कवी होण्याच्या चार सोप्या टिप्स

Submitted by जव्हेरगंज on 9 May, 2020 - 16:13

मंडळी,
आज मी आपणाला कवी कसे बनावे याच्या चार सोप्या टिप्स देणार आहे. होतकरू तरूणांना यांचा निश्चित फायदा होईल. अनेकांना कविता लिहायची इच्छा असते. पण ती लिहावी कशी हे मात्र कळत नाही. त्यांच्यासाठी या टिप्स फार उपयोगी ठरतील.

पहिली टिप : सुरुवातीला आपल्या मनातल्या भावना मुक्तपणे वाहू द्या. मनात येतील ते शब्द कागदावरती लिहून घ्या. तीन चार शब्दांची एक ओळ करा. आणि त्या ओळी एकाखाली एक लिहा. अभिनंदन! तुमची पहिली कविता तयार आहे. याला मुक्तकविता असे नाव देऊन कुठेही चिपकवा.

दुसरी टिप : यमकांचा सराव. आपला शब्दसाठा वाढवा. कोणत्या शब्दाला कोणते यमक योग्य जुळते याचा सराव करा. यमक हे ओळींच्या शेवटी आले पाहिजे तेवढे बघा. तुमची यमकी कविता यशस्वी होण्यास कुठलीही आडकाठी नाही.

तिसरी टिप : प्रेम करा. हा कविता लिहीण्याचा अत्यंत यशस्वी फॉर्म्युला आहे. प्रेम करण्यासाठी तुम्ही भर चौकात दक्षिणेकडे तोंड करून ऊभे राहा. तिथे तुम्हाला एक सुंदर तरूणी दिसेल. हिच वेळ आहे तिच्या प्रेमात पडण्याची. आम्हाला माहीत आहे, आपला दिवस अत्यंत दगदगीचा गेलेला आहे. बॉसने आपल्याला चिक्कार झापले आहे. आणि आपला पगारही कमी आहे. साहजिकच आहे आपण आयुष्याला कंटाळला आहात.

तेव्हा त्या सुंदर तरूणीच्या रुपाने आपल्या आयुष्यात एक सुंदर पहाट आलेली आहे. तिच्या हातात जाडजूड सामान आहे. आणि तिला रिक्षाही मिळत नाहीये. थोडा वेळ थांबा. घाई करू नका. संयम बाळगा. कवी होणे मोठ्या कष्टाचे काम आहे.

तिला थोडे पुढे जाऊ द्या. मग तिच्यापाशी जाऊन मदतीची तयारी दाखवा. सुरूवातीला आढेवेढे घेईल पण नंतर ती तयार होईल. जाडजूड सामान हातात घेतल्यावर ते भलतेच जाडजूड भासेल. पण ताठ मानेने तिला घरापर्यंत पोहोचवा. अनायासे आता तुम्हाला तिचे घरही माहीत झाले आहे.
ती तुम्हाला "थॅन्क यू" म्हणेल. पण 'भैय्या' म्हणणार नाही. याचा अर्थ समजून घ्या. तिच्या स्मिताला एक स्मित देऊन तुम्ही तिथून निघून या.

तुम्ही तुमच्या खोलीवर येता. हिंदी चित्रपटांची मधूर गीते ऐकता. खोलीभर परफ्युम मारता. आणि सुगंधित झोपता.
सकाळी लवकर उठता. आंघोळ करता. तुमचा दिवस उल्हासित जातो.
संध्याकाळी तुम्ही पुन्हा चौकात जाऊन ऊभे राहता. ती दिसत नाही. मग टपरीवर एखादी सिगारेट झोकता. तिच्या घराकडे उगीचच एक चक्कर मारता. ती झोपाळ्यावर काहितरी वाचत बसलीये. आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून तुम्हाला पाहतेही आहे. तिची कळी खुलली आहे. आणि चेहऱ्यावर गोड हसू फुटले आहे. तुम्हाला सिग्नल मिळाला आहे.

सकाळी कामावर जाताना तुम्हाला ती चौकात उभी दिसते.
"कुठे जायचंय का तुम्हाला?" तुम्ही विचारता.
"कॉलेजला" ती लाजत म्हणते.
"सोडू का मग?" तुम्ही आता संधीचा फायदा उठवत आहात.
"नाही नको.." साहजिकच ती आढेवेढे घेते. तिचे कॉलेज उलट्या बाजूला आहे. तुम्हास बहुधा ठाऊक नसावे.

