नो अपत्य

Submitted by अज्ञातवासी on 16 April, 2020 - 12:17

हा धागा विडंबन वगैरे म्हणून काढलेला नाही, तर खरंच मनातले विचार मांडावेत म्हणून काढलाय.
जेव्हा जेव्हा कुणी म्हणत ना, की आज मुलाची फी भरायचीय, आज त्याची स्कुल ट्रिप, आज सुट्टी टाकून स्कुलमध्ये जायचंय, तेव्हा तेव्हा मी विचार करतो, खरंच मूल असणं गरज आहे, की पूर्वापार आलेली परंपरा म्हणून पाळायची म्हणून पाळायची?
सध्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीचं पालकत्व बघतोय. रात्री अपरात्री लहान मुलगी उठली, की रात्रभर त्याचा डोळा लागत नाही. सारखी रडत असते. सकाळी त्याचे तारवटलेले डोळे बघून वाईट वाटत. त्याच्या बायकोच म्हणणं तर असं की खूप कमी वयात तिच्यावर हे पालकत्व लादलं गेलंय.
त्यानंतर एका काकांची कथा. मुलगा काहीही कामधंदा करत नाही. अट्टल दारुबाज आणि भामटेगिरीत मुरलेला. हा नसता तर बरं झालं असत, असं नेहमी ऐकू येतं.
याउलट माझी पुतणी, अशी धमाल करते ना, वेळ कसा जातो ते कळत नाही. मी चांगला मुलगा बनू शकेल की नाही माहिती नाही, पण माझे बाबा आणि काका यांनी नक्कीच चांगल्या मुलांची जबाबदारी निभावली.
लहानपणी त्याचं शाळेत एडमिशनचं टेन्शन, नंतर कॉलेजचं, नंतर जॉबच, मग लग्नाचं, मग सून जावई कशी असेल याचं. म्हणजे पालकत्व फक्त एक जबाबदारीच बनून राहते का?
असो, आम्ही दोघे भावंडे. लहानपणापासून एकत्र कुटुंबाची सवय होती, बरीच लहान बाळे असायची जवळ, पण कधी लळा लागला नाही.
मोठेपणी हळूहळू लोकसंख्या विस्फोट वगैरे गोष्टी समजत गेल्या, आणि कॉलेजही असं मिळालं, की येता जाता एक अनाथाश्रम दिसायचा. एकीकडे आमची पुढची पिढी यावी याचा अट्टाहास असणारे पालक, आणि दुसरीकडे त्याच पिढीला नसणारे पालक.
हळूहळू वैचारिक बैठक पक्की होत गेली, की आपल्याला मूल नकोच. कारण आपण ही जबाबदारी नाही सांभाळू शकत.
पण जर समजा कधी वाटलं, स्वतःच मूल असायला हवं तर?
तर सरळ अपत्याचे जे लाड पुरवायचे असतील, ते जर पैशात मोजता येत असतील तर तेवढी देणगी आश्रमाला देऊन टाकायची.
अजून लग्न व्हायचंय, करेन की नाही माहीत नाही. पण लग्न करताना एकच अट असेन. मला मूल नकोय.
आणि हो, फायनान्शियली प्लॅनिंग करतोय, एका अपत्यासाठी. मी दत्तक वगैरे घेणार नाही, पण एका अपत्याचा संपूर्ण खर्च उचलेन. राहणीपासून शिक्षणापर्यंत. शेवटी तेही माझंच अपत्य होईल, नाही का? भलेही माझं नाव लागणार नाही, आणि इच्छाही नाही, पण कमीत कमी एका अभागी जीवाचं आयुष्य मार्गी लागल्याचं समाधान तर मिळेन.

