क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

Submitted by पाषाणभेद on 9 May, 2020 - 10:47

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

Crompton Cealing Fan Review
इमेज १

पार्श्वभुमी:
माझ्या एका रूममधल्या सिलिंग फॅनचा खूप आवाज येत होता. तो पोलर कंपनीचा होता. तो चालू केल्यानंतर घर्रघर्र असा आवाज करायचा. त्याला दोन वेळेस दुरूस्तही केले गेले होते. पण आता उन्हाळा सुरू होणार अन त्यात त्याचा न सहन होणारा आवाज ऐकून तो फॅन बदलायचा निर्णय घेतला.

बाजारात अनेक प्रकारचे सिलींग फॅन्स उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती अगदी ९०० रूपयांपासून सुरू होतात.

नवा फॅन घेण्यासाठी मी मार्केट मध्ये फिरलो. त्याचप्रमाणे इंटरनेटवरही सर्च केले. त्यात BLDC Motor असणारे नवे तंत्र असणारे सिलींग फॅन्स देखील आले आहेत.

घरात दुसर्‍या रूम मध्ये ओरीएंट कंपनीचा चांगला चालणारा फॅन असल्याने ओरीएंट चे फॅन्स बघीतले. इतर कंपन्यांचेही फॅन्स उपलब्ध आहेत आणि ते चांगले आहेतच. तर बीएलडीसी मोटर असणारा पोलर कंपनीचा फॅन हा ३२ वॅट मध्ये १२०० एमएम अ‍ॅल्यूमीनीअम पाती असणारा, कॉपर वायंडींग मध्ये उपलब्ध होता. हा फॅन रिमोट कंट्रोल करून वापरता येतो. त्याची किंमत २९५०/- इतकी सांगितली गेली. वॉरंटी २ वर्षे. (इलेक्ट्रीक प्रॉडक्टसमध्ये एमआरपी वेगळी आणि जास्त असते. एमआरपीला काही अर्थ नसतो.)

दुसर्‍या दुकानात क्रॉम्टन कंपनीचे बीएलडीसी मोटर सोडून इतर फॅन्स होते. त्यांच्या किंमती साधारण १२००/- रुपयांपासून पुढे होत्या.

आणखी एक दुकान पाहिले असता तेथे एक ग्राहक बीएलडीसी मोटर आणि रिमोट कंट्रोल असलेले क्रॉम्टन कंपनीचे दोन फॅन्स घेवून जात असतांना दिसला. मलाही त्या फॅन्सबाबत उत्सूकता होतीच. मी त्या फॅन बाबत दुकानदाराला विचारले. त्यात सध्या क्रॉम्टन Energion HS (रिमोट कंट्रोल सहीत) हे एकच मॉडेल बीएलडीसी मध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. त्याची किंमत रुपये ३०००/- होती. या फॅनवर वॉरंटी पाच वर्षांची आहे. मी तो फॅन घेणार असे त्या दुकानदाराला सांगितले. त्याचेकडे केवळ आयव्हरी रंगात तो फॅन उपलब्ध होता. मला तपकिरी - ब्राऊन रंगात फॅन हवा होता. मला थोडा वेळ असल्याने अन फॅन घेवूनच घरी जायचे असल्याने मी तो त्यांना उपलब्ध करून द्यायला सांगितला. त्या मालकाने होकार दिला. ग्राहकाने आग्रह केल्यास दुकानदार शेजारपाजारच्या त्याच्या ओळखीतून ती वस्तू अ‍ॅरेंज करून देतो. तो कुठून आणतो याबाबत मला काही घेणे नव्हते. मला वस्तू हवी होती आणि दुपारच्या उन्हात आणखी दुसरे दुकान पाहण्याची माझी इच्छा नव्हती. अर्थात या दुकानापासून थोडे दूर - समोरच माझ्या कॉलेज मित्राचे असलेच फॅन, कूलर, कूकर, ओव्हन, मिक्सर इत्यादी विकण्याचे दुकान आहे पण मी ते टाळले. आणि त्याचेकडे हे मॉडेल उपलब्ध असेलच असे नव्हते.

