लिहायचे की बोलायचे !

Submitted by कुमार१ on 21 April, 2020 - 23:12

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ?

ठीक आहे. आता सांगतोच.

ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी की अजून प्रगत झालेली नाही. तसेच अशा मराठी लेखनात विरामचिन्हे मात्र बोलून टंकता येत नाहीत. तसे ऐकल्यावर मी या सुविधेपासून लांबच राहात होतो. परवा एकदा एका अनुभवी मित्राशी यावर बोललो. त्यांच्याकडून असे कळले, की आता ही बोल-लेखन सुविधा मराठीत देखील खूपच विकसित झालेली आहे. त्यांनी स्वतः एक मोठा लेख याप्रकारे पूर्ण लिहिला होता. विरामचिन्हे आपल्यालाच टंकावी लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा लेखनात साधारण दहा टक्के मजकूर हातानेच टंकून संपादित करावा लागेल, असेही समजले.

एखादा लेख लिहिताना ९० टक्के काम बोलूनच होईल, हा भाग नक्कीच आकर्षक वाटला. मग हे नवे तंत्र शिकून घेतले. प्रथम एक छोटा प्रतिसाद अशा प्रकारे टंकलिखित केला. मग हुरुप आला. म्हणून या विषयावर एक छोटा लेख लिहून पाहत आहे.

या निमित्ताने माझ्या लेखन प्रकाराचा थोडक्यात आढावा घेतो आणि त्यातले काही अनुभव सांगतो. सन २०१५ पूर्वी मी सर्व लेखन हस्तलिखित करीत असे. तेव्हा ते फक्त छापील माध्यमांसाठीच पाठवीत असे. आपण लिहिताना एकीकडे विचार विचार करीत असतो. त्यानुसार हातांना संदेश मिळून ते काम करतात. ही लेखनाची अगदी नैसर्गिक पद्धत आहे. त्यामुळे अशा लेखनाचा माझा वेग सर्वाधिक असतो. आजही मला जर एखादे लेखन एकटाकी करायचे असेल, तर मी हातानेच लिहिणे पसंत करेन. आपले विचार आणि हस्तलेखन यांच्यातील समन्वय जबरदस्त असतो. या लेखनात आपली लेखणी अक्षरशः सशासारखी पळते. अर्थात असे लेखन करताना हाताची फक्त तीनच बोटे वापरली जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर खूप ताण येतो.

२०१६ पासून मी संगणकावर टंकलेखन करून स्वतंत्र लेख लिहिण्यास सुरुवात केली. सुरवातीस हे लेखन दमादमानेच करायचे होते. म्हणून प्रथम ते ऑफलाईन करण्याचे शिकलो. तेव्हा डेस्कटॉप वापरत होतो. त्यावर टंकताना हातांना ऐसपैस जागा मिळते खरी. पण त्याच बरोबर बोटे कळफलकावर अक्षरश आपटत असतात. त्यामुळे एका बैठकीत दीर्घ लेखन होऊ शकत नाही. म्हणून एका वेळेस फक्त अर्धा तास लिहित असे. त्यानंतर बोटांना थोडेसे दाबावे लागे आणि त्यांची उघडझाप करून व्यायाम करावा लागे.

गेल्या वर्षी मी डेस्कटॉप चा त्याग करून लॅपटॉप घेतला. काही आधुनिक संगणक सुविधांसाठी हे नक्कीच फायद्याचे आहे. आता यावर टंकलेखन करू लागलो. बोटांच्यासाठी एक सुखद बदल लगेच जाणवला. पूर्वी जी बोटे बोर्डवर अक्षरशः आपटत असंत, त्यांना आता एक प्रकारे मुलायम स्पर्श जाणवू लागला ! या सुखामुळे आता टंकन बऱ्यापैकी आरामदायी झाले. मग लेखनाचा हुरूप वाढला. आता एक गंमत असते. एखादी कृती सुखावह झाली की आपण ती अधिकाधिक करू लागतो. कालांतराने असे लक्षात येते की आपण आपले श्रम वाढवूनच ठेवले आहेत ! त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की टंकन दीर्घ काळ केल्यास बोटांना ताण हा पडणारच. त्यानुसार लेखन करताना योग्य अंतराने विश्रांती घेतलेली बरी.

अलीकडे काही जणांकडून या बोल-लेखन सुविधेबद्दल ऐकत होतो. त्यात हळूहळू बऱ्याच सुधारणा होतं असल्याचे समजत होते. पण काहीही नवे शिकण्याचा आळस मला त्यापासून लांब ठेवत होता. तसेच या पद्धतीत एकेक शब्द सुटा सुटा व्यवस्थित उच्चारणे आवश्यक असते. त्यामुळे लेखनाचा वेग खूप मंदावणार हे उघड होते. अशात सध्याची घरात सक्तीने बसण्याची परिस्थिती निर्माण झाली. नेहमीच्या भाषाविषयक छंदांमध्ये मन रमवित होतोच. तरीही असे वाटत राहिले की या काळात काहीतरी नवे शिकूयाच. आता नेहमीच्या आपल्या व्यवहारात नसलेली पूर्णपणे नवीन गोष्ट शिकायला नको वाटते. म्हणून असे ठरवले, की आपल्या लेखन छंदालाच उपयोगी पडेल अशी ही नवी कृती शिकावी.

