मन वढाय वढाय (भाग ३८)

Submitted by nimita on 22 April, 2020 - 23:04

रजत इतक्या दिवसांनंतर येणार म्हणून स्नेहाच्या उत्साहाला उधाण आलं होतं. काय करू आणि काय नको- असं झालं होतं तिला. श्रद्धाला आपल्या आईची ही लगबग बघून खूप गंमत वाटत होती.. सकाळी जेव्हा वंदना मावशीचा फोन आला होता तेव्हा स्नेहा स्वैपाकघरात busy होती.. तेव्हा आपल्या आजीशी बोलताना श्रद्धा म्हणाली,"अगं आजी, आई तर बाबांच्या स्वागताची अशी तयारी करतीये की जणू काही ते एखादं युद्धच जिंकून येणार आहेत. मला नाही वाटत आत्ता तिला वेळ मिळेल तुझ्याशी बोलायला." पण तिच्या या चिडवण्याकडे लक्ष द्यायला खरंच वेळ नव्हता स्नेहाकडे. आज तर तिनी सुमती मावशींना पण सुट्टी दिली होती. रजतसाठी आज ती स्वतः त्याच्या आवडीचा स्वैपाक करणार होती.

खरं म्हणजे सुमती मावशींना पण तिनी केवळ रजतच्या आग्रहावरूनच नोकरीवर ठेवलं होतं. गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्या स्नेहाकडे स्वैपाक करायला म्हणून येत होत्या. स्नेहाच्या मते त्यांचा तिघांचा स्वैपाक करायला असा कितीसा वेळ आणि कष्ट लागणार? त्यामुळे ती रजतच्या या प्रस्तावाच्या अगदी विरोधात होती. त्यावेळी रजत म्हणाला होता,"तुला वेळ नाहीये किंवा तुला जमत नाहीये म्हणून नाही म्हणत मी ... केलंस की इतकी वर्षं घरातलं सगळं काम! तुझा सगळा वेळ घर, मी आणि श्रद्धा- या सगळ्या उस्तवारीतच गेला....आता जरा आराम कर, स्वतःच्या स्टुडिओ कडे लक्ष दे, स्वतःचे छंद जोपास. तुझा वेळ हा आता तुझ्यासाठी वापर." श्रद्धानी पण त्याचा हा प्रस्ताव उचलून धरल्यामुळे स्नेहाचा नाईलाज झाला होता. पण रजतला तिच्याबद्दल वाटणारं प्रेम, काळजी बघून ती मनातून खूप सुखावली होती.

स्नेहाच्या दिवसभराच्या धावपळीनंतर शेवटी एकदाचं सगळं घर नटून सजून रजतच्या स्वागतासाठी सज्ज झालं. रजतला एअरपोर्टहून घरी पोचेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती. घरात शिरल्या शिरल्या त्याच्या आवडत्या निशिगंधाच्या सुवासानी त्याचं स्वागत केलं होतं. त्या वासानी त्याचा प्रवासाचा अर्धा अधिक शीण गायब झाला होता. आणि जेव्हा त्यानी स्नेहाला समोर बघितलं तेव्हा उरला सुरला थकवा पण पळून गेला. तिला आपल्या मिठीत ओढून घेत तो हळूच म्हणाला," Missed you so much..." तो पुढे वाकून अजून काही धिटाई करणार इतक्यात आतल्या खोलीतून श्रद्धाचा आवाज ऐकू आला आणि तो गडबडीत स्नेहापासून दूर झाला. हे सगळं इतक्या पटकन - काही क्षणांत घडलं की स्नेहा पण गोंधळून गेली. पण नंतर कितीतरी वेळ तिच्या कानांत रजतचे ते शब्द घोळत होते..' Missed you so much....' आणि त्याचा परिणाम म्हणून की काय पण स्नेहाला अक्षरशः हवेत तरंगत असल्याचा भास होत होता. कारण गेल्या काही वर्षांत रजत हे असं व्यक्त होणं विसरूनच गेला होता. कदाचित इतक्या दिवसांच्या विरहाचा परिणाम असावा हा...पण त्याच्या त्या एका वाक्यातून, त्याच्या त्या अधीर स्पर्शातून त्याचं प्रेम स्नेहापर्यंत पोचलं होतं.

इतक्या दिवसांनंतर आपल्या बाबांना भेटल्यामुळे श्रद्धा पण खूप खुश होती. कित्ती काय काय सांगायचं होतं तिला ... आणि त्याबरोबरच तिनी रजतला जी शॉपिंग ची लिस्ट दिली होती त्यातलं त्यानी काय काय आणलंय याचीही उत्सुकता होती तिला. स्नेहा एकीकडे जेवणाची तयारी करत असताना तिला श्रद्धाचा चिवचिवाट ऐकू येत होता. अधूनमधून रजतच्या कोपरखळ्याही कानावर पडत होत्या. अचानक घरात एक उत्साहाचं , उत्सवाचं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटत होतं तिला. तिच्या मनात आलं, 'खरंच, आपल्या माणसांच्या अस्तित्वानी किती फरक पडतो ना आपल्या आयुष्यात !'