मला हव्या असलेल्या रंगाचा फॅन येईपर्यंत मग मी तेथल्या काउंटरवरील विक्रेत्याशी त्या फॅन बाबत चौकशी केली. त्याला वॅटेज विचारले असता तो ५० वॅटचा फॅन असल्याचे सांगितले. पण मला विश्वास बसला नाही. कारण रेग्यूलर फॅन्स हे साधारण ७५-८० वॅट असतात आणि आधीच्या दुकानात ओरीएंट कंपनीचा बीएलडीसी मोटर असणारा फॅन हा ३२ वॅट मध्ये उपलब्ध होता तर या क्रॉम्टन Energion HS फॅनचे वॅटेज जवळपास तितकेच असायला हवे होते. बीएलडीसी मोटर असणारा फॅन वीजेची बचत ५०% पर्यंत करतो.

image2 Crompton Celing Fan Review Marathiliha.com

माझा गोंधळ पाहून दुकानाचा मालक तेथे आला. त्याने मोबाईलमध्ये क्रॉम्टन Energion HS चे स्पेसीफिकेशन पाहून या मॉडेलचे इनपूट वॅटेज हे ३५ वॅट असल्याचे मला दाखवले. माझी खात्री पटली. तो तेथे येईपर्यंत मी देखील माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटवर या मॉडेलचे वॅटेज किती हे पाहिले. तेच दुकानमालकाने दाखवल्याने मला समाधान वाटले. या फॅनची एमआरपी रु. ३८००/- आहे.

माझ्या आवडीच्या रंगाचा फॅन येईपर्यंत त्या मालकाने मला त्याच्या डोक्यावर गरगरणारा फॅन दाखवला. तो फॅन (कंपनीचे नाव विसरलो) साध्या मोटरमध्ये होता पण तो फॅन मोबाईलमधल्या अ‍ॅपवर कंट्रोल करता येणारा होता. त्यात १ ते १०० पर्यंत फॅन स्पिड कंट्रोल करता येतो. त्यात क्वाडकोर असलेला क्वालकॉम्पचा मायक्रोप्रोसेसर होता. त्यात असंख्य सेटींग्ज होत्या जेणे करून फॅन ब्रीझ मोडवर जाणे, थांबून थांबून चालवणे, टायमर लावून चालवणे इत्यादी सोई होत्या. त्याची किंमत ४९०० रुपये होती. त्याच्याच खालचे मॉडेल ३५०० रुपयांत होते पण त्यात स्मार्ट मायक्रोप्रोसेसर नव्हता. तो नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा रुपये १५००/- मध्ये जोडून मिळण्याची सोयही होती.

माझ्या आवडीचा क्रॉम्टन Energion HS फॅन आला आणि मग मी तो पैसे देवून घरी घेवून आलो.

अनबॉक्सींग क्रॉम्टन Energion HS फॅन:
फॅनची मोटर आणि तीन पाती दोन वेगवेगळ्या बॉक्स मध्ये होती. पात्यांचे बॉक्स उघडून पाती निराळी ठेवली.

फॅनचे बॉक्स उघडल्यानंतर त्यात फॅनचे मोटर असणारा मुख्य भाग होता. त्याबरोबरच एक दांडी, हुकला टांगायचे रबरी बूश, त्याला असणार्‍या क्लॅम्स, नट बोल्ट्स, वॉशर, लॉकींग पीन्स इत्यादी होते. मुख्य म्हणजे रिमोट होता. रिमोटमध्ये बॅटरी-सेल्स नव्हत्या. ते दोन सेल्स मी बाहेरून घेतले.