आता नवे नवे शिकत असल्याने अगदी मजा येत येत आहे. त्याच बरोबर आपले उच्चार आणि समोर उमटणारी अक्षरे यांच्यातील काही गमती जमती ती देखील नजरेस पडत आहेत. त्या पाहून अंमळ मजाही वाटते आहे. नमुन्या दाखल काही उदाहरणे देतो:

( प्रथम माझा उच्चार आणि यापुढे प्रत्यक्ष उमटलेले शब्द)

१. स्फूर्ती : टाकली
२. शिकत : चिकन

३. अक्षरशः : अक्षर शहा / शहर शहा
४. पसंत : वसंत…..

आहे की नाही हे हे मजेदार?
एकाक्षरी शब्द दोनदा पडणे हे तर फार फार होते बुवा !

अजून एक जाणवले. ‘की’, ‘ही’ सारखे एकाक्षरी शब्द बरेचदा जाम उमटत नाहीत. मग आपण चिडून संगणकावर ओरडतो ! पूर्वीचे टंकन आणि आणि ही सुविधा यात अजून एक महत्त्वाचा फरक आहे. वर्डमधील टंकन हे ऑफलाईन करता येते. त्यामुळे ते करताना आपल्या जालसुविधेचा वेग वगैरे गोष्टींचा विचार नसतो. तसेच टंकनासाठी आपला डेटाही खर्ची पडत नाही. याउलट बोल सुविधातील लेखन खूप हळू होत असल्याने डेटा खर्च होतो. तसेच मधून मधून जाल सेवेचा वेग कमी होत असतो. त्यामुळे हे लेखन मध्ये मध्ये अडते. हळूहळू या या प्रकाराचा सराव वाढल्यावर अजून मजा येईल असे वाटते. एकीकडे टंकनश्रम कमी करण्याच्या नादात दुसरीकडे संपादनाचे कष्ट बरेच वाढताहेत, असे आता तरी वाटत आहे. इथे आपण बोलताना आपले उच्चार जितके स्पष्ट आणि शुद्ध होतील, तितकीच या लेखनाची अचूकता वाढेल.

सहज जाणवलेला एक मुद्दा. आपण टंकनक्रिया शांतपणे करू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या कुणाला आपला त्रास नसतो. बोलसुविधेत पुरेसा खाजगीपणा आवश्यक ठरतो. मग घरात आपल्या खोलीचे दार लाऊन बसावे लागते. कार्यालयात असे काम करताना तर गोपनीयतेचा मुद्दा नीट पहावा लागेल.

आपल्यातील बरेच जण संगणक तंत्रज्ञानात कुशल आहेत. त्यातील काहीजण ही सुविधा वापरत असतीलच. तेव्हा तुमचेही यातले अनुभव जाणून घेण्यास उत्सुक.
अनौपचारीक गप्पांमध्ये असे ऐकले की येत्या काही वर्षांत संगणकाचे कळफलक कदाचित कालबाह्य होतील. तेव्हा या प्रकारच्या बोलण्यातूनच बहुतेक सगळे लिहावे लागेल. आज तरी यावर पूर्ण विश्वास बसत नाही. पण कुणी सांगावे ? येणारा काळच याचे उत्तर देईल.

… हा लेख नव्या प्रकारे शिकून लिहिल्याने छोटाच ठेवत आहे. शेवटी नवशिकेपणाच्या मर्यादा असतातच.
धन्यवाद !
**************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साद, धन्यवाद.
आता नीट समजले.
वरील चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सूचना केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार !

वरील चर्चेतून पण आपण डिजिटल तंत्रज्ञानाची कमाल पाहिली.

याच दरम्यान एक लघुलेख वाचण्यात आला त्याचा विषय आहे की, भविष्यात कागदावरील हस्तलेखन टिकून राहील नाही ?
त्यात एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणाचा उल्लेख आहे. Forrester ही अमेरिकी व्यापारी संशोधन संस्था, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, यावर अभ्यास करीत असते. त्यांच्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की, विविध उद्योग जगतातील ८७% अधिकारी वर्ग डिजिटल लेखनाच्या बरोबरीने हस्तलिखित टिपणे देखील आवर्जून काढीत असतो !

त्यांच्या या सवयीचा कार्य-समन्वय आणि कार्यक्षमता वाढीसाठी चांगलाच उपयोग होतो, असे दिसले आहे.

