कोरोना आणि माझा प्रवास...

Submitted by परदेसाई on 29 April, 2020 - 11:23

६ मार्च २०२०. मी अमेरिकेहून विमानाने भारतात चाललो होतो. अमेरिकेत आणि सगळ्या जगातच कोरोनाची लागण सुरु झाली होती. खरं तर प्रवास करणं धोक्याचं होतं, पण आईची तब्येत बिघडल्यामुळे भारतात जाण्याला पर्याय नव्हता. विमानात कुणी खोकला, शिंकला की ‘अरे बापरे, याला कोरोनाची लागण नसेल ना?’ एवढा एकच प्रश्न मनात येत होता. विमान मुंबईला उतारण्याआधीच वैमानिकाने कल्पना दिली होती. आरोग्य तपासणीचे दोन फॉर्म भरून घेतले होते. त्या फॉर्मवर भारतातला पत्ता, फोन नंबर, ई-पत्ता इत्यादी माहिती होती. विमानतळावर उतरताच प्रत्येक प्रवाशाचे तापमान पाहून, त्याच्या फॉर्म वर शिक्के मारून जाऊ दिले होते. विमानात बसला असताना प्रचंड खोकणारा एक मुलगा मला विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. त्याअर्थी त्याला ताप नसावा आणि खोकला असलेल्या लोकांना अडवत नसावेत. मी विमानतळावरून बाहेर पडून टॅक्सी गाठली आणि तिथून आंतर्देशीय विमानाने गोव्याला, आणि पुन्हा टॅक्सी करून कुडाळला पोहोचलो. या सगळ्या प्रवासात मला तुरळक प्रवासी व विमानतळाचे कर्मचारी मास्क लावून काम करताना दिसले, पण बहुतेकांकडे मास्क नव्हते.

देवाची प्रार्थना करत मी घरी पोहोचलो खरा, पण एवढ्या विमान प्रवासात ‘कोरोनाची लागण’ झाली असण्याची शक्यता मनात होतीच. घरी आलेल्या गेलेल्या नातेवाईक/मित्रमंडळी पासून जेवढं शक्य असेल, तेवढं अंतर ठेऊन राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाला ‘कोरोना व्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो आणि मला लागण झाली असल्याची शक्यता’ समजावून सांगणे अशक्य होतं. त्यात आईला बरं नसल्यामुळे तिचे औषध-पाणी इतरांवर टाकायला तिथे कुणी नव्हतं. पोचलो त्याच रात्री आईचा श्वास अडकला, आणि सात-आठ शेजाऱ्यांना बरोबर घेऊन तिला इस्पितळात भरती करावं लागलं. अश्या वेळी ‘माझ्या आईला तुम्ही मदत करा, मी लांब उभा राहतो’ म्हणणे अशक्य आणि ‘माझ्यामुळे या सर्वाना कोरोनाची लागण तर होणार नाही ना?’ ही धाकधूक सतावत होती.

रात्री १२ वाजता इस्पितळात असलेली गर्दी, माणसांना माणसे चिकटून बसलेली, सगळ्या प्रकारचे रुग्ण आणि त्यांना मदत करायला आलेली घरची माणसं बघून माझी कोरोनाची भीती अजूनच वाढत होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढच्या १०/१५ दिवसात त्याची लक्षणं दिसतात, पण तोपर्यंत माझ्या आईला मदत करायला आलेले शेजारी आणि इस्पितळातले रुग्ण यांना माझ्यामुळे लागण झाली तर मी तर मरेन पण बरोबर कोकणात ही महामारी पसरवून हजारोंचा बळी पण घेईन हा विचार मनाला सोडत नव्हता. सोबत असलेल्या डॉक्टर मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला पण कुणी माझ्या शंका कुशंकांकडे लक्ष देण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