image3 Crompton Celing Fan Review Marathiliha.comफॅनची जोडणी:
बॉक्समधले सर्व पार्टस मी टेबलावर काढून ठेवले. सर्वात आधी आवाज करणारा जुना फॅन सिलींगमधून काढून घेतला. (मेन एमसीबी अर्थातच बंद केला होता.) त्या जुन्या फॅनच्या दांडीमधून असणारी पाऊण-एक फुटाचीच वायर मला नव्या फॅनमध्ये बसवायची असल्याने मी ती आधी काढून घेतली. सर्वात प्रथम नव्या फॅनच्या दांडीमध्ये ती वायर ओवून घेतली. नंतर मोटर असणार्‍या मुख्य भागाला तीन पाते जोडून त्यांना नट आवळून टाईट केले. फॅनला दांडी जोडून खाली नट टाईट केले. दांडीतून खाली आलेल्या वायर्स फॅनच्या इनपूटला जोडल्या. पण मोटर आणि छताला असणारे दोन कप मी त्या दांडीत टाकायचे विसरलो. लक्षात आल्यानंतर पुन्हा दांडीच्या वरच्या बाजूला मी वायरला जोडणे सोपे जावे म्हणून कपलींग लावतो ते काढावे लागले. त्यानंतर ते दोन कप दांडीत टाकले. (वाळूचे घड्याळ कसे असते तसे ते कप दिसतात. येथे फोटो टाकत नाही पण आपल्याला कल्पना यावी म्हणून हे लिहीले आहे.) पुन्हा वायरच्या वरच्या बाजूला कपलींग लावले. (कृपया वर इमेज १ बघा.)

फॅनची छताला जोडणी:
या बीएलडीसी फॅनला भिंतीवरच्या रेग्यूलेटरची गरज नसते. रिमोटवरच हे फॅन चालतात. तशी सुचना ऑपरेटींग मॅन्यूअल मध्ये आणि रिमोटवरही लिहीलेली आहे. ऑपरेटींग मॅन्यूअलमध्ये असेही लिहीलेले होते की तुम्ही भिंतीवरचे रेग्यूलेटर जरी काढले नाही तरी ते कायम फूल स्पिडच्या सेटींगवर ठेवा. भिंतीवरचे रेग्यूलेटर काढायचे ठरवले असते तर आणखी काम वाढले असते. त्यामुळे मी भिंतीवरचे इलेक्ट्रॉनीक रेग्यूलेटर तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला.

नंतर शिडीवर उभे राहून नवा फॅन मी बूश सहीत छताच्या हूकला टांगला. नट थोडे लूजच सोडले. कारण मला पहिल्यांदा फॅनची ट्रायल घ्यायची होती. आधीच नट टाईट करून नंतर काही झाले अन फॅन चालला नाही तर शिडीवर उभे राहून वरचे नट खोलणे किती त्रासदायक असते अन ते देखील उन्हाळ्यात वीज/ फॅन बंद करून - ते आपण अनूभवले असेलच. (आपण हवेसाठीच फॅन लावत असतो तर मग आपल्याला उंचावर काम करतांना हवा देणार कोण?) असो.

त्यानंतर एमसीबी चालू केला असता फॅन लगेचच गोल फिरायला लागला! (भिंतीवरचे इलेक्ट्रॉनीक रेग्यूलेटर फूल स्पिडच्या सेटींगवर होते.) नंतर रेग्यूलेटर बंद करून शीडीवर चढून छताच्या हूकला टांगलेल्या फॅनचे सगळे बोल्ट्स टाईट केले. दोन कप्स फॅनची मोटरची असेंब्ली अन छताची हूकची जोडणी झाकतील असे सरकवले.

त्यानंतर भिंतीवरचे रेग्यूलेटर फूल स्पीडला ठेवून फॅन चालू केला.

फॅनचे रिमोट कंट्रोल टेस्टींग:
बीएलडीसी फॅनला भिंतीवरचे रेग्यूलेटरची गरज नसते हे आधीच सांगितले आहे. रिमोट कंट्रोल ने सर्वात प्रथम मी फॅन ऑफ बटन दाबून थांबवला. नंतर तो ऑन बटन दाबून चालू केला. तो पाच या सेटींगवर फूल स्पीडमध्ये फिरत होता. नंतर मी एक नंबर स्पीडचे बटन दाबून पाहिले. फॅनचा स्पीड कमी झालेला होता. नंतर २, ३, ४ असे सर्व रिमोटवरील बटन दाबून फॅन टेस्ट केला. फॅन त्या त्या स्पीडला योग्य रितीने फिरत होता.
त्या रिमोटवरच १ तास, २ तास, ३ तास आणि ४ तास असे बटन आहे. म्हणजे ते दाबले असता फॅन त्या त्या तासांपूरता चालून आपोआप थांबतो. अर्थात मला त्याची टेस्टींग करायची नव्हती. हा एक रिमोट दोन क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन कंट्रोल करण्याकरता वापरता येतो असे मॅन्यूअल मध्ये लिहीलेले आहे. त्यासाठी एक नंबरचे बटन दहा सेकंद दाबून ठेवल्यास बीप असा आवाज होतो आणि तो रिमोट त्या त्या फॅनला सेट होतो.

