व्यक्तिचित्र १

Submitted by Tushar Damgude on 8 May, 2020 - 01:08

"त्या" विचाराने सुद्धा माझं हृदय शतशत तुकड्यांमध्ये विदीर्ण होत होतं. आत्म्याशिवाय जिवंत असलेलं शरीर कुणी पाहिलं आहे का ? भर मध्यरात्री उगम पावलेला सहस्त्रश्मी कुणी पाहिला आहे का ? आपल्या स्थानावरून ढळलेला ध्रुव कुणी पाहीला आहे का ? जसं हे सगळं घडणं कालत्रयीही शक्य नव्हतं तसंच श्रीरामाशिवाय एकाकी आयुष्य जगणारा सौमित्र देखील कुणाच्या नजरेस पडणं कालत्रयी शक्य नव्हतं.

पण कधीकधी जे अशक्य असते ते शक्य करून दाखवण्याचे कटकारस्थान जणू नियती रचत असते. खडतर भविष्याच्या जाणिवेने भूतकाळातील अनेक स्मृतींचा पट माझ्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागला.

ज्या वयात संसारिक सुखात रमून गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडायचे असते त्या वयात वनवासाच्या रूपाने आमच्यावर दुर्दैवाचा आघात झाला.  ज्यांना वंदन करून माझ्या दिवसाची सुरुवात व शेवट होत होता त्या श्रीराम व जानकीला राजत्याग करणे क्रमप्राप्त झालं होतं.

राजा दशरथ व माता सुमीत्रा नंतर माझ्या माता व पित्यास्थानी माझे ज्येष्ठ बंधू श्रीराम व त्यांची अर्धांगिनी मैथिलीच होते. स्त्रियां-स्त्रियांमधील हेव्यादाव्यांमुळे माझा दादा व माझ्यात अंतर पडू नये म्हणून मी वहिणींच्या कनिष्ठ भगिनी उर्मिले सोबतच विवाह केला होता. घरातील ज्येष्ठांची देखभाल करण्याची जबाबदारी उर्मिलेवर सोपवून मी दादा आणि वहिनी बरोबरच वनवासात गेलो होतो.

पुढे चौदा वर्षांचा खडतर वनवास व राक्षसराज रावणवधानंतर 'श्री'रामाच्या पदस्पर्शाने लंकेची 'श्री'लंका झाल्यावर आम्ही आयोध्येत पुन्हा परतलो होतो. परतून सगळा राज्यकारभार हाती घेतल्यानंतर श्रीरामांनी आपल्या रक्ताच्या कुटुंबापेक्षा प्रजेला जास्त महत्त्व देत देवांना देखील हेवा वाटावा अशा एका आदर्श व समृद्ध राज्यकारभाराची घडी बसवली होती. 

या सगळ्या प्रवासात अनेक सुखाचे व अत्यंत दुःखाचे प्रसंग आमच्या जीवनात आले. परंतु इतकं सगळं सोसून व भोगून राम-लक्ष्मण ही जोडी मात्र अभेद्य राहिली होती. आम्ही दोघं आता जवळपास वयाच्या पन्नाशीत पोहोचलो होतो. रेशमी राजवस्त्र, सुवर्णालंकार व हिरेजडित किरीट मस्तकी धारण केल्यावर दादा अगदी भगवान विष्णूचा अवतार दिसत असे. ह्या साजअलंकारांच्या तेजाने डोळे दिपू नयेत म्हणूनच की काय निसर्गाने योजना केल्याप्रमाणे दादाच्या केशसंभारातून आता एखाद दुसरा चंदेरी केस हळूच डोकावत होता. 

सगळं काही सुरळीत चालले होते आणि एका दुर्दैवी दिवशी... 

हो दुर्दैवीच ... तिकडे दूर वैतरणीच्या किनाऱ्यावर वसलेल्या यमपुरीचे नरेश 'धर्मराज' अयोध्या दरबारात प्रवेश करते झाले. सूर्यपुत्र धर्मराजांची भेट इतकी अनपेक्षित होती की राजसिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामांनादेखील अत्यंत आश्चर्य वाटलं. राज्य, धर्म कर्तव्य, ,मृत्यू, मोक्ष आदी अनेक विषयांवर कमालीचा अभ्यास व अनुभव असलेल्या धर्मराजांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी दादाने त्यांचे चरणस्पर्श केले व अत्यंत भक्तिभावाने त्यांना आपले सिंहासन अधिग्रहण करण्याची हात जोडून नम्र विनंती केली. या भक्तिने प्रसन्न झाल्याचे भाव यमराजांच्या चेहर्‍यावर झळकत होते.

