लिहायचे की बोलायचे !

Submitted by कुमार१ on 21 April, 2020 - 23:12

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ?

ठीक आहे. आता सांगतोच.

ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी की अजून प्रगत झालेली नाही. तसेच अशा मराठी लेखनात विरामचिन्हे मात्र बोलून टंकता येत नाहीत. तसे ऐकल्यावर मी या सुविधेपासून लांबच राहात होतो. परवा एकदा एका अनुभवी मित्राशी यावर बोललो. त्यांच्याकडून असे कळले, की आता ही बोल-लेखन सुविधा मराठीत देखील खूपच विकसित झालेली आहे. त्यांनी स्वतः एक मोठा लेख याप्रकारे पूर्ण लिहिला होता. विरामचिन्हे आपल्यालाच टंकावी लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा लेखनात साधारण दहा टक्के मजकूर हातानेच टंकून संपादित करावा लागेल, असेही समजले.

एखादा लेख लिहिताना ९० टक्के काम बोलूनच होईल, हा भाग नक्कीच आकर्षक वाटला. मग हे नवे तंत्र शिकून घेतले. प्रथम एक छोटा प्रतिसाद अशा प्रकारे टंकलिखित केला. मग हुरुप आला. म्हणून या विषयावर एक छोटा लेख लिहून पाहत आहे.

या निमित्ताने माझ्या लेखन प्रकाराचा थोडक्यात आढावा घेतो आणि त्यातले काही अनुभव सांगतो. सन २०१५ पूर्वी मी सर्व लेखन हस्तलिखित करीत असे. तेव्हा ते फक्त छापील माध्यमांसाठीच पाठवीत असे. आपण लिहिताना एकीकडे विचार विचार करीत असतो. त्यानुसार हातांना संदेश मिळून ते काम करतात. ही लेखनाची अगदी नैसर्गिक पद्धत आहे. त्यामुळे अशा लेखनाचा माझा वेग सर्वाधिक असतो. आजही मला जर एखादे लेखन एकटाकी करायचे असेल, तर मी हातानेच लिहिणे पसंत करेन. आपले विचार आणि हस्तलेखन यांच्यातील समन्वय जबरदस्त असतो. या लेखनात आपली लेखणी अक्षरशः सशासारखी पळते. अर्थात असे लेखन करताना हाताची फक्त तीनच बोटे वापरली जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर खूप ताण येतो.

२०१६ पासून मी संगणकावर टंकलेखन करून स्वतंत्र लेख लिहिण्यास सुरुवात केली. सुरवातीस हे लेखन दमादमानेच करायचे होते. म्हणून प्रथम ते ऑफलाईन करण्याचे शिकलो. तेव्हा डेस्कटॉप वापरत होतो. त्यावर टंकताना हातांना ऐसपैस जागा मिळते खरी. पण त्याच बरोबर बोटे कळफलकावर अक्षरश आपटत असतात. त्यामुळे एका बैठकीत दीर्घ लेखन होऊ शकत नाही. म्हणून एका वेळेस फक्त अर्धा तास लिहित असे. त्यानंतर बोटांना थोडेसे दाबावे लागे आणि त्यांची उघडझाप करून व्यायाम करावा लागे.

गेल्या वर्षी मी डेस्कटॉप चा त्याग करून लॅपटॉप घेतला. काही आधुनिक संगणक सुविधांसाठी हे नक्कीच फायद्याचे आहे. आता यावर टंकलेखन करू लागलो. बोटांच्यासाठी एक सुखद बदल लगेच जाणवला. पूर्वी जी बोटे बोर्डवर अक्षरशः आपटत असंत, त्यांना आता एक प्रकारे मुलायम स्पर्श जाणवू लागला ! या सुखामुळे आता टंकन बऱ्यापैकी आरामदायी झाले. मग लेखनाचा हुरूप वाढला. आता एक गंमत असते. एखादी कृती सुखावह झाली की आपण ती अधिकाधिक करू लागतो. कालांतराने असे लक्षात येते की आपण आपले श्रम वाढवूनच ठेवले आहेत ! त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की टंकन दीर्घ काळ केल्यास बोटांना ताण हा पडणारच. त्यानुसार लेखन करताना योग्य अंतराने विश्रांती घेतलेली बरी.

