सुटकेस ६

Submitted by जव्हेरगंज on 8 May, 2020 - 14:37

पाचव्या भागातला अतर्क्य, इल्लॉजिकल, अतिरंजित कंटेंट काढला आहे. खरंतर अहमदाबादला पोहोचेपर्यंत पाच सहा मर्डर करायचा इरादा होता. Proud पण सुज्ञ मायबोलीकरांनी तो उधळून लावला.. Light 1
असो. पहिले एक दोन परिच्छेद सोडल्यास बाकी कंटेंट नवा आहे. आशा आहे आपल्याला आवडेल.

***********************************
स्टेशनला गेलो आणि गाडी पार्क केली. मग तोबा गर्दीत सलीमची वाट बघत बसलो. तिकीट काऊंटरच्या आसपास भटकलो. साला नक्की कुठे असेल या विचारात असतानाच तो पुढे येऊन टपकला.
"चलो.." म्हणून मला सोबत येण्याची खूण केली. मी त्याच्या मागे मागे एका उड्डाणपूलाखाली अंधाऱ्या जागेत गेलो. तेथे एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याच्याकडून कसलीशी पिशवी त्याने उचलली. आणि " ये ले" म्हणून माझ्याकडे दिली.
"क्या है इसमे..?" मी पिशवी चापचत विचारले. आतमध्ये तर जुने फाटके कपडे कोंबून बसवले होते.
"कोकेन.." तो शांतपणे म्हणाला. "ढूंढ मत, काफी मेहनत से छुपाया है."
"अच्छा!"
"लेकीन याद रख, अगर पकडा गया, हममेसे किसीका नाम नही लेनेका.." त्याने मला सक्त ताकिद दिली.
"बिलकुल" मी त्याला भरोसा दिला.
"अब निकल.." त्याने आदेश सोडला.

पिशवी घेऊन मी स्टेशनवर आलो. तिकिट काऊंटरवर तोबा गर्दी. रात्रीचे दहा वाजत आले होते. आणि अहमदाबाद एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर ऊभी होती. मग तसाच आत घुसलो.

स्लीपर कोचात साईड अप्परचं एक बाकडं रिकामं दिसलं. मग पिशव्या ठेवून निवांत पडलो. गाडीने वेग पकडला तसा टिसी येऊन दाखल झाला. बाकिच्यांचे तिकीट चेक करत करत त्याने माझेही तिकीट मागितले. मी दोन हजाराची कडक नोट सारत त्याला म्हटले, " एक अहमदाबाद देदो"
त्यालाही काय ते कळून चुकलं. त्यानं हातानंच एक तिकीट बनवलं आणि मला दिलं
मी "थ्यांक यू" म्हणत पुन्हा एकदा आडवा झालो.

विक्याने व्हाटसआप पाठवले होते. चेक केले. बॉसने आज कुठल्याश्या कारणावरून दंगा केला असं काहीसं ते होतं. म्हणजेच कुठल्याश्या फालतू प्राण्याने त्याला जरूर झापलं असणार. हाहा.. पण रिप्लाय द्यायचे मी टाळले. इच्छाच मरून गेली होती कुठेतरी. आपण कुठे चाललो आहोत. कशासाठी. आणि हे थांबणार कुठे? प्रश्न डोळ्यात रुंजी घालायला लागले. मी शुन्याच्या पार आतवर गेलो. लढलो. झगडलो. आणि केंद्रबिंदू झालो.
***********************************

रेल्वेच्या चटक फटक आवाजात झोप कधी आली कळलेच नाही.

सकाळी जाग आली तेव्हा गाडी अहमदाबाद स्टेशनवर ऊभी होती. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला. मग रिक्षास्टंडवर जाऊन चंदेरी बजारचा ऍड्रेस विचारला.
"२०० होगा" तो म्हणाला.
"ठिक है" म्हणून मी बसलो. आणि बऱ्याचशा गल्ल्या वगैरेतून रिक्षा पळायला लागली.
मला वाटले मोदींचे मोठमोठे पोस्टर बघायला भेटतील. पण कसलं काय. एकही पोस्टर नव्हते. इथली लोकं मोदींना ओळखतात तरी का असा प्रश्न पडावा.