त्यानंतर समस्त अयोध्यावासीयांच्यावतीने युवराज भरताने धर्मराजाचे स्वागत केले व दरबारात उपस्थित पौरजनांना काही मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेथून पुढे कमाल तासभर यमराजांनी अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत चार आश्रम तसेच पौर जनांचे, राजाचे व अधिकाऱ्यांचे कर्तव्य व अधिकार यावर विवेचन केले. अयोध्या अनेक बाबतीत एक आदर्श शासनव्यवस्था असली तरी धर्मराजांच्या मार्गदर्शनामुळे ती अधिक दोषमुक्त होण्यास मदत होणार होती हे नक्की. 

दरबारातील कामकाज संपल्यानंतर अयोध्या नरेशांनी यम राजांची अत्यंत आदरपूर्वक आमच्या कुटुंबाबरोबरच भोजन व्यवस्था केली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात भोजन पार पाडले व वातावरण जरा सैलसर झाल्यावर धर्मराजांनी श्रीरामांकडे सूचक नजरेने पाहिले. तो इशारा मिळताच श्रीरामांनी सर्वांना रजा घेण्याची अनुमती दिली. आता त्या दिवाणखान्यात धर्मराज, प्रभु श्रीराम व फक्त मी उरलो होतो. 

यमराजांनी माझ्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे भाव चेहऱ्यावर प्रकट करताच श्रीरामांनी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मध्येच थांबवत ... 

" अयोध्या नरेश मजल-दरमजल करत दूर देशातून मी येथपर्यंत आलो आहे ते भविष्यकालीन काही अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर विचारविनिमय करण्यासाठी, त्या फक्त आणि फक्त तुमच्या कानांसाठी आहेत. यामध्ये तुमचे बंधू लक्ष्मण यांच्याबद्दल किंचितही अविश्वास निश्चित माझ्या मनात नाही. लक्ष्मण तुमची सावली असला तरी प्रकाश लुप्त झाल्यावर मनुष्याची सावली देखील काही काळ नजरेआड होतेच, ही वेळ देखील तशीच समजा. 

यावर श्रीराम धर्मराजांना काही बोलणार त्याआधीच मी बोलायला सुरुवात केली "दादा यमराज योग्य तेच बोलत आहेत, आपली मुलं आपल्याला कितीही प्रिय असली तरी मनात काही सद्हेतू बाळगून आपण काही गोष्टी त्यांच्या कान व नजरेआड ठेवतोच ना ? धर्मराज तुम्ही अगदी निश्चिंत मनाने अयोध्या नरेशांसोबत हितगूज करा, त्यामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मी स्वतः द्वारपाल बनून पहारा देतो"

"श्रीराम आपलं बोलणं सुरू असताना मला खरंच कुणाचा व्यत्यय नको आहे कारण...." यमराज हे बोलत असताना त्यांना मध्येच थांबवत राजा श्रीराम म्हणाले 'महात्मा शनी यांचे जेष्ठ बंधू, संध्या व सूर्याचे ज्येष्ठ पुत्र व अष्ट दिशांचे लोकपाल असलेल्या यमपुरीचे नरेश धर्मराजा मी आपल्याला आश्वस्त करतो आपली चर्चा सुरू असताना ह्या कवाडातून फक्त जीवन वायू आत येईल. याद्वाराचे रक्षण स्वतः लक्ष्मण म्हणजे मीच करतोय असे समजा व माझी म्हणजे या अयोध्या नरेशाची आज्ञा मोडून जो आत येईल त्यास मी स्वतः आपला यमपाश गळ्यात अडकवून मृत्यूदंड देईन. लक्ष्मणा... " 

"जी दादा.." मी प्रतिसाद दिला. 

"मी धर्मराजांना काय वचन दिले ते तू ऐकलं आहेस , आता प्राण गेला तरी मी दिलेल्या वचनाचे पालन कर" दादा म्हणाला.