अलीकडे काही जणांकडून या बोल-लेखन सुविधेबद्दल ऐकत होतो. त्यात हळूहळू बऱ्याच सुधारणा होतं असल्याचे समजत होते. पण काहीही नवे शिकण्याचा आळस मला त्यापासून लांब ठेवत होता. तसेच या पद्धतीत एकेक शब्द सुटा सुटा व्यवस्थित उच्चारणे आवश्यक असते. त्यामुळे लेखनाचा वेग खूप मंदावणार हे उघड होते. अशात सध्याची घरात सक्तीने बसण्याची परिस्थिती निर्माण झाली. नेहमीच्या भाषाविषयक छंदांमध्ये मन रमवित होतोच. तरीही असे वाटत राहिले की या काळात काहीतरी नवे शिकूयाच. आता नेहमीच्या आपल्या व्यवहारात नसलेली पूर्णपणे नवीन गोष्ट शिकायला नको वाटते. म्हणून असे ठरवले, की आपल्या लेखन छंदालाच उपयोगी पडेल अशी ही नवी कृती शिकावी.

आता नवे नवे शिकत असल्याने अगदी मजा येत येत आहे. त्याच बरोबर आपले उच्चार आणि समोर उमटणारी अक्षरे यांच्यातील काही गमती जमती ती देखील नजरेस पडत आहेत. त्या पाहून अंमळ मजाही वाटते आहे. नमुन्या दाखल काही उदाहरणे देतो:

( प्रथम माझा उच्चार आणि यापुढे प्रत्यक्ष उमटलेले शब्द)

१. स्फूर्ती : टाकली
२. शिकत : चिकन

३. अक्षरशः : अक्षर शहा / शहर शहा
४. पसंत : वसंत…..

आहे की नाही हे हे मजेदार?
एकाक्षरी शब्द दोनदा पडणे हे तर फार फार होते बुवा !

अजून एक जाणवले. ‘की’, ‘ही’ सारखे एकाक्षरी शब्द बरेचदा जाम उमटत नाहीत. मग आपण चिडून संगणकावर ओरडतो ! पूर्वीचे टंकन आणि आणि ही सुविधा यात अजून एक महत्त्वाचा फरक आहे. वर्डमधील टंकन हे ऑफलाईन करता येते. त्यामुळे ते करताना आपल्या जालसुविधेचा वेग वगैरे गोष्टींचा विचार नसतो. तसेच टंकनासाठी आपला डेटाही खर्ची पडत नाही. याउलट बोल सुविधातील लेखन खूप हळू होत असल्याने डेटा खर्च होतो. तसेच मधून मधून जाल सेवेचा वेग कमी होत असतो. त्यामुळे हे लेखन मध्ये मध्ये अडते. हळूहळू या या प्रकाराचा सराव वाढल्यावर अजून मजा येईल असे वाटते. एकीकडे टंकनश्रम कमी करण्याच्या नादात दुसरीकडे संपादनाचे कष्ट बरेच वाढताहेत, असे आता तरी वाटत आहे. इथे आपण बोलताना आपले उच्चार जितके स्पष्ट आणि शुद्ध होतील, तितकीच या लेखनाची अचूकता वाढेल.

सहज जाणवलेला एक मुद्दा. आपण टंकनक्रिया शांतपणे करू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या कुणाला आपला त्रास नसतो. बोलसुविधेत पुरेसा खाजगीपणा आवश्यक ठरतो. मग घरात आपल्या खोलीचे दार लाऊन बसावे लागते. कार्यालयात असे काम करताना तर गोपनीयतेचा मुद्दा नीट पहावा लागेल.

आपल्यातील बरेच जण संगणक तंत्रज्ञानात कुशल आहेत. त्यातील काहीजण ही सुविधा वापरत असतीलच. तेव्हा तुमचेही यातले अनुभव जाणून घेण्यास उत्सुक.
अनौपचारीक गप्पांमध्ये असे ऐकले की येत्या काही वर्षांत संगणकाचे कळफलक कदाचित कालबाह्य होतील. तेव्हा या प्रकारच्या बोलण्यातूनच बहुतेक सगळे लिहावे लागेल. आज तरी यावर पूर्ण विश्वास बसत नाही. पण कुणी सांगावे ? येणारा काळच याचे उत्तर देईल.

… हा लेख नव्या प्रकारे शिकून लिहिल्याने छोटाच ठेवत आहे. शेवटी नवशिकेपणाच्या मर्यादा असतातच.
धन्यवाद !
**************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा!

