातं माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.... कधीच नाही....तसं वचन दिलंय आम्ही एकमेकांना....आणि तेही त्याच्या शेवटच्या काही क्षणांत !"

स्नेहाचं हे रूप सलीलसाठी नवखं होतं. पण तिच्या वक्तव्यातला शब्द न् शब्द त्याच्या बुद्धीला पटत होता....अगदी त्याच्या मनालाही न जुमानता !!

स्नेहा पुढे म्हणाली," माझा निर्णय कसा बरोबर आहे हे जसं मी दाखवून दिलं तसाच तुझा हा - 'मला लग्नासाठी propose करण्याचा' - निर्णय कसा चुकीचा आहे तेही तुला पटवून द्यायचं आहे मला... " त्यावर थोडासा चिडून सलील म्हणाला," तेव्हा तुझ्याशी लग्न न करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता हे मान्य आहे मला ; पण आता परत तीच चूक नाही करायची मला.... यापुढचं आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचं आहे....आणि यावेळी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.... काहीही झालं तरी !" हे सांगत असताना सलीलच्या डोळ्यांत अश्रू गोळा झाले होते.

त्याला हाताच्या इशाऱ्यानी थांबवत स्नेहा म्हणाली, "खरंच? एक प्रश्न विचारू ? खरं खरं उत्तर देशील?" स्नेहाच्या या अशा पवित्र्यानी सलील पुरता गोंधळला आणि म्हणाला," मी कधी तुझ्याशी खोटं बोललोय का स्नेहा?"

काही क्षण थांबून स्नेहानी त्याच्या डोळ्यांत बघत विचारलं," जर आत्ता तुझे बाबा हयात असते तरीसुद्धा तू हाच निर्णय घेतला असतास?"

तिचा तो प्रश्न ऐकून सलील एकदम स्तब्ध झाला.....त्याच्या चेहेऱ्याचा रंग पार उडाला. इतका वेळ आपलं मन स्नेहासमोर उलगडून दाखवणारा सलील अचानक निरुत्तर झाला. त्याच्या घशाला कोरड पडली. काहीही न बोलता तो नुसताच स्नेहाकडे बघत होता.......स्नेहाच्या चेहेऱ्यावर एक विषण्ण हसू पसरलं.... ती म्हणाली," तू न सांगताच तुझं उत्तर मिळालं मला. In fact, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ..…. आजही तुझ्या मनात माझं स्थान दुय्यमच आहे.....आणि म्हणूनच मी मगाशी म्हणाले की - मला माझा आत्मसन्मान नाही गमवायचा...." स्नेहाचं बोलणं ऐकून सलील खजील झाला ... तिच्या डोळ्यांत दिसणारं स्वतःचं प्रतिबिंब बघून त्याची मान शरमेनी खाली झाली ... स्नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरत जात होता. पण तिनी इतक्या उघडपणे दाखवलेलं सत्य स्वीकार करण्यावाचून त्याच्याकडे गत्यंतर नव्हतं. स्नेहाच्या त्या एका प्रश्नानी आज त्याला त्याची , त्याच्या कमकुवत प्रेमाची जागा दाखवून दिली होती. तो काही न बोलता तिथून उठला आणि बाहेर निघून गेला....त्या खोलीतून आणि स्नेहाच्या आयुष्यातूनही !

सलीलला आज पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातून असं निघून जाताना बघितलं आणि स्नेहाला रजतनी तिला दिलेलं वचन आठवलं.....'You will always find me by your side ....' रजतचा विचार मनात आला आणि स्नेहाच्या चेहेऱ्यावर एक शांत हसू झळकलं ....

तिला कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळी आठवल्या....

परि दिव्य ते तेज पाहून पुजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे ...

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बलांचा

तुझी दूरता त्याहूनि साहवे ....

तुझी दूरता त्याहूनि साहवे !

------------------------ समाप्त -------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, तुमची कवितेच्या धाग्यावर असलेली कमेंट आणि आताच प्रतिसाद दोन्ही परस्परविरोधी मत वाचुन थोडंस हसु आलं.. पण तुम्ही मांडलेल्या दोन्ही मतांमागे तुमच भरपुर वाचन आणि पाठीशी असलेला अनुभव आहे. हे सहज लक्षात येत. तुम्ही सुचवलेल्या दृष्टीकोनातुन ही कथा वाचयला आवडेल.. Happy

अमा, तुमची कवितेच्या धाग्यावर असलेली कमेंट आणि आताच प्रतिसाद दोन्ही परस्परविरोधी मत वाचुन थोडंस हसु आलं>> तेव्हा शेवटा चा भाग आला नव्हता. व तिथे थोडे वैयक्तिक मत ही व्यक्त करणे शक्य होते. म्हणून तुम्हास तसे वा टणे साहजिकच आहे. अश्या कथांमध्ये साधारण पणे गृहिणी थोडी मानसिक रीत्या स्ट्रे होउन पण परत नवरा संसार मुले ह्या कडे परत जातात. पण इथे परत गेल्यावर तो पतीचा मृत्यू व नंतरचे चॉइस हे ही आहे.

अमा, राजसी...
कथेवर प्रतिक्रिया लिहिताना तुम्ही कथेचे सगळे भाग वाचले असावेत असं मी गृहीत धरते.त्यामुळे तुम्ही नमूद केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मी स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. पण हीच story line घेऊन तुम्ही जर तुमच्या मनात असलेली कथा लिहिली तर ती वाचायला मला नक्कीच आवडेल .