इस्पितळात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत जात होते. माझ्या आई शेजारी ठेवलेल्या एका बाईंना खोकल्याची उबळ येत होती. एका तरुण नर्सने येऊन त्यांना ऑक्सिजन मास्क लावला. काही वेळाने त्या बाईंना थोडे बरे वाटल्यावर नर्सने तो मास्क काढला, कागदाने थोडा पुसून घेतला व शेजारी असलेल्या दुसऱ्या रुग्ण बाईंना लावून टाकला. कोरोनाची माहिती अजून गावात पोहोचली नव्हती. डॉक्टर आणि नर्सना एखादा कोरोनाचा रुग्ण कसा हाताळावा हे माहीत नसावे, आणि असलेच तर असलेली उपकरणं आणि साधनं रुग्ण-संख्येला अगदीच तोकडी होती. रुग्ण लोकांसाठी असलेले टॉयलेट सगळेच रुग्ण वाटेल तसे वापरात होते. एकाला झालेला रोग दुसऱ्याला व्हायला अजिबात वेळ लागला नसता. कोरोनाला तर हे अक्षता देऊन आमंत्रण ठरणार होते. दुसऱ्या दिवशी आईला थोडे बरे वाटल्यावर मी जवळपास उचलून घरी घेऊन आलो. खोकणाऱ्या बाईंच्या तरुण मुलीने मला मदत करण्यासाठी माझ्या आईला एका बाजूने आधार देत रिक्षात बसवले. मी मात्र त्या तरुणीला ‘कोरोना’ देईन की काय याचा विचार करत रिक्षात बसलो.

त्यानंतर पुढचे पाच दहा दिवस भीतीत गेले. एकीकडे आईला मदत करणे जरुरी होते. गावी गेल्यावर Jet -lag मुळे पहिले काही दिवस ‘आपल्याला बरे वाटत नाही’ असे सतत वाटत राहाते. झोप पूर्ण झालेली नसते, डोकं दुखतं , थोडा ताप आल्या सारखा वाटतो. यावेळी मात्र प्रत्येक त्रास हा ‘कोरोनाचा’ नसेल ना? ही शंका पाठ सोडत नव्हती. आईचे काही रिपोर्ट घेऊन दवाखान्यात जावे लागले. तिथे नेहमीप्रमाणे ५०/६० रुग्ण दाटीवाटीने बसले होते. कुणी खोकत होते, कुणी शिंकत होते, कुणी तिथेच शेजारी थुंकत होते. एकावेळी चार चार रुग्णांना एका छोट्याश्या खोलीत घेऊन डॉक्टर त्यांना तपासत होते. सुरक्षित अंतर ठेवणे काहीही करून साध्य होणारे नव्हते. डॉक्टरांनी मास्क लावला नव्हता, नर्सकडे मास्क नव्हता, रुग्णाकडे मास्क असणे शक्य नव्हते. जगात कोरोना पसरत चालला होता.

उरलेले बरेच दिवस घरात बसून काढले. चार पाच दिवसांनी डोकेदुखी व ताप निघून गेला. मला, शेजारी/पाजारी किंवा घरी येऊन गेलेल्या कुणालाच आजारपण आलं नव्हतं, आणि भारताने २१ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याचे घोषित केलं. त्या आधी देश सोडून बाहेर पडणे, किंवा देशात अडकून पडण्याला काहीच पर्याय नव्हता. कुडाळात घरी राहायला हरकत नव्हती, पण किती दिवस? या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हतं. आणि कुडाळात असताना कोरोनामुळे आजारी पडलो तर तिथल्या इस्पितळात गेलो तर नक्की मरेन असं वाटू लागलं होतं.

मी २० तारखेच्या शेवटच्या विमानाने परत जायचं ठरवलं. कुडाळ ते गोवा टॅक्सी, आणि गोवा मुंबई विमानात काही अडचण येण्याची शक्यता होती. दोडामार्गला परदेशी प्रवाशांची तपासणी होण्याची शक्यताही होती. आणि काहीही लक्षणे दिसल्यास त्यांची तिथल्या इस्पितळात रवानगी होत होती. त्यात कोरोना तपासणीचे नमुने तिथून मिरज/पुण्याला पाठवून त्याचे निकाल यायला ४/५ दिवस सहज लागले असते. कुडाळमधल्या इस्पितळाची अवस्था बघता, दोडामार्गाला काय प्रकार असेल याची कल्पना करवत नव्हती. एका रुग्णाचा मास्क दुसऱ्याला लावला तर एकाचा कोरोना दुसऱ्याला होईल ही प्राथमिक माहिती गावात नर्सना नव्हती हे पाहून आलो होतो. भारतात डॉक्टरना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. ते सांगणार आणि आपण फक्त ऐकायचे एवढाच वेळ ते आपल्याला देतात हेही अनुभवलं होतं.