निष्कर्ष:
बीएलडीसी फॅन हे तुलनेने नव्या टेक्नॉलॉजीचे फॅन आहेत. हे फॅन कन्व्हेंशनल फॅनच्या तुलनेत ५०% वीज वाचवतात. (असे स्पेसीफीकेशन मध्ये लिहीलेले आहे. मी घेतलेल्या क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅनचे बॉक्स पॅकींग व्यवस्थित होते. त्यावर सर्व सूचना आहेत.

ऑपरेटींग मॅन्यूअल सुचनांमधील तृटी:
* २३० व्होल्ट इनपूट वायर्स कोठे जोडाव्यात हे कोठेही लिहीलेले नाही.
* दोन कप्स आधीच दांडीत टाकून घ्यावेत हि सुचना किंवा चित्र देखील नाही.
या दोन बाबी खटकल्या.

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन वापरल्यानंतर योग्य हवा देतो असे आढळले. फॅन रूममध्ये सर्वदूर हवा फेकत होता. रिमोटने फॅन कंट्रोल करणे सुखदायक आहे. हा रिमोट फॅनकडे वळवायलाच हवा असे नाही. कुठल्याही अँगलमध्ये (जमीनीकडे सुद्धा) बटन दाबून फॅन कंट्रोल करता येतो. यात इन्फारेड टेक्नॉलॉजी आहे. (दुकानमालक वाय-फाय आहे असे सांगत होता. आपण ऐकून घ्यायचे.)

या फॅनची बाजारात तुलनात्मक किंमत योग्य आहे. फॅनवर डिजाईन वगैरे काही नाही. एकदम सोबर दिसतो.

सुचना:
* क्रॉम्टन कंपनीचा आणि माझा फॅन विकत घेण्याशिवाय काहीही संबंध नाही.
* हा रिह्यू (समीक्षा - review) लिहीण्यासाठी मला कुणाकडूनही आर्थिक प्राप्ती झालेली नाही.
* फॅनच्या जोडणीबाबत व्यक्तीपरत्वे निराळे अनूभव येवू शकतात.
* कोणत्याही इलेक्ट्रीकल वस्तू हाताळतांना वीजेचा मुख्य प्रवाह मेन स्विच किंवा एमसीबी बंद करावा.
* जरूर तेथे तांत्रीक भाषेतले इंग्रजी प्रतीशब्दच लेख लिहीतांना वापरले आहेत.

- पाषाणभेद
०२/०३/२०२०
(पूर्वप्रकाशीत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान समीक्षा.
छताला असणारे दोन कप मी त्या दांडीत टाकायचे विसरलो.

हे बऱ्याचदा माझ्याकडून झाले आहे. आकाश कंदील लावताना बल्ब होल्डर ला वायर जोडल्यावर लक्षात येते की त्याची कॅप वायरमध्ये टाकायचे राहून गेले, पुन्हा वायर जोडणी खोलून कॅप वायरमध्ये टाकावी लागते.

व्वा क्या बात है. खूप छान रिव्ह्यू.
असा रिमोट वाला पंखा असतो हे मला माहितीच नव्हतं. गेले १० वर्ष पंखा खरेदी करायची गरजच पडली नव्हती.
यात वायफाय असतं तर अलेक्सा ला सांगून चालू/बंद, कमी/जास्त करता आला असता ना?

कृपया असेच रिव्ह्यू लिहीत रहा.

छान.!
Fan. + Regulator = ४९०० ?

@Srd
आपणांस कसली किंमत अपेक्षित आहे?

आजकाल फॅनसोबत रेग्यूलेटर मिळणे बंद झाले आहे.

रेग्यूलेटर आपल्या वॉलसॉकेटच्या बटनांमध्ये घ्यावा लागतो.

फॅनची किंमत मला ३०००/- पडली आहे.