असो, ईथे कुणी असा निर्णय घेतला असेल तर प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

आणि हो, आता मी पुतणीबरोबरच खेळतोय हे टाइप करताना. कारण तिचे डायपर मला चेंज करावे लागत नाही. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>आणि हो, फायनान्शियली प्लॅनिंग करतोय, एका अपत्यासाठी. मी दत्तक वगैरे घेणार नाही, पण एका अपत्याचा संपूर्ण खर्च उचलेन. राहणीपासून शिक्षणापर्यंत. शेवटी तेही माझंच अपत्य होईल, नाही का? भलेही माझं नाव लागणार नाही, आणि इच्छाही नाही, पण कमीत कमी एका अभागी जीवाचं आयुष्य मार्गी लागल्याचं समाधान तर मिळेन.>>>>

अतिशय उत्तम , उदात्त विचार आहे हा. माझे तर स्वप्न होते एक मूल आपले व एक दत्तक. परंतु नंतर नंतर जाणवले, अरेच्या आपण त्या उदात्ततेच्या प्रेमात आहोत. आपला इगो सुखावणार आहे की आपण काही भारी करतोय. जर ते मूल स्किझोफ्रेनिक निघाले, किंवा त्याला फॉल्स मेमरीज चा आजार होउन, त्याने आपल्यावर अ‍ॅब्युझ ची केस ठोकली तर, आपल्याला हँडल करता येणारे का? आता अशी उदाहरणे कॉमन नाहीत परंतु एखादे तुरळक ऐकीव आहे. शेवटी व्यामिश्र रासायनिक गुंतागुंत असणारा जीव आहे तो. आपण त्याच्या गुणावगुणांची संपूर्ण जबाबदारी उचलू शकतो का? तेवढी मनाची तयारी/हिंमत आहे का आपली?

हे विचार अनेकांना अतिशय नकारात्मक वाटू शकतील त्याबद्दल क्षमस्व.
____________________
हां मूल नकोच आहे तर किती तरी छंद - पर्यटन, पुस्तके, बागकाम जोपासू शकाल. खूप वेळ , उर्जा, पैसा वाचेल. ही सकारात्मक बाजू आहेच. तेव्हा निर्णय कोणताही असो आपण तो निभाउ शकलो तर फारच छान.

कारण तिचे डायपर मला चेंज करावे लागत नाही. Happy
>>>>

मला मजा येते माझ्या पोरांचे डायपर चेंज करायला.
किंबहुना मी घरी असताना हे काम माझेच असते. कारण ते काम वाटतच नाही.. बाथरूममध्ये न्यायचे आणि मस्त पाण्यत खेळून यायचे Happy

अवांतर - मी आधी धाग्याचे नाव नऊ (९) अपत्य असे वाचले Happy

हा धागा विडंबन वगैरे म्हणून काढलेला नाही, तर खरंच मनातले विचार मांडावेत म्हणून काढलाय > >>> हे जर खरं असेल तर मीही त्याच बोटीत आहे. अर्थात मुल होऊ देणं न देणं हा निर्णय होणाऱ्या जोडीदारावर निम्मा अवलंबून असेल. सध्या समोर ओळखीतील एक उदाहरण आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी ह्यांचसुद्धा एक उदाहरण आहे. बऱ्याचदा लहान मुलांचा आपल्याला लळा नाही म्हणूनही अपराध्यासारख वाटतं. ही लिंक वाचा, तसेच काहीसे माझे विचार आहेत. माबोवर कुणीतरी तसा निर्णय घेतलेले नक्कीच असणार पण ते बहुतेक लिहिणार नाहीत यावर काही for obvious reasons.
https://www.mid-day.com/articles/no-kid-on-the-block/22648291

अज्ञा, भावना पोचल्या. पुर्ण विचारांती निर्णय घे.

लग्न करायचे ठरवल्यास समान विचाराची सहाचारिणी शोधणे आणि मिळणे थोडे अवघड आहे. दोघांचाही पुढील आयुष्यात विचार ठाम रहाणे आवश्यक आहे. तू नाही म्हणणे आणि तीची इच्छा जागृत होणे हे नात्याला घातक ठरेल.

विचारांवर ठाम राहिल्यास, आयुष्याच्या एका थांब्यावर तू एकटा/ दुकटा असताना, पश्र्चाताप झाल्यास दात आहेत पण चणे नाहीत अशी वेळ येऊ शकते.

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. शुभेच्छा.

