फसलेल्या पावाची कहाणी

Submitted by विद्या भुतकर on 24 April, 2020 - 07:33

गेल्या काही दिवसांत निरनिराळ्या फूड ग्रुप्स वर लोकांच्या पाककलेचं दर्शन चालू आहे. त्यात ब्रेड, पाव वगैरे घरी बनवून ते किती छान बनलेत असे एकेक फोटो पोस्ट करायचं पेवच फुटलेलं आहे. पूर्वी मी अनेकदा घरी पाव (वडापावचे पाव) बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक रेसिपी तंतोतंत कृतीत उतरवणारे आणि दुसरे माझ्यासारखे स्वतःच्या आयडिया त्यात घुसवणारे. तर पूर्वी जेव्हा मी पाव बनवण्याचे प्रयत्न केले त्यात बटर कमी टाकणे, मैद्याच्या ऐवजी थोडी कणिक वापरणे, पाण्याचे माप खूप जास्त आहे असं वाटून कमीच पाणी घालणे असे अनेक प्रकार केले आहेत. अनेक बॅचेस पिठाचे गोळे वाया घालवल्यानंतर एक दिवस मी जिद्दीने नवीन यीस्ट चे पाकीट घरी आणले आणि तंतोतंत कृती पाळून एकदम भारी पाव बनवले होते. आता एकदा पाव नीट बनल्यानंतर माझा जीव शांत झाला आणि उरलेली यीस्टची पाकिटं तशीच पडून राहिली होती. आणि इथेच आजची पोस्ट सुरु होते.

सध्या लॉकडाऊनमध्ये घरातील ब्रेड संपल्यावर आणि विशेषतः ते नवनवीन ब्रेडचे फोटो पाहून माझ्यात एकदम पुन्हा पाव बनवण्याची खुमखुमी आली. म्हटलं तीन पाकिटं आहेत जुनी, प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? म्हणून मी एक दिवस बसून दोन-चार रेसिपी पाहिल्या आणि मनात मला योग्य वाटेल ते प्रमाण ठरवून घेतलं(हे असंच असतं आपलं) आणि सुरुवात केली. आता पूर्वीचा अनुभव असल्याने मी लगेच पाणी कोमट करुन त्यात यीस्ट घालून ठेवलं. सानुला 'त्याला हात लावू नकोस' म्हटलं तरी तिने ते पाणी मिसळलंच. आता ते मिश्रण काही बरे वाटेना. पण प्रयत्न करायलाच हवेत. म्हणून मी दिलेल्या मापाच्या दुप्पट मैदा घेतला आणि मळले. ते आपटून, खूप मळून त्या कणकेतले ग्लुटेन वाढवणे वगैरे सर्व प्रकार झाले. दोन तास ठेवले तरी काही पीठ फुगले नाही. म्हटलं इतक्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं?

त्या कणकेचे मोठे गोळे करुन ६ गोळे लाटले आणि पिझ्झा बेस बनवून ओव्हन मध्ये टाकून भाजले. तरीही खूप कणिक शिल्लक होती. त्यांच्याही लाट्या लाटून घेतल्या. पण थोड्या पातळ केल्या आणि ओव्हनमध्ये भाजायला ठेवल्या. आता त्यांचे फुगून मस्त 'नान' होतील अशी माझी अपेक्षा होती. पण बाहेर आले तोवर चांगलेच कडक झाले होते. मग आम्ही ते तुकडे करुन दुसऱ्या दिवशी पोरांना चिप्स म्हणून खायला दिले. त्या पिझ्झाच्या बेसवर भाज्या घालून पिझ्झा बनवले. बिचारी पोरं ! त्यांना काय माहित पिझ्झा इतका चिवट का लागतोय ते? पण दोघांनीही आवडीने पिझ्झा आणि दुसऱ्या दिवशी चिप्सही खाल्ले. इतकं झालं तरी माझी खाज अजून गेली नव्हती. पाव कुठे बनले होते?

