दोस्ती

Submitted by रायगड on 26 April, 2020 - 21:59

माझं नाव नार्‍या - म्हणजे नारायण कांबळे पण नार्‍याच म्हणतात मला. शिक्षण - B.Com. तीन वेळा बसून नापास. सध्या क्लार्क आहे एका खाजगी कंपनीत. तर असा मी साधा-सुधा माणूस. पण गम्मत अशी आहे की सर्वांनाच मी साधा-सुधा नाही वाटत. पण लोकांचं काय, त्यांची आणि एखाद्याची मतं नाही जुळली की लगेच त्या माणसाला विचित्र ठरवून मोकळे! माझ्या शेजार्‍या-पाजार्‍यांनी , ऑफिसमधल्या सहकार्‍यांनी मला असच विचित्र माणूस ठरवलय. एवढच काय माझी आई सुध्दा कधी कधी माझ्या बोलण्यावर एकदम टीपं गाळते. म्हणते "देवा, कसं व्हायचं माझ्या या वेड्या लेकराचं?" आता मी काही वेडा आहे का? पण "जाऊ देत", मी म्हणतो.

यामुळे ऑफिसमध्ये मला जवळचा असा कोणी मित्र नाहीच आहे. तसा मी नॉर्मलच आहे हो पण माझी आणि लोकांची मतं काही बाबतीत नाही जमत. आता बघा, परवा डबा खाताना सगळ्यांचा विषय चाललेला - पाळीव प्राणी. तो शिर्क्या सगळ्यांना त्याच्या घरच्या कुत्र्याचं कौतुक ऐकवत होता. कसलं ते त्याचं कुत्रं - पांढरं-पांढरं-केसाळ - पामेरिअन की कायसं, शी मला नाही ते आवडत. ती लिली त्यांच्या पोपटाचं पुराण सांगत होती. मलासुद्धा माझं मत मांडावसं वाटलं - मी म्हटलं,"पाळायचा तर एखादा कावळा पाळावा माणसानं, काळा-कुळकुळीत डोमकावळा!" यावर सगळे इतके का दचकावेत? आता माझं मत मी मांडल्यावर सगळे असेच विक्षिप्त वागतात. जाऊ देत, मी नाही लक्ष देत कोणाकडे.

नाही म्हणायला मन्याचं माझ्याबरोबर बर्‍यापैकी जमतं. मन्या म्हणजे - मनोज माने. आमच्याच चाळीत रहाणारा माझा लहानपणापासूनचा दोस्त. शाळा- कॉलेजलाही एकाच वर्गात होतो आम्ही दोघं. मी तीन वेळा बी.कॉम. ला बसलो, तेवढ्या वेळात त्याने पोस्ट-ग्रॅज्युएट केलं आणि या कंपनीत लागला चांगला ऑफिसर म्हणून. माझं ग्रॅज्युएशन काही होइना. तेव्हा माझ्या आईच्या सांगण्यावरून त्याने मला या कंपनीत चिकटवला - ज्यु. क्लार्क म्हणून.

आता तुम्ही म्हणाल, मन्याचं माझ्याबरोबर कसं काय जमतं? याला कारण म्हणजे दोघांचं वाचनाचं वेड. पहिल्यापासून आम्हाला दोघांना वाचायला सॉलिड आवडतं. तसं मन्याला काहीही चालतं वाचायला. पण मला मात्र असं-तसं काही आवडत नाही हं. रहस्यकथा, गूढकथा हे माझे आवडते प्रकार. मन्याही हे वाचतो. मग आम्ही याविषया वरची पुस्तकं मिळाली की देवाण-घेवाण करायचो. त्यामुळे शाळेत हा माझा एकमेवच म्हणावा असा दोस्त होता. अजूनही आमची दोस्ती टिकून आहे. आता तसा तो मला वरिष्ठ, पण त्याने काही फरक नाही पडला. दोघांची पुस्तकांची देवाण-घेवाण तशीच चालते, त्यात आता अधून-मधून रम्मीचे डाव मांडतो आम्ही - रविवारी दुपारी.