देवाचं नाव घेत मुंबई गाठली. आंतर्देशीय विमानतळावर पोलीस कर्मचारी परदेशी प्रवाश्याना थांबवून त्यांना आरोग्याविषयी प्रश्न विचारत होते. बहुतेक पोलिसांकडे मास्क होते. मी स्वतः कुडाळमध्ये अडीचशे रुपयाला घेतलेला N95 मास्क घातला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळावरही बहुतेक लोकांकडे सर्जिकल मास्क होते.

विमान सुटल्यावर हुश्श्श वाटले. आता १५ तासांच्या विमान प्रवासात कोरोना आपल्या वाट्याला ना येवो म्हणत विमानात बसलो. बहुतेक प्रवाश्यांनी मास्क लावलेले होते. विमानाचे कर्मचारी मास्क घालून होतेच. विमानात जेवण खाण दिले गेले त्यात ‘सलाद’ किंवा इतर थंड पदार्थ अपेक्षित नव्हते. जेवण हाताळणाऱ्या कुणालाही कोरोना झाला असेल तर सलाद, फळाचे तुकडे इत्यादी मुळे त्याचा प्रसार होऊ शकतो, हे माहित असून सुद्धा ते पदार्थ ना देण्याची खबरदारी घेतली नव्हती.

अमेरिकेत उतरताना तारीख होती २१ मार्च २०२०, आणि अमेरिकेत कोरोनाने हाहाःकार माजला होता. विमानतळावर आरोग्याविषयी कोणतीही तपासणी केली गेली नाही. कुणाचा ताप बघितला गेला नाही, कुठे काही प्रश्न विचारले नाहीत. ‘खबरदारी बाळगा, कुटुंबियांपासून लांब राहा’ अश्या सध्या सूचनाही दिल्या गेल्या नाहीत. मी नेहमी प्रमाणे १५/२० मिनिटात बाहेर पडलो. न्यायला आलेल्या कन्या आणि बायकोची लांबून दृष्टी भेट घेऊन गाडीत त्यांच्या पासून शक्य होईल तेवढं लांब बसलो.

घरी गेल्यावर पुढचे १५ दिवस एका खोलीत कोंडून घेतलं. घर मोठं असल्यामुळे एकाच घरात बायको मुलांपासून दूर राहता आलं. प्रवासाच्या दगदगी मुळे पुन्हा ८/१० दिवस ताप आला. बाकी कोरोनाची काही लक्षणं नव्हती. तरीही डॉक्टरना फोन केला. कोरोनाच्या भीती मुळे इथे डॉक्टर प्रत्यक्ष तपासत नव्हते. Video conference च्या साहाय्याने डॉक्टरने तपासणी केली. डायबेटिस असल्यामुळे लवकरात लवकर कोरोना चाचणी करून घ्या असं सांगितलं. मुळात अमेरिकेत कोरोनासाठी काहीच तयारी नसल्यामुळे सरकारी यंत्रणा कोलमडली होती. कोरोनाची लक्षणे असल्याशिवाय ते तपासणी करू देत नव्हते. शेवटी एका खासगी दवाखान्यात पैसे भरून तपासणी करून घ्यावी लागली. त्यात मी कोरोनमुक्त असल्याचे दुसऱ्या दिवशी कळले आणि जीव भांड्यात पडला. त्याच १५ दिवसात कुडाळ पोलीस, कुडाळ नगर पंचायत, आणि कुडाळ आरोग्य विभागाने घरी माणसं पाठवून अगर फोनवरून मी कोकणात नसल्याची आणि मला कोरोना व्हायरस ना झाल्याची खातरजमा करून घेतली.

२१ मार्च पासून भारतात लॉकडाऊन सुरु झाला, अमेरिकेत अजूनही पूर्ण लॉकडाऊन नाही. भारतात कितीतरी लोक लॉकडाऊन पळत नाहीत, इथे अमेरिकेत बहुसंख्य लोक घरी बसले आहेत. तिथे डॉक्टर/नर्स वगैरे लोकांना प्रशिक्षण आणि साधने नाही आहेत. इथे हे सगळे असूनही स्वतः डॉक्टर/नर्स वगैरे कोरोनाला बळी पडले आहेत. तिथे रस्त्यावर उगाच फिरणाऱ्या लोकांना पोलीस फटके देत आहेत, इथे मात्र तसे करता येत नाही. एक मात्र खरे की भारतात जर हा रोग पसरला तर तो किती कोटी लोकांचा बळी घेईल सांगता येत नाही.