मला फक्त शेवटच्या दोन भागांचा प्रॉब्लेम आहे. गेल्या भागात कथा संपवली असती तर मला बाकी काही issue नाही. भाग 50 आणि 51 नको.

गेले कितीतरी दिवस ही कथा वाचतोय. शक्यतोवर मी काहीही वाचायला किंवा बघायला घेतलं की एका फटक्यात संपवतो, आणि त्यानंतर त्यावर विचारमंथन चालू होतं. पण इकडे प्रत्येक भागाअंती काहीतरी विचार करायला लावणारं वाटलं. म्हणून वेळ लागला.
या कथेचं माझ्या शब्दात वर्णन म्हणजे - मानवी मनाचं अप्रतिम प्रवास!
यात जी मानवी भावनांची मांडणी केलीये ना, ती खूप सुंदर आहे. कथेत कॅरेक्टर कमी आहेत, पण जे आहेत, ते खूप सुरेखपणे समोर आलेत. आणि काही भागानंतर तर आपण यात इतकं समरस होतं जातो, की या पात्रांच्या मनाच्या खेळात आपणही गुंतून जातो. हॅट्स ऑफ...
खूप दिवसांनी काहीतरी खूप सुंदर वाचल्याचं फील आलं. आणि खरं सांगायला गेलं तर यात चूक - बरोबर हा खेळ नाहीचे, फक्त 'हे आहे ते असं आहे!'
आजपर्यंत जी जी कथा मी वाचलीये, आणि जी माझ्या अगदी जवळ पोहोचलीये, ती संपल्यावर न जाणे का अगदी रितेपण येतं. ही कथा संपली आणि असच रितेपण आलंय. जस्ट लेखिकेकडून जाणून घ्यायला आवडेल, की अशी काही पोकळी वाटतेय का. (कारण वाचकांची एवढी भावनिक गुंतवणूक होत असेल, तर लेखिकेची झालीच असावी असं वाटतं.)
लिहीत राहा, खूप खूप लिहा.

बरेच भाग वाचायचे राहुन गेलेत. पण आज पुन्हा सगळी कथा वाचुन काढणार आहे.
तुमच्या चिकाटीचे विषेश कौतुक... सलग ५०-५१ भाग लिहिणे खरच सोपी गोष्ट नाही.

अज्ञातवासी,
खरं सांगायचं तर मी गेले काही दिवस तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होते. आणि आज ती मिळाली. इतके दिवस वाट बघितली त्याचं फळ मिळालं.. Happy इतक्या सखोल आणि सुस्पष्ट प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.
तुम्ही म्हणता तसं मीही या कथेतल्या पात्रांमध्ये गुंतून गेले होते. कारण प्रत्येक पात्राच्या मनाचा प्रवास करायचा, त्यातले पापुद्रे उलगडून वाचकांसमोर मांडायचे हा अनुभव माझ्यासाठी खूप इमोशनल होता. कथेतील काही प्रसंग लिहिताना ऱ्या पात्रांप्रमाणेच माझ्याही मनाची ससेहोलपट होत होती. कथा लिहून झाल्यावर खरंच खूप मोठी पोकळी जाणवत होती काही दिवस. त्यावर इलाज म्हणून दुसरी कथा लिहायला घेतली आहे. अर्थात, ही लघुकथा आहे. लवकरच पूर्ण होईल. Happy

सर्व वाचक मित्र मैत्रिणींना अगदी मनापासून धन्यवाद . तुमच्या या मिश्र प्रतिक्रिया अजून चांगलं लिहायची प्रेरणा देतात. Happy

सुरेख कथा. सगळे भाग वाचुन काढले.
इथे खर्‍या अर्थाने कथेला साजेसा शेवट झाला. नुसत प्रेम प्रेम करत कुरवाळत बसण्यापेक्षा आत्मसन्मानाला देखिल आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, हे खुपच सकारात्मकतेने पाहायला शिकवणारी कथा.

- काही गोष्टी या अपुर्णच एवढ्या परिपुर्ण असतात की त्याना पुर्णत्वाच्या मोहोरेची गरज नसते.

खुप आधी पहिला भाग वाचला होता आणि तेव्हाच ठरवलं ही कथा सगळे भाग आल्यावर सलग वाचावी.. आज सकाळपासून वाचत सगळे भाग संपवले...

कथा खुप खुप आवडली.. मानवी मनांचे असंख्य पैलू आणि विचारांचे वादळ आणि त्यावर केलेली मात हे खुप संयत शब्दांत मांडलंत तुम्ही..

आधी मला वाटलं की, स्नेहा सलीलला होकार देईल पण तसं न होता तिने नकार दिला तेव्हा सलीलइतकाच मीपण चपापलो पण स्नेहाचं स्पष्टीकरण आणि त्यामागची कारणे अगदी योग्य आहेत हे पटतं..

तुमच्या लिखाणातून तुमच्या विचारांची प्रगल्भता प्रकर्षाने जाणवते.. त्यासाठी हॅट्स ऑफ..

लिहत राहा....पुढील कथेच्या प्रतिक्षेत..

Sadha manus,
याआधीचे सगळे भाग मायबोलीवर पोस्ट केले आहेत..

Pages