©राक्षसमंदिर - उपसंहार भाग २

Submitted by अज्ञातवासी on 23 April, 2020 - 08:16

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

उपसंहार भाग १ - https://www.maayboli.com/node/74201

संपूर्ण कथा - 
https://www.maayboli.com/node/74130

त्या विशाल दाराची उंची डोळ्यांना दिसत नव्हती, कारण उंचच उंच जाऊन ते अंतर्धान पावत होत. संपूर्णपणे सोन्यात बनवलेल्या त्या दाराची रुंदीच जवळजवळ पन्नास पुरुषभर होती, व अनेक चौकोनांमध्ये अनेक पौराणिक देखावे उभे केले होते. दाराला दोन सोन्याचे फाळ होते, व प्रत्येक फाळावर एक एक घंटा लावलेली होती.
मात्र त्या दारापेक्षाही त्याच्या द्वारपालाकडे बघताच मित्र आणि अमित्राच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या. तो द्वारपालही उंचच उंच जाऊन अंतर्धान झाल्यासारखा भव्य होता. त्याच्या चारही हातांमध्ये कमळ, गदा, शंख आणि चक्र होते. त्याच्या भव्य छातीवर माला रुळत होती, आणि त्याच्या फिकट निळ्या वर्णावर पितांबर खुलून दिसत होतं.
विष्णू!!!! देवतांचा रक्षक, राक्षसांचा संहारकर्ता!!
"मित्र, अमित्र" एक आश्वासक परंतु तितकाच खंबीर आवाज आला.
"प्रणाम विष्णू." दोघांनी विष्णूला नमस्कार केला. "बऱ्याच वर्षांनी आपली भेट झाली."
"सहस्त्र वर्ष आणि दोन दिवस." विष्णूदेव म्हणाले.
"सर्वज्ञाता विष्णू, आणि आज बळीमहाराजांचा द्वारपाल म्हणून इथे युगानुयुगे उभा? विष्णुदेव, काय ही तुमची दशा!" मित्र कुत्सितपणे म्हणाला.
गडगडाटी हसण्याचा आवाज झाला. त्या आवाजाने मित्र आणि अमित्रही हादरले.
"मीच निर्माता, मीच संहारकर्ता, मीच रक्षणकर्ता. या नगरीच्या रक्षणाचा सगळा भार माझ्यावर आहे. मी आहे, तोपर्यंत ही नगरी आणि इथले नागरिक सुरक्षित आहेत...
...पण या नगरीच्या बाहेर जे घडेल, त्याची जबाबदारी माझी नाही. तिथे मी प्रसंगानुसार संहारही करू शकतो."
मित्र आणि अमित्रांचा थरकाप उडाला. विष्णूने केलेली त्यांच्या महान पूर्वासुरींची दुर्दशा त्यांना आठवली.
...आणि बळीमहाराजांविषयी त्यांच्या मनात असलेला आदर आणखीच दुणावला.
कडSS कडSS असा प्रचंड आवाज झाला. मित्र आणि अमित्र मागे सरले.
व तो प्रचंड दरवाजा उघडला...
आतले दृश्य बघून मित्र आणि अमित्राच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दोघांनी दरवाजाच्या आत पाऊल टाकलं व जमीनीवर डोकं टेकवले. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
महान सुतळ नगरीत त्यांनी प्रवेश केला होता...
अतिशय सुबकपणे या नगरीची रचना केली गेली होती. विष्णूदेवांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा अहोरात्र या नगरीच्या निर्माणासाठी झटत होते. त्यांच्या सोबतीला मयासुरानेही अनेक कष्ट घेतले होते.
आणि त्यातूनच ही सुतळ नगरी निर्माण झाली होती...
"जर स्वर्गाहून लंका रम्य असेल, तर सुतळ नगरी लंकेहून रम्य आहे!"
अमित्राच्या तोंडून भावोद्गार बाहेर पडले.