साधे रेग्यूलेटर बटन अगदी रुपये ८०/- पासून मिळते.

@भरत
बरोबर. मला ता विक्रत्याने हा पण पंखा दाखवला होता. नाव विसरलो होतो मी.

हा मोबाईल ॲपने कंट्रोल करता येवू शकतो.

पण यात बीएलडीसी मोटर/तंत्र नाहीये. त्यामुळे टाळला. अन ॲप बेस्ड कंट्रोल नको होता मला.

कसा आहे रिजल्ट?

मस्त. माहिती. कामाचा धागा
नवीन घरात नवीन पंखे काय कुठले घ्यायचे हा प्रश्न होताच. बजेटचाही अंदाज नव्हता. रिमोटवर चालणारया पंख्याबद्दल माहितीही नव्हते.
एक दोन प्रश्न

१. एकाच रिमोटवर सारे पंखे चालतील ना? आणि चालले तर तो एकच रिमोट सर्व घरभर नाचवायचा का?
की प्रत्येक पंख्यासोबत एक रिमोट येतो आणि एकमेकांचे एकमेकांना चालतात. हे सोयीचे आहे सर्वाधिक

२. रिमोटमध्ये ग्डबड झाली वा वेळेवर सापडला नाही तर रेग्युलेटर नेहमीसारखे आप्ले काम करतो ना? कि रिमोटवरच अव्ल्ंबून राहायचे?

Sleep Mode
Fan’s speed keep on reducing gradually
During the night increase your comfort level by switching to this mode
Saves energy smartly
असे वरील लींकमध्ये दिलंय

ऋन्मेश, प्रत्येक फॅनसोबत एक रीमोट मिळतोच. (कोणताही मेक असो).
स्पेसीफिक क्रॉम्प्टन बद्दल या मॉडेल बद्दल बोलायचे झाले तर दोन रुमचे फॅनचे एका रीमोटबरोबर पेअरींग करता येते. त्यामुळे व्हर्च्यूअली एका रीमोटवर दोन फॅन चालतील. ( पण ते नाचवावे लागतील.)

दुसरे असे की या फॅनसोबत रेग्यूलेटर लागतच नाही. आहे तो रेग्यूलेटर आधीचा असल्यास काढून टाकावा लागतो. जे काय कमी जास्त करायचे ते रिमोटनेच.

आणि जर तुम्ही घोडा विकत घेतला तर नालेची चिंता कशाला करतात? नाल मिळेल ना दुसरी.

फक्त एकच की एका कंपनीचे रिमोट त्याच कंपनीच्या मेकला चालते. रोटीबेटी व्यवहार आपसात करत नाहीत.

आशा आहे की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले.
आपण समाधानी असाल तर आमव्या कस्टमर सॅटिसफॅक्शन सर्वे मध्ये सहभागी ह्वा.

आम्हाला एक ते दहा अंकांमध्ये रेटींग द्या जेथे १ म्हणजे उपयोगी नाही आणि १० म्हणजे सर्वोत्कृष्ट आहे.

धन्यवाद.

वाह! मस्त लेख/रिव्ह्यू. उपयोगाचा धागा आहे. तुम्हाला वीजबिलात काही फरक जाणवला का?
भरत, तुमचाही अनुभव वाचायला आवडेल.
BLDC ceiling fans माझ्या लिस्टमध्ये कधीपासून आहेत!
अजून एक या अनुषंगाने प्रश्न आहे मला. अमेरिकेत बऱ्याच फॅन्सना एक स्विच असतो ज्यामुळे आपण पाती फिरण्याची दिशा बदलू शकतो. भारतात अशा प्रकारचे फॅन्स मिळतात का?

अल्सो देअर मे बी सम फॅन्स वीथ बीएलडीसी मोटर ॲन्ड विदाऊट रिमोट. यू निड टू सर्च फॉर ईट.

( हे म्हणजे मला विंग्रजी येते हे सांगण्यासाठी हं)
Happy

जिज्ञासा, वीजबीलाची रक्कम एका फॅनमुळे कमी नाही होणार. आणि बरेच फॅक्टर असतात वीज वापरात. तसेच येथे उन्हाळा आहे. पंखे जास्त चालतात. दुसरे असे की लॉकडाऊनमुळे ॲव्हरेज बीले येत आहेत.