नीट माहिती नसताना, साधने आणि उपकरणे नसताना, अशिक्षित जनता असताना भारतात काही शेकडो लोक या फक्त कोरोनाला बळी पडले. आणि पैसे, आरोग्य व्यवस्था, प्रशिक्षण, साधने आणि शिक्षण असलेल्या अमेरिकेत मात्र हा आकडा लाखाच्या घरात पोहोचला आहे, याला भारताचे नशीब म्हणावे, की निसर्गाची कृपा हे मला तरी कळत नाही. जगातली पाचवी अर्थसत्ता असलेल्या भारत देशात आरोग्य सेवा इतक्या अपुऱ्या आहेत हे पाहून वाईट वाटावे की अमेरिकेत इतके सगळे काही असताना भारतापेक्षा वाईट परिस्थिती असावी याबद्दल दुःख करून घ्यावे हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही.

(माझ्या नावासकट हे लेखन शेयर करायला हरकत नाही...)

Group content visibility: 
Use group defaults

सुरुवात वाचताना थोडा धसका निर्माण झाला होता. लेख छान आहे. मोजके तपशील, धावते वर्णन पण संपूर्ण परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहाते. तटस्थपणा आणि तुमचे सामाजिक भान आवडले. पंधरा दिवसांतली तुमच्या जिवाची तगमग, घालमेल आणि शरीराची दगदग याची कल्पनाच करवत नाही. आई सुखरूप आहेत हे एक समाधानाचे वाक्य , ' याचसाठी केला होता अट्टाहास' .

विनय तुम्ही त्या काळात ईथे आहात असच वाटलं पण धाग्यावर जेव्हा लिहिलात मी पोहोचलो उसगावात ते ऐकुन नवल वाटलं. त्यानंतर तुमची टेस्ट निगेटीव्ह ऐकुन अजुन बरे वाटले.
छान लिहिले सगळे. Happy

पूर्ण लेख वाचताना तगमग होत होती. आणि तुमची होणारी तगमग समजतही होती. वर कोणी म्हटलंय तसं मोजक्या शब्दांत डोळ्यासमोर उभी राहिली परिस्थिती.
तुमच्या आई आजारातुन बाहेर पडल्या, तुम्हाला काही झालं नाही आणि तुम्ही वेळेत परत आलात वाचुन बरं वाटलं.

सगळं ठीक आहे आणि आई ची तब्येत चांगली आहे हे उत्तम.

साधना,
दुर्दैवाने इथे या सगळ्याला राजकीय वळण लागले आहे.
साथ आणि बाधित रूग्ण इथे ही आहेत.

साधना,
दुर्दैवाने इथे या सगळ्याला राजकीय वळण लागले आहे.
साथ आणि बाधित रूग्ण इथे ही आहेत.>>>

हम्म... जीवन किती क्षणभंगुर असू शकते याचा प्रत्यय गेले तीनचार महिने जग घेतेय, तरीही मानवी स्वभाव बदलत नाही... ही असली मानवजात टिकवुन ठेवण्यासाठी निसर्गाला काय बरे मोटीवेशन असेल??

वेळेत परत आलात देसाई हे बरे झाले. तुम्हा सर्वांची तब्येत सही सलामत आहे ह्यात सगळे आले, कशामूळेही होईना.

अमेरिकेत (दुर्दैवाने) एक प्रवाह असा आहे ज्यांच्या मते हे सगळे चढवलेले आहे. फ्ल्यू पेक्षा फारसे काही वेगळे नाही त्यामूळे नेहमीपेक्षा अधिक काही वेगळे वागायला नको.