दादाचे साधे शब्द देखील माझ्यासाठी आज्ञाच होती. आणि सेवक, बालकं व कनिष्ठांनी प्रतिप्रश्न न करता फक्त आज्ञा पाळावी यातच त्यांचं हित असतं.

मी पटकन हालचाल करत गरज भासली तर असावं म्हणून त्या दोघांसाठी दासीकरवी काही फळे व जलकुंभांची व्यवस्था करायला लावली व सगळं व्यवस्थित आहे याची खात्री झाल्यावर मी त्या दिवाणखाण्याचे कवाड बंद करून घेतलं अगदी निश्‍चिंत मनाने त्यांची चर्चा पूर्ण करण्यासाठी. 

त्या दोघांची चर्चा सुरू होऊन जवळपास एक प्रहर निघून गेला असेल आणि राजद्वारावर कुणी अतिथी आल्याची वार्ता सांगणारा टोल टणकार करत वाजला. द्वाराशी आलेल्या अतिथींचे स्वागत व आदरातिथ्य करण्यासाठी युवराज भरत व माझा जुळा बंधू शत्रुघ्न समर्थ होते त्यामुळे मी निर्धास्त मनाने पहारा देत त्या द्वारा बाहेर उभा होतो .

कोण आलं असावं या विचारात मी असतानाच मोठमोठ्याने वाद-विवाद करत असलेला एक कठोर आवाज माझ्या दिशेने येऊ लागला. काही क्षण गेले असतील तोच समोरचा दरवाजा धाडकन उघडून हतबल नजरेने माझ्याकडे पाहणारे भरत - शत्रुघ्न व त्यांच्यापुढे सूर्यासारखे तेजस्वी डोळे असलेले, किडकिडीत परंतु ताठ शरीरयष्टीचे, कठोर मुद्रा असलेले ऋषी दुर्वास उभे होते. महान योगी दत्तात्रयांचे ज्येष्ठ बंधू व अत्रि ऋषींचे ज्येष्ठ पुत्र महर्षि दुर्वास माझ्यासमोर अतिथी म्हणून उभे होते

'दुर्वास'....... दुर्वास म्हणजे ज्याच्या सोबत राहणे अशक्य आहे तो ! आणि या नावाला शोभेल अशीच ख्यातकीर्ती असलेले ऋषी दुर्वास आज ह्यावेळी इकडे अयोध्येत कशासाठी आले असावेत असा प्रश्न माझ्या मनात उमटला तोच माझे मन वाचल्याप्रमाणे 
" मी तुझ्या जेष्ठ बंधू रामाची भेट घेण्यासाठी येथे आलो आहे सौमित्रा. जा तुझ्या ज्येष्ठ बंधू रामाला वार्ता दे की अत्रीनंदन दुर्वास तुला भेटण्यासाठी तुझा द्वारावर उभे आहेत, जा लक्ष्मणा.. त्वरा कर " 

हे ऐकताच " महर्षी, आज आपले पाय आयोध्येला लागले हे आमचे सौभाग्य आहे. आपले चरण प्रक्षालन करण्याची संधी मिळणे म्हणजे सप्त गंगेचे तीर्थोदक घेतल्यासारखे आहे. आपल्याला तत्काळ भेटण्यास अयोध्या नरेशांना अपार आनंद झाला असता पण..." मी चाचरत बोललो

"पण काय लक्ष्मणा...?" दुर्वास

"पण अयोध्या नरेश श्रीराम यमराजांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत आणि कुणीही आलं तरी त्यांच्या चर्चेत व्यत्यय न आणण्याची सक्त ताकीद त्यांनी मला दिली आहे" मी हळूच उत्तरलो व त्यांच्याकडे पाहिले

"कुणीही आलं तरी ? अत्रिनंदन दुर्वास म्हणजे रस्त्यावर शिधा गोळा करणारा कुणीही ऐरागैरा गोसावी वाटतो का तुला लक्ष्मणा" जणू एक वीज चमकली व दुर्वासांच्या मस्तकावरली शीर हळूहळू प्रसरण पावत असल्याचे मला तिरप्या नजरेने दिसले. 

