मन वढाय वढाय (भाग ४८)

Submitted by nimita on 8 May, 2020 - 00:45

दुसऱ्या दिवशी पहाटे कुठल्याशा आवाजानी स्नेहाला जाग आली. तिनी खोलीतून बाहेर येऊन बघितलं - आवाज स्वैपाकघराच्या दिशेनी येत होता. तिची आई आणि मावशी स्वैपाकघरात काहीतरी खुडबुड करत होत्या. तिनी जेव्हा विचारलं तेव्हा वंदना ओशाळलेल्या स्वरात म्हणाली," अगं, फार काही नाही ...रजत ला आणि श्रद्धाला नीलाच्या हातचे शंकरपाळे आवडतात ना ; म्हणून तेच बनवतीये ती .. आणि मी थोड्या कुरडया, सांडगे वगैरे पॅक करतीये...तेही आवडतात ना त्या दोघांना!" त्या दोघींची ती धडपड आणि त्यामागचं प्रेम बघून स्नेहाच्या मनात कुठेतरी कालवलं ! पण वरकरणी त्यांची चेष्टा करत ती म्हणाली," त्यांच्या दोघांच्या आवडी निवडी सारख्या आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर तुम्ही दोघीनी इथे अख्खी खानावळ चालू केली असती."

थोड्याच वेळात सगळे तयार झाले; तेवढ्यात संतोष पण आला. स्नेहाच्या बाबांच्या SUV मधे सगळं सामान लोड करून ठरलेल्या वेळी त्यांनी बडोद्याकरता कूच केलं. रात्रीची झोप अर्धवट झाल्यामुळे थोड्याच वेळात एक एक करून चारही senior citizens झोपून गेले. स्नेहा मात्र अधून मधून संतोषशी गप्पा मारत होती जेणेकरून त्याला इतक्या लांबच्या प्रवासात झोप नाही येणार. थोड्या वेळानी स्नेहानी त्यांच्या कॉलेजच्या व्हॉट्सऍप ग्रुप वर मेसेज पाठवला -' Sorry, cannot attend the b/f meet due to some urgent personal commitment. दोन दिवस तुमच्या सगळ्यांच्या सहवासात खूप छान गेले. सगळ्यांना thanks .'

ग्रुप वरचा तिचा मेसेज वाचून सलीलचा मात्र हिरमोड झाला होता.त्याच्या मनात आलं, 'काल रात्री तर म्हणाली होती स्नेहा की उद्या सकाळी भेटू म्हणून ... मग एका रात्रीत असं अचानक काय झालं असेल? विचारू का तिला फोन करून ? नको, तिनी लिहिलंय की काहीतरी personal काम आहे ; याचाच अर्थ तिला नाही सांगायचं ते सगळ्यांना. आणि दुसरं म्हणजे तिनी हा मेसेज ग्रुप वर टाकला आहे, नेहेमी सारखा मला माझ्या नंबर वर नाही पाठवला- याचाच अर्थ जे काही कारण आहे ते मलासुद्धा सांगायची इच्छा नाहीये तिची... असं असताना मी तिला फोन करून विचारणं योग्य नाही.' पण स्नेहानी आपल्याला विश्वासात घेतलं नाही या जाणीवेनी सलील थोडा हिरमुसला.