तर मन्या मला आवडतो कारण तो मला कधी विचित्र म्हणत नाही. कधीतरी म्हणतो,"नार्‍या, तू नुस्त्या त्या रहस्यकथा वगैरे वाचू नकोस. त्या कथाच तुझ्या डोक्यात असतात सदानकदा. जरा वेगळं ही काहीतरी वाचत जा." पण मी लक्ष देत नाही. आपल्याला नाही आवडत दुसरं काही तर कशाला वाचावं आपण?
हं आता तो म्हणतो ते खरं आहे - थोड्याबहुत प्रमाणात. ती कथानकं सतत माझ्या डोक्यात घोळत असतात हे खरं पण त्याने काय होतय? सहज एकदा मी ऑफिसात सर्वांदेखत मन्याला म्हणालो होतो - "मन्या, मला एक खून करावासा वाटतोय." " काssय?", एकदम तीन-चार जणांनी कधी नव्हे ते मला प्रतिसाद दिला. "खून!", मी शांतपणे उत्तरलो. त्या कथांमध्ये नाही का खून होत असतात, मग मी एखादा केला तर काय बिघडलं?"
"पण कोणाचा?" लिलीने हळूच विचारले होते.
"आणि का?", पाटील.
"का म्हणजे? सहज! कोणाचाही! आणि कारण कशाला हवं त्यासाठी?" मी म्हणालो.
"अच्छा! मग कर ना त्या सुखात्म्याचा. सगळेच सुटू आपण.", कोणीतरी हसत-हसत म्हणालं आणि सगळे नेहेमीप्रमणे माझी टर उडवत निघून गेले.

सुखात्मे म्हणजे आमच्या विभागाचा सेनिअर मॅनेजर. एकदम खडूस माणूस. ऑफिसमधील सर्वांवर डाफरत असतो सदैव. सगळ्यांचाच राग आहे त्याच्यावर. पण लोकं तरी काय, मी खून म्हणातरीआणि लगेच सुखात्म्याचा कर खून सांगून मोकळे. जसा काही मी लगेच कोणाचा खून करणारच होतो - अहो, एवढी कुठली माझी हिंमत? आपला एक विचार मनात घोळत होता तो बोललो, झालं!

असंच एकंदरीत आमचं रूटीन चालू होतं. मध्ये एकदा मन्याने जाहीर केलं की तो गाडी घेतोय. आणि ४-५ दिवसांत खरोखरच हा पठ्ठ्या गाडी घेऊन ऐटीत ऑफिसला आला. सर्वांना त्याचे फारच कौतुक वाटले. माझी तर चांगलीच सोय झाली. जमेल तेव्हा तो मला गाडीने घरी सोडायला लागला. मस्त आरामात घरी जायचो. त्याला नेहेमीच जमायचं असही नाही. ऑफिसमध्ये बरेचदा त्याला उशीरापर्यत थांबायला लागायचं. मग मी बसने यायचो पण तरी आठवड्यातून २-३ वेळाची तरी सोय चांगली झालेली.

३-४ महीने ठीक गेले. म्हणजे माझ्या बोलण्यावर अधे-मधे लोक दचकचत होते. एक-दोघांनी मला अधे-मधे विचारलं" काय मग नार्‍या, सुखात्म्याचा खून कधी करणार आहेस?" "करेन, करेन वेळ येइल तेव्हा करेन. आयुष्यात एक खून करून पाहिलाच पाहिजे, काय थ्रिलींग असेल ना तो अनुभव!" यावर प्रश्न विचारणारे नुसत्याच माना डोलावून निघून जात. नजरेत तोच भाव - "काय विचित्र माणूस आहे!"