" शब्दांच्या चुकीच्या निवडी बद्दल मला माफ करा ऋषीपुत्र, आपण म्हणजे कोणीही ऐरेगैरे नक्कीच नाही मुनिवर, मी आधीच म्हटल्याप्रमाणे ज्यांचे चरण कमल दुग्ध व जलाने रोज प्रक्षालीत करावे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे साक्षात तुम्ही आहात महर्षी " मी हात जोडून म्हटले . 

"तुझा शब्दछल पूरे सौमित्रा. आता तो दरवाजा उघड आणि रामाला मी आल्याची वार्ता दे" त्यांनी आपलाच हेका पुढे रेटला.

"मी वचनबद्ध आहे अत्रीनंदन, आपला किंचितही अवमान करण्याचा माझा हेतू नाही परंतु ही कवाडं आज्ञेविना उघडण्यास मी असमर्थ आहे" मी अत्यंत विनवणीच्या स्वरात म्हणालो.

"दशरथपुत्रा तू कोणाशी अहंगंडाने बोलत आहेस ह्याची कल्पना आहे का तुला ? एका लत्ता प्रहारात साक्षात विष्णूला रानोमाळ भटकायला लावणाऱ्या अनुसयापुत्र दुर्वासाला काय शक्य आहे आणि काय शक्य नाही हे सांगतो आहेस तू?" हे बोलताना एखाद्या ज्वालामुखीतून तप्त ज्वाला बाहेर पडाव्यात असा त्यांचा चेहरा होत होता. आजूबाजूला असलेले सेवक दास-दासी,भरत, शत्रुघ्न यांच्या समोर आपली अडवणूक एक यकश्चित राजपुत्र करतो आहे कदाचित या संतापाने ते थरथरू लागले असावेत. 

" श्रीरामांच्या आज्ञेशिवाय दरवाजा उघडणाऱ्यास मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल असे वचन श्रीरामाने धर्मराजांना दिले आहे यास्तव तरी माझे ऐकण्याची कृपा आपण करावी ही नम्र विनंती" मी हात जोडत त्यांच्या समोर गुडघे टेकले.

"दिलेल्या वचनामुळे काय काय घडू शकते हे तुमच्या पित्याच्या उदाहरणातून सुर्यवंशीनी काही बोध घेतलेला दिसत नाही" ते अधिक ताडकन फटकारा ओढते झाले.

"निद्रेच्या अधीन झाले असता नकळतपणे उच्चारलेले शब्द देखील वचनाप्रमाणे पाळणाऱ्या रघु कुलाचे आम्ही वंशज आहोत मुनिवर." मी आता होईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याच्या हतबलतेतून बोलून गेलो.

"अच्छा तुला तुझ्या रघु कुळाचा एवढा गर्व आहे तर ऐक, मी अनुसयासुत दुर्वास तुझ्या पुढे दोन पर्याय ठेवतो. पहिला पर्याय म्हणजे माझी क्षमा मागून तू ही कवाडं माझ्यासाठी उघडशील किंवा दुसरा पर्याय म्हणजे माझा अवमान केल्याचे प्रायश्चित म्हणून माझ्या हातून होणाऱ्या अयोध्येच्या सर्वनाशासाठी कारणीभूत होशील" अत्यंत कठोर शब्दात दूर्वासांनी शब्द उच्चारले ते ऐकताच भरत आणि शत्रुघ्न तर मटकन जागेवरच खाली बसले . एक वेळ यमपाशातून मान सोडवणं शक्य होईल पण दुर्वासांनी उच्चारलेले शब्द असत्य होणे कालत्रयी शक्य नव्हतं. 

योगबला बरोबरच रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र व जीव शास्त्रावर वर्षानुवर्षे केलेल्या अत्यंत सखोल अभ्यासामुळे देवांनाही दुर्लभ असणारी अनेक दाहक शस्त्रं व जल-वायु याद्वारे पसरणारी कित्येक अमोघ शस्त्र देखील त्यांच्या भात्यात नरसंहार करण्यासाठी तयार होती ..........तृणपात्याच्या जुडीला भस्म करावं त्याप्रमाणे अयोध्या नगरी मृत्यूच्या भयंकर तांडवात निर्मनुष्य करणे त्यांच्यासाठी क्षुल्लक काम होते

"अयोध्या".... निबिड अरण्यात एकांतवासात राहणाऱ्या या वयोवृद्ध ऋषीसाठी दगड विटांची एक निर्जीव वास्तु असली तरी माझ्या दादासाठी मात्र त्याचा आत्माच होती. स्वेद आणि रक्ताबरोबरच आपल्या अनेक वैयक्तिक सुखांचा बळी देऊन हजारो जनमाणसांना सुख समाधान व समृद्धी देणारे चालते-बोलते नगर होते. त्या अयोध्येचा विनाश होण्याआधी दादाने स्वतःचाच विनाश करून घेणे निवडले असते."