<<१. स्फूर्ती : टाकली
२. शिकत : चिकन

३. अक्षरशः : अक्षर शहा / शहर शहा
४. पसंत : वसंत…..>>>

म्हणजे आता कालबाह्य झालेल्या तारखात्याच्या गमतीजमती (संदर्भ- माझे पौष्टिक जीवन- पुलं) उदा. Receive mother-in-law ऐवजी deceive mother-in-law, babu's marriage fixed with Limaye's daughter ऐवजी babu's garage mixed with lemon water
परत अवतरणार म्हणायच्या Lol

वावे,
अगदी अगदी ! पुलंच्या आठवणी ताज्या झाल्या.

अपा,
(laptop) गुगल डॉक्स >>> टूल्स >>> मराठी पर्याय >>> टिचकी मारून बोलणे.
माझ्या मोबाईलवर मात्र मराठी गंडतय .

माझ्या मोबाईलवर मात्र मराठी गंडतय .>>> सेटिंग> सिस्टीम सेटींग> language and input>current keyboard> Gboard> languages>marathi
असे सेटींग करा मग येईल युट्युबर विडिओ आहे

छान कला.
मी आता बघेन प्रयत्न करून.
>>>>
शिकत : चिकन
अक्षरशः : अक्षर शहा / शहर शहा
>>>>> हे भारीच.

मस्त !

काही महीने पूर्वी मी फोन मध्ये लिपिकर अँप वापरले. मराठी लिहायची /टाईप करायची सवय नसलेकारणाने अँप वर लवकर टाईप झाले. Whatsapp वर मराठी मित्रांंसोबत बोलायला (लिहायला) पण सोपे गेले.
पण....
Google doc मध्ये टाईप केलेले एक मराठी document जेव्हा प्रिंट काढू गेले तेव्हा विचित्र लिपी आली . मग मी पुन्हा त्या वाटेला नाही गेले. आत्ता परत प्रयत्न करून पाहिन

कुतुहल वाढलेय. वापरून पहाणार.

पण गोपनीयतेचा मुद्दा पटलाच. शिवाय संगणाकालाफक्त आपलाच आवाज (घरातील इतर असंख्य आवाज वगळून) ऐकू यायला हवा. हे दुर्मिळच.

लिपिकर अँप >> माहितीसाठी धन्यवाद.

फक्त आपलाच आवाज (घरातील इतर असंख्य आवाज वगळून) ऐकू यायला हवा.
>>>

तसे घरातील टीवी किंवा लांबच्या आवाजांनी फरक पडत नाही. आपल्यालाही तसे जवळ तोंड करूनच बोलावे लागते.

माझ लिपिकार ऎप पुर्वी voice typing करायच आता करत नाहि. रीइन्स्टॉल केल तरी काही फरक नाही

>>>>
शिकत : चिकन
अक्षरशः : अक्षर शहा / शहर शहा
>>>>> Lol
संस्कृत सुभाषीते कसे लिहील मग !!
मी प्रयत्न केला होता. माझे नाव ....आहे याच्या पलीकडे जाऊ नाही शकले. आपले बोलणे झाल्यावर ते असे....टिंब टिंब देऊन विचार करते. तेव्हा मला वाटायचे की त्याला ऐकू आले नाही मग मी अजून एकदा बोलायचे आणि अगम्य लिहिले जायचे. ते पहिलीचे मुल वाचताना जसे शब्द फोडून
वाचतात तसे बोलायचा कंटाळा आला. माझ्या बोलण्याचा आणि त्याचा लिहीण्याचा वेग जुळलाच नाही. तुमचा लेख वाचून पुन्हा प्रयत्न करावा वाटतो. मुलीला मराठी उत्तम बोलता येत पण घरात तिला एकटीला मराठी लिहीता वाचता येत नाही. म्हणून ती या voice type शी खेळत असते खूप वेळा. मला चेक केल्यावर काही तरी वेगळे दिसते. Happy

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

एक विचार चर्चेसाठी ठेवतो:

साधारण आपण असे समजतो की –
१. बोलणे हे ऐकण्यासाठी असते आणि
२. लिहिणे हे वाचण्यासाठी.

आता या नव्या सुविधेने आपण बोलणे >> लिखित स्वरूप >> वाचणे , असे करतोय.
पण...
भविष्यात जर प्रत्येक संगणकीय आज्ञा बोलूनच करायची ठरली (कारण कळफलक नाहीच) तर मग असे होऊ शकेल का ....
बोलणे >>> संगणकीय ध्वनिमुद्रण >>> दुसऱ्याने ऐकणे >> बोलूनच उत्तर देणे.

मधली ‘लिहिणे’ ही प्रक्रियाच बाद ठरू शकते का? बोलणे व ऐकणे याच 'नैसर्गिक' कृती आहेत. त्या किमान पातळीवर जाऊ आपण ?
काय वाटते तंत्रज्ञांना ?