अलिकडे मला जाणवलं, मन्याने बर्‍याच दिवसांत म्हणजे गेला जवळ-जवळ महिनाभर मला गाडीतून सोडलं नाहीये. "साला, मन्या पण मला टाळतोय की काय आजकाल?" अशी मला शंका येऊ लागली. पण मग मी लक्ष ठेवलं तर हळूहळू काहीतरी गडबड आहे असं जाणवायला लागलं. म्हणजे मन्याला रोजच कामासाठी थांबायला लागू लागलं होतं आणि नेमकं लिलीलाही रोज काम निघू लागलेलं. एरव्ही ५ ऐवजी ४.५० लाच निघणारी लिली हल्ली सगळे निघाले तरी टायपिंग करत बसलेली असायची."काय निघायचं नाही का?" असं कोणी विचारलं की म्हणे,"तुम्ही व्हा पुढे. एवढं पत्र टाईप करून निघते." हळूहळू ऑफिसमध्ये कुजबुज चालू झाली. मला कोणी काही बोललं नाही तरी मला कळलंच - मन्या आणि लिली काहीतरी प्रकरण.....

लिली ही सुखात्म्याची सेक्रेटरी. सुबक-सावळी, दिसायला नीटस! अख्ख्या ऑफिसवर डाफरणारा सुखात्मे लिलीवर डाफरताना कोणी कधी पाहिला नाहिये. तर बहुदा मन्या आणि लिलीचं प्रकरण चालू झालं होतं. आणि त्यामुळे मन्याच्या गाडीतून जाण्याचे माझे योग आता संपले होते. पण तरीही मला वाईट नाही हं वाटलं. म्हटलं - चांगलं आहे, मन्याने चांगली पोरगी निवडल्ये. मला तर आवडली त्यांची जोडी.विचार केला - मन्याला सांगितलं पाहिजे एकदा याविषयी.

आणि एकदा मन्याला एकटा गाठून मी सांगून टाकलं. म्हटलं,"मन्या लेका, चांगली पोरगी गटवल्येस. आपल्याला बुवा फारच आवडली जोडी. आता लग्न कधी करतोयस?" मन्याने जरा आढेवेढे घेतले पण शेवटी कबूल झाला बेटा. माझ्या बोलण्याने फारच खूष झाली स्वारी आणि मग अर्धा तास मला लिलीपुराण ऐकवत होता.माझ्या या बोलण्याने मला फारच फायदा झाला. कारण परत मला घरापर्यंत लिफ्ट मिळू लागली. म्हणजी लिली असायचीच गाडीत त्याच्याबरोबर. मला सोडून दोघं पुढे जायचे फिरायला.

त्यादिवशी ऑफिसनंतर मी आणि मन्या गाडीत जाऊन बसलो - लिलीची वाट बघत. लिली आली थोड्यावेळाने - ती एकदम गंभीर चेहरा करून. नंतर रस्ताभर ती गप्प-गप्पच बसलेली. मन्याने बर्‍याचवेळा विचारल्यावर एकदम रडायलाच लागली.
"अगं काय झालं तरी काय?" मन्याने विचारले.
"मन्या त्या सुखात्म्याचा खून करावासा वाटतोय आता मला", लिली रडत रडत म्हणाली.
"अगं पण झालं तरी काय?" मन्याने परत विचारले.
"निर्लज्ज, नालायक...."
तिची ही गाडी अजून किती वाढणार असे वाटून तिल दिलासा देण्याच्या दृष्टीने मीच म्ह्टले,"खरच, आपण करून टाकू सुखात्म्याचा खून म्हणजे सुखात्म्याचा दु:खी आत्मा होईल. हॅ हॅ हॅ!"
तर नेहेमीप्रमाणे माझ्याकडे लक्ष न देता तिने मन्याला विचारले,"काय वय असेल रे त्या थेरड्याचं?"
"अगं असेल ५०-५५ पर्यंत. पण का?"
"आणि माझं २३. अरे मुलगी शोभते मी त्याची. आणि हा थेरडा मला आज म्हणतो,'लिली, मला तू आवडतेस. माझी बायको मला सोडून गेल्यापासून मी फार एकटा आहे. तू जर माझ्या आयुष्यात आलीस तर मी तुला खूप सुखात ठेवेन' - थेरडा". लिलीच्या अंगाचा तिळपापड होत होता नुसता. यावर मन्या एकदम गंभीर झाला. पण मला तर बुवा हसूच आले. मी दिलखुलास हसून घेतले. पण मनाशी म्हटले, आता खरंच या सुखात्म्याच्या खूनाचा प्लॅन आखायला सुरुवात केली पाहिजे.