रात्रीचं जेवण अगदी हसतखेळत पार पडलं. रजतनी पहिला घास घेतला आणि त्याच्या तोंडून शब्द निघाले.."वा! घरचं जेवण !!!" स्नेहाला त्यावेळी तेवढीच पावती पुरेशी होती.तिच्या दिवसभराच्या कष्टाचं चीज झालं होतं. श्रद्धानी मात्र वेगवेगळे प्रश्न विचारून रजतला भंडावून सोडलं होतं. तिच्या एका ट्रॅव्हलॉग साठी त्याचा इंटरव्ह्यू घ्यायची इच्छा होती तिची आणि त्यासाठी ती त्याला convince करायच्या प्रयत्नात होती. रजत जरी वरकरणी तिच्याशी बोलत असला तरी त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाहीये हे स्नेहाच्या लक्षात आलं होतं. कारण तिचीही अवस्था तशीच होती. तिची आणि रजतची वारंवार होणारी नजरभेट....श्रद्धाची नजर चुकवून पण जाणूनबुजून केलेले ते चोरटे स्पर्श... त्या स्पर्शातून जाणवणारी अधीरता.....स्नेहाला परत एकदा ते लग्नानंतरचे रोमँटिक दिवस आठवले. शेवटी एकदाची जेवणं उरकली. श्रद्धा रजतला म्हणाली," बाबा, माझ्यासाठी काय काय आणलंय ते दाखवा ना प्लीज. माझे सगळे फ्रेंड्स वाट बघतायत. मी त्यांना प्रॉमिस केलंय की मी त्यांना विडिओ कॉल करून सगळी शॉपिंग दाखवीन म्हणून. प्लीज, बाबा !" तिनी अक्षरशः ओढतच रजतला बाहेरच्या खोलीत नेलं. स्नेहा पण जेवणानंतरची आवरसावर करायला लागली. ती स्वैपाकघरात शेवटची झाकपाक करत असतानाच अचानक मागून येऊन रजतनी तिला आपल्या बाहुपाशात ओढलं. त्याच्या हातांचा विळखा सोडवत स्नेहा दबलेल्या आवाजात म्हणाली, "अरे! काय करतोयस ... श्रद्धा येईल ना !" पण तिला अजूनच जवळ ओढून घेत रजत तिच्या कानाशी कुजबुजला," ती तिच्या खोलीत फ्रेंड्स शी बोलतीये फोनवर. आता इतक्यात तरी ती बाहेर येणार नाही." रजतकडे वळून बघत स्नेहा म्हणाली," तरीसुद्धा नको... म्हणजे इथे नको." रजतचा हिरमुसलेला चेहेरा बघून स्नेहाला खूपच मजा येत होती. त्याला अजून चिडवत ती म्हणाली," इतका उतावीळपणा बरा नाही. थोडा धीर धरा." नाईलाजानी तिच्यापासून दूर होत रजत म्हणाला," राणीसाहेबांची आज्ञा शिरसावंद्य ! सेवक बेडरूममधे आपली वाट बघतोय... लवकर यायची कृपा करा. पुढच्या पाच मिनिटांत जर तुमचं दर्शन झालं नाही तर जे काही होईल त्याला हा सेवक जबाबदार नसेल हे मात्र नक्की!"

रजतचा तो एकूणच हावभाव बघून स्नेहा मनातल्या मनात मोहरून निघाली होती. आज कित्येक वर्षांनंतर तिचा पूर्वीचा रजत तिला परत मिळाला होता. 'पण त्याचं हे असं वागणं म्हणजे अळवावरचं पाणी तर नसेल ना?' स्नेहाच्या मनात विचार आला...' आत्ता इतक्या दिवसांच्या विरहामुळे कदाचित त्याला ही उपरती झाली असेल का ? आणि म्हणून तो आता मागची सगळी कसर भरून काढायचा प्रयत्न करतोय का ? जर खरंच तसं असेल तर मग ही जाणीव अजून किती दिवस टिकून राहील? का थोड्या दिवसांनंतर पुन्हा आपलं 'ये रे माझ्या मागल्या' सारखं होईल?' स्नेहानी तो विचार मनातून झटकून टाकला आणि स्वतःलाच दटावत म्हणाली,' उगीच नको नको ते विचार करायची सवयच लागलीये तुला स्नेहा... रजत नीट वागला नाही तरी प्रॉब्लेम; आता तो तुला हवं तसं वागतोय तर ते appreciate करायचं सोडून त्यातही शंका काढत बसलीयेस. अगदी बरोब्बर म्हणतो रजत- उगीच काहीतरी विचार करतेस आणि मग स्वतःच स्वतःला हवे तसे निष्कर्ष काढत असतेस तू. आता हे सगळे 'किंतु, परंतु' गुंडाळून ठेव आणि पुढ्यात जे सुख वाढून ठेवलंय त्याचा आस्वाद घे."

त्या सुखाच्या नुसत्या कल्पनेनीच स्नेहाच्या चेहेऱ्यावर हसू खुललं. तिनी तिचा फोन silent mode वर लावला.... आणि रजतचा सुद्धा! आजची रात्र ही फक्त तिची आणि रजतची होती; त्या दोघांच्यात तिला तिसरं कोणीही नको होतं...अगदी फोन सुद्धा !!

पण तिकडे सलील मात्र बऱ्याच उशिरापर्यंत स्नेहाच्या good night मेसेजची वाट बघत बसला होता .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं काही छान चालू असताना शेवटच्या ओळीमुळे करकचून ब्रेक लागला! पुढे कायची नेहमीची उत्सुकता!