वाचन ही पण नैसर्गिक कृती आहे. वाचन करण्यासाठी आधी लिहावे लागते.

<< भविष्यात जर प्रत्येक संगणकीय आज्ञा बोलूनच करायची ठरली >>
मुके लोक काय करणार मग? लेखन मुके/आंधळे/बहिरे सगळे करू शकतात.

मी आज हे करून पाहिले. मुद्दामहून काही अवघड शब्द बोललो:

धृतराष्ट्र >>> बरोबर आला.

दृष्टद्युम्न >>> नाही. हा टाईप केलाय.

वांगमय >>> असा चुकीचाच येतो. बराच वेळ प्रयत्न केला.

शिकायला छान वाटते.

आदिश्री
प्रयत्न चालू ठेवा !
साद,
चांगला प्रयत्न.
पु बो ले शु Bw

गुगलला मराठी नीट समजत नाही अस माझ मत आहे.

बोललेल टाइप करण्यासाठी तुम्ही कुठले अ‍ॅप वापरता.
लिपिकर हे अ‍ॅप आहे काय?

विक्रम,
गुगल डॉक्स >>> टूल्स >>> >>> आवाजाचा पर्याय >> >>> मराठी पर्याय >>> टिचकी मारून बोलणे.

... सोप्या उच्चारांचे शब्द छान समजतात त्याला !

आजकल बोट दुखावल्यामुळे गूगल व्हॉइस टायपिंग ची भारी आयड्या मिळाली!
हेही गुगल व्हॉइस टायपिंग वर टाईप केले!

छान. मी पण हा प्रतिसाद बोलूनच देत आहे. नुकतंच मी माझ्या यूट्यूब चैनल साठी मराठी मधून काही लिखाण केलं. त्यासाठी मराठी व्हॉइस टायपिंग चा खूपच उपयोग झाला. विरामचिन्हे सोडली तर बाकी काहीही अडचण येत नाही. मला तरी व्हॉइस टायपिंग चा वेग प्रत्यक्ष टायपिंग पेक्षा खूप जास्त वाटतो. Happy

अगदी अगदी ! पुलंच्या आठवणी ताज्या झाल्या.
लहान मुले कविता कशी म्हणतात आणि ती ऐकायला कशी येते ह्याचे पुलंनी गमतीदार उदाहरण दिले होते.
पंख चिमुकले निळे जांभळे
पंतजी मुतले निळे जांभळे.
मोबाईल मधील इंडिक की बोर्ड मधील व्हॉईस पर्याय खूप फास्ट आणि अचूक टाईप करतो.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

*मोबाईल मधील इंडिक की बोर्ड मधील व्हॉईस पर्याय खूप फास्ट >>>
चांगली माहिती. शिकून बघावे आता.

आग्या,

इंडिक चा प्रयत्न करतोय पण जमत नाही.
आधी आवाजाचे बटण दाबायचे की आधी कीबोर्ड निवडायचा?
जरा नीट क्रम सांगता का?

धन्यवाद.
काहीतरी गंडतेय. बघतो कोणाची मदत घेऊन .

प्रथमतः, ह्या उत्तम धाग्याबद्दल श्री कुमार1 यांचे अभिनंदन !
मराठी बोल-लेखनासाठी काही आणखी पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत."स्पीच टाइपिंग"-वाईस टू टेक्स्ट कन्व्हर्टर या वेबसाईटवर उत्तम प्रकारे मराठी बोल-लेखन करता येते. ही सुविधा गुगल क्रोम मध्ये उपलब्ध आहे व त्याच प्रमाणे अँड्रॉईड फोनवर देखील उपलब्ध आहे. गुगल डॉक पेक्षा काकणभर चांगली संगणक-प्रणाली आहे. अवश्य वापरून पहावी, धन्यवाद!
www.speechtyping.com

धन्यवाद डॉ., माहितीबद्दल. ही सोय गुगल पेक्षा छान व गतिमान वाटली .
अर्थात विरामचिन्हे नाहीतच आणि तिथल्या तिथे संपादन करता येत नाही.
डॉक्सला तो फायदा आहे.

मोबाईलवर ते snapchat मध्ये जाते का ?

>>>>आणि तिथल्या तिथे संपादन करता येत नाही.>>>
डॉक्टर,
त्या बॉक्स च्या खाली संपादन करायची एक सोय आहे. तिच्यावर क्लिक केले की वेगळी बॉक्स उघडते.
डॉक्स पेक्षा इथला फॉन्ट पण चांगला आहे.

Pages