यांनंतर पुढले २-३ दिवस मी खूनाच्या कथांची बरीच जुनी-नवी पुस्तकं वाचण्याचा सपाटा लावला - काही वेगळ्या पद्धतीने खून करता येतो का ते बघायला. २-३ प्लॅन्स निवडून ठेवले. पण खरं सांगू का? अहो, खून करावा - करावा असं वाटण. सोप्प आहे पण खरच खून करायला फार हिम्मत लागते हो! मला काही हिम्मत होईना, म्हटलं तूर्तास बाजूलाच ठेऊया हा विचार. हिम्मत गोळा करायला कालावधी तरी जाऊ द्यायला हवा ना!

पण गोंधळ काय झाला - या २-३ दिवसांत माझं थोडं कामाकडे दुर्लक्ष झालं. ऑफिसात बसून मी माझे प्लॅन्स ठरवत होतो ना - त्यामुळे! तर काय झालं, सुखात्म्याची कसलीशी मिटींग होती आणि त्याकरीता लागणारी फाईल व्यवस्थित लावून द्यायला त्याने मला दिली होती. या माझ्या कामाच्या गडबडीत त्या फाईलविषयी मी साफ विसरून गेलो. त्यादिवशी - म्हणजे शुक्रवारी सुखात्म्याने मला त्याच्या केबिनमध्ये बोलवून फाईल मागितली. मी नम्रपणे त्याला म्हटलं,"सर, मी जरा वेगळ्या कामात होतो त्यामुळे फाईल लावून नाही झाली."
"कसलं वेगळं काम?" सुखात्म्याने आवाज चढवून विचारलं.

आता याला सांगावं का की याच्या खूनाचे प्लॅन्स आखत होतो पण सध्यातरी लांबणीवर टाकलाय प्लॅन. मी असा विचारच करत होतो तर हा प्राणी जोरात माझ्या अंगावर खेकसला - "ऑफिसच्या कामापेक्षा महत्वाची काय कामं असतात तुम्हाला? कामावरून कमी करेन मी तुला असा हलगर्जीपणा केला तर..." आणखीही बरच काही ओरडत होता सुखात्म्या पण मी ताडताड बाहेर निघून आलो.

"समजतो काय हा सुखात्म्या स्वतःला?" बाहेर येऊन मी ओरडलो. सर्वानी खाडखाड माना वर केल्या माझ्या दिशेने.
"काय तिरशिंगराव, सुखात्म्याच्या प्रेमळ शब्दाचा प्रसाद आज तुम्हाला बसलेला दिसतोय!", कुलकर्णीने विचारले.
"मग याला काय वाटतं, पुर्णवेळ याची नोकरी करायला काय आम्ही बांधील आहोत?" मी परत ओरडलो. त्यात मधल्या मध्ये कुल्कर्ण्या मला तिरशिंगराव म्हणाला हेदेखील माझ्या लक्षात आले नाही.
"खरोखरच आता मी खून पाडेन तो सुखात्म्याचाच!"या माझ्या बोलण्यावर सर्वांनी एकमेकांकडे कटाक्ष टाकत कामाला सुरुवात केली. परत सर्वजण ही माझी नेहेमीचीच बडबड समजले.

दिवस चालले होते. दिवसेनदिवस लिलीची सुखात्म्यावरची चीड-चीड वाढू लागली होती. मला सगळया गोष्टी सांगायचे नाहीत, ती किंवा मन्या पण तिला बराच त्रास होत असावा - हे तिच्या बोलण्यातून उमगत होते. आणि दरवेळी तिची चीड्चीड झाली की "साला या सुखात्य्माचा खात्मा कोणी करेल तर किती बरं.." असं म्हणून मन्या माझ्याकडे आशेने बघत असे.

