पद्मा आजींच्या गोष्टी १७ : माठाशी गाठ

Submitted by पद्मा आजी on 9 May, 2020 - 17:11

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

मदर्स डे च्या सगळ्यांना शुभेच्या. त्या निमित्ताने मी आज तुम्हाला माझ्या आईने सांगितलेली गोष्ट सांगणार आहे.

ही गोष्ट फार जुनी आहे. मी फार लहान होते तेव्हा.

त्या काळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची फारच धमाल असायची. आज इकडे तर उद्या दुसरीकडे. कधी कधी तर दिवसात दोन किंवा तीन आमंत्रणं असायचे. माझ्याकडे अनेक गमती जमती आहेत तेव्हाच्या. सांगेन परत केव्हा.

एके दिवशी आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. माझ्या आईने तिच्या सगळ्या मैत्रिणींना आमंत्रित केले होते. कार्यक्रम बराच वेळ चालला. आईच्या आणि तिच्या मैत्रिणींचे अनेक गोष्टीवर गप्पा झाल्या. मी आणि माझ्या तीन बहिणी पण गप्पा ऐकत होतो. मध्येच माठाचा विषय निघाला आणि आईच्या सगळ्या मैत्रिणी हसल्या. आम्ही बहिणी बुचकळ्यात पडलो.

नंतर कार्यक्रम संपल्यावर मी आईला विचारले, "माठावरून तुम्ही सगळ्या का हसत होत्या?"
तेव्हा तिने आम्हाला हि फार अजब गोष्ट सांगितली.

आईची ती मैत्रीण श्रीमंत घरात जन्मली होती. पण काही केल्या तीचे लग्न जमत नव्हते. कारण तिच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. लग्न होताच नवरा मरणार असे ज्योतिषी सांगायचे म्हणे. तुम्हा लोकांना आत्ता काही फारसे वाटणार नाही. तुम्ही हसाल हि एखाद्या वेळा. पण त्या काळी पत्रिकेवर फार विश्वास होता लोकांचा. त्यामुळे लग्न जमविताना पत्रिका बघायचेच.

तिच्या वडिलांनी पण फार प्रयत्न केले. पण पत्रिकेमुळे कोणी मुलगा तयार होईना. मग लोक्कानी तिच्या वडिलांना अनेक सल्ले दिले. कोणी म्हणे पत्रिका दुसरी बनवा, जन्म दिवस वेगळा दाखवा, ज्योतिष्याला लाच द्या. पण तिची वडील म्हणायचे अहो असे करून लग्न लागेल पण काही झाले तर त्रास तिलाच ना? म्हणून त्यांनी असे काळेबेरे केले नाही. ते प्रत्येकाला पूर्ण खरी कल्पना द्यायचे.

असे होता होता फार दिवस गेले. त्या मैत्रिणीचे लग्न होते का नाही असा संभ्रम पडला.
मग काय झाले. अचानक पणे एक मुलगा तिला सांगून आला. तिच्या वडिलांनी नेहमी प्रमाणे त्याला सविस्तर पणे सगळी कल्पना दिली. ते जणू सवयीप्रमाणे तो नकार देणार असे गृहीत धरून चालले होते.

तर वेगळेच घडले. त्या मुलाने चक्क होकार दिला. तो म्हणाला मी तयारआहे पण माझी एकअट आहे. तिच्या वडीलांनी विचारले काय अट ते सांगा.
तर तो मुलगा म्हणाला, "तुमच्या मुलीचे प्रथम अगदी व्यवस्थित रित्या एक लग्न लाऊन द्या. नंतर मी तिच्याशी लग्न करेन."

ती विचित्र अट ऐकून सगळे चकित झाले. तिचे वडील म्हणाले हे कसे शक्य आहे तर तो लगेच म्हणला कि मी कुठे म्हणतो कि तिचे लग्न माणसाशी लावून द्या. हे त्याचे बोलणे ऐकून आता तिचे वडील जरा वैतागले पण तो लगेच म्हणाला अहो तिचे लग्न माठाशी लावा. यावर तिच्या वडिलांनी थोडा विचार केला आणि म्हणाले कि मी घरी बोलतो आणी तुम्हाला कळवतो. मुलीला हि विचारतो."