भारतात असले उलटे फिरणारे बटन नसते.
आम्रविकेत असले उलटे फिरवणारे बटन पक्षी उलट फिरणारे फॅन्स का असावेत?

खालची हवा वर फेकणे हा उद्देश का असावा?
गरम हवा हलकी असते अन ती वर जावी हा सायंटीफीक परिणामाचा उपयोग करून घेतला आहे काय?

अवांतर: मोटरची वायंडींग उलट केली की फॅन उलट फिरतो.

पाभे, ओके.
पंख्याखाली झोपल्यावर हवेचे फटके बसतात तसे न होता हवा सिलींगच्या बाजूने खेळती राहते. अमेरिकेत मुख्यतः एसी मधून येणारी हवा नीट पसरवली जाते पंखा उलटा फिरला की. मला तरी हेच कारण माहित आहे. It's a nice to have feature.

>>यात वायफाय असतं तर अलेक्सा ला सांगून चालू/बंद, कमी/जास्त करता आला असता ना?<<
इथे सिलिंग फॅन्स कंट्रोल करण्याकरता वेगळे स्विच मिळतात, ते भारतात सुद्धा चालु शकतील. वायफाय एनेबल्ड असल्याने सिरी, अ‍ॅलेक्सा फ्रेंडली म्हणु शकतो...

>>गरम हवा हलकी असते अन ती वर जावी हा सायंटीफीक परिणामाचा उपयोग करून घेतला आहे काय?<<
नॉट श्योर, आय्डिया इज टु कांप्लिमेंट सेंट्रल एसीज फोर्स्ड एयर सिस्टम. थंडित क्लॉकवाइज सेटिंगमुळे रुममधली गरम हवा खेळती रहाते, आणि उन्हाळ्यात अ‍ॅंटिक्लॉकवाइज सेटिंगमुळे थंड हवा पंख्याच्या स्पिडनुसार खाली वेगाने फेकली जाते, विंडचिल इफेक्ट करता...

छान समीक्षा.
छताला असणारे दोन कप मी त्या दांडीत टाकायचे विसरलो. >>+१

माझ्याकडुन पण दोन तीन वेळा ही चुक झाली आहे.

BLDC मध्ये फॅन चा रेग्युलेटर जर बनवला तर आजच्या technology मध्ये त्याचा आकार खुप मोठा लागेल आणि कदाचित आजुन एक वायर रेग्युलेटर वरुन फॅन पर्यन्त खेचावी लागेल. त्यामुळे मला नाही वाटत की कोणती कंपनी ट्रेडिशनल रेग्युलेटर देतील .

पाषाणभेद ,
मॅन्युयल मध्ये PFC किंवा Power Factor Correction चा उल्लेख आहे का?
जेव्हा स्मार्ट मीटर लागेल तेव्हा PFC नसेल तर जास्त सेव्हिंग नाही होणार.

@पाषाणभेद, फ्यान +रिमोट ची किंमत असं लिहायचं होतं ते रेग्युलेटर लिहिलं. दोन वेगळे फ्यान दिले आहेत ते वाचलं.
मग सर्व डिटेल्स क्राम्पटन आणि इतर साईटवरचे BLDC बद्दल वाचून काढले.

एकूण हे तंत्रज्ञान उत्तम आहे यात शंकाच नाही. माहितीबद्दल धन्यवाद.

गेले चाळीस वर्षांत सिलिंग फ्यान घेण्यासाठी दुकानात जाण्याची वेळ आली नाही. पण खिडकीला (किचन ) बसणारे इग्झॉस्ट फ्यान ( टु इन वन टाइप दोन)आणले. त्यात आताचा तिसरा फक्त वनवे इग्झॉस्ट आहे. तो फार उपयोगी पडला.

@साहिल शहा , तुमचे उत्तर मी देऊ शकतो.