मी बरीच हिंमत गोळा करून पाहिली...पण राव...काय उपयोग नाही झाला...दिवस-रात्र त्या खूनकथा वाचूनही साला मी नेभळट तो नेभळटच राहिलो होतो. साला, एकुलत्या एका मित्राकरीता एवढीही हिंमत करता येऊ नये??? माझा मलाच राग येऊ लागला होता.

अलिकडे लिली आणि तिचा भाऊ आमच्या बरोबर रमीचे डाव टाकत. लिलीच्या भावाशी मन्याचा चांगला दोस्ताना जमला होता. बरेचदा लिलीच्या घरात रविवार दुपारचे आम्ही भेटत असू. लिलीच्या घरी बरे होते. ती आणि तिचा भाऊ दोघेच नोकरीनिमित्त या शहरात रहात होते.

एक दिवस काहीतरी नक्की झाले असावे, लिलीने तडका-फडकी नोकरी सोडून दिली. मन्यालाही सोडून दे म्हणून ती मागे लागली होती. पण मन्याला तेवढ्या सहजपणे सोडणं शक्य नव्हतं हे तिलाही माहिती होतं. इथे अजून वर्षभर थांबला की त्याला कंपनीतर्फे परदेशी पाठवणार होते. तो चान्स त्याला या सुखात्म्यापायी सोडायचा नव्हता. परदेशी वर्षभर राहून पैसा मिळवून मग घर घ्यायचा त्याचा बेत होता. सध्याच्या त्याच्या दोन खोल्यांच्या घरात त्याला लग्न करून लिलीला घेऊन यायचे नव्हते.

त्यानंतर २-३ आठवडे आम्ही पत्ते खेळायला जमलोच नाही...लिलीची इच्छा नाहीये असं मन्या सांगत होता. पण त्यानंतरच्या रविवारी मात्र मला अगदीच रहावेना. साला! एवढाच तर एक वेळ होता जरा मजेत जायचा. सकाळीच मी मन्याला गाठले आणि आज दुपारी खेळायला लिलीच्या घरी भेटूया असं सांगून टाकलं. मन्या आढेवेढे घेत तयार झाला एकदाचा!!

दुपारी आम्ही दोघं लिलीकडे जमलो. एखादा डाव झाला असेल-नसेल तर त्यानंतर लिली डोकं दुखंतय सांगून तिच्या आतल्या खोलीत जाऊन पडली. मन्या तिच्या मागे जाऊन तिच्या तब्येतीची चौकशी करत असावा. लिलीला बहुदा बरंच बरं नसावं कारण तिच्या रडण्याचा आवाज आल्यासारखं वाटलं...मन्या बाहेर आला तो औषध घेऊन येतो असं काहीसं पुटपुटत बाहेर गेला...आणि मी आणि तिचा भाऊ मात्र बाहेरच्या खोलीत टि.व्ही. बघत बसलो. अधे-मधे तिचा भाऊ जाऊन लिलीची चौकशी करून येत होता पण एकूणातच ती झोपूनच होती. एक-दीड तास झाला असेल. अखेरीस मन्या आला. आला तो तडक आतल्या खोलीत, मग बाथरूम मध्ये जाऊन जवळपास २०-एक मिनीटांनी तो परत बाहेर येऊन बसला. लिली त्याच्याकरीता चहा-बिस्कीटं काही-काही घेऊन आली. मन्या जरा अस्वस्थ, शांत-शांत वाटला....

शेवटी थोड्या वेळात पुढे काही न खेळता आम्ही दोघं निघालो घरी जायला!! परतीच्या रस्त्यात सुद्धा मन्या शांतच होता....एखाद-दोनदा मी काही बोलायचा प्रयत्न केला तर तो, "यार तू तर काहीच केलंच नाहीस दोस्ताकरीता!", असं काहीसं बडबडला... त्याच्या बोलण्याने खजील होऊन मी गप्प बसलो. तो बोलत होता ते काही खोटं नव्हतं ना!! त्याने माझ्याकरीता काय-काय केलं होतं आणि मी मात्र त्याबदल्यात त्याच्याकरीता काय केलं होतं?

दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसात पोहोचलो तर मोठी खबर! सुखात्म्याचा मृत्यू!! आदल्या दिवशी दुपारी त्याच्या घरी घुसून कोणीतरी त्याचा खून केला होता म्हणे!!! आयला! ही तर सॉल्लिड खबर होती.....ही खबर ऐकून खूश होण्याऐवजी लोकं गप्प का होते, कळेना!! मी तर मोठ्याने म्हणालो - "अरे! ही तर खूशखबर!! पार्टी मनाओ!! आपण तर बुवा फारच खूश!" यावर लोकं परत नेहेमीप्रमाणे दचकले. साले, सगळे खूश होते मनातून. वरून मात्र दु:खी असल्याचा आव आणत होते. . सगळे खोटारडे नुसते! मी इकडे-तिकडे फिरून कसा-कधी खून झाला याची माहिती काढू लागलो. यावर कोणीतरी हळू आवाजात मला विचारलं सुद्धा - "काय नार्‍या, शेवटी जमवलंस का तू खूनाचं??" मी दचकलोच...हे लोकं अजून ते धरून चाललेले? मी खून करेन हे? अर्थात मला आवडलं असतंच मन्या आणि लिलीकरीता तेवढं करायला त्यामुळे हे ज्या कोणी केलं त्याच्यावर मी बेहद्द खूश होतो.

यथावकाश ऑफिसमध्ये पोलिस आले चौकशी करायला. एकेकाला बोलावून त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मन्याची , माझीही चौकशी झाली. साहेबांनी मला आदल्या दिवशी दुपारी कुठे होतास हे विचारले...मी आपले सरळपणे लिलीकडे पत्ते खेळायला जमलो होतो ते सांगितलं...साहेबांनी फारसे प्रश्न न विचार ता सरळ मी खून केलाय हे त्यांना माहित्ये हे मला सांगितले. मी वेड्यासारखा बघत असताना त्यांनी सांगितलं की ऑफिसमध्ये बर्‍याच जणांनी "मी सुखात्म्याचा खून करणार", हे बोलताना ऐकलं असल्याचं सांगितलं. आदल्या दिवशी दुपारी २ ते ४ दरम्यान खून झाला तेव्हा नक्की पूर्ण वेळ तू लिलीकडे होतास का - हे साहेबांनी परत-परत विचारले. मन्या, लिली, तिचा भाऊ पण पूर्ण वेळ तिथेच होते का हे ही साहेबांनी विचारले. आणि एकाएकी माझ्या डोक्यात कधी नव्हे तो प्रकाश पडला....मन्या काल बराच वेळ गायब होता....कुठे होतास याचे कारणही त्याने नीट दिले नव्हते.... आयला! साला मन्या माझ्यापेक्षा हिंमतवान निघाला की!!! मी बसलो आपला मुळूमुळीत!!!

त्याक्षणी मला कळलं की हीच वेळ आहे - मन्याला मदत करायची... एकुलत्या एका दोस्ताची दोस्ती निभवून न्यायची!!! मी मान्य करून टाकलं - मीच आदल्या दुपारी जाऊन मीच सुखात्म्याला संपवून आलो म्हणून!!!
पोलिस मला गाडीकडे घेऊन जात असताना कुठे मन्या दिसतोय का ते मी शोधत होतो....पठ्ठ्या कुठे दिसेना...दिसला तर...... त्याच्याजवळ मला झालेला आनंद व्यक्त करायचा होताच आणि शिवाय खूनाचे डीटेल्स पण घ्यायचे होते. नाहीतर पोलिसांना जबानीत काय सांगणार होतो मी!....शेवटी मी मित्राच्या कामी येणार होतो! साला! एकुलत्या एका मित्राकरीता एवढं तर करायलाच हवं ना!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जब्राट

धन्यवाद लोक्स.
सायो. हो. दुसर्‍या संस्थळावर टाकली आहे पूर्वी.

कडक!!