देसाई, योग्य डॉक्युमेंटेशन केलंय. म्हणजे अनुभव म्हणून तर आहेच पण सगळीकडेच काय ते lack of knowledge could be seen. WHO is supposed to blame then? Wink

आता तब्येती बर्या आहेत नं? काळजी घ्या. तुमच्या कोस्टच्या बातम्या मी वाच(वत) नाही. अजून सेंट्रल पार्कात लोकं तशीच हिंडतात असं उडत उडत ऐकलं.
असामीशी सहमत. मागेच कुठेतरी लिहिलं होतं की आमचा शेजारी त्याच्या कॅलिच्या फॅमिली आणि एकंदरित कॅली बद्द्ल विचारलं तर ओह इट्स नो मोअर दॅन अ फ्लू हे मला त्या इस्टरच्या नंतर म्हणाला. तरी स्वतः टू बी ऑन अ सेफ साइड दरवर्षीप्रमाणे फॅमिलीला भेटायला तिथे गेला नाही. असो.

बापरे! देवाची कृपा या साऱ्या प्रवासात काही झाले नाही आणि तुमच्या आईंची तब्बेत ही चांगली आहे. हा अनुभव इथे मांडलात हे चांगलं केलंत! >>> अगदी अगदी.

हम्म... जीवन किती क्षणभंगुर असू शकते याचा प्रत्यय गेले तीनचार महिने जग घेतेय, तरीही मानवी स्वभाव बदलत नाही>>
काही फरक पडत नाही लोकांना. पैसे आणि सत्ता हेच मह्त्वाच. जीव बीव गेला तरी काही नाही त्याचं. वर आणि 'म्हातारे लोक त्याग करायला तयार आहे , त्यांचा जीव घालवायला तयार आहेत तरूण पीढीसाठी. इकॉनॉमी महत्वाची आहे' असली बडबड करणारे पॉलिटिशिअन आहेत.
नंबर्स रोज वाढत आहेत पण बीचेस रिओपन झाल्यावर अर्ध्या तासात भरून गेले म्हणजे लोक किती डेस्पीरेट असतील बघ. एकुणच प्रत्येकाचा पर्सनल अ‍ॅजेंडा आहे. हे सगळ एखाद्या कार्पोरेट कंपनीसारख वाट्त . प्रत्येकाला आपल्याला प्रमोशन सॅलरी,महत्व किती मिळते बघायचय. कंपनी साठी काय योग्य आहे वगैरे गेल खड्ड्यात. कंपनी बुडेना का मग.

वाचताना धडधडत होत सारख पुढे काय ह्या विचाराने. पण तुम्ही ही घरी पोचलात सुखरूप आणि आई ही बऱ्या आहेत म्हणून खूप छान वाटलं.
पण परिस्थितीच अशी होती की पावला पावला ला रिस्क आहे हे माहीत असून ही जे केलंत ते करणं क्रमप्राप्त च होत पण परमेश्वरी कृपेने वाटावलात त्यातुन !

असामी, खरंय तुझं. it’s not more than a flu. It’s against our constitutional rights. economy is important वगैरे विचारांचं बाळकडू पाजणारे विद्वान भेटले की हतबलता येते.

हे सगळे अमेरिकेतच करता आले असते ना ? तिकडे तर इन्शुरन्स ऑलरेडी असेलच ना ? >>> कळले नाही....
मला प्रश्न विचारत असाल तर आई भारतात आणि मी अमेरिकेत आहे...

धिस इज मोर दॅन फ्लू माहित आहे. पण इकॉनॉमी चालू करणं ही आता महत्त्वाचं आहे हे दिसतंय.
एकदा का तुमच्या देशाचा प्लॅटू आला की यापुढे लस येई पर्यंत यात १% लोकं मरत रहाणार आणि त्यात तुमचे जवळचे असले तरी त्यांच्या शेवटच्या काळात तुम्हाला कदाचित बरोबर रहाता येणार नाही हे वास्तव अ‍ॅक्सेप्ट करुन, फिजिकल डिस्टंसिंग, हायजिनिक सवयी इ. काटेकोर पाळून दैनंदिन व्यवहार चालू करावेच लागणार. कटू आहे पण हे केलं नाही तर आणखी भयावह परिणाम होतील हे जाणवतंय.

अनुभव कथन वाचताना धस्स होत होते. कोरोनाची लागण न होता एवढा प्रवास केलात हे खरच ग्रेट .
तुमची व तुमच्या मातोश्रींची तब्येत उत्तम आहे हे वाचुन छान वाटले.
काळजी घ्या .

Glad that u r through and ur mom is doing better!
Overall ithe change handle kararahet ass madhyamvargiy anubhavavarun mhanu shakato

Pages