जालीय अस्तित्व अर्थात आयडी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 25 April, 2020 - 23:56

आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्‍या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात. सुरक्षितता, खाजगीपणा, विक्षिप्तपणा, खोड्याळपणा,तटस्थपणा काहीही असू शकतात. व्यवस्थापनही या माहितीचा आग्रह धरत नाही. त्यामुळे इथे व्यक्ती ही आयडी असते.अगदी डूआयडी असली तरीही. इथे आपण डूआयडी विचारात घेतल नाहीये. ती पण शेवटी आयडीच. तो पुन्हा भन्नाट विषय आहे. काही लोक आपल्या व्यक्तिमत्वाशी सूचक अशी आयडी धारण करतात. इथे सभासद असंख्य आहेत. लिहिते,वाचनमात्र,अर्धलिहिते मूकनिरिक्षक अशा भूमिका बजावत असतात. कोणीही कुठल्याही विषयावर लिहू शकतो. प्रतिवाद,प्रतिसाद,वाद,विवाद,संवाद,विसंवाद,कुसंवाद करु शकतो. तरी प्रत्येकाच्या आवडीची अशी काही क्षेत्र असतात,कल असतो,मउ कोपरा असतो,राजकीय,सामाजिक विचारधारा असते, आयुष्यात पाहिलेले चढ उतारांचा अनुभव असतो,व्यक्तिमत्वाचा असा एक पिंड असतो. तो त्याच्या लेखनात प्रतिसादात डोकावत असतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्न: । हे ही आलच. आपलीच विचारधारा कशी योग्य असून समोरचा कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यात आपला वेळ, एनर्जी खर्च करताना अनेक आयडी दिसतात. समोरच्याला पटेपर्यंत कळफलक बडवत राहतात. नाही पटल तर दूषणे देतात,उपहास करतात,कीव करतात वा लायकी काढतात. हे सगळ करताना आपल्या समोर फक्त आयडी असतो. माणुस नसतो. आयडीच्या अपारदर्शकतेमुळे आपल्याला बाकी काही बोध होत नाही फक्त आयडी, त्याचे त्या संकेतस्थळावरचे वय, त्याचे लेखन व त्याचा प्रतिक्रियेचा ट्रॅक एवढच दिसत. त्यातून आपण त्या आयडीच्या आंतरजालीय व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधत असतो. आयडी जेवढी पारदर्शी तेवढा आपला अंदाज बांधण्याचे पॅरामिटर्स वाढतात व तो अंदाज खरा ठरण्याची शक्यताही वाढते. ज्यांची आंतरजालीय वय जास्ती आहेत त्यांनी जालीय उन्हाळे पावसाळे अधिक पाहिलेले असतात, जालीय इतिहास त्यांना बर्‍यापैकी माहित असतो. नवीन आयडींना तो माहित असण्याची शक्यता कमी. त्यांचा भर तत्कालीन उस्फूर्ततेवर असतो. त्यामूळे प्रतिसाद देताना ते कोणत्या आयडीला प्रतिसाद देतो आहे हे ते पहात नाहीत. ते फक्त तत्कालीन लिखाणावर प्रतिसाद देत असतात. मूळ लेखनातील गर्भितार्थ त्यांच्या लक्षात येत नाही. काही नवोदित आयडी मात्र जालीय उत्खनन करुन समोरच्याचा इतिहास पक्का करुन घेतात. त्यामुळे त्यांचा सभासदत्वाचा कालावधी जरी कमी असला तरी ते जालीय जेष्ठतेत कमी पडत नाहीत. कधी कधी ते जालीय जेष्ठांची सुद्धा विकेट घेतात. पण अभ्यासू आणि विनयशील (द्वंद्व समास) आयडी फारच थोड्या. मानसशास्त्रातील सर्व प्रकारची व्यक्तिमत्व इथे आयडी रुपाने वावरत असतात. प्रत्यक्ष कट्टा वा गटग वगैरे कार्यक्रमातून फिजिकली ओळख होते. त्या आयडी विषयी मनात बांधलेले अंदाज कधी खरे ठरतात तरी कधी कोसळून पडतात.