दारू, लॉकडाऊन आणि अर्थशास्त्र

Submitted by www.chittmanthan.com on 4 May, 2020 - 12:22

कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर
पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही.
मास्कने चेहरा झाकला होता पण डोळ्यातलं ते. समाधान तो आनंद कॅमेरामन च्या कॅमेरात कैद होत नव्हता. एखाद्या युध्दात केलेल्या परक्रमासाठी इनाम घ्यायला ज्या जोशात गेले नसतील त्याहून जास्त आवेशात छाती बाहेर काढून रांगडे गडी आणि बाया रांगेत उभ्या होत्या.
रांगेतल्या लोकांना जणू काही सर्व स्वप्नवतच होत सार. दोन महिन्यांची क्रूर प्रतीक्षा संपली होती.गेल्या दोन महिन्यात यांनी ग्लास उचलला तो पाणी पिण्यासाठी.. बर्फ टाकला तो सरबत बनवण्यासाठी आणि शेंगदाणा खाल्ला तो उपवासाच्या शाबुमध्ये.आता थरथरणारे ओठांच दुःख संपलं अस वाटत असतानाच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दारू दुकान उघड ठेवायच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. आपला आनंद कुणाला सहन होत नाही अस म्हणून बंद व्हायच्या भीतीनं आणि दोन बाटल्या एक्स्ट्रा घेणाऱ्या बेवड्यानी बोट मोडली.
अनेकांनी दारू विक्री सुरू ठेवावी अशी मागणी केली होती. काहींना वाटलं हे बेवड्यांची बाजू घेत आहेत. अर्थशास्त्र समजनाऱ्याना वाटलं आर्थिक स्त्रोत म्हणून ही मागणी केली आहे. खरंच इतका मोठा वाटा दारू विक्रीचा आहे का? तर उत्तर होय अस येत. गेल्या दोन महिन्यात बंद असलेल्या दारू विक्री मुळे देशाला दररोज जवळपास सातशे कोटी च्या कराला मुकावे लागले.
भारतात जागतिक ३३% सरासरीच्या तुलनेत दारू पिनाऱ्यांचे प्रमाण कमी म्हणजे 15% असले तरी भारतात गेल्या सात वर्षांत दारूची मागणी 38% नी वाढली आहे.इतक्या झपाट्याने मागणी वाढणारे हे बहुदा एखादेच क्षेत्र असेल. भारतातल्या खूप साऱ्या राज्यात एकूण कर गोळा होतो त्याच्या जवळपास 20% वाटा हा दारुउद्योग चा आहे. सरकारदरबारी नोंद नसलेल्या गावठी दारू, ताडी आणि भांग पिणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे.
हे झालं अर्थशास्त्र. आता समाजावरचा परिणाम तितकाच महत्वाचा. जसं दारू विक्री वाढली तर कर उत्पन्न वाढते तसाच दारूचे दर वाढल्यावर कुटुंबावर होणारा खर्च कमी होतो असाही निष्कर्ष काढला जातो. ज्यातून चांगलं अन्न, आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. घरगुती हिंसाचार वाढतो.दारू पिऊन गाडी रेटणारे लाखो अपघातांना निमंत्रण देतात. विषारी दारू प्यायल्याने मेलेले लोक सुध्दा खूप आहेत.
आर्थिकदृष्ट्या फायद्याची बाजू समाजशास्त्रीय दृष्ट्या चुकीची असेल तेव्हा दोघांमध्ये समतोल साधणे कठीण होऊन जातं. तरी समतोल साधायचाच अस ठरवल तर सुरवातीच्या टप्प्यात जे लोक दारूच्या पूर्ण आहारी गेले त्यांची संख्या कमी करावी लागेल.ती करताना जोरदार समाजजागृती, वैद्यकीय मदतीबरोबर मानसोपचार तज्ज्ञांची पण मदत दिली पाहिजे.दुसरं म्हणजे दरडोई दारू प्राशन 2007 साली जे 2.4 लिटर होते ते वाढून 2016 मध्ये 5.2 लिटर इतके झाले होते ते कमी करावे लागेल. हे कमी झाल्याने उद्योग तोट्यात जाऊ नये म्हणून लीकर उद्योगाला निर्यात कशी वाढवता येईल यासाठी मदत करावी लागेल. भुमध्य समुद्राला लागून असलेले देश वाइन निर्मिती मध्ये अग्रेसर आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतीची वाइन भारतात निर्माण व्हावी यासाठी संशोधन करणं गरजेचं आहे.ज्यातून रोजगार निर्मिती ही होईल.
मद्य उद्योग हा असा उद्योग आहे जो कधीही बंद पडेल किंवा मंदी येईल असा नाही. त्यामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम कमी करून ह्या उद्योगाचा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी करून घेणं गरजेचं आहे.

टीप- वरील लेख कुणीही मद्याचे सेवन करावे ह्यासाठी प्रोत्साहन करत नाही. मद्याच्या आहारी गेलेल्या लोकांमुळे होणारे समाजाचे नुकसान जाणतो .ह्या लेखातून फक्त वास्तविकता मांडलेली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users