तिच्या वडिलांनी त्या मुलाची अट घरी सगळ्यांना सांगितली. घरातील सर्व बायका एकत्र आल्या आणि त्यानी त्या मुलीला सगळी कल्पना दिली.

हळूहळू बातमी पसरली. मोठा वाद माजला. काहींचे मत पडले हे चुकीचे आहे. काही म्हणे माठाबरोबर लग्न म्हणजे धर्म भ्रष्ट. काही म्हणे योग्य होईल. असे अनेक वादातीत प्रश्न निर्माण झाले. काही केल्या मार्ग निघेना. तेव्हा तिचे वडील म्हणाले तिला कि तू निर्णय घे. आमची तुझ्या निर्णयाला संमती आहे.

तिने विचार केला. मुलगा चांगला आहे, त्याची लग्नाला तयारी आहे मग काय हरकत आहे असा विचार करून म्हणून तीने संमती दिली.
ल्गनाची तारीख ठरली.

पण नंतर दुसराच प्रश्न निर्माण झाला. गावातला कोणी भटजी तयार होईना माठाबरोबर लग्न लावून द्यायला. त्याना भीती होती पुढे काय होईल अन काय नाही. मग आता काय करायचे?

शेवटी तिच्या वडिलांनी बरीच बिदागीची आमिष दाखवली आणि शेजारच्या गावातून भटजी बोलाविला.

माझी आई लग्नाला गेली होती. साले गाव लोटले होते असे म्हणाली. सगळ्यांना कुतुहूल होते. माठ फेऱ्या कसा मारेल.
रीतीप्रमाणे गुरूजींनी लग्न लावले. माठाला एका पाटावर ठेवले आणि पाटाला चाके लावली होती. असा माठ आणि आईच्या मैत्रिणीने फेऱ्या मारल्या.

लग्न तर झाले पण आता माठाचे काय करायचे? कुठे ठेवायचे? असा विचार करत असतांनाच, त्या गडबड गोंधळात माठाला कसला तरी धक्का लागला आणि माठ फुटला. क्षणभर सगळे गंभीर झाले होते पण तेव्हा नवऱ्या मुलाने हुशारी दाखविली आणि म्हणाला पत्रिके प्रमाणे नवऱ्याचा मृत्यू झाला. आणि आता आमचे लग्न लावा. पुढच्या लग्नाच्या धांदलीत सगळे आधीचे प्रश्ने मागे पडली.

"झाले बाबा शेवटी लग्न." माझी आई म्हणाली. "व पुढे सगळे ठीक झाले. काल ती आली, आणि समोर माठ होता म्हणून सगळे आठविले. आता बराच काळ लोटल्यामुळे ती स्वतःच माठावर विनोद करते आणि आम्ही हसतो."

ती गोष्ट ऐकून आम्ही फार हसलो.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल किस्सा आहे... माठाला चाके लाऊन फेरे ह ह पुरे वाट आहे Lol

माझी स्वत:चीही या चक्कर मध्ये तीन लग्ने झाली आहेत.
दोन बायकांशी आणि एक झाडाच्या फांदीशी Proud
का तर म्हणे बायको मृत्युचा योग होता..
असो, आता मी स्वत: हे केल्यावर दुसरयांना हसायचा हक्क नाही मला Happy

खूप दिवसांनी तुमचे काही वाचले. फोटोही छान आहे. लिहीते राहा ....

बरेच दिवसांनी पद्मा आजींची गोष्ट आली Happy

>> तुम्हा लोकांना आत्ता काही फारसे वाटणार नाही.
नाही हो. राय आणि बच्चन कुटूंबीयांनी त्यांच्या लग्नात हा धडा दिला की Wink

नंतर कधीतरी तुम्हाला टांग्याचे मजेदार किस्से सांगेन. (आठवण करून द्या मला नंतर)...... आठवन करुन दिली.
बाकी गोष्टी खुप खुप छान

