मन वढाय वढाय (भाग ४५)

Submitted by nimita on 4 May, 2020 - 22:01

स्नेहा डिनर करता हॉटेल मधे जायला निघाली. कॅब मधे बसलेली असताना सुद्धा एकीकडे तिची विचारचक्रं चालूच होती. त्याच नादात तिनी पर्समधे ठेवलेली एक छोटी डबी बाहेर काढली आणि उघडली...आत ते निळ्या रंगाचं ब्रेसलेट होतं.... अगदी नवंकोरं.... आजपर्यंत कधीही न वापरलेलं ! . हो, कारण इतक्या वर्षांत तिला कधी इच्छाच नव्हती झाली ते वापरायची. तिच्या कपाटात एका कोपऱ्यात पडून होतं ते इतकी वर्षं... दुर्लक्षित अवस्थेत !!... 'पण मग आत्ता मी हे का आणलं माझ्याबरोबर ? मी अजूनही ते जपून ठेवलंय हे सलीलला कळावं म्हणून?' स्नेहानी स्वतःच्याच मनाला प्रश्न केला. पण या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडेही नव्हतं.

बडोद्याला जेव्हा ती तिचे कपडे पॅक करत होती तेव्हा तिला एका कप्प्यात ही डबी सापडली होती. आणि एखादी प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी त्याप्रमाणे कोणताही विचार न करता स्नेहानी ती डबी तिच्या vanity case मधे ठेवली होती.....त्यावरून स्नेहाला काहीतरी आठवलं,' पण मग जेव्हा मला मदत करत असताना श्रद्धा ती vanity उघडायला लागली तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका का चुकला? मी हे ब्रेसलेट बरोबर नेतीये हे इतरांपासून लपवावंसं का वाटलं मला? हे काय होतंय मला? माझ्याच मनावर माझा कंट्रोल नाही उरला. माझ्या मनात हे असे चित्रविचित्र विचार का येत असतात ?.. लहानपणी तो 'तळ्यात- मळ्यात' नावाचा खेळ खेळायचो तसंच काहीसं झालंय माझ्या मनाचं.....क्षणात एक विचार करतं तर पुढच्या क्षणी स्वतःच तो खोडून काढतं आणि त्याच्या विरुद्ध विचार सुरू होतात!!! मी स्वतःच मला अनोळखी वाटायला लागली आहे आता !!!'

मनात ही अशी विचारांची वावटळ उठत असताना एकीकडे स्नेहा त्या ब्रेसलेट कडेच बघत होती... 'काय करू ? आज आत्ता घालू का हे ब्रेसलेट हातात?' विचार करता करता स्नेहानी ते ब्रेसलेट हातात चढवलं देखील..... किती छान दिसत होतं...अगदी तिच्या साडीला परफेक्ट मॅचिंग !

काही क्षण ती नुसतीच त्याला न्याहाळत राहिली...पण मग झटका लागल्यासारखी भानावर आली.....स्वतःलाच दटावत म्हणाली, ' तुझं डोकं ठिकाणावर आहे ना स्नेहा?? हा काय मूर्खपणा करतीयेस तू? जर सलीलनी तुझ्या हातात हे त्यानी दिलेलं ब्रेसलेट बघितलं तर त्याला काय वाटेल याचा विचार तरी केलायस का तू? इतकी वर्षं तू त्याची ही आठवण जपून ठेवलीस हे कळल्यावर त्याच्या मनाची अवस्था काय होईल तुला माहीत आहे ना? मग का उगीच त्याला वेडी आशा दाखवतीयेस? का खेळतीयेस त्याच्या मनाशी ? एखाद्याच्या चांगुलपणाचा इतकाही फायदा नाही घेऊ गं! ' स्नेहानी पुढच्या क्षणी ते ब्रेसलेट हातातून काढलं आणि पुन्हा तिच्या पर्समधे ठेवून दिलं...अगदी तळाशी !'वेळेतच सावरले मी ,' एक सुस्कारा सोडत स्नेहानी स्वतःलाच शाबासकी दिली.