१) नेहमीच्या फ्यानमध्ये रनिंग कॉइल (=प्रायमरी )ला समांतर कंडेन्सर जोडलेला असतो तो पॉवर फ्याक्टर सुधारण्यासाठी असतो. त्याची केपसिटी कमी होऊन फ्यान हळू फिरतो/पावर फ्याक्टर कमी होतो तेव्हा बदलावा लागतो.
कॉइल असणारे प्रत्येक इलेक्ट्रिक उपकरण( वाशिंग मशिन, फ्रिज, पंप वगैरे) हे स्वतंत्रपणे पॉवर फ्याक्टर सुधरवूनच केलेले असते.
२) BLDC चे रोटर मध्ये फिक्स्ट परमनंट म्याग्निट्स आहेत तशी नेहमीच्या फ्यानला नसतात. BLDC च्या स्टेटरचे वाइंडींगही साधे सोपे वेगळे आहे.
३) इलेक्ट्रोनिक्स युनिट BLDC जोडलेले असते त्यात -
२३० वोल्टस एसी सप्लाई >> SMPC CIRCUIT >> हवे असलेले डीसी वोल्टेज>> रिमोट अक्टिवेशन आहे.

हे SMPS सर्किट एलसीडी टिवी, सेट टॉप बॉक्स वगैरेत असते आणि सहज स्वस्त मिळते. याचे पावर कन्झम्पशन ३०-३५ वॉट असते. हेच वापरले आहे आणि वाइंडिंगमध्ये फेरफार केला आहे.
BLDC चा खप वाढला की किंमत दोन हजारपर्यंत खाली येईल.

>>> अमेरिकेत बऱ्याच फॅन्सना एक स्विच असतो ज्यामुळे आपण पाती फिरण्याची दिशा बदलू शकतो. भारतात अशा प्रकारचे फॅन्स मिळतात का? >>>

@जिज्ञासा,
ही आइडिया चांगली आहे.
हे असे करणे इथे, आतासुद्धा नवीन फ्यान न घेता ,आहे त्याच कोणत्याही सिलिंग फ्यानला करणे पन्नास रुपयांत करणे सहज शक्य आहे.
मी फ्यान उघडून बारीकसारीक काम ( कंडेन्सर बदलणे) करतो. तेव्हा हे जमते. आतले संपूर्ण वाईंडिंग बदलायचे नसून फक्त बाहेर पडणारे वायरींचे शेडे यांची जोडाजोड टु इन वन स्विचमधून घ्यायची एवढेच काम आहे.

पाषाणभेद, अ‍ॅटमबर्गच्या पंख्यांत बी एल डीसी मोटर आहे की.
आम्हांला टाटा पॉवरच्या कृपेने पंखे अर्ध्या किंमतीत पडलेत.

आधीच्या पंख्यांच्या तुलनेत स्पीड जास्त आहे.
वीज बिलात फरक पडलाय का ते या महिन्याचं बिल पाहून सांगेन.
इथे लिहिल्याबरोबर अ‍ॅटमबर्ग फेसबुकवर मागे लागलं. नवीन रेनेसा स्मार्ट प्लस मॉडेल Voice-enabled, App-controlled & Wi-fi compatible आहे. आमचे फक्त रिमोट ऑपरेटेड आहेत.

चांगली माहिती मिळाली. नवे पंखे घ्यायची वेळ येईल तेव्हा ही माहिती उपयोगी पडेल.

दुसरे असे की लॉकडाऊनमुळे ॲव्हरेज बीले येत आहेत.

मोबाईलमध्ये महावितरण अँप असेल व त्या मोबाईलवर त्यांच्याकडून आलेला एसेमेस असेल तर आपले महिन्याचे युनिट्स देता येतात. मी गेल्या महिन्यात दिले होते, असज एसेमेस आलाय. 14मे पर्यंत द्यायचे आहे. एसेमेस आलेला नसेल तर अँप असूनही युनिट्स देता येत नाहीत.

मी मागील महिन्यात आणि परवा अॅपवरून मिटर रिडिंग चा फोटो टाकला, त्यामुळे सरासरी बिलापासून सुटका झाली.

एसआरडी, साहिल शहा, भरत
बरीच टेक्नीकल माहीती समजली. धन्यवाद.

@ आग्या१९९० मिटर रिडींगमध्ये अनेक आकडे बदलत असतात.
चालू मिटररिडींगसाठी कोणते रिडींग असलेला फोटो पाठवायचा?
आणि एसएमएस येण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते काय?

Pages