मन वढाय वढाय (भाग ४४)

Submitted by nimita on 3 May, 2020 - 21:55

घरी पोचल्यावर थोडा वेळ घरच्यांशी गप्पा मारून स्नेहा तिच्या खोलीत गेली. आज इतक्या वर्षानंतर एवढं चालल्यामुळे दमली होती ती. रात्री पुन्हा डिनर करता जायचंच होतं ; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्याच्या हेतूनी ती बेडवर आडवी झाली. पण तिचं मन मात्र काही केल्या शांत होत नव्हतं. स्नेहाला राहून राहून स्वतःचाच राग येत होता .... राग म्हणण्यापेक्षा तिचा खूप उद्वेग होत होता ! या reunion मधे सलीलच्या सहवासात आल्यापासून तिच्या मनात बरीच उलथापालथ चालू होती. इतकी वर्षं मनाच्या तळाशी निष्प्राण, निष्प्रभ होऊन पडलेल्या सगळ्या आठवणी, कधी काळी बघितलेली स्वप्नं- सगळंच पुन्हा उसळून वर येत होतं ... पण ही अशी काही पहिलीच वेळ होती असं नाही...तिच्या मनानी याआधीही बऱ्याच वेळा काही ना काही कारणामुळे अशा प्रकारची आठवणींची उजळणी केली होती. 'मग यावेळी जीवाची एवढी तगमग का होतीये ?' - स्नेहानी स्वतःच्याच मनाला प्रश्न केला. ' तुला नाही माहित त्याचं कारण ?' तिच्या मनानी तिला उलट प्रश्न केला...आणि तो प्रश्न काही पूर्णपणे वृथा नव्हता. स्नेहा पण या उद्वेगामागचं खरं कारण जाणून होती... याआधी तिला जेव्हाही सलीलची आठवण आली होती तेव्हा तिला त्या पार्श्वभूमीवर रजतचा चांगुलपणा दिसला होता... रजतच्या तिच्यावर असलेल्या प्रेमाची महती पटली होती....अगदी तिच्या आजीनी म्हटलं होतं त्याप्रमाणे!! पण यावेळी सगळं काही विचित्रच होत होतं... नेहेमीपेक्षा वेगळं... अगदी उलट ! कालपासून सलीलच्या वागण्या बोलण्यामुळे तिला रजतच्या वागण्यातल्या त्रुटी दिसायला लागल्या होत्या. पण मग तसं पाहिलं तर हेदेखील काही पहिल्यांदाच होत नव्हतं. याआधीही बऱ्याच वेळा तिला रजतचा स्वभाव,त्याचं वागणं खटकायचं ! पण आज रजतच्या स्वभावातल्या उणिवांच्या पार्श्वभूमीवर ती सलीलचं वागणं मापून तोलून बघत होती ; म्हणूनच बहुतेक तिचं मन असं बेबंद झालं होतं. तिच्या आणि रजतच्या नात्यात जे हरवलं होतं ते तिला सलीलच्या वागण्या बोलण्यात सापडत होतं.... आणि त्यासाठीच तिचं मन त्या दिशेला ओढ घेत होतं.