आता ठरला आहे, परंतु लग्न झाल्यावर काही कालावधी नंतर विचार बदलू शकतात. तुमच्या जोडीदाराचे हि असेच विचार हवेत. तरीही शक्यता राहतेच लग्नानंतर गोष्टी बदलतात.
जे ठरल आहे ते चांगलंच आहे. All the best

आपण संगीत का ऐकतो? आपण फिरायला का जातो? आपण चित्रपट का पाहतो? आपण वाचन का करतो?
आपल्या आनंदासाठी.
अपत्याचे पण तसेच आहे. तो जो आनंद असतो तो शब्दात वर्णन अशक्य आहे. त्या छोट्याश्या जीवाशी दिवसभर खेळणे. त्याला जेवण भरवणे. त्याचे कपडे बदलणे. त्याचे डायपर चेंज करणे.थकून तुमच्या कुशीत त्याचे झोपणे. रात्री भीती वाटली कि आई किंवा बाबा म्हणून तुम्हाला बिलगणे ... यातला आनंद खरंच समजावणे अशक्य आहे. तो अनुभवावाच लागतो .

यातला आनंद खरंच समजावणे अशक्य आहे. तो अनुभवावाच लागतो .
>>>

+७८६

लग्न वा अपत्य दोन्ही नको असण्यास काही हरकत नाही. सहसा मनुष्याला याची निसर्गत:च ओढ असते. त्यामुळे आपल्यातील ती ओढ तात्पुरती लपली तर नाही ना हे आत्नपरीक्षण आधी करणे फार गरजेचे अन्यथा पाफा म्हणतात तसे नंतर निर्णय चुकला असे वाटेल पण वेळ निघून गेली असेल.
काही लोकांच्या आयुष्यात एखादे पॅशन ईतके भिनले असते की तेच त्यांच्या जगण्याचे साधन असते आणि त्यात त्यांना अडथळा ठरू पाहणारे कुटुंब नको असते. तसे काही पॅशन आपल्यात आहे का आणि ते आयुष्यभर पुरणारे आहे का हे सुद्धा हा निर्णय घेताना चेक करावे.

दुसरया एका अनाथ गरजू मुलाचा आर्थिक भार ऊचलणे स्तुत्य पण तो वेगळा विषय झाला. निर्णय घेताना दोन्ही एकात मिसळू नका.

@सामो - हे विचार अनेकांना अतिशय नकारात्मक वाटू शकतील त्याबद्दल क्षमस्व.
>>>
आहेतच Lol मात्र त्यासाठी क्षमस्व असण्याची गरज नाही, कारण १०० मधील जरी ही एक केस निघाली, आणि ते आपल्याबाबतीत घडलं तर उदात्तता गेली उडत, आपणच बाराच्या भावात जाऊ.
पण माझं calculation थोडं वेगळं आहे. मी एका अपत्याचा खर्च उचलतोय याचा अर्थ त्याला ते माहितीच असायला हवं असं नाही ना? मी फक्त एक राहणीमान आणि शिक्षणाचा खर्च कुणालातरी देतोय. दरवेळी तो एकाच पाल्याला जाईल असंही नाही. त्यामुळे ही शक्यताच निकालात निघते.
दुसरी गोष्ट, सगळ्यानी असा विचार केला ना, तर भारतातले निम्मे अनाथश्रम बंद करावे लागतील. कारण फक्त उदात्त हेतूने कार्य सुरू करून भागत नाही, त्यासाठी पैसा लागतो.
त्रंबकेश्वरजवळ एक अशाच अनाथाश्रमाविषयी ऐकून आहे, तिथे जवळजवळ साठ मुले आहेत. त्यांच्यासाठी जवळजवळ ७० ते ८० वर्गणीदार आहेत. त्यांना कुणालाही माहिती नाही, की नेमकं ते कुणासाठी पैसे देतायत. पण कुणा 'एका अपत्यासाठी' ही भावनाच त्यामागे असते. आणि असंही नाही की तो पैसा फक्त त्याच मुलासाठी ठरवून दिलेला आहे.
आणि मी मूल दत्तक घेणार नाहीये.
येस, मला भरपूर छंद आहेत अशातला भाग नाही, पण ते जोपासण्यासाठी वेळ मात्र आहे. समाजसेवा हा त्यातलाच एक. त्यामुळे मी छंदच जोपासतोय.
आणि असे निर्णय तावतावात नाही, तर खूप वर्षाच्या जडणघडणीनंतर आणि विचारांती निभावण्यासाठीच घेतले जातात.