जास्त डेअरिंग न करता तुम्ही स्कूटरला किक मारता. मात्र जाताना तुम्ही "भेटू ऊद्या" म्हणायला विसरत नाही. कॉन्फिडन्स आता तुमच्यात ठासून भरला आहे.

संध्याकाळी तुम्ही पुन्हा तिच्या घराकडे चक्कर मारता. नेत्रपल्लवीचे सुख अनुभवता. ती आता खास तुमच्यासाठी रोज बाहेर येउन झोपाळ्यावर पुस्तक वाचत बसते आहे. आणि तुम्हाला आनंदाच्या ऊकळ्या फुटत आहेत.

एके दिवशी तुम्ही तिला डेटसाठी विचारता. आणि ती "किती उशीर केलास विचारायला" म्हणून आनंदाने तुमच्या स्कूटरवर बसते. तुम्ही तिला मॉलमध्ये घेऊन जाता. थंडगार ऐसीत एखादा सिनेमा पाहता. ती तुमच्या खांद्यावर डोके ठेवून भावनिक झाली आहे. तिला बाहुपाशात घेण्यास तुम्ही आतूर आहात हे आम्ही जाणतो आहोत. पण ती अशी हाती सापडत नाही. १२० चे पॉपकॉर्न आणि तीनशेची पेप्सी घेऊन तुम्ही इंटरव्हलचा आनंद लुटता. डबल चीज मार्गेरेटा खाऊन तुमचा खिसा आता बराच हलका झाला आहे.

गोड गुलाबी आठवणी घेऊन तुम्ही खोलीवर येता. मधूर गाणी ऐकत सुगंधित झोपता. ऊत्साहाने सळसळत दिवस घालवता. तिला बागेमध्ये फिरायला नेता. पहिला किस घेऊन धुंद प्रेमाची नशा अनुभवता. गोड गोजिऱ्या फुलासारखे तिला जपता. फोनवर रात्रभर गप्पा झाडता. खाता पिता उठता प्रत्येक डिटेल तुम्ही तिच्याशी शेअर करता. जिवनातले हे क्षण कधीच संपू नये असे तुम्हाला मनोमन वाटते. आयुष्य इतकं सुंदर असू शकतं यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करता.

एका सकाळी तुम्ही तिला एका हॅन्डसम तरूणाबरोबर गप्पा मारताना पाहता. तुमची निश्चित जळत असणार हे आम्हाला कळले आहे. तुम्ही तिला विचारता. "फ्रेंड आहे" म्हणून ती तुमची समजूत घालते. आणि त्या तरूणाच्या स्पोर्टबाईकवर बसून कॉलेजला जाते. नाही म्हटलं तरी तुम्ही थोडं ढासळता.

मग अशाच एका संध्याकाळी तुम्ही तिला बागेत फिरायला घेऊन जाता. मजेमजेत तिचा मोबाईल चाळता. त्या हॅन्डसम तरूणासोबतचे तिचे कित्येक फोटो पाहून अवाक होता. संशयाने तिला जाब विचारता. रागाच्या भरात "छिनाल", " रांड" अश्या शिव्या घालता. ती मात्र इंग्लिशमध्ये "फक यू" म्हणून निघून जाते.

तुम्ही खोलीवर येऊन उध्वस्त होता. दर्दभरे गाणे ऐकता. वारंवार तिला फोन करता. पण तिने मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवला आहे. रात्रभर तुम्हाला झोप येत नाही. तुम्ही आतून पोखरले जात आहात.

सकाळी तुम्ही चौकात जाता. प्रेमानेच तिच्याशी बोलणी करायचा प्रयत्न करता. पण हॅन्डसम तरुण तुमची तुंबळ धुलाई करतो. "परत हिच्या आसपास दिसला तर तंगडं मोडीन" म्हणून तंबी देतो.

काळानिळा डोळा घेऊन तुम्ही खोलीवर येता. तो दिवस जेवण न करता उपाशी राहता. ऑफिसमध्ये तुमचे मन लागत नाही. कामावर परिणाम होतो. तुम्ही भरपूर दांड्या मारता. एक दिवस बॉस तुमच्या पार्श्वभागावर लाथ घालतो. आणि कामावरून काढून करतो.