या सत्याची प्रचिती झाल्यावर स्नेहा अजूनच गोंधळून गेली... अचानक तिच्या मनात अपराधाची भावना मूळ धरायला लागली...'हे असे विचार करून मी काही चूक तर करत नाहीये ना ? रजत माझा नवरा आहे ; खूप प्रेम करतो तो माझ्यावर.... आणि माझंही तितकंच प्रेम आहे त्याच्यावर....मग असं असतानाही मी दुसऱ्या पुरुषाबद्दल हे असले विचार करतीये ?? एका दृष्टीनी पाहिलं तर हे पापच आहे ना ! मी रजतशी, त्याच्या प्रेमाशी प्रतारणा तर करत नाहीये ना !!' हा विचार मनात आल्याक्षणी स्नेहा स्तब्ध झाली. 'खरंच ही प्रतारणा आहे का?' आपल्या मनात हे असे बंडखोर विचार येताना बघून स्नेहाला स्वतःचीच भीती वाटायला लागली. तिला तिचेच विचार ऐकू यायला लागले... इतकं स्पष्ट विचार करत होतं तिचं मन .... -'इतक्या वर्षांनंतर अजूनही सलील तुझ्यावर प्रेम करतो हे तुला चांगलंच माहिती आहे....अगदी जेव्हापासून सलील पुन्हा भेटला आहे तेव्हापासूनच तू हे जाणून आहेस. तू दुसऱ्या कोणाची तरी बायको आहेस हे माहीत असूनसुद्धा त्यानी तुझ्यावर प्रेम करणं थांबवलं नाही. त्यानी जरी प्रत्यक्ष बोलून दाखवलं नसलं तरी तुझ्या मनापर्यंत पोचल्या आहेत त्याच्या भावना. मग तेव्हाच तू स्पष्टपणे त्याला जाब का नाही विचारालास? का नाही सांगितलंस त्याला की - 'काढून टाक मला तुझ्या मनातून'...तू सांगितलं नाहीस कारण तुलाही मनातून हे सगळं आवडत होतं. त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवणारं त्याचं ते अव्यक्त प्रेम तुला सुखावत होतं. तेव्हासुद्धा तुला रजतकडून जे मिळत नव्हतं ते सलील देत होता.....त्याचा वेळ, त्याचं attention सगळं मिळत होतं तुला. आणि म्हणूनच तू एकीकडे रजत वर प्रेम करत राहिलीस आणि दुसरीकडे सलीलच्या प्रेमालाही नाकारलं नाहीस... As if you wanted to have the best of both the worlds !!'

त्या दृष्टीनी विचार करत असताना तिला तिच्या आईचं एक वाक्य आठवलं. तिच्या लग्नाआधी एकदा जेव्हा ती आणि आई गप्पा मारत होत्या तेव्हा तिची आई म्हणाली होती," एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्नेहा, जेव्हा एका पुरुषाच्या अपेक्षा त्याच्या स्वतःच्या घरात पूर्ण होत नाहीत ना , तेव्हा त्याचं लक्ष घराबाहेर जातं."

आईचं हे म्हणणं जर खरं असेल तर मग हेच सत्य पुरुषांइतकंच बायकांना पण लागू पडायला पाहिजे ना ! पुरुषांसारख्याच स्त्रियांच्या पण कितीतरी अपेक्षा असतातच की त्यांच्या नवऱ्याकडून, त्यांच्या दोघांच्या नात्याकडून! आणि त्या अपेक्षा जर तिचा नवरा पूर्ण करू शकत नसेल तर अशा परिस्थितीत तिचं लक्ष घराबाहेर गेलं तर ??? दोष कोणाचा ? अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या नवऱ्याचा ? का एक स्त्री असूनही तिनी दुसऱ्या पुरुषाबद्दल विचार केला म्हणून त्या स्त्रीचा ??

काय चूक , काय बरोबर ... काहीच उमगत नव्हतं. योग्य आणि अयोग्य यामधलं अंतर अचानक कमी कमी होत होतं. विचारांना, भावनांना मर्यादेत ठेवणारी लक्ष्मणरेषा पुसट होत चालली होती. तिचे ते बंडखोर विचार आता हळूहळू तिच्या मनाचा ताबा घ्यायला लागले होते.