मंगेश
धन्यवाद आणि माबोवर स्वागत !
……………….
जसे या सुविधेने लेखन वाढवीत आहे, तशा ‘तिच्या’ टंकनात सुधारणा होत आहेत. कालपर्यंत ‘कोविड’ उच्चारले की ‘कोबी’ उमटत असे ! आज चक्क ‘कोविड’ उमटले.

एक आश्चर्यकारक अनुभव .

मराठी बोल लेखन सुविधेत अजून विरामचिन्हे येत नाहीत हे माहिती आहे. काल मी speechtyping.com इथे एक वाक्य बोलल्यावर त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह आपोआप उमटले !
कसे ते काय माहित ?
नंतर पुन्हा प्रयत्न करून पाहिला तर मात्र काही आले नाही.

काही तरी ग्लिच् असू शकेल का ? कारण पुन्हा आले नाही .
ते उद्गारवाचक चिन्ह वाक्याशी अनुरूप(Expression) होते का.
glitch

/ɡliCH/

INFORMAL

noun

a sudden, usually temporary malfunction or irregularity of equipment.

अस्मिता, बहुतेक असेच काहीतरी असेल.

पण क्षणभर मला असं वाटलं होतं, की मी जे वाक्य बोललो ते भावांनासकट बोललो की काय !
होय, त्या वाक्याशी ते चिन्ह बऱ्यापैकी अनुरूप होते. मीहून नसते घातले. पण चालू शकेल असे होते.
भविष्यात कदाचित या यंत्रणा इतक्या हुशार होऊ शकतील, नाही का ?

नितीन +१
.........................
आज या सुविधेची काही विशेष शब्द वापरून परीक्षा घेतली. त्यात असे दिसले :

शहामृग षटकोन
कोश कोषातून विशेष शहा
शोषण शेषाद्री मेष पोषण
…………………….

ऋषिकेश ( पण हृषिकेश नाही येत).
हृदय
वांग्मय ( हे मार खाते )
सुशेगात घर्षण

.......बऱ्यापैकी छान होतंय .

(टंकनाशी संबंधित आहे म्हणून इथे लिहितो)

एक चांगला लेख
"Roman Lipit Lihinarya मराठी बहाद्दरांविषयी…
इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं?"

https://www.loksatta.com/blogs-news/blog-for-those-who-write-devanagari-...

गेली दोन वर्षे मी नियमित बोलून टंकन speechtyping.com येथे करीत आहे.

आताचे काही अनुभव :
१. अजूनही बोलायला सुरुवात केल्यानंतरचा पहिला शब्द बऱ्याचदा उमटत नाही. मग दोन-तीनदा जोरात उच्चारल्यावर एकदम तो दुहेरी तिहेरी स्वरूपात उमटतो.
२. अंक मराठीतून बोलले असताही रोमन लिपीतच उमटतात.

३. जी मराठी नावे आकारांत आहेत व त्यांना जर प्रत्यय लावला (उदा. आवरणातील) तर ते बहुतेक वेळा
आवरण आतील” असे उमटते. त्यामुळे नंतर संपादनाचे काम बऱ्यापैकी पडते.

४. नुसत्या ‘कोविड’ शब्दाची गम्मत अजूनही चालूच आहे ! ते ‘कोबी ड किंवा कॉमेडी’ असे उमटते. (आपण लिहितोय आजाराबद्दल आणि याला पडलय कोबीच्या भाजीबद्दल ! ). मात्र covid-19 असे उच्चारल्यावर ते रोमन लिपीत बरोबर उमटते.

५. मराठीत विरामचिन्हे अजूनही नाही उमटत.
तुमच्याही अनुभवांच्या गमतीजमती लिहा. याहून अधिक सरस संस्थळ असल्यास सुचवा.

बोलणाऱ्या व्यक्तीच्या निव्वळ ओठांच्या हालचालीवरून बोलणे ओळखणारे तंत्रज्ञान:
VSR:

https://techxplore-com.cdn.ampproject.org/v/s/techxplore.com/news/2022-1...

यातले जाणकार अधिक काही सांगू शकतील.

नवे तंत्रज्ञान :
चॅट-जीपीटी : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या साधनाचा सगळ्या मोठा दुष्पपरिणाम लेखनकलेवर होऊ शकतो. ही कलाच संपुष्टात येऊ शकते

https://www.aksharnama.com/client/article_detail/6474

मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या साधनाचा सगळ्या मोठा दुष्पपरिणाम लिहिण्यावर म्हणजे लेखनकलेवर होऊ शकतो. चॅट-जीपीटी हे साधन वापरून कोणीही विनासायास कुठल्याही विषयावर निबंध लिहू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःचा म्हणून खपवू शकतो.

हे एक फुटबॉल स्पर्धांत गाजलेले. सामने दिसत आहेत, चूक झाली, गोल झाला नाही की एक कोच काही बडबडायचा आणि ते 'पाहून' एक बाई
ते ताबडतोब ट्विटरवर अपलोड करायची. अगोदर त्याने इन्कार केला पण नंतर माफी मागीतली.

Pages