तुम्ही आता दिवस दिवस सिगारेट पित खोलीवर पडून आहात. तुम्ही आता देशीही प्यायला शिकला आहात. आजकाल तुम्हाला आंघोळ करण्याचीही ईच्छा होत नाही. भरघोस दाढी वाढवून तुम्ही रुपडं सजवलं आहे. LIC च्या पॉलिश्या विकण्याचा धंदा तुम्ही आता उभारू पाहात आहात. जीन्स जाऊन तुम्ही आता पायजम्यावर आला आहात. पण अजून तुमच्या डोक्यातून 'ती' जात नाहीये. ती बसली आहे थंडगार एसीत हॅन्डसम तरुणाबरोबर सिनेमा पाहत. ती बागेतही फिरते त्याला घेऊन. दुपारी ती त्याच्या चकचकीत फ्लॅटवर जाते. तो तिच्या उघड्या पोटऱ्यांवर हात ठेवतो. आणि हळूच निकरमध्ये सारतो. तुम्ही डोक्यातून हे असले विचार झटकन काढून टाकता. सिगारेट परवडत नाही म्हणून भिकाजी बीडी पिता. निस्तेज चेहऱ्याने खिडकीबाहेर बघत बसता. तुम्ही गावेच्या गावे पालथी घालता. तुमची पॉलिसी कोणीही विकत घेत नाही. डोक्यावरील केसांचे छप्पर सावरत तुम्ही घाम पुसता. तुम्हाला आजकाल कुत्रंही विचारत नाही. तुम्ही समूळ उध्वस्त झाला आहात. तुम्ही पानेच्या पाने लिहून काढता. कुठुणतरी संपादकांचा नंबर शोधता. आपले घबाड शबनम थैलीत कोंबून बसस्टंडवर जाऊन ऊभे राहता.
अभिनंदन! तुम्ही आता प्रोफेशनल कवी झाला आहात.

चौथी टिप : किंवा मग अभंग लिहा. फार पवित्र कार्य आहे. देवाचाही नाद लागेल आणि भक्तगणांचा आशिर्वादही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्चच्चच्च. खुप टिपीकल झाला राव लेख! Proud

अवांतर : छंद, गज़ल, वृत्त आणि मात्रा, बाराखडी अस भरपुर काही असत कवितेत. ते राहीलंय..

भरघोस दाढी वाढवून तुम्ही रुपडं सजवलं आहे. LIC च्या पॉलिश्या विकण्याचा धंदा तुम्ही आता उभारू पाहात आहात.
>>>>बेकार हसलो...

मस्त Lol
एक पाचवा प्रकार, म्हणजे गझल लिहायची.
कुठलीही एक टेम्प्लेट उचलायची.
उदा.
अमक्यात अर्थ आहे
तमकेच व्यर्थ आहे
अमक्यात शर्थ आहे
तमकेही सार्थ आहे.

इथे अमक्या / तमक्या ऐवजी सात आठ शब्दांचा मसाला टाकावा

उदा. : तुझ्या परसातील गवऱ्या वेचण्यात अर्थ आहे...
शेराला अर्थ नसला तरी चालते ही हे सिक्रेट ओळखले की झाले.

भारीच
मी पहिली टिप पाळते आहे , आणि एकंदरित असे वाटते की तिथवरच मजल आहे Happy Proud

मानवमामा Lol

बाई दवे, मी तिसरी टिप - प्रेम करा. आयुष्यभर करत आलोय. प्रेमभंगही तितकेच अनुभवत आलोय. पण कविता काही झाल्या नाहीत मला. माझ्या प्रेम करायच्या पद्धतीत काही चुकले असावे का?

कविता म्हणजे काय तर मनात उभारलेल्या भावनांचा साचेबद्ध किव्हा मुक्त मांडलेला अविष्कार. या मध्ये लेखक पात्राच्या मनातील भावना व्यक्त करतो तर काही वेळा कल्पनाविलास दाखवतो, ते सत्य असतेच असे नाही. काही वेळा तो प्रबोधनपर सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर काही वेळा प्रसंगानुरूप वर्णन करत असतो. बऱ्याच वेळा कवी एक भाव व्यक्त करतो तर वाचक तो वेगळ्या भावनेने समजून घेतो. जेव्हा एखादया कवितेचे रसग्रहण वेगवेगळे जण करतील तेव्हा त्यात वेगवेगळे पैलू दिसतील. कवितेचे सहसा हाताळले जाणारे विषय म्हणजे चंद्र, पाऊस, प्रेम, निसर्ग, दुःख वगैरे.