बऱ्याचशा वेळाने ते चंदेरी बझार आले. नाव आणि तिथल्या परिसराचा अजिबातच काही संबंध नव्हता. जुनी पत्र्याची मोडकळीस आलेली घरे. रिक्षावाल्याला दर्शन हॉटेलच्या समोर घ्यायला लावले. घर क्रमांक ३०१ इथंच असावं.
"मुझे तुरंत वापसभी जाना है. रूक सकते हो तो रूको." मी रिक्षावाल्याला म्हटले. तो तयार झाला. मी पुढे जाऊन एकाला जतिनभाईचा पत्ता विचारला. त्याने एका जुनाट छप्परवजा घराकडे जाण्यास मला सांगितले. मी तिथे जाऊन दरवाजा ठोठावला.
आतून एक म्हातारा पण तगडा दाढीवाला पुरुष बाहेर आला.
"कौन?"
"जतिनभाईसे मिलना था.."
त्याने पिशवीकडे बघितले समजून गेला. म्हणाला, "अंदर आ जाव. इधर बैठो."

गरीबीच्या अवकळा दाखवत असलेल्या त्या झोपडीत मी एका लाकडी खुर्चीवर बसलो. विश्वास नाही बसत ही अशी माणसे अंडरवर्ल्ड मध्ये आहेत.
"नये लगते हो.." त्याने पिशवी चेक करत विचारले.
"जी.." मी अंधारी खोली न्याहाळत त्याला म्हणालो.
त्याने पिशवीतील कपडे बाहेर काढले. आणि कपड्याची आतमध्ये लपवलेली पांढरी पाकीटे फोडून चाखून पाहिले.
"असली है... शाब्बास.." कदाचित तो माझ्या इमानदारीवर खुश झाला असावा.
"मै रोकडा लाता हू.." म्हणून आत कुठेतरी गेला.

त्या अंधाऱ्या झोपडीत राहून राहून माझी नजर फळीवर ठेवलेल्या एका सुटकेसकडे जात होती. मी जवळ जाऊन पाहिले. च्यावी लावायच्या ठिकाणी पुर्ण मोडतोड झाली होती. माझ्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. ही तीच सुटकेस होती. जिला मी खिळा ठोकून उघडले होते.

च्यायला!

मी येऊन खुर्चीवर गपगार बसलो. जतिनभाई आतून एक थैली घेऊन आला. "लो" तो म्हणाला.
मी थैली उघडून बघितले. करकरीत नोटांची बंडले अस्ताव्यस्त पडली होती.
"कितना है?"
"दस पेटी.." म्हणजे दहा लाख. तरीच एवढी कमी होती.

मी तिथून बाहेर पडलो आणि रिक्षाने स्टेशनवर आलो.
मग राजनभाईला फोन लावला.
"भाई, काम हो गया.. लेकीन एक लफडा है."
"क्या हुआ?"
"वो सुटकेस मिल गया."
"कौनसा?"
"वही जो मैने टोयोटा कार से उठाया था"
"------"
"और सोचो वो कहा मिला.?"
"कहा?"
"जतिनभाईके घर मे.."
"सच बोल रहा है तू?"
"बिलकूल"
"एक काम कर तू सिधा निकलके यहा आजा, मै देखता है आगे क्या करनेका" तो फोन ठेवत म्हणाला.

पण ही सुटकेस त्याच्याकडे पोहोचली कशी. अंडरवर्ल्ड किती तगडं पसरलंय सालं. पण जतिनभाई सारखे गद्दार कितीतरी असतील.

रेल्वेत बसलो. आणि परतीचा प्रवास सुरु केला. निव्वळ झोपलो. या अनपेक्षित सुटकेने जरा सुखावलो. भार हलका झाला. आता या असल्या भानगडीत पुन्हा पडायचे नाही असे मनोमन ठरवले.