या विचारासोबत पुढे काय करावे याचे उत्तर मला मला सापडले होते. अयोध्या नगरी कि मी ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता आणखी एकदा देखील विचार करण्याची गरज नव्हती. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तरी ही अयोध्या अशीच निरंतर फुलणार बहरणार होती.

पुढील घटनाक्रम अत्यंत वेगाने माझ्या डोळ्यासमोरून सरकला आणि त्या गारगार पाण्याच्या स्पर्शाबरोबर मला वास्तवात देखील घेऊन आला. शरयूच्या किनारी काळ्या कातीव दगडांचा हा विस्तीर्ण घाट आम्ही मोठ्या हौसेने बांधून घेतला होता. त्या घाटाकर आज पाय ठेवायला देखील जागा उरली नव्हती. पौरजनांनी फुललेल्या त्या गर्दीच्या कोंडाळ्यात उभे असलेले माझे पुत्र अंगद आणि चंद्रकेतू इतर अनेक अयोध्यावासीयां प्रमाणे स्वतःच्या उत्तरीयाने आपले ओलते डोळे पुसत उभे होते.  आता शरयूच्या त्या विशाल पात्रात मी गळ्या इतक्या पाण्यात चालत गेलो होतो, वातावरणात भयाण वारा सुटला होता. त्या वातावरणात अनामिक हुरहूर लावणारी कातरवेळ आपल्या परीने आणखी भर घालत होती. 

अयोध्या व अयोध्या नरेशांचे शेवटचे दर्शन व्हावे म्हणून मी मागे वळून पाहिले. मी मागे पाहिले खरे पण अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांमुळे मला सारे दृश्य धुसर दिसत होते. त्या भल्यामोठ्या गर्दीत माझे डोळे पीत वस्त्रांमध्ये लपेटलेल्या ज्या निलवर्णी पायांना शोधत होते. ते पाय मात्र त्या गर्दीत कुठेही दिसत नव्हते. अर्थात ते दिसणारही नव्हते. कारण एक लोकराजा म्हणून प्रसंगी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागत असले तरीही आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणांचा साथीदार असलेला आपला पुत्रासमान कनिष्ठ बंधू त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघालेला आहे हे त्या पित्याच्या हृदयाला पहावणारे होते का ? त्या जागी मी स्वतःला कल्पून पाहिले असता असंख्य यातना आणि तळमळणारे दादाचे हृदय मला दिसत होते. 

"अनेक लोक आम्हाला 'भगवंत' समजत असले तरीही आम्ही मात्र फार फार सामान्य जीव होतो. राग,लोभ, मोह, मद, मत्सर अशा अनेक विकारांना तोंड देत जीवनभर वावरत होतो. सहा विकारांनी घातलेल्या प्रचंड मोठ्या बांधामुळे मानवी जीवन पाण्याच्या जलाशयाप्रमाणे कुंठित झाले होते. तो अदृष्य परंतु अभेद्य बांध फोडून सकारात्मक विचारांचा प्रवाह समाजात वाहता राहण्यासाठी दादा,वहिनी, हनुमान, सुग्रीव, भरत आणि मी आम्हाला जमेल तितपत जीवनभर प्रयत्न केला होता. 

हे सगळं स्वस्तुती करायची म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये. तर तुमच्या देखील आयुष्यात सत्य-असत्य, योग्य आणि अयोग्य, स्वसुखाय आणि बहुजन सुखाय, नीती आणि अनीती यातील निवड करण्याचे अनेक प्रसंग येतील. कित्येकदा तुम्हाला असत्य, अयोग्य आणि अनीती यांचे मोहदायक आणि अनुसरण्यास सोपे असलेले मार्ग चोखाळावेसे वाटतील. अर्थात मानवी मन देखील त्याला पूरक आहे, पण तुमचे चारित्र्य स्खलन करणारे विचार जेव्हा जेव्हा तुमच्या मनात येतील तेव्हा तेव्हा एखाद्या नाट्यमय महाकाव्या प्रमाणे असलेले हे राम आख्यान जरूर आठवा ....!"