असे तोडगे धर्मशास्त्रात काढले जातात. ज्योतिषाचार्य सुंठणकरांनी तर मंगळदोषाचे स्तोम ज्योतिषांनीच माजवले आहे असे म्हणून ‘विवाह मंगळाची अनावश्यकता’ या 1966 साली लिहिलेल्या पुस्तकात ज्योतिष शास्त्राच्या चैकटीत राहूनच ज्योतिषांचा खरपूस समाचार घेतला आहे. या पुस्तकाला आशिर्वाद पर प्रस्तावना संकेश्वर पीठाचे शंकराचार्य लिहताना म्हणतात, ‘‘ ही पुस्तिका वाचून विवाह जुळते समयी वधूवरांच्या कुंडलीतील 1, 4, 7, 8, व 12 या स्थानातील मंगळ पाहून कोणीही घाबरुन जाउन विवाह मोडण्याची मुळीच जरुर नाही, एवढा अर्थबोध जरी झाला तरी पुस्तिका लिहिल्याचे सार्थक झाले.’’
या पुस्तिकेत सुंठणकरांनी तर मंगळदोषाला 107 फलज्योतिषशस्त्रीय अपवाद ग्रंथाधारे दिले आहेत. ते म्हणतात, ‘‘भौगोलिक परिंिस्थतीसुद्धा मंगळदोषाचा परिहार करतात.
गोदावरीदक्षिणतीरवासिनां भौमस्य दोषा नहि विद्यते खलु ।
अर्थ:- गोदावरी नदीच्या दक्षिण प्रदेशात स्थाईक असणा-यांना मंगळ दोष मानू नये. हे एक संस्कृत वचन ज्योतिर्मार्णव ग्रंथात दिले आहे. त्याचप्रमाणे
कलिंगनामा यमुनांशमालवौ सुमागधः सिंधुसुभोजसौ नृपाः ।
अमीरस्युरंशोग्र्रहजन्म देशकासस्थैव ते स्युः फलदायका ग्रहाः ।।
ज्योतिष संग्रह या ग्रंथातील वरील शास्त्राधाराचा आशय असा की सूर्याचे जन्मस्थान कलिंग देश, चंद्राचे जन्मस्थान यमुना तीर, मंगळाचे जन्मस्थान मालवदेश, बुधाचे जन्मस्थान मगध देश, गुरुचे आणि शनीचे जन्मस्थान सौराष्ट् देश या ग्रहाचे जन्म प्रदेश शास्त्रात सांगितले असून त्या त्या ग्रहांचे परिणाम त्या त्या प्रदेशांवर विशेषत्वाने होत असतात. या अनुषंगाने मालव देशात तेवढाच मंगळ पहावा व बाकीच्या प्रदेशात मंगळ देाष मानू नये. या शिवाय धर्मशास्त्र असो वा ज्योतिषशास्त्र असो दोष आला म्हणजे परिहार वा तोडगा आलाच. मंगळाची शास्त्रोक्त शांती, विष्णु उपासना, शुचिर्भूतपणे मंगळाचा किमान 10 हजार जप, मंगळजपाने अभिमंत्रित प्रवाळ रत्नाची अंगठी इत्यादी मुळे मंगळदोषाचा परिहार होतो. वैधव्याच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी सावित्रीव्रताचे आचरण ही सांगितले आहे. त्या शिवाय कुंभविवाह धर्मसिंधुमध्ये सांगितला आहे. वैधव्य हराः कुंभ विवाहः। वैधव्य टाळण्यासाठी विवाहापूर्वी मातीचा कुंभ घेउन त्यात विष्णुप्रतिमेची विधीपूर्वक स्थापना करावी. त्याची प्रार्थना करुन प्रतिमेसह तो कुंभ जलाशयात वा नदीकाठी फोडून तो विसर्जित करावा. म्हणजे कुंभरुप पतीशी विवाह होउन वैधव्यादियोग कुंभासमवेत नाश पावतात. नंतर मानवी पतीशी विवाह करावा.

(अस्मादिकांच्या यंदा कर्तव्य आहे या विवाह व ज्योतिष या विषयावरील पुस्तकातून)

आज्जी कसली गोड आहेस गं तू.
ते प्रत्येक गोष्टीच्या शेवटचं वाक्य खूपच आवडतं. आणखी पण लिही ना गोष्टी.

पद्मा आज्जी.. किती दिवसांनी दिसलीस इथे.
आम्ही तुला खूप मिस् केलं.