माझ्या मित्राचे लग्न माझ्या अगोदर झाले होते त्याला पहिली मुलगी झाली होती मी त्याच्या घरी गेलो होतो.
त्याची मुलगी खूप रडत होती मी विचारले एवढी रडते आहे तुला त्रास होत नाही का?
त्यांनी जे उत्तर दिले त्याची सत्यता मला माझा पहिला मुलगा झाल्यावर झाली.
" तुला मुल झाल्यावर तुला कळेल मुलाच्या रडण्याचा बापाला त्रास होत नाही"
हे त्याचे वाक्य होते.
भले माणसाच्या आर्थिक,स्थिती नुसार वर्गीकरण होत असेल पण सर्व माणसाच्या भावनिक गरजा पूर्ण जगात एक सारख्याच असतात.
तिथे कोणताच भेद नसतो.
कुटुंब ही भावनिक गरज भागवते त्या मुल,बायको,आईवडील ह्या व्यक्ती समाविष्ट असतात.
गरीब असू नाही तर श्रीमंत माणूस जेव्हा आजारी पडतो,आर्थिक संकटात सापडतो,अपघात मध्ये सापडतो ,तेव्हा त्याला जवळच्या माणसाचा भावनिक आधार हवा हवा सा वाटतो आणि त्याच्या जोरावर च तो संकटातून बाहेर पडतो.
पश्चिमात्य देशात ही व्यवस्था कमजोर झाली आहे तिथे डिप्रेशन मध्ये जाणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण नक्कीच जास्त असणार .
आपल्या देशात सुद्धा एक्कल कोंड्या व्यक्ती आर्थिक बाबतीत समृध्द असून सुद्धा आत्न हत्तेचा मार्ग निवडताना दिसतात.
त्या साठी मुल,हे कुटुंब हे असावेच .
किती ही वलगंना केल्या तरी एकटा माणूस जीवनाचा आनंद घेवू शकणार नाही.
त्या साठी हक्काची माणसं हवीत.
जिथे व्यवहारिक नाते नसावे तर भावनिक निस्वार्थी नात असावे आणि असे नात फक्त कुटुंब पद्धती मध्येच निर्माण होते.
आजारांनी किंवा अपघाताने जेव्हा माणूस पंगू बनतो दुसऱ्या च्या मदती शिवाय हलू पण शकत नाही तेव्हा व्यवहारिक नात असलेली प्रेमाची परकी माणसं फिरकणार पण नाहीत पण जवळची कुटुंबात असणारे तुमची काळजी घेतील.
जेव्हा माणूस निराश होतो ,हतबल होतो तेव्हा व्यवहारिक नात तिथे तुमच्या हतबलता चा फायदा घेण्याचे आडखे आखेल आणि भावनिक नातं तुम्हाला त्या मधून बाहेर पडण्यास मदत करेल.
कुटुंब पद्धती ही उत्तम अशी व्यवस्था आहे त्या मध्ये मुल होण्याला खूप महत्त्व आहे.
पश्चिमात्य संस्कृतीचे आपल्याकडे गोडवे गाणारे कमी नाहीत पण कुटुंब व्यवस्था उध्वस्त झाल्यामुळे पश्चिमात्य देश काय भोगत आहेत त्याचे वर्णन ते कधीच करणार नाहीत..
डिप्रेशन मध्ये जावून किती तरी लोकांना विनाकारण जिवानिशी मारणे .विनाकारण
लहान मुलावर गोळीबार करणे
मॉल मध्ये गोळीबार करणे अशा घटना तिकडे नेहमीच घडतात आणि जे हे कृत्य करतात ते दहशत वादी नाहीत तर डिप्रेशन चे बळी आहेत.
ज्या देशात कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे त्या देशात अशा घटना होण्याचे प्रमाण नगण्य आहे.
मुल लहान वयात व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण सुद्धा पश्चिमात्य देशात खूप आहे.
कुटुंब व्यवस्था नष्ट झाल्याचे अनेक दुष्परिणाम तिथे बघायला मिळतील.

@रुन्मेषजी - तुम्ही एकाच आयडीने प्रतिसाद दिलेत तर बरं होईल.
१. तुम्हाला काहीही आवडू शकत, माझा नाईलाज आहे.
२.तुम्ही अनुभवता आहात, आनंद आहे
३. पॅशन वगैरे आणून मुद्दा भरकटवला आहे, हे समजलं आहे. काळजी नसावी. बाकी काही पॉईंट्स मी पाफा यांना प्रतिसाद देईन तेव्हा येतीलच.
४. तिसऱ्या अपत्यासाठी शुभेच्छा
दोन्ही मुद्दे सरमिसळ होतीलच, कारण शेवटी तो माझ्या विचारांचा परिपाक आहे. वर सामो याना दिलेल्या प्रतिसादात याचे उत्तर मिळेल.
आता यावर जितं मया अशी हाकाटी पिटायची असेल, तरीही माझी हरकत नाही.