म्हणून दुसऱ्या दिवशी परत निम्म्या मापाने परत यीस्ट ऍक्टिव्हेट करुन पीठ मळून घेतलं. नवरा म्हणे मग काल पण कमी घ्यायचीस ना? म्हटलं असं कसं? यालाच म्हणतात कॉन्फिडंस ! तर मी मळलेलं पीठ पुन्हा दोन तास ठेवलं. ते काही फुगलं नाही. म्हटलं आजच्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं? शेवटी डोकं लावून छोले बनवले आणि त्या कणकेचे मस्त भटुरे तळले. आयुष्यात कधी मी अशा पुऱ्या केल्या नव्हत्या त्यामुळे जरा धावपळ झाली. पण ते पार पडलं. तळायला तेल काढलंच आहे तर म्हटलं हातासरशी भजीही करुच ना. म्हणून मग कांदा भजी, मिरची भजीही झालीच. पोरांना जाम आवडले छोले-भटुरे आणि सोबत आमरस( मँगो पल्प). अगदी दोघांनी येऊन मिठी मारली मला. म्हटलं चला अजून एक दिवस निघाला.

पुढचे ४-५ दिवस मी कसेबसे काढले पण इच्छा काही जाईना . त्यात अजून लोकांचे नवीन वडापावचे फोटो येत होतेच. अनेकदा वाटलं आपलं यीस्ट जुनं आहे म्हणून होत नसेल. पण ऑनलाईन ऑर्डर दिली तरी ती मे मध्ये मिळणार होती. तोवर मला कुठे धीर? शेवटी मी म्हटलं, बहुतेक मी पाणी गरम करुन घेते ते खूप गरम होत असेल त्यामुळे यीस्ट मरत असेल. म्हणून थर्मामीटर घेऊनच बसले. पाण्याचं तापमान योग्य इतकं झाल्यावर यीस्ट घालून ऍक्टिव्हेट केलं. आता नेहमीपेक्षा जास्त बरं दिसत होतं ते. हे सर्व चालू असताना आमच्या ब्रेड बनवता येणाऱ्या एका मित्राला फोनही केला. त्यांनी यीस्ट नसेल तर बेकिंग सोडा घालून ब्रेड कसा बनवायचा याची रेसिपीही दिली. म्हटलं या कणकेच्या गोळ्यांचं काही झालं नाही तर त्यातच बेकिंग सोडा घालून बेक करु. काय बिघडतंय? नेहमीप्रमाणे कणिक आहे तशीच राहिली. मग मी ठरवलं होतं तसं त्यात बेकिंग सोडा टाकला आणि ओव्हनला लावलं. पण त्यातून कसलातरी भयानक वास येऊ लागला. (कदाचित सोड्याचा). मग जीवावर दगड ठेवून तो दगडासारखा झालेला गोळा फेकून दिला.

आता माझी हिंमत पूर्णपणे खचली होती. पण पुढच्या आठवड्यात आमच्या ब्रेड बनवणाऱ्या मित्रांनी घरी ब्रेड बनवला होता त्याचे फोटो पाहिले आणि पुन्हा माझे हात खाजवायला लागले. मग त्यांनी ज्या यीस्टने तो सुंदर ब्रेड बनवला होता, त्यातलंच थोडं मला बरणीत आणून दिलं. म्हटलं आता हे ऍक्टिव्ह यीस्ट आहे. याने आधीच ब्रेड नीट बनलेला आहे म्हणजे माझाही होईलच. म्हणून पुन्हा मी हिम्मत केली. यावेळी मैद्याचं नवीन पाकीट फोडलं. पण तरी नुसताच मैद्याचा ब्रेड कसा करायचा म्हणून एक कप गव्हाचं पीठ घातलं. त्यांनी दिलेल्या प्रोसेसप्रमाणे मळलेली कणिक रात्रभर ठेवायची होती. मी आपली मळून ठेवून टाकली. रात्री १ वाजता मला खाली जाऊन बघायची इच्छा होत होती. नवरा म्हणे गप झोप. शेवटी सकाळी उठून लहान पोराच्या उत्सुकतेने मी तो कणकेचा गोळा पाहिला. पण त्यात ढिम्म फरक पडलेला नव्हता. इतकी चिडचिड झाली. मी तर दुपारच्या जेवणाला सँडविच करणार होते, स्वतः बनवलेल्या ब्रेडचं. शेवटी तो गोळा आहे तसाच ओव्हनमध्ये टाकला. म्हटलं जे होईल ते होईल.