ती जेव्हा हॉटेल मधे पोचली तेव्हा मोजकेच जण आले होते. पण तरीही गप्पा आणि गोंधळ काही कमी नव्हता. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे आपापल्या रुटीन मधे व्यस्त होणार होते आणि म्हणूनच आजची ही भेट सगळ्यांसाठीच खास होती. स्नेहानी reunion मधे आलेल्या सगळ्यांसाठी स्वतः बनवलेली गिफ्ट्स आणली होती.... मित्रांसाठी hand painted neck ties आणि मैत्रिणींसाठी बाटीक काम केलेले दुपट्टे ! सगळ्यांना तिची गिफ्ट्स खूप आवडली... सगळ्यांनी अगदी आवर्जून सांगितलं तिला तसं.... पण तिला सगळ्यात जास्त उत्सुकता होती सलीलच्या प्रतिक्रियेची ! 'सलीलला आवडेल ना माझं हे गिफ्ट ?' एखाद्या लहान मुलासारखी उतावीळ झाली होती ती. शेवटी एकदाचा सलील आला आणि स्नेहानी त्याला त्याचं गिफ्ट दिलं.." बघून सांग कसं वाटलं !" आपली अधीरता लपवत स्नेहा म्हणाली. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता सलील म्हणाला," तू दिलं आहेस म्हणजे मला आवडणारच नक्की !" स्नेहाला जरी हेच उत्तर अपेक्षित असलं तरी ते ऐकल्यावर मात्र तिचं मन सुखावलं ! सलीलच्या पुढच्या वाक्यानी तर ती जणूकाही पुन्हा भूतकाळात गेली... तिची नजर चुकवत सलील हळूच म्हणाला होता ," तुला अजूनही निळा रंग suit करतो."

सलील न राहवून बोलून तर गेला पण त्यावर स्नेहाची प्रतिक्रिया ऐकायला थांबायचं धैर्य नव्हतं त्याच्यात .... 'जर माझं हे असं बोलणं तिला आवडलं नाही तर ? माझ्या या अशा उघड उघड तारीफ करण्याचा राग तर नसेल ना आला तिला?' सलीलच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली... स्नेहाला- तिच्या मैत्रीला गमावून बसण्याची भीती ! आणि म्हणूनच स्नेहा काही म्हणायच्या आत त्यानी तिथून काढता पाय घेतला आणि तो इतर मित्रांच्या घोळक्यात शिरला.

स्नेहाच्या मनाची अवस्था पण काही फारशी वेगळी नव्हती... तिलाही धास्ती वाटत होती....' सलीलच्या वागण्या बोलण्यामुळे माझ्या मनात होणारी भावनांची चलबिचल त्याला समजली तर नसेल ना? तो जेव्हा माझी काळजी घेतो, माझी तारीफ करतो तेव्हा मला होणारा आनंद माझ्या चेहेऱ्यावर दिसत तर नसेल ना त्याला ?

नाही नाही... हे सगळं सलीलला अजिबात कळायला नाही पाहिजे... फक्त सलीलच नव्हे तर हे कोणालाच कळता कामा नये. माझ्या मनातल्या या भावना, या संवेदना या फक्त माझ्यासाठी आहेत. हे भावविश्व माझं स्वतःचं आहे. आणि ते मला माझ्यापुरतंच मर्यादित ठेवायचं आहे. कारण जर हे बाकीच्यांना कळलं तर लगेच प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार माझ्या या भावविश्वाचं विश्लेषण करायला सुरुवात करेल. त्यातल्या नाजूक, कोमल अशा भावनांचं विच्छेदन केलं जाईल आणि मग त्यांना योग्य - अयोग्य, नैतिक - अनैतिक ,पाप - पुण्य या आणि अशा अनेक नावांची लेबल्स लागतील. आणि नेमकं हेच नको आहे मला. माझ्या मनातले हे विचार, भावना बरोबर आहेत का चूक हे माझं मलाही समजत नाहीये... निदान आत्ता तरी ! पण मला त्याची गरजही भासत नाहीये. या क्षणी मला माझ्या मनातल्या विचारांनी , माझ्या भावनांनी आनंद मिळतोय, पूर्णत्वाचा प्रत्यय येतोय - आणि तेवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी !'