मुंबई गाडी जेव्हा थांबली तेव्हा प्रचंड तहान लागली होती. मग प्लॅटफॉर्मवर बिस्लेरी घेतली. आणि फळांचा ज्युस पिलो.
नंतर जागेवर येऊन बघतो तो काय? थैली गायब!!
प्रचंड शोधले. डबे पालथे घातले. स्टेशनभर धावलो. मुंबईचे भामटे चोर फार निष्णात असतात. पुन्हा टेन्शन. सवाल दहा लाखांचा होता. राजनभाईला फोन लावणारंच होतो की थोडा विचार केला.
जतिनभाईकडून पैसे घ्यायचेत हे मला कोणी सांगितलेच नव्हते. ना सलीमने, ना राजनभाईने.
जतिनभाईने आपल्याला पैसे दिलेच नाहीत असा कांगावा मी करु शकत होतो. किंवा मी त्याबाबतीत अनभिज्ञ होतो. तसाही आता जतीनभाई गद्दार ठरला होता. स्टोरी तयार होती. पचवायला एकदम सोपी.

मग त्याच रेल्वेने पुण्यात आलो. घरी गेलो. तसा लवकरच आल्याने बायकोने विशेष चौकशी केली नाही. जरा वेळ झोपलो.

फोन वाजला तसा उठलो. राजनभाई फोनवर होता.
"पहुंच गया क्या?"'
"जी भाई."
"अरे वो रोकडा दिया था जतिनभाईने, वो देना मेरेको"
"कैसा रोकडा, उसने तो मुझे कुछ भी नहीं दिया.."
"रुक मै अब उपरही आता हू"
च्यायला! हा बिल्डिंगच्या खाली ऊभा आहे की काय? आणि आता हा घरी येणार?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरो जरा येडा निघाला, मुंबईत थैली गाडीत ठेऊन उतरला. Happy >>> तेच म्हणते असं कसं ? आपण तर आपली साधी बॅकपॅक पण घेऊन उतरतो कुठेही. आणि या बाबा १० लाखाची थैली गाडीत ठेऊन उतरला !
असो पण हा भाग आवडला आहे, लॉजिकल वाटला आधीच्यापेक्षा..

मी हा भाग अजून वाचला नाहीये पण चार लोकांनी टीका केली म्हणून तुमच्या डोक्यात असलेली गोष्ट का बदलता? फार तर ती गोष्ट पूर्ण केल्यावर हा आल्टरनेट प्लॉट देखिल टाकायचा. अजूनही तो आधीचा ट्रॅक पूर्ण केला तर आवडेल. असो.

आता हा भाग वाचते.

@मामी,
या क्रमशः नादात थोडा गोंधळ उडतोय खरा.. पण प्लॉट तोच आहे. फक्त जरा सॉफ्ट करून सिंपल भाषेत लिहीत आहे.

लोकांच्या टेस्ट जपायला आपली स्टाइल बदलत राहिली तर आम्हाला आवडणारा जव्हेरगंज इफेक्ट त्यात कसा येईल ?
दिल के कुछ मायूस अल्फाझ कुछ इस कदर है की....
अब तो लगता है हवा का स्थानीय बहाव लहरों पर काफ़ी असर रखता है।

पण चार लोकांनी टीका केली
>>>>> ॲा .. टीका कुठे ... एकूण कथेचा फ्लो पाहता थोडासा अतिरंजीत वाटतोय असचं लिहीलय कि चार लोकांनी. अस लिहू नका, नविनच भाग लिहा अस कुणी नाही बोललं.
लेखकाने स्वत : अवलोकन करून पुन : लेखन केल या भागाचं.

या अशा उंटावरच्या शहाण्यांमुळे प्रतिक्रिया द्यायला ही आताशा नको वाटतं. Sad

मला तुमच्या कथा फारच आवडतात.. ही पण मस्त चालली आहे..
भाग ५ मला खूप आवडलेला.. शॉकींग एलिमेंट होता तो रेल्वेतला प्रसंग..
हापण अर्थातच आवडला्य..

पाचवा भाग मस्त होता. सरळ मर्डर! साध्या माणसाची वेगळी स्टोरी मस्त झाली असती.
हे पण ठीक आहे.