मन वढाय वढाय (भाग ४३)

Submitted by nimita on 2 May, 2020 - 21:46

त्या रात्री जेवणं आणि घरच्यांबरोबर गप्पा टप्पा झाल्यावर स्नेहा तिच्या खोलीत गेली. तिनी ठरल्याप्रमाणे श्रद्धाला फोन केला होता. पण नेमका तेव्हाच रजतचा ऑफिसचा कॉल चालू होता त्यामुळे त्याच्याशी बोलणं झालं नाही. पण ती कसर श्रद्धानी भरून काढली होती.आणि स्नेहाशी बोलणं झाल्यावर आता श्रद्धा तिच्या आजी आजोबांशी व्हिडिओ कॉल वर बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हेरिटेज वॉक साठी जायचं असल्यामुळे स्नेहा झोपायला गेली होती. श्रद्धाला प्रॉमिस केल्यानुसार त्या दिवशीचे सगळे फोटोज तिनी त्यांच्या फॅमिली ग्रुप वर फॉरवर्ड करायला सुरुवात केली. ते सगळे फोटो बघताना ती पुन्हा दिवसभराच्या आठवणींत रमून गेली. बऱ्याच दिवसांनंतर स्नेहानी आज खूप एन्जॉय केलं होतं...तिच्या मनात आलं," खरंच मैत्रीच्या नात्यात किती ताकद असते नाही ... ही निखळ मैत्री काही काळापुरतं का होईना पण आपल्याला सगळं काही विसरायला लावते... संसारातल्या काळज्या, जबाबदाऱ्या ... सगळं काही ! जणू काही आपल्या आयुष्याच्या सेटिंग मधलं 'refresh' बटण असल्यासारखी!' दिवसभराच्या घडामोडींबद्दल विचार करत असतानाच ती झोपेच्या अधीन झाली.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेनुसार स्नेहा तयार झाली. हेरिटेज वॉकसाठी दौलताबाद किल्ल्याजवळ सगळ्यांनी एकत्र जमायचं ठरलं होतं. आज सलील त्याच्या गाडीतून तिला घ्यायला येणार होता. काही वेळातच त्याच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि स्नेहा घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर गेली. तिला असं लगबगीनी येताना बघून सलीलच्या मनात आलं,' माझी वाटच बघत होती बहुतेक.' त्या नुसत्या विचारानीच तो सुखावला. त्यानी कारमधून बाहेर येत तिच्यासाठी co driver च्या बाजूचं दार उघडून धरलं. ती आत बसल्यावर दार बंद करून तो पुन्हा आपल्या जागी येऊन बसला आणि त्यानी कार स्टार्ट केली. त्याचं ते वागणं बघून स्नेहाला रजतची आठवण झाली.. जेव्हा त्यांनी बडोद्याला गेल्यावर पहिली कार घेतली होती तेव्हा सुरुवातीला रजत पण असंच करायचा; पण ती नव्याची नवलाई काही दिवसांतच संपली. त्यामुळे आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा अशी रॉयल ट्रीटमेंट मिळाल्यामुळे स्नेहा खुश झाली. थोडा वेळ दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. एक अवघडलेली शांतता होती दोघांच्या मधे. "काही गाणी वगैरे आहेत का ? लाव ना असली तर." स्नेहानी विचारलं. त्यावर मानेनीच होकार देत सलीलनी गाणी चालू केली.....एकीकडे ती अवीट गोडीची गाणी ऐकत त्यांचा प्रवास चालू होता. मधेच सलीलच्या फोनवर कोणाचातरी कॉल आला आणि एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसा स्नेहा गाण्यांचा आवाज कमी करायला लागली; पण तिला खुणेनीच थांबवत सलीलनी 'आत्ता busy आहे, नंतर कॉल करतो ', असं म्हणत फोनवरचं बोलणं संपवलं. स्नेहाची नजर टाळत,समोरच्या रस्त्याकडे बघत तो म्हणाला," गाणी ऐकताना अक्षरशः समाधी लागली होती तुझी.... पण या फोनमुळे भंग पावली...म्हणून कॉल कट केला . आता सायलेंट मोड वरच ठेवलाय..त्यामुळे आता कुठलाही डिस्टर्बन्स नाही होणार !"