स्वतःच्या विचारांचं, स्वतःच्या वागण्याचं समर्थन करत स्नेहा स्वतःलाच समजावत म्हणाली,' सलीलच्या या अशा वागण्याला मी जबाबदार नाहीये ! मी तर त्याला लग्न करायचा पण सल्ला दिला होता. माझ्या मनात आता फक्त रजत आहे - हे पण माहीत आहे सलीलला. म्हणजेच मी त्याला कोणत्याही प्रकारे अंधारात ठेवलेलं नाहीये. आणि आजपर्यंत माझ्या वागण्या बोलण्यातून कधीही त्याला चुकीचा संदेश पण नाही दिलेला.... इतकं सगळं असूनही जर तो अजूनही माझ्यावर प्रेम करत असेल तर त्यात माझी काय चूक आहे? आणि मी जरी त्याचं प्रेम नाकारलं नसलं तरी त्याचा स्वीकारही नाही केला.... आत्ता प्रत्यक्ष भेटीत तर नाहीच नाही पण याआधी कधीही फोनवर बोलतानाही नाही ! हां, कालपासून तो माझ्याशी जसा वागतोय ते त्याचं वागणं मला आवडतंय हे मान्य आहे मला.... त्याचं ते माझी काळजी घेणं, माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं - सगळं खूप हवंहवंसं वाटतंय. मला बघितल्यावर त्याच्या डोळ्यांत येणारी ती चमक देखील लक्षात आलीये माझ्या... आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामुळे माझा इगो कुठेतरी सुखावतोय ! पण म्हणून काही मी रजतचं प्रेम विसरून सलीलच्या प्रेमाचा स्वीकार केलाय असंही नाहीये....आणि तसंही - हे सगळं मी माझ्यापुरतंच मर्यादित ठेवलं आहे. माझ्या बोलण्यातून किंवा कोणत्याही कृतीतून सलीलचा काहीतरी गैरसमज होईल- त्याच्या प्रेमाला बढावा मिळेल अशी थोडीशी सुद्धा hint नाही दिलेली मी त्याला....आणि देणारही नाही! तेवढी तारतम्यता आहे माझ्याजवळ!! माझ्या मनाला बरं वाटतंय म्हणून उगीच सलीलच्या भावनांशी खेळण्याइतकी पण निर्दयी नाहीये मी...या reunion नंतर आम्ही परत एकमेकांना भेटू की नाही याचीही खात्री नाहीये... आणि जर कधी भेटलोच तर तेव्हा माझ्या मनाची स्थिती आजच्या सारखीच असेल का हेही माहीत नाहीये मला.... पण खरं म्हणजे मी आत्ता तो सगळा विचार करतच नाहीये.... आत्ता मला सलीलच्या सहवासात बरं वाटतंय आणि मी त्याचा सहवास एन्जॉय करायचं ठरवलंय! बस्... इतकंच !!

स्नेहाच्या विचारांची ही अशी उलट सुलट वीण पडत असताना अचानक तिला खोलीच्या बाहेरून वंदना मावशीची हाक ऐकू आली. स्नेहासाठी संध्याकाळचा चहा घेऊन आली होती ती..."अगं, तुला परत डिनर साठी तयार व्हायचं असेल ना ? उशीर नको व्हायला ; म्हणून मग मीच केला चहा।" स्नेहाच्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिनी आधीच उत्तर देऊन टाकलं. स्नेहानी चमकून घड्याळाकडे बघितलं... तिची निघायची वेळ जवळ येत होती. मावशी आणि आईशी गप्पा मारत तिनी चहा संपवला आणि ती तयार होण्यासाठी खोलीत गेली. आज श्रद्धानी सांगितल्याप्रमाणे ती तिची निळी शिफॉन ची साडी नेसणार होती. एकीकडे तयार होताना स्नेहाच्या मनातले विचार चालूच होते. "मी कालपासून निळ्या रंगसंगतीचेच कपडे घालतीये हे सलीलच्या लक्षात आलं असेल का? तो नेहेमी म्हणायचा-'निळा रंग तुझ्यावर अगदी खुलून दिसतो.' अजूनही तसंच वाटत असेल का त्याला?

पण मी फक्त या रंगाचेच कपडे का आणले बरोबर ? केवळ सलीलला आवडतात म्हणून ? का खरंच मला तो रंग खुलून दिसतो म्हणून ? " स्नेहा पुन्हा एकदा विचारांच्या भोवऱ्यात अडकली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग वाचून जगजित सिंग यांची एक गझल आठवली
समझते थे मगर फ़िर भी ना रख्खी दूरीयाँ हमनें
चरागों को जलाने में जलाली उंगलियाँ हमनें

असचं काही झालयं स्नेहाचं

," एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्नेहा, जेव्हा एका पुरुषाच्या अपेक्षा त्याच्या स्वतःच्या घरात पूर्ण होत नाहीत ना , तेव्हा त्याचं लक्ष घराबाहेर जातं."

आईचं हे म्हणणं जर खरं असेल तर मग हेच सत्य पुरुषांइतकंच बायकांना पण लागू पडायला पाहिजे ना ! पुरुषांसारख्याच स्त्रियांच्या पण कितीतरी अपेक्षा असतातच की त्यांच्या नवऱ्याकडून, त्यांच्या दोघांच्या नात्याकडून! आणि त्या अपेक्षा जर तिचा नवरा पूर्ण करू शकत नसेल तर अशा परिस्थितीत तिचं लक्ष घराबाहेर गेलं तर ??? दोष कोणाचा ? अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या नवऱ्याचा ? का एक स्त्री असूनही तिनी दुसऱ्या पुरुषाबद्दल विचार केला म्हणून त्या स्त्रीचा ??
अप्रतिम....