@रुन्मेषजी - तुम्ही एकाच आयडीने प्रतिसाद दिलेत तर बरं होईल.
>>>

दुसरा आय्डी कुठला आहे माझा वरीलपैकी आपल्यामते?

@पाफा - परफेक्ट प्रतिसाद. यातील सर्व पॉईंट्स मान्य आहेत. खूप खूप धन्यवाद.
(बादवे पाफा हा माणूस लाफिंग बुद्धा असेल काय? याची मला बऱ्याचदा शंका येते. नाहीतर कमीत कमी झेन गुरुजी तरी. Happy

आपली भूमिका नकारात्मक वाटते. दोन उदाहरणे जेथे मुले चांगली निघाली नाहीत ती दिली आहेत. आपण स्वतः आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घेत असलात तर आपण चांगले सुपुत्र आहातच.

मग मुले वाईट निघतील हा विचार म्हणजे अगदी मूलभूत स्थितीत पलायनवादी आहे.

आंबे खराब निघतील म्हणून ते विकतच न घेणे अशा तर्हेचा.
आपल्याला लग्न करायचे नाही असे ठामपणे म्हणणार माझा मित्र आहे. मला दुसऱ्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर ऍडजस्ट करणे शक्य होणार नाही असे त्याचे स्पष्ट मत होते. तो आपल्या जागी बरोबरच होता.

तसेच आपल्याला मूल नको असेल तर आपण आपल्या जागी बरोबरच आहात. पण त्याच्या समर्थनार्थ नकारात्मक भूमिका घेण्याची गरज नाही.

जगात 100% माणसांना मूल हवंच असतं किंवा 100% माणसांना लग्न करायचंच असतं हे असत्य आहे.
4-6 % माणसं लग्न करायचं नाही किंवा मूल नको अशा विचारांची असतील आणि ती आपल्या जागी बरोबरच असतात.
बऱ्याच वेळेस लग्न जमत नसेल तर मला लग्नच करायचं नाही असे म्हणणारी माणसे किंवा मूल होत नाही म्हणून मूल नकोच म्हणणारी माणसे भरपूर दिसतात.
परंतु त्यांची विचारसरणी हवे ते न मिळाल्यामुळे नकारात्मक झालेली आढळते. आपली विचारांची बैठक पक्की करा. नकारात्मकतेतून निर्णय घेऊ नका अन्यथा आपला जीवनाकडे पाहण्याचा निर्णय नकारात्मक होऊ शकतो.
आपल्या माध्यवयात किंवा उतारवयात हा निर्णय आपल्याला कदाचित बदलता येणार नाही. यास्तव असा निर्णय तरुणपणात घेताना व्यवस्थित साधकबाधक विचार करूनच घ्यावा असे मी म्हणतो.

आपल्याला शुभेच्छा

अपत्य नको या अटीवर कोणी लग्न केले आणि दोघांपैकी एकाचा विचार पुढे जाऊन फिरला तर आणखी कॉम्प्लिकेशन वाढू शकतात...

@सुबोधजी, तुमच्या म्हणण्यानुसार एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे धागा निगेटिव्ह वाटत होता. त्यानुसार बदल केला आहे.
बाकी प्रतिसाद नंतर देतो. शुभरात्री!

अजून एक महत्त्वाची गोष्ट.

आज आपल्याला मूल नको असं विचार आहे. उद्या तो बदलू शकतो. विचार बदलला तरी स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वप्नात दिलेले वचन पाळण्यासाठी तुम्ही काही हरिश्चंद्र नाही.

कित्येक पुरुष लग्नाचे वेळेला मूल हवे अशा विचाराचे असतात असे नाही तर बरयाच जणांनी लग्नाचे वेळेस मुलाचा विचारच केलेला नसतो.
लग्नानंतर काही काळाने ते तसा विचार करू लागतात.
आपल्या विचारांशी प्रामाणिक रहा. मग ते बदलले तरी चालेल.
लोक काय म्हणतील म्हणून आपल्या विचारांशी प्रतारणा केल्यामुळे कित्येक लोक आयुष्यात दुःखी होताना दिसतात.