सलील जरी समोर बघून बोलत असला तरी नजरेच्या तिरप्या कटाक्षात त्याला स्नेहाच्या चेहेऱ्यावरचे भाव वाचता येत होते. त्याचं बोलणं ऐकून ती मनोमन खुश झाली असावी....तिनी जरी बोलून दाखवलं नसलं तरी तिच्या स्मितहास्यातून, झुकलेल्या नजरेतून सलीलपर्यंत तिच्या भावना पोचत होत्या. आणि त्याला जे वाटत होतं ते खरंच होतं.त्याच्या त्या छोट्याशा कृतीनी स्नेहा खूप सुखावली होती. 'त्याच्यासाठी आपली खुशी महत्वाची आहे' या नुसत्या विचारानीच तिला किती छान वाटलं होतं. कार मधून जाताना असं गाणी ऐकायला खूप आवडायचं स्नेहाला. पण रजत बरोबर असताना ते कधीच जमायचं नाही. कारण तो जरी गाडी चालवत असला तरी बहुतेक वेळा त्याचं एकीकडे स्पीकर फोन वरून कोणाशी तरी कामानिमित्त बोलणं चालूच असायचं. त्यामुळे साहजिकच तिला गाणी बंद करायला लागायची. पण आज बऱ्याच वर्षांनंतर तिची ही हौस पूर्ण होत होती. थोड्याच वेळात स्नेहा सुद्धा बरोबरीनी गुणगुणायला लागली. जवळजवळ सगळीच गाणी तिच्या आवडीची होती. तिनी आश्चर्यानी सलीलकडे बघितलं ! पण तिनी काही विचारायच्या आधीच सलील नकळत बोलून गेला ," मला लक्षात आहे तुझी आवड!" सलीलची ही अशी स्पष्ट शब्दातली कबुली ऐकून स्नेहा चपापली. त्याची नजर चुकवत खिडकीतून बाहेर बघायला लागली. आपल्याच तोंडचं वाक्य ऐकून सलील स्वतःसुद्धा एकदम गोंधळून गेला...' हे काय बोलून बसलो मी... स्नेहाला आवडलं नाही बहुतेक. तिला राग तर नसेल ना आला माझा!" त्यानी स्नेहाच्या दिशेनी एक चोरटा कटाक्ष टाकला; पण ती तर बाहेर बघण्यात गुंग होती. स्नेहा जरी काही बोलली नसली तरी मनातून तिला खूप बरं वाटत होतं. आदल्या दिवसापासूनच्या सलीलच्या वागण्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा तिला - 'आपण कोणासाठी तरी स्पेशल आहोत' - अशी फीलिंग येत होती. आणि ती नुसती जाणीवसुद्धा खूप समाधानकारक होती.

दौलताबाद मधली ती पूर्ण सकाळ जणू काही मंतरलेल्या अवस्थेतच गेली.... स्नेहा आणि सलील दोघांसाठी ! स्नेहाच्या सहवासातले ते सोनेरी क्षण सलील आपल्या हृदयात साठवून ठेवत होता. तिचं हसणं, तिचं बोलणं .... एकंदरीतच तिचं त्याच्या बरोबर असणं हे त्याच्यासाठी एखाद्या उत्सवासारखंच होतं. त्याच्या आयुष्याच्या एकाकी वाटेवर या दिवसांच्या आठवणीच त्याला साथ देणार होत्या. स्नेहासाठी सुद्धा तो अनुभव खूपच खास होता. तिच्याही नकळत सलीलचा सहवास तिला आवडायला लागला होता. त्यानी जरी बोलून दाखवलं नसलं तरी त्याच्या वागण्यातून, त्याच्या कृतीतून त्याच्या भावना आज स्नेहापर्यंत पोचत होत्या. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेत होता तो.. इतर मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात असला तरी स्नेहाकडे सतत लक्ष होतं त्याचं... हेरिटेज वॉक च्या वेळी त्याचं तिच्या मागेपुढेच असणं, तिची वाट बघत थांबणं, हॉटेल मधे जेवायला बसताना तिच्यासाठी त्याच्या जवळची खुर्ची राखून ठेवणं, जेवणाची ऑर्डर ठरवताना मुद्दाम तिच्या आवडीचा मसाला पापड मेन्यू मधे ऍड करणं.... एक ना अनेक !! हे सगळं स्नेहाला दिसत होतं.. आणि खरं सांगायचं तर सलीलच्या या अशा वागण्यामुळे तिचं मन सुखावत होतं. आज कितीतरी वर्षांनंतर कोणीतरी तिला इतकी स्पेशल वागणूक देत होतं. रजत तिच्या सुखाचा, आरामाचा विचार करत नव्हता असं नाही. पण या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा किती महत्वाच्या असतात हेच तो विसरला होता. आणि तेच सगळं आज स्नेहाला सलीलच्या वागण्यातून मिळत होतं. तिच्या तारतम्य बुद्धीला न जुमानता तिचं मन राहून राहून सलील आणि रजतच्या वागण्याची तुलना करत होतं. आणि इतर वेळी नेहेमी रजतची निवड करणारं तिचं मन आज मात्र सलीलच्या दिशेनी वळत होतं. एकीकडे सगळ्यांबरोबर गप्पा मारत स्नेहा जेवत होती, पण तिच्या मनात मात्र चांगलाच गोंधळ उडाला होता. आज तिला स्वतःचंच खूप आश्चर्य वाटत होतं. 'आज हे असं काय होतंय ? आणि का ? माझ्या मनावर माझाच कंट्रोल राहिला नाहीये का आता ? बडोद्याहून निघाल्यापासून जणू काही बंडच पुकारलंय माझ्या मनानी....समोर दिसणारी वस्तुस्थिती नाकारून भूतकाळातल्या त्या मृगजळाला सत्य समजायला लागलंय ते आता !'

या गोंधळलेल्या मनस्थितीतच तिनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घरी जायला निघाली. अजयनी तिला परत एकदा रात्रीच्या gala dinner ची आठवण करून दिली. सलीलनी तिला घरी सोडायची तयारी दाखवली पण तिनी काहीतरी कारण सांगून त्याला नकार दिला. पण त्या नकारामागचं खरं कारण तिच्या लक्षात आलं होतं. 'जर अजून थोडा वेळ सलीलच्या सहवासात राहिले तर माझ्या मनाची ही दोलायमान स्थिती त्याच्याही लक्षात येईल' - ही भीती वाटत होती तिला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात किती महत्वाच्या असतात ना? Specially स्त्रियांच्या. खूप आनंददायी असतात. मैत्रीची जादूच अशी असते की कधी तोंड न उघडणारे सुध्दा तासनतास बोलत असतात! असाच आनंद आपल्या भोवती असला तरी तो आस्वादायचा सोडून कशा न कशाच्या मागं धावत असतो आपण..
आज हा भाग वाचून त्या क्षणांची आठवण आली Happy