ग्रुप मधे सगळ्यांना कळवल्यावर स्नेहानी रजतला फोन करायचं ठरवलं; तेवढ्यात तिच्याच फोनची रिंग वाजली. श्रध्दाचा फोन होता. स्नेहानी सगळ्यात आधी रजतबद्दल विचारलं. पण तो तर मगाशीच तयार होऊन ऑफिसला गेला होता. "इतक्या लवकर," स्नेहानी घड्याळात वेळ बघत विचारलं. त्यावर श्रद्धा म्हणाली,"अगं, आज संध्याकाळी लवकर यायचं आहे ना त्यांना घरी म्हणून लवकर गेले." तिचं हे उत्तर ऐकून स्नेहाचं मन सुखावलं. पुढची जवळजवळ दहा मिनिटं तिची आणि स्नेहाची प्रश्नोत्तरं चालू होती. स्नेहा अगदी काळजीपूर्वक तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होती.. कोणत्याही प्रकारे आजच्या सरप्राईज बद्दल तिला शंका येऊ नये म्हणून! शेवटी श्रध्दाची कॉलेजला जायची वेळ झाली म्हणून मग तिनी आपलं बोलणं आवरतं घेतलं. पण त्यानंतर कितीतरी वेळ स्नेहाच्या मनात रजतचाच विचार येत होता.संध्याकाळी सगळ्यांना एकत्र आलेलं बघून त्याची प्रतिक्रिया काय आणि कशी असेल याबद्दल विचार करूनच तिच्या चेहेऱ्यावर हसू फुलत होतं. डोळ्यांसमोर सारखा रजतचा हसरा चेहेरा दिसत होता. ती मनानी कधीच त्याच्याजवळ जाऊन पोचली होती.

जसजशी घरी पोचायची वेळ जवळ येत होती तसतशी स्नेहाची अधीरता वाढत चालली होती. तिचा हा प्लॅन सीक्रेट राहावा म्हणून तिच्या flight schedule च्या हिशोबानी ती वेळोवेळी रजतला मेसेज पाठवत होती.... 'left for airport' ; 'checked in' ; 'boarding'.... आणि त्यानंतर तिनी चक्क चक्क आपला फोन खरंच aeroplane mode वर ठेवला होता... रजतला कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये यासाठी तिनी सर्वतोपरी काळजी घेतली होती. शेवटी एकदाचे ते सगळे घरी पोचले. घराबाहेर रजतची कार दिसली आणि स्नेहाची अधीरता अगदी शिगेला पोचली.सकाळी श्रद्धानी म्हटल्याप्रमाणे खरंच आज रजत लवकर घरी आला होता. सगळे अगदी चुपचाप गाडीतून उतरले आणि कोणताही आवाज न करता घराच्या मुख्य दारापाशी गोळा झाले. स्नेहानी धडधडत्या हृदयानी कॉलबेल वाजवली. बंद दारामागून रजतचा आवाज ऐकू आला.." श्रध्दा, जरा बघ तर कोण आलंय आत्ता यावेळी?" पुढच्या काही क्षणांत श्रद्धानी दार उघडलं आणि समोर सगळ्यांना बघून ती इतकी खुश झाली की तिला काय बोलावं काहीच सुचेना... तिच्या मागोमाग रजत देखील आला... स्नेहाला आणि तिच्याबरोबर त्यांच्या आईबाबांना समोर उभं राहिलेलं बघून क्षणभर तो सुद्धा चक्रावला. त्याच्या चेहेऱ्यावर एकाच वेळी आनंद, उत्साह, आश्चर्य असे वेगवेगळे भाव तरळून गेले. कारण त्याच्या हिशोबानी स्नेहा अजूनही विमानातच असायला हवी होती....आणि तीही एकटी !! तेवढ्यात वंदनामावशी पुढे होऊन श्रद्धाला जवळ घेत म्हणाली," काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?" तिच्या या बोलण्यानी भानावर येत रजतनी स्नेहाकडे बघत विचारलं," म्हणजे , तुमचं आधीपासूनच ठरलं होतं की काय हे सगळं?" त्यावर घरात शिरत स्नेहा हसत म्हणाली," नाही रे, काल रात्री ठरवलं आम्ही...सांगते सगळं ; पण जरा आम्हांला आतमधे तर येऊ दे. सकाळपासून प्रवास करून सगळ्यांनाच दमायला झालंय."