अपत्य नको हे विचार होणाऱ्या जोडीदाराशी आणि स्वतःच्या आणि त्याच्या(सॉरी तिच्या) पालकांशी अगदी स्पष्ट बोलावे.आणि 'हे विचार आताचे क्षणिक नाहीत, यावर नीट विचार करून हा निर्णय आहे, पूर्ण तयारी असेल तरच नात्यात पुढे जाऊ' असे स्पष्ट करून.
हा विषय खूप सेन्सेटिव्ह आहे.नातेवाईक प्रेशर भरपूर येते.शिवाय बायकांना जास्त त्रास होतो(हल्लीच्या काळात अगदी डिस्करीमिनेशन होत नसले तरी कोणत्याही बाबीत जज केले जातेच.)
जोडप्याचा निर्णय आहे. पण परदेशात हा घेणे आणि भारतात घेणे यात बराच फरक आहे.

समाजातील दोनच प्रकारच्या व्यक्ती विचारावर ठाम असतात.
एक अती सज्जन संत महात्मे आणि अती दुर्जन गुंड मवाली.
आणि अशा दोन्ही टोकाच्या प्रवृत्ती असणारी लोक अगदी मोजकीच असतात.
समाजातील बाकी व्यक्ती विचारावर कधीच ठाम नसतात परिस्थिती नुसार त्यांचे विचार सतत बदलत असतात.

@पाफा - परफेक्ट प्रतिसाद. यातील सर्व पॉईंट्स मान्य आहेत. खूप खूप धन्यवाद.
(बादवे पाफा हा माणूस लाफिंग बुद्धा असेल काय? याची मला बऱ्याचदा शंका येते. नाहीतर कमीत कमी झेन गुरुजी तरी. 

नवीन Submitted by अज्ञातवासी on 16 April, 2020 - 23:29
>>>>
धन्यवाद, पण माझे शरीर मातीचे आहे. आणि मी जमेल तेवढा खड्डा खणून पाय खड्यात ठेवायचा प्रयत्न करतो.

@सुबोधजी खरे - आपण स्वतः आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घेत असलात तर आपण चांगले सुपुत्र आहातच.
>>>>
धन्यवाद! I am really trying...

पण त्याच्या समर्थनार्थ नकारात्मक भूमिका घेण्याची गरज नाही.
>>>
मी फक्त माझ्या मनातले विचार मांडतोय. कुठल्याही विचाराचं समर्थन अथवा विरोध करत नाहीये, किंवा कुणावर मत लादण्याचा प्रयत्नही करत नाही.

बऱ्याच वेळेस लग्न जमत नसेल तर मला लग्नच करायचं नाही असे म्हणणारी माणसे किंवा मूल होत नाही म्हणून मूल नकोच म्हणणारी माणसे भरपूर दिसतात.
परंतु त्यांची विचारसरणी हवे ते न मिळाल्यामुळे नकारात्मक झालेली आढळते. आपली विचारांची बैठक पक्की करा. नकारात्मकतेतून निर्णय घेऊ नका अन्यथा आपला जीवनाकडे पाहण्याचा निर्णय नकारात्मक होऊ शकतो.
>>>>
१. लग्न जमत नाही म्हणून नाही करायचं म्हणतात - अजूनपर्यंत तरी मी लग्नविषयी सिरीयस नाही, पण लग्न जमण्यापेक्षा करण्यात जास्त अडचणी येतील असं मला वाटत नाही, जेव्हा मी लग्नाचा विचार करेन.

२. किंवा मूल होत नाही म्हणून मूल नकोच म्हणणारी माणसे भरपूर दिसतात.
>>>
लग्न झालेलं नसल्याने हा प्रश्न गैरलागू आहे.

त्यामुळे नकारात्मकतेतून हा निर्णय आलेला नाही. क्षमस्व!
जर कधी मन केलंच आणि सगळे फॅक्टर दुसऱ्या बाजूने असले, तर निर्णय बदलण्याची शक्यता असतेच. पण तोही बदलताना खूप विचार करून बