व्हेज रोल टिक्की

Submitted by योकु on 27 April, 2020 - 11:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जराश्या खटपटीची कृती आहे ही. तसही आता वेळ जरा काढता येतो आणि नेहेमीच्या सामानात चांगला प्रकार होतो. कुणी पाहुणे वगैरे येणार असतील (अर्थात लॉकडाऊन नंतर) तर आधीही करून ठेवता येईल आणि वेळेवर मस्त गरमागरम सर्व्ह करता येतील.

मूळ रेसीपी इथे आहे.

तर लागणारे जिन्नस-
पत्ताकोबी
गाजर
सिमला मिर्ची
फरसबी
हवा असेल तर कांदा
कोथिंबीर
हे जिन्नस एकदम बारीक चिरून/ जाड किसून किंवा फुप्रोमधून फिरवून. सगळे मिळून ३०० - ३५० ग्रॅम / लहान पातेलंभरून तरी व्हायला हवं.

३/४ मध्यम बटाटे उकडून सोलून
१.५ कप कणीक

आपल्याला जो हवा तो चवीचा मालमसाला
तिखट
हिरवी मिरची
जिरेपूड
धनेपूड
हवी असेल तर ताजी मिरपूड/ चाट मसाला (हे वरून घेतलं तर जास्त चवीष्ट लागेल)
अजून कुठला मसाला हवा असेल तर तो

चवीनुसार मीठ
तेल
उथळ तळणीकरता पॅन

तयार होतांना -
WhatsApp Image 2020-04-27 at 19.28.17.jpeg

टिक्की तयार-
WhatsApp Image 2020-04-27 at 19.28.16.jpeg

क्रमवार पाककृती: 

उकडलेले बटाटे पोटॅटो राईसर मधून काढावेत किंवा किसून मऊ गोळा करावा, हा + जरा मीठ कणकेत घालून, लागलंच तर पाणी + तेल वापरून नेहेमीच्या पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवून तयार करून ठेवावी.

चिरलेल्या भाज्यांमध्ये हवा तो चवीचा मालमसाला घालून सारण तयार करून घ्यावं.

कणकेची जाडसर मोठी पोळी लाटून त्यात भरपूर सारण भरून रोल तयार करावा. याचे इंचभर जाडीचे काप करून प्रत्येक कापाला जरा दाब देऊन चपटं करावं. ही रोल-टिक्की तयार झाली. अश्या सगळ्या टिक्की तयार करून घ्याव्यात. (बहुधा २ किंवा ३ मोठे रोल्स होतील या साहित्यात) या स्टेजला क्लिंग रॅप लावून फ्रीजमध्ये ठेवता येतील आयत्यावेळी करायला.

एखादं पॅन तापवून त्यात जरा तेल घालून उथळ तळणी करावी आणि प्रत्येक टिक्की दोन्ही बाजूनी खरपूर भाजून-तळून गरमागरमच खायला घ्यावी.

सोबत दाल-तडका/ माह की दाल, हिरवी चटणी इ. घेता येइल आणि पोटभरीचं जेवणही होईल.

गरमागरम खायला तयार आहेत. घ्या -
WhatsApp Image 2020-04-27 at 19.28.17 (1).jpeg

वाढणी/प्रमाण: 
जेवणाप्रमाणे
अधिक टिपा: 

मी अगदी कमी मसाले वापरले आहेत सो जरासं ब्लॅड झालं होतं तर मीठ मसाला सारणात व्यवस्थित हवा. कणीक भिजवतानांही मीठ घालायला विसरू नका.

अगदी कमी तेल वापरायचं असेल तर आधी वाफवून घेता येतील तयार टिक्की. अर्थातच तळलेली जास्त खमंग आणि चवीष्ट लागते.

पिठात बटाटा मूळ कृतीत आहे म्हणून मीही वापरला. न वापरून काय होईल. दडस होतील का?

सारण फार आधी करून ठेवू नये. त्याला पाणी सुटेल अन भिजकं होईल प्रकरण.

यात प्रतिसादांत प्राजक्ता म्हणाली तसं चीज घालता येइल आणि पिझ्झा रोल चा फील आणता येइल. मालमसाल्यात अर्थात जे हवे ते हर्ब्स घालता येतील.

माहितीचा स्रोत: 
वर दिलेला आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासू!!

उथळ तळणी>> शब्द आवडला.

मस्त आहे रेसिपी, ट्रेडर जोजमधे पिझ्झा सर्कल मिळतात ते सेम असेच दिसतात, या रोलवर वरुन चिज घातल तर पिझ्झा बाईट म्हणून खपवता येतिल.

तीन-चार दिवसांपूर्वी ही रेसिपी निशा मधूलिका वर बघितली तेव्हाच करावी असा विचार आला होता. पोळी-भाजी पेक्षा जास्त खटाटोप वाटला म्हणून मग बघू असा विचार केला.
तुमचा नवीन रेसिपी करून बघण्याचा उत्साह दांडगा आहे. मस्त दिसत आहेत तुम्ही केलेल्या टीक्की. चव छान आहे का आणि जेवायला करायचं असेल तर साधारण एका माणसाला 2 टीक्की पुरेत का?

चव छान आहे का आणि जेवायला करायचं असेल तर साधारण एका माणसाला 2 टीक्की पुरेत का > चवीचं मी म्हणलंय तसं मीठमसाला व्यवस्थित हवा सारणात + कणकेतही मीठ हवं. बाकी चवीला गरमागरम चांगले लागतात. माझं तरी २ (च) टिक्यांत नाही झालं. काही पिकमीअप वाला आयटम ठेवायचा विचार असेल तर गोष्ट वेगळी म्हणा.

इनशॉर्ट हे भाजीपोळी टाईप असल्यानी सोबत एखादी दाट दाल आयटम मस्त लागतो.

ममो, अ‍ॅक्च्युअली फाआआर अशी खटपट नाहीय. अर्थात आधी मी म्हणलंय तसं वीकडेज वाला प्रकार सुद्धा नाहीय. विकेंडास सकाळी करून ब्रंचला हे खाऊन बिंजायला बसावं असला प्रकार आहे.