जेव्हा मूर्ख ट्रेकिंगला जातात ! -४

Submitted by शक्तिमान on 22 April, 2020 - 15:53

कमानीजवळ आम्हाला एक घर दिसले आणि चहाच्या आशेने आम्ही तिथे गेलो...
आता पुढे...

जाण्याच्या आधीच आम्ही भाऊश्याला "तिथं काहीच बोलू नकोस" असा दम भरला.
घराच्या बाहेरच एक व्यक्ती दिसली.
त्या व्यक्तीने आम्हाला हसतमुखाने "या भैय्या या " असं म्हणून बसायला खुर्च्या टाकल्या.
आधी पाणी देऊन,"नाश्ता करणार का जेवण?" असं आपुलकीने त्याने आम्हाला विचारले.जेवण करण्याचे आता कोणाचेच मन नव्हते.
"आम्हाला चहा मिळेल का ४ कप ?",असं विचारल्यावर "अक्के चहा टाक गं ४ कप " असा बाहेरूनच बोलून तो आमच्या शेजारी बसला.

डोंगरातले लोक खूप प्रेमळ,प्रामाणिक आणि नेहमी मदतीला तत्पर असतात असं मी फक्त ऐकले होते.लहान असताना आईच्या मामाचे गाव "कोतुळ" ला मी गेलेलो पण ते इतके आठवत पण नाही. कळसूबाईला तान्हाजीच्या घरी आल्यावर डोंगरातले लोक खरंच किती चांगले असतात याचा प्रत्यक्ष अनुभव आला.

तान्हाजी खाडे. आमच्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असेल. इतक्या डोंगराळ भागात राहुनसुद्धा त्याने डिग्री पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले. वडिलांचा पारंपरिक शेती व्यवसाय.शेतीही जेमतेम. मोठा भाऊ पोलीस खात्यात नौकरीला. तान्हाजी आता MPSC ची तय्यारी करतोय. पण त्याचबरोबर तो आलेल्या ट्रेकर्स सोबत guide म्हणून जायचा.घरी ट्रेकर्स साठी नाश्ता-जेवनाची सोय त्याने केलेली.कॅम्पिंगसाठी टेन्ट्स पुरवणे,bonfire ची सोय आणि नॉन-व्हेज प्रेमींसाठी नॉन-व्हेज सुद्धा त्याच्याकडे मिळायचे. त्यासाठी कोंबड्या सुद्धा घरीच ठेवलेल्या होत्या. ट्रेकर्स साठी स्वतंत्र washroom सुद्धा ह्याने घराशेजारी बांधलेले.

पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळ दिवसा ह्याचा स्टॉल लागलेला असतो.कळसुबाई शिखराचा कानांकोपरा त्याला ठाऊक आहे हे त्याच्या बोलण्यातून मला लगेच कळले. कळसुबाई शिखराचे historical ,geographical माहिती त्याची तोंडपाठ होती. एखादया प्रो-ट्रेकरला सुद्धा जे शिखर चढायला २:३० ते ३ तास लागतात त्याच्यावर हा पठ्ठया फक्त तासाभरात जायचा. आधी मला वाटले हा माणूस उगाच टापा झोडतोय पण त्याचा बोलण्यातला कॉन्फिडन्स बघून हा खरं बोलतोय हे मला पटले. आणि तसेपण गावाकडल्या लोकांना कॉर्पोरेट वाल्यांसारखे "when you can't make it,fake it" असलं जमत नाही.

चहा घेतांना तो आम्हाला त्याने गाईड केलेले ट्रेकर ग्रुप्स चे फोटोस,त्यांना माहिती सांगतांनाचे व्हिडिओज, त्यातल्या काही जणांचे वेगवेगळे परफॉर्मन्स दाखवत होता. विडिओ मध्ये दिसलेल्या karaoke माईक बद्दल भाऊश्यातले कुतूहल जागे झाले.त्याच्याबद्दल विचारताच तान्हाजीनं तो माईक भाऊश्याला आणून दाखवला. माईक चालू करून भाऊश्या त्याच्या फाटक्या आवाजात गाणे म्हणायला लागला. शेवटी मी तो माईक हिसकावून हितेशकडे दिला.
तसा हितेश मस्त गाणे म्हणायचा. त्याने zayn malik चे pillowtalk म्हणायला सुरुवात केली. भाऊश्या विडिओ काढत असून देखील मधूनच "DJ भाऊश्या" असं जोरात ओरडायचा. परफॉर्मन्स तर भारीच झाला. तान्हाजीच्या वडिलांनी हितेशला अजून एक जुने हिंदी गाणे म्हणायला लावले आणि तो गायला देखील.
आता निघायला हवे होते.जायचा मार्ग विचारताच "तुम्ही बिनधास्त जा ,जागोजागी मी दिशा दाखवणारे बाण बनवून ठेवले आहेत" असं त्याने सांगितले. त्यामुळे काळजीत पडलेला आमचा जीव भांड्यात पडला. लगेच वरती जाणार असला तर टेन्ट घेऊन जा,वरती खूप हवा असते असा तो आम्हाला म्हणाला. पण आम्ही रात्री ३:०० ला चढाई सुरु करणार आहोत आणि सध्या मध्येच कुठेतरी शेकोटी करून थांबू असं बोललो.