गोष्ट छानच. ऐश्वर्या रॉय चे पिंपळाच्या झाडाशी लग्न लावल्यामुळे हा प्रकार (तोडगा) फेमस झालाय आता. शिवाय मला सिनेमाचे नक्की नाव आठवत नाही पण त्या सिनेमातही ईला अरुण आपल्या मंगळ असलेल्या मुलीचे लग्न आधी एका कुत्र्याच्या पिल्लाशी लावणार असते.

हि सर्व पूजा पाठ, हा विधी , तो विधी भटा- ब्राम्हणांनी स्वत:ची पोटं भरण्यासाठी काढलेले लुबाडण्याचे मार्ग आहेत.
अंधविश्वास पसरवण्याचेी लाजही वाटत नाही त्यांना.
ऑफिसमधिल एका गरीब मद्रासी साफ-सफाई कामगार स्त्रीला, तिच्या भटजीने सांगितले की, रामेश्वरलाच जावून परत कसलीतरी पुर्वजांची पूजा केलीस तर तुझे पुर्वज खुष होवून तुझे घरी संपत्ती येइल, तुझे लग्न होइल.
त्यासाठी, तिला २५००० रुपये हवे होते. तिचा पगार ८०००, खाणारी तोंड ७ घरी, ६ बहिणी, बाप नाही आणि तिची आई रोज ह्या पुजेसाठी तिच्याशी वाद घालायची. मला म्हणायची, दिदी क्या करनेका?
म्हटल, २५००० जमवतेय असं सांग आईला आणि भटजीला आणि ठेव बँकेत आणि शिक काहितरी झाडु मारण्यापेक्षा, बहिणींना कामाला लाव व त्यांना हि शिकव.
गरीब लोकांनी, काय जगु नये काय? ह्या असल्या पुजा श्रीमंतानीच कराव्या.
पण, लुबाडणारे गरीबाला सुद्धा सोडत नाहित. अडाणी लोकांची हि कथा.. तर शिकलेली डॉक्टर असलेली मैत्रीण, रोज महिन्यातुन पुजा घालायची खास नाशिकला जावून भटजीने सांगितले म्हणून.
तो भटजी, ५००० रुपये घ्यायचा. लग्न काही जातीत जमत नाही म्हणून. कमाल वाटते अश्या लोकांची.

‘मला मूल होणारच नाही’ असं भविष्य माझ्या वडिलांना त्यांच्याच एका भटजी मित्राने माझी जन्म्तारीख आणि वेळ स्चतःच उगाच खोदून विचारून , ‘पत्रिका काढून देतो आणि एक पूजा पण घालावी लागेल मुलीला संतती सुख नाही म्हणून‘ असे माझ्याच बारशाचे जेवण जेवून सांगितले.
वडिलांनी, ओळखेतलाच होता आणि आपल्याच घरी आलेला म्हणून शांत राहिले. व त्याचे जेवून झाल्यावर नम्रपणे किमान शब्दात असल्या भविष्यवाणीचा विरोध करून मार्गाला लावले.
आजी, एकदम चिंतेत कारण तिचा विश्वास ह्या कर्मकांडावर. तिने तिच्या काळात असले बरेच भटजी पोसले/पाळले..

पुर्वी,रुइच्या फांदीशी लग्न लावत आणि भटांना जेवायला घालत , मंगळ असला की. एकले बरेचदा आजीकडून.

मस्त गोष्ट आहे आजी . Happy

ऐश्वर्या रॉय चे पिंपळाच्या झाडाशी लग्न लावल्यामुळे हा प्रकार (तोडगा) फेमस झालाय आता. शिवाय मला सिनेमाचे नक्की नाव आठवत नाही पण त्या सिनेमातही ईला अरुण आपल्या मंगळ असलेल्या मुलीचे लग्न आधी एका कुत्र्याच्या पिल्लाशी लावणार असते. >>>> नागिण मिळत नाही बिझी शेड्युलमुळे म्हणून मोनिशा तर रोसेशच लग्न कोंब डीबरोबर लावणार असते , Wink

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियांनी मला फार आनंद वाटला. आणि तुमचे प्रेम बघून माझा उत्साह दुणावला. यापुठे नियमाने गोष्टी लिहीन.
कोरोना मुळे मी काळजी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या.

तुमची पद्मा आज्जी.