त्या ठिकाणी या आयडी माणसे होतात.अर्थात अल्पकाळातील सहवासातून माणसे समजतातच असे मात्र नाही हा मुद्दा आहेच. तसेही आयुष्यभर एकमेकाच्या सहवासात राहून एकमेकांना न समजलेली माणसे आपण पहातोच. कुठल्या आयडी ला जालीय विश्वात किंवा माणसाला अजालीय विश्वात किती अंतरावर ठेवायच हे ठरवण्याच काम आपला मेंदु करतच असतो. त्यासाठी बरीच इनपुटस लागतात. ती जर मिळाली नाही तर उपलब्ध असलेल्या इनपुटस वर आपण काहितरी निर्णय घेत असतो तो प्रसंगी बदलत ही असतो. आंतरजालावरचे उत्खनन हे पुराणातील समुद्रमंथनासारखे असते यातून काही रत्ने बाहेर येतात.
आंतरजालावर दीर्घकाळ वावरल्यानंतर एक साचलेपण येते. त्याच त्याच गोष्टी, तेच ते प्रतिसाद याचा कंटाळा यायला लागतो. विचारणार्‍याची पहिली वेळ असु शकते पण तुमच्यासाठी ती शंभरावी वेळ असते. मग तुम्ही दुर्लक्ष करायला लागता. प्रत्येकवेळी नवीन वाचकाच्या माहितीसाठी कॉपी पेस्ट करायचा कंटाळा यायला लागतो. आंतरजालीय वा प्रत्यक्ष वय जसे वाढेल तसा विरक्तीचा घटक प्रभावी व्हायला लागतो.आपण इथे कितीही आपटली तरी त्यामुळे जग थोडच बदलणार आहे? ते आपल्या पद्धतीने चालुच रहाणार आहे. तुमच्या सह किंवा तुमच्या शिवाय.मरु दे तिकड जग, आपण काही जग सुधारण्याचा मक्ता घेतला नाही हा विचार बळावायला लागतो. मग विरक्तीबरोबर तुमची उदासीनताही वाढायला लागते. काही जिनीयस लोक मात्र सातत्याने नव्याचा शोध घेत राहतात. या ना त्या मार्गाने माहिती मिळवीत राहतात.ती इतरांनाही देत राहतात. इतकी की कधी इतरांनाही अजीर्ण होत. शेवटी किती वाचायच, काय वाचायच आणि कधी वाचायच हे वाचकच ठरवत असतात.तुम्ही आंतरजालावर सोडलेली माहिती ही कुणाला ना कुणाला उपयोगी पडत असते पण आपल्यासाठी ते अज्ञात राहतात.या आंतरजालावर आपण नकळत गुरफटत जातो. हा मला तेव्हा अस म्हणाला तो तसं म्हणाला मग याचा हिशोब चुकता करा त्याचा हिशोब चुकता करा असे स्कोअर सेटलिंग होत जाते मग त्याचे स्कोअर सेटलिंग, मग कंपूबाजी, अखंड प्रवास सुरुच राहतो या चक्रव्यूहात.आपल्या किंवा आपल्या आयडीच्या अंतापर्यंत. बाकी काहीही असो आंतरजालामुळे आपली मानसिक आरोग्याची समीकरणे बदलणार आहेत हेच आमचे भाकीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलंय.
ऑलमोस्ट सर्वच मुद्दे नेटक्या शब्दात मांडले गेलेत.

बाकी सगळं ठीक आहे पण शेवटचा शब्द वाचून मौज वाटली.
आंतरजालामुळे आपली मानसिक आरोग्याची समीकरणे बदलणार आहेत हेच आमचे भाकीत.

छान
एखाद्या संकेतस्थळावर नवोदीत आयडी म्हणून वावरण्याची मजा आहे ती जुनाट आयडी झाल्यावर येत नाही..
यावर एकच उपाय.. आयडी बदलावेत Happy

कंपूबाजी ला समविचारी लोक एकत्र येणे अशा सकारात्मक अर्थाने देखील घेतले जावे. शेवटी समानशीले व्यसनेषू सख्यं।

कंपूबाजी ला समविचारी लोक एकत्र येणे अशा सकारात्मक अर्थाने देखील घेतले जावे.

राजकारणातील घराणेशाही आणि संगीतातील घराण्याची परंपरा यात जो फरक आहे तोच
कंपूबाजी आणि मित्रमंडळ यात आहे.

चांगल्या परंतु लाजाळू लेखकास प्रोत्साहन देऊन लेखनास उद्युक्त करणे हे मित्रमंडळ करते.

तर आपल्या कंपूत नसलेल्या नवोदित( काहो वेळेस जुन्या सुद्धा) लेखकाला ट्रोलिंग करून नाउमेद करणे याला कंपूबाजी म्हणतात.

मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्तिगावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.

हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात.

सुबोध खरे तुम्ही बर्‍याच लोकांना पुरुन उरता.पण त्यात जी ताकद जाते त्याचा तुम्हाला वैताग येतो का?

समास सोडायचे काम काँप्युटर करून घेतो. परिच्छेद करायचे काम मात्र आपल्यालाच करावे लागते.

या प्रकारच्या "वॉल ऑफ टेक्स्ट" चे वाचन वेदनादायी असते हा अनुभव.

आजकाल माबोवर स्वतःचे लिखाण एडिट करणे हे सोडलेले ब्रह्मास्त्र परत बोलावण्यासारखे झाल्याने नाईलाज आहे, पण प्यारेग्राफ पाडले असते तर लेख अधिक प्यारा वाटला असता असे नोंदवितो.

हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात
<<
तरीच बोल्ड केलेल्या भागाप्रमाणे काही आयडी आपोआप कट्ट्यावर पोहोचतात. 21.gif

त्यात जी ताकद जाते त्याचा तुम्हाला वैताग येतो का?

हॅ असले लोक माझ्या खिजगणतीतही नसतात.

किती तरी डू आय डी माझं मिसळपाव वरचं भांडण येथे उकरून आपल्या कंपू बरोबर मला ट्रोल करायचा प्रयत्न करतात.

अशा लोकांचं बँका कसं खातं बंद करतात तसं मी त्यांना माझ्या मनातून वजा करून टाकतो.

आणि त्यानंतर त्यांचा आपण कोण? ( आपली लायकी काय? ऐवजी) असे सभ्य शब्दात विचारून कचरा करून टाकतो.

बहुसंख्य लोकांच्या ते वर्मी लागतं.

काही लुब्रे आणि लोचट डू आय डी असतातच. त्यांना झुरळा सारखे झाडून टाकतो.

हे सर्व मी मिसळपाववर विखारी वैयक्तिक टीका करणाऱ्यांशी दोन हात करताना शिकलो.

I am battle hardened soldier.

असल्या टिनपाट लोकांना घाबरून मी मायबोली/ मिसळपाव सोडून गेलो तर त्यांचा हेतू साध्य होईल.
परंतु ते होणे नाही.

मुळात भुकणाऱ्या कुत्र्यांकडे आपण कितो लक्ष द्यायचं हे आपणच ठरवायचं असतं.

घाटपांडे साहेब
आपण जालावर सुद्धा आपल्या मूळ नावानेच वावरता आणि जे आहे त्याला सरळपणे उत्तर देता ( विशेषतः फलज्योतिषबाबत विखारी टीका करणार्यांना) याबद्दल मला आपल्याबद्दल आदर आहे.

लोकांचे वैचारिक मतभेद असतातच पण डू आय डी च्या मागे लपून दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणाऱ्या टिनपाट लोकांना आपणही पुरून उरता हे पाहून माझा आपल्या बद्दलच आदर द्विगुणित झालेला आहे हे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो.

असल्या टिनपाट लोकांना घाबरून मी मायबोली/ मिसळपाव सोडून गेलो तर त्यांचा हेतू साध्य होईल.
खरे मायबोलीवर फिरकत नाहीत आजकाल. battle hardened soldier सॉफ्ट पडला की काय?