कित्येक योजने दूर, पांढऱ्याशुभ्र संगमरवरी प्रशस्त घरांची रांग पसरली होती. प्रत्येक घराभोवती कलाकुसर करून काळ्या संगमरवरात कुंपण केलं होतं. तिथून थोडं आत जोत्यावर घर बांधलं होतं. गुळगुळीत खांबावर सूर्यप्रकाश पडताच पाहणाऱ्याला स्फटिकाचा भास होत असे.
घराच्या उजव्या बाजूला एक लहान पण अतिशय लखलखीत झाड होतं. दैत्यगुरू शुक्राचार्यानी प्रत्येकाला या संजीवनी झाडाचं वरदान दिलं होतं.
दोन घरांमध्ये एका घराएवढं अंतर होतं. प्रत्येक पाच घरांनंतर एक घर लांबीचा रस्ता जात होता. असा दहा घरांचा समूह मिळून एक चौकोन बनत होता. चार चौकोन मिळून एक भव्य कारंजा बसवला होता. प्रत्येक सोळा चौकोन मिळून एक वैद्यालय, एक प्राथमिक शिक्षालय व एक कोतवाल यांची सोय होती. चौसष्ठ चौकोन मिळून एक कनिष्ठ विद्यालय, एक वैद्यशाळा व दंडाधिकारी यांची रचना होती. असे चार हजार शहाण्णव चौकोन मिळून संपूर्ण रहिवासी विभाग पूर्ण होत असे. यासाठी एक विद्यापीठ, न्यायाधिकारी, व वैद्य प्रयोगशाळा यांचे प्रयोजन होते.
घरांएवढीच जागा एका दुकानाला दिली गेली होती, व तिथे पृथ्वी, स्वर्ग व पाताळातीळ सर्वोत्तम वस्तू मिळत होत्या. कित्येक उंची अत्तरे, वस्त्रे, शस्त्रे यांची रेलचेल होती. नानाविध खाद्यपदार्थ मिळणारी दुकाने होती. सुवर्णकारांचीही बरीच दुकाने होती व त्यांच्याकडेच रत्नांचा व्यापार होता.
या दोन विभागापासून दूर दोन स्वतंत्र विभाग होते. औद्योगिक विभाग व कृषी विभाग. औद्योगिक विभागात जीवनावश्यक, चैनीच्या वस्तू व संरक्षक वस्तू असे तीन विभाग होते. प्रत्येक वस्तूच्या कारखान्याला एका चौकोनाएवढी जागा दिली होती, व शैक्षणिक सोडून इतर सर्व सोयी होत्या.
सर्वात शेवटचा मात्र सर्वात महत्वाचा विभाग म्हणजे कृषिविभाग! या विभागाच नेतृत्व स्वतः बळीमहाराज करत असत. दिवसातून एक तास तरी ते या विभागात घालवत असत.
कित्येक योजने काळीभोर, लाल, पांढरट अशा अनेक प्रकारची जमीन पसरली होती. जगातल्या प्रत्येक प्रकारच्या वनस्पती या जमिनीमध्ये लावलेल्या होत्या. पिकानुसार जमिनीची वर्गवारी केली गेली होती. कित्येक श्रमिक राक्षस स्वतः नांगर घेऊन जमीन नांगरत असत. कित्येक वेळी बळीमहाराजांनी स्वतः जमीन नांगरून अनेकविध दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली होती. या जमिनीला खताची गरज नसे, याचं कारणही अद्भुत होतं.
...पृथ्वीतलावरच्या पापाचरणाला कंटाळून सरस्वती नदी लोप पावली. अनेक ठिकाणी गेल्यावरही तिला राहण्यायोग्य जागा सापडली नाही. हे वृत्त कळल्यावर बळीमहाराज स्वतः सरस्वती नदीकडे गेले, व तिला सुतळ नगरीत येण्याची विनंती केली. सरस्वतीने त्यांना अनेक अवघड दिव्य पार पाडायला सांगितले. ते सर्व लीलया पार पाडून त्यांनी शेवटी सरस्वती नदी नगरीत आणली होती.
...याच सरस्वती नदीने सुतळ नगरीचा संपूर्ण प्रदेश सुजलाम सुफलाम केला होता...
अशा महान सुतळ नगरीत मित्र अमित्राने प्रवेश केला होता...
...आणि आता ते बळीमहाराजांच्या राजवाड्याकडे निघाले....

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

@मन्या - धन्यवाद
@धनुडी - धन्यवाद
@पाफा - थँक्स
@नौटंकी - धन्यवाद
@अथेना - थँक्स
@अजय - थँक्स.

पुढील भाग टाकला आहे.