"पित्याने दिलेल्या शब्दाचा अनमान होऊ नये म्हणून ऐन तारुण्यात राज्यत्याग करून वनवास स्वीकारणारा माझा दादा, एखाद्या फुलपाखराप्रमाणे प्रेमाने जपलेल्या परंतु पती प्रेमाखातर क्षणात त्या सर्व राजभोगांचा त्याग करणारी माझी वहिनी सीता, नियतीने अनायसेच पायाशी आणून टाकलेल्या महानगरी अयोध्येची राजगादी पुन्हा दादाच्या पायाशी नेऊन टाकणारा बंधू भरत, आयुष्यभर धन्याच्या सुखात स्वतःचे समाधान मानणारा हनुमान आणि स्वतःच्या सुखांचे भस्म करून घेत दुसऱ्यांना आनंदाचा प्रकाश देणारी माझी उर्मिला ! 

दादा एकदा आम्हां सगळ्यांना म्हटला होता. एक प्रामाणिक व आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या राज्यातील प्रजा प्रामाणिक व आदर्श हवी. परंतु प्रामाणिक व आदर्श प्रजा निर्माण करण्यासाठी त्या राज्याचा कारभार चालवणाऱ्या शासकांना प्रसंगी वैयक्तिक सुखाचे बळी देत आपल्या प्रजेपुढे नितीमूल्यांचे मापदंड उंचवावे लागतील. म्हणूनच खडतर असे मानवी जीवन जगताना एक आशादायी व सकारात्मक ऊर्जा देऊ शकणाऱ्या मानवी नीतिमूल्यांचे मापदंड आम्ही आमच्या वर्तणुकीने शक्य तेवढे उंचावले होते. आणि आम्हा सर्वांना विश्वास होता की या भूमीत जन्म घेणाऱ्या आमच्या आगामी पिढ्या आम्ही निर्माण केलेले मापदंड खुजे ठरवत आणखीन उत्तुंग आदर्श निर्माण करतील. नक्कीच निर्माण करतील."

मला पुन्हा वास्तवात आणण्यासाठी एक मासा माझ्या पायांना लुचण्याचा अयशस्वी प्रयत्न करून गेला. मी माझे डोळे मिटले व शरीर शरयूच्या तळाशी चिरनिद्रा घेण्यासाठी त्या जल प्रवाहात पुढे पुढे चालू लागलो . 

त्याक्षणी प्राणप्रिय दादाला सोडून चालल्याचे प्रचंड दुःख माझ्या मनाशी होते तर दुसरीकडे दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मृत्यूदेखील स्वीकारणाऱ्या रघुवंशाला साजेसा मार्ग अनुसरल्याचे समाधान देखील होते. आपल्या इष्ट देवतेच्या चरणांशी निर्माल्य होण्यात फुलांना जो मोक्षानुभव मिळतो तोच मला मिळत होता.

त्यामुळे जे घडत होते ते योग्यच होते, आणि ..................

आणि माझा दादा बरं मला त्या मृत्यूलोकात एकटे राहू देईल. लोक मला वेगळ्या अर्थाने शेष म्हणतात पण मी फक्त आणि फक्त माझ्या दादाच्या आत्म्याचा एक 'शेष' होतो. आणि आपल्या आत्मिक चैतन्याच्या उर्वरित शेषाचा शोध घेत घेत दादा देखील एक दिवस शरयूच्या कुशीत नक्की येईल याची मला खात्री आहे !

दोन्ही हात भक्तिभावाने छातीशी जोडून मी माझा देह त्या खोल पाण्यात सोडून दिला.. मागे एकच आवाज उठला ........

श्रीराम श्रीराम श्रीराम !

'श्री रामार्पणमस्तू '

तुषार दामगुडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

सुरेख!!! दुर्वासांची कथा विस्मरणाअत तरी गेलेली होती किंवा वाचलेली तरी नव्हती.
अनुसयाचे कृपया अनसूया करावे (जिला असूया नाही)