आता ते ब्रेड फुगणार तर नव्हता. तरीही wishful thinking ! पोरंही बिचारी दोन चार वेळा डोकावून गेली. तासाभराने बाहेर काढलेला ब्रेड म्हणजे विटेचा तुकडाच झाला होता. मारला तर जोरात खोक पडली असती डोक्याला. पण म्हटलं जाऊ दे ना. घट्ट तर घट्ट ब्रेड. वाया का घालवायचा? नवऱ्याला म्हटलं जरा स्लाईस करुन ठेव. आता सँडविच तर बनणार नव्हतं म्हणून जेवणासाठी दुसरं काहीतरी करावं लागलं याचा वैताग होताच. त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या नवर्याने दमून विचारलं, निम्मा झालाय, उरलेला दुपारी करु का? त्याला म्हटलं मार खाशील. तर आता तो तुकडे केलेला ब्रेड कालपासून डब्यात पडलेला आहे. मी विचार करतेय टोमॅटो सूप बनवावं का? म्हणजे त्यात बुडवून थोडा मऊ पडेल, चावायला तितकाच बरा. Meanwhile नवऱ्याने ऑनलाईन ऑर्डर मध्ये ६ ब्रेड मागवले आहेत. ते आलेत. त्यामुळे त्याला बहुतेक 'सुटलो !' असं वाटत आहे. पण घरात अजून एक जुनं यीस्टचं पाकीट आहे ते त्याला कुठे माहितेय? आणि माझ्यातली खाजही !

तर हे असं आहे. माझासारख्या सुग्रणीला काय काय ऐकून घ्यावं लागतंय पोरांकडून, नवऱ्याकडून या ब्रेड आणि पावाच्या नादात. असो. आताच मी कुणीतरी टाकलेली काजुकतलीची पोस्ट पाहिली. अगदी १५ मिनिटांत झाली म्हणे. उद्या काजूकतलीचा प्रयोग नक्की ! Happy

-विद्या भुतकर.

A977416A-85BB-4565-B83A-46F74F6AA832.jpeg36271FF5-FA21-4EEA-B605-B43E9D3862F5.jpeg6BD9AA6E-0522-4C51-9B42-347F04E830B9.jpeg

Group content visibility: 
Use group defaults

पाव फसला नाही तर पावाने आपल्याला फसवले. पावाला काय आपल्याला पावायची इच्छा दिसत नाही.

पावाचे किस्से Lol इतक्या वेळा फसून पण पुन्हा ट्राय करणे म्हणजे _/\_ हे वाचून मी तर माझी आयडिया रद्द करून टाकली.

हाय विद्या,
खुऽऽऽऽप दिवसांनी लिहीती झालीस, बरे वाटले. it seems all is well at your end and touchwood for future. Stay safe.

रच्याकने आपल्या कडे करायला गेलो गणपती आणि झाला मारूती यालाच म्हणतात. Don't give up your spirit.

मनी नाही भाव
म्हणे देवा मला पाव Happy

Biggrin
भारी लिहीलंय, जोरदार जिद्द आहे हो Happy

व्हीट ब्रेड ऐवजी विट ब्रेड झाली म्हणायचे Lol , तुम्हाला वीट आला नाही प्रयोगाचा हे छान झाले.
तुझे जसे पावांचे झाले आहे तसे माझे केकांचे झाले होते. बेकींगचा धसका घेतला आहे.
लेख आवडला. पाफांच्या पोस्टला मम. काळजी घ्या.

यिस्ट , साखर( यिस्टला खायला), बाहेरचे तापमान, आणि पाण्याचे तापमान ह्याचे बिनसले दिसंय्य.