मग नंतर बराच वेळ 'हे सरप्राईज आणि त्याच्या प्लॅंनिंग' बद्दल सविस्तर गप्पा झाल्या. त्यावरून वंदना आणि नीला चे हास्य विनोद ही झाले. गप्पांना अगदी ऊत आला होता. चार दिवस शांत असलेली वास्तु आता अचानक हसायला लागली होती. घराला लागूनच असलेल्या आऊट हाऊसमधे संतोषची सोय करण्यात आली. दिवसभर ड्रायव्हिंग केल्यामुळे तोही थकला होता. त्याचं जेवण रजतनी त्याला त्याच्या खोलीतच नेऊन दिलं.इतरांच्या जेवणाची तयारी करायच्या उद्देशानी स्नेहा स्वैपाकघरात शिरली. रजतनी सुमती मावशींकडून सगळा स्वैपाक आधीच करवून घेतला होता. आणि घरी पोचल्यावर जास्तीचं काही करायला नको म्हणून स्नेहानी येता येता त्यांच्या नेहेमीच्या take away मधून जेवण पॅक करून आणलं होतं. ती जेवणासाठी टेबल सेट करत असताना रजत तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला," Thanks स्नेहा... इतकं छान सरप्राईज दिल्याबद्दल खूप खूप thanks ... खरंच आज आपल्या दोघांच्या आई बाबांना असं समोर बघून मला इतका आनंद झालाय ना... काल त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हापासूनच त्यांना प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा होत होती. तुला नेहेमीच माझ्या मनात काय चाललंय ते न सांगताही कळतं... पण मी मात्र...." रजत बोलता बोलता अचानक थांबला. त्याच्या हसऱ्या डोळ्यांत एक विषण्ण भाव जाणवला स्नेहाला. त्याचं ते रूप बघून स्नेहाचेही डोळे भरून आले. त्याचे हात हातात घेत ती म्हणाली, " तू अजिबात स्वतःला दोष देऊ नकोस. मी खूप सुखी आणि समाधानी आहे. आणि तुझी बायको असल्याचा अभिमान आहे मला..." त्यांचं बोलणं चालू असतानाच बाहेरून स्नेहाच्या आईची हाक ऐकू आली..." तुमचा नवरा बायकोचा रोमान्स झाला असेल तर थोडी पोटपूजा करायची का?" तिच्या या प्रश्नामुळे घरभर हास्याची लाट उसळली. स्नेहा आणि रजत ही त्यात सामील झाले.

हसत खेळत सगळ्यांची जेवणं झाली आणि मग जो काही गप्पांचा फड रंगला तो मध्यरात्र व्हायला आली तरी संपायचं नाव घेत नव्हता. सगळ्यांचे ते आनंदी, समाधानी चेहेरे बघून स्नेहाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. खास करून तिच्या या सरप्राईज मुळे रजत खुश झाला होता त्यामुळे तिच्या मनातली आदल्या रात्रीची अपराधाची भावना थोडी कमी झाली होती.

बराच वेळ झाला तरी कोणी झोपायला जायचं नाव घेत नव्हते, शेवटी स्नेहाचे बाबा।म्हणाले, " आता उरलेल्या गप्पा उद्या मारू या. रजतला पण सकाळी उठून ऑफिसला जायचं असेल ना ?" त्यावर रजत म्हणाला," मी विचार करतोय की उद्या रजा टाकतो..." त्याच्या या विचाराला सगळ्यांनी मिळून दुजोरा दिला. पण तरीही स्नेहाच्या बाबांनी आपला मुद्दा काही सोडला नाही -" अरे वा! मग तर बरंच झालं. आता उरलेल्या गप्पा मारायला उद्याचा पूर्ण दिवस मोकळा आहे. आणि तसंही दिवसभर प्रवास करून मी तरी खूप दमलोय बाबा...मी तर चाललो झोपायला."

थोड्याच वेळात एक एक करून सगळे झोपायला गेले. स्वैपाकघरातली शेवटची झाकपाक करून स्नेहा पण बेडरूममधे आली. रजत तिची वाटच बघत होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users