स्नेहानी मनातले सगळे विचार तात्पुरते बाजूला सारले आणि ती इतरांबरोबर गप्पा गोष्टी करण्यात रंगून गेली. अधूनमधून तिची नजर सलीलच्या दिशेनी वळत होती; पण आता स्नेहा तिच्या त्या नजरेला अडवत नव्हती. कारण तिच्या आजूबाजूचं वातावरणच इतकं भारून टाकणारं होतं. प्रत्येक जण भूतकाळात जाऊन पोचला होता. मधली पंचवीस वर्षं जणूकाही हवेत विरून गेली होती सगळ्यांसाठी. तेव्हाच्याच गोष्टी, तेव्हाच्याच आठवणी.....या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय - स्नेहा पण नकळत त्याच धर्तीवर विचार करायला लागली होती.

बघता बघता सगळ्यांची निघायची वेळ झाली. पण कोणालाच तिथून जावंसं वाटत नव्हतं.... काही ना काही कारण काढून सगळे तिथेच रेंगाळत होते. शेवटी हॉटेल बंद करायची वेळ झाली आणि नाईलाजानी सगळे आपापल्या घरी जायला निघाले.

"तू कशी जातीयेस? मी येऊ का तुला सोडायला?" सलीलनी खूप अपेक्षेनी स्नेहाला विचारलं - तेवढाच अजून थोड्या वेळासाठी तिचा सहवास मिळेल या आशेनी! पण त्याची नजर टाळत स्नेहा म्हणाली," अरे, अजय येतोय मला सोडायला.. तसंही तो माझ्या घराजवळच राहतो ना!" तिचं उत्तर ऐकून सलीलचं मन खट्टू झालं... त्यानी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी त्याच्या चेहेऱ्यावरची नाराजी स्पष्ट वाचता येत होती स्नेहाला. ती मनातल्या मनात म्हणाली," आज मला नक्की काय झालंय माहीत नाहीये, पण तेव्हा सारखंच आजही तुला माझ्यापासून लांब जाताना बघितलं तर कदाचित तिथेच रडू येईल मला....."

विषय बदलत स्नेहा पुढे म्हणाली ," उद्या सकाळी 'parting breakfast ' साठी येणार आहेस ना? तेव्हा भेट होईलच परत एकदा.."

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी एकदा शेवटचं भेटायचं ठरवलं आणि सगळे आपापल्या घरी गेले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या कथेचे भाग वाचल्यानंतर मनात विचारांची रांग लागते.. तेच विचार मांडायचा माझा केविलवाणा प्रयत्न. Happy

पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?

ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?

ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?

तु घर नाहीस माझे
तु तर मुक्त आभाळ
हे भान असुनही
पुन्हा गुंतताना
स्वतःला रोखु कशी मी?

(Dipti Bhagat)

मन्या,
खूप सुंदर कविता लिहिली आहे तुम्ही. आणि ती तुम्हाला माझं लिखाण वाचून सुचली यातच माझ्या लिखाणाची सफलता आहे असं मी मानते. तुमची ही कविता मी तुमच्या नावासकट माझ्या whatsapp परिवारातील सर्व मित्र मैत्रिणींमधे share केली तर चालेल का? तुमच्या उत्तराची वाट बघते आहे. तुम्ही हो म्हणालात तरच share करीन Happy

वा दिप्ती!
हाही भाग जबरदस्त. भावनांचे कल्लोळ शब्दात अलगद बांधले आहेत.

@निमिता, हो! चालेल ना.. कवितेला 'मन वढाय वढाय' हेच शिर्षक दिल तर चालेल का? इथे वेगळा धागा काढुन पोस्ट करेल.. Happy

धन्यवाद चिन्नु! Happy

चिंनू,
धन्यवाद
मन्या,
धन्यवाद, वाचकांच्या प्रतिक्रिया कळवीन तुम्हाला Happy

@निमिता, हो! चालेल ना.. कवितेला 'मन वढाय वढाय' हेच शिर्षक दिल तर चालेल का? इथे वेगळा धागा काढुन पोस्ट करेल..
मन्या, चालेल हो .. Happy

मन्या,
धन्यवाद, वाचकांच्या प्रतिक्रिया कळवीन तुम्हाला Happy>>>>
नक्की कळवा... आवडेल प्रतिक्रिया जाणून घ्यायला... Happy Happy