"उद्या नक्की जेवायला येऊ ", असं बोलून आम्ही १ तासाची चढाई सुरु केली.
कमानीजवळ जाऊन अर्धा तास वेगवेगळ्या पोज मध्ये सगळे फोटोज काढू लागले. अगोदर मीसुद्धा काही बोललो नाही पण जेव्हा अति होऊ लागले तेव्हा मी ओरडताच सगळे चालू लागले.

थोड्यावेळ चढल्यावर "आपण अजून जीन्स घालूनच चढतोय" हे भाऊश्याला उमजले. आमच्यातला हा एकटाच बहाद्दर जीन्स घालून आलेला. रात्र असल्यामुळे आणि सगळे पोरंच असल्यामुळे त्याने रस्त्यामध्येच बॅग फेकून लगेच jogger धारण केली.
ट्रेकला मित्रांसोबत गेल्याचे ३ फायदे असतात.
१. मनसोक्त शिव्या देता येतात.
२. उगीचच पोरं इंग्लिश मध्ये बढाया मारत नाही कारण प्रत्येकाला एकामेकाची खोड माहित असते.
३. आणि एखाद्या रॉक पॅच ला कोणाची फाटली तर बिनधास्त सांगता येते.

आता थोडीशी थंडीही जाणवली होती. त्यामुळे सगळ्यांनीच स्वेटर धारण केले.
स्वेटर परिधान करून मी एका मोठ्या दगडावर बसलो. सागरने जेव्हा माझ्यावर टॉर्च फिरवली तेव्हा त्याला दगडावर काहीतरी दिसले.
कोणीतरी दगडावर बदाम काढून स्वतःचे आणि प्रेमिकाचे पहिले अक्षर लिहिलेले होते.

"महाराजांनी अक्ख्या जन्मात जितके बदाम नसतील खाल्ले त्यापेक्षा जास्त बदाम आजकालची पोरं गडावर काढतात".
ज्याने ते काढलय त्याला भरपूर शिव्या देऊन आणि असेही लोक असतात याची खंत वाटून आम्ही चालणे सुरु केले.

छान वारा पसरलेला होता. त्यामुळे वरती काडीपेटीने bonfire पेटेल कि नाही ह्याची शंका होती.
इतक्यात आम्हाला शेतातले भात काढून झाल्यावर जो घास उरतो त्याचा एक मोठा ढिगारा दिसला.
वेळ न दवडता भाऊश्या शेतात गेला आणि जितके हातात मावेल तेवढे गवत घेऊन तो चालू लागला . त्याला घेऊन आल्याचा थोडातरी फायदा नक्कीच झाला होता. आमच्या चालण्यात वेग आला होता. जागा शोधणे चालूच होते.

बरोबर एक तास चालल्यावर आम्ही एका प्लेन जागेवर आलो होतो. ११:३० वाजून गेले होते.आता इथेच शेकोटी पेटवून विश्राम करूया असे आमचे ठरले.
आजूबाजूला भरपूर झाडे होती. हितेश आणि मी वाळलेल्या फांद्या काढून आणू लागलो. एक फांदी खूप मोठी होती पण ती हितेशकडून तुटत नसल्यामुळे त्याला शिव्या देत मी झाडावर चढलो. त्या फांदीला दोन्ही हातांनी घट्ट पकडून मी खाली लटकून त्या फांदीला झटके देऊ लागलो.

आपला लाडका लेक रात्रीचा ११:३० वाजता एका अनोळखी ठिकाणी झाडाला लटकलाय हे दृश्यं जरका माझ्या आईने बघितले असते तर ट्रेक तर सोडाच गावच्या जत्रेलाही तिने मला कधी पाठवले नसते. तसेही कोरोनामुळे गावची जत्रा कॅन्सल झालीच. मला स्वप्नात कधी वाटले नव्हते कि चीनमुळे माझ्या गावची जत्रा बंद होईल.
असो. ३-४ तास आरामात जातील इतके लाकडे गोळा झाल्यावर आम्ही शेकोटी पेटवायला सुरुवात केली.
भाऊश्याला आता कोणीही थांबवू शकत नव्हते. त्याने परत हितेशला कॅमेरा चालू करायला लावला.
आणि वेगवेगळ्या प्रकारे काडी ओढू लागला.
"मैने बोला था , मैं आग लागा दूंगा आग" असले काही फालतू डायलॉग तो मारत होता. आणि उगाच काड्या नासवतोय म्हणून सागर त्याला शिव्या देत होता.

पण त्याला माहीत नव्हते कि काल केलेल्या हरिश्चंद्रगडाच्या प्लॅन मुळे हितेश आणि मी भाऊश्याची कशी जिरवणार होतो...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users