बहुधा ह्यावरूनच, हि जिफ फिरतीय, ह. घ्या.

21755CE7-B8E8-49C8-8857-A1DB37627B30.jpeg

छान झालंय पाव पुराण.
पावाचे गिळगीळीत गोळे, दगड म्हणून फेकून मारायचे बन्स अश्या बऱ्याच स्टेज केल्यात. घरी ताजा पाव हे स्वप्न मोह पडणारं आहेच.
सध्या दगड आणि गिळगीळीत गोळे यामधला खाणेबल प्रकार होतो. ☺️☺️

२ वर्षांपूवी मीपण असेच पाव बनवण्यासाठी ४ यीस्ट चे पाकीट आणले होते . पहिला प्रयत्न चांगलाच फसला , कडक बटर बनले . चहा बरोबर कसेतरी संपवले . परत हिम्मत करून try केले तीच गत ... तेव्हापासून धसकाच घेतलाय पाव या प्रकारचा ....
अजूनही ते २ यीस्ट पाकिटं फ्रिज मध्ये लोळत पडले आहेत....
भारी लिहलंय ... तुमच्या जिद्दीला सलाम !!

दोनदा केक फसल्यानंतर मावे नीट नाही अशी मी स्वतःची समजूत करून बेकींगच्या वाटेवर जायचं नाही अस ठरवल आहे.. आता हे वाचून पाव तर 'अजिबात नाही' कटेगिरीमध्ये गेले Lol
रच्याकने, मैत्रिणीला पाव करायची हौस आली होती पण तिच्या घराशेजारील सर्व दुकानात यीस्ट संपल म्हणे! म्हणजे किती लोक पावाच्या नादी लागलेत बघा Proud

फोटो आज टाकले का. छान दिसतंय ताट पुरी-छोले-रस. पिझ्झाही फसलेल्या पावाचा केलाय का. शेवटचा फोटो भारी (दोन्ही अर्थाने :)) आहे.

>>> तिच्या घराशेजारील सर्व दुकानात यीस्ट संपल म्हणे!<<
अगदी अगदी. माझ्याही डोक्यात़ किडा वळवळला होता पण माझ्यावरच्याच कृपेने, यिस्ट अगदी कुठेच नाही मिळाले...

Last week Maza pan brown bread phasala..less spongy zhala..mag chapatiche ladu kartat tasa bread cha ladu kela..n bread chya thin slices karun..mini pizza kela..n ...bread finish....punha kadhi bread try karen ase vatat nahi..

पावाचा जाऊ दे, पण लेख मस्त जमलाय. वाचायला मजा आली. स्वतःचे असे अनेक बिघडलेले प्रयोग आठवले. आणि जमत नाही म्हटलं की तेच करावसं वाटतं Happy

भारीच लिहिलाय लेख ! बिघडलेल्या product पासून child products पर्यन्त! सगळा प्रवास अगदी रिलेट झाला Happy

यावर दमलेल्या बाबाची कहाणी च्या चालीत फसलेल्या पावाची कहाणी असं गाणं लिहिता येईल ☺️☺️

Submitted by mi_anu on 25 April, 2020 - 10:52>>>

फ्रिजमध्ये पडलेले दोन तीन यीस्ट..
लागलीय खाज, घेतली थोडी रिस्क..
रोजचेच नाही पण आज काहीतरी
पाव कसे बनवू, मला जमतच नाही..
करतेच थोडे बघू ना, आज जमते का?
खायला पाहिजे पाव, माझ्या सानुल्या फुला..
फसलेल्या पावाची ही कहाणी तुला..

ला ला ला ला ..ला ला . ( पोर पाठिमागे रडकुंडीला आलेत)

विद्याजी हलके घ्या.. बाकी लेख मस्त जमलाय.. तुमची चिकाटी आवडली.. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत करायलाच हवं.. मीसुद्धा कितीतरी वेळा फसलो आहे.. पण नंतर जमल्यावर जो आनंद मिळतो ना तो शब्दात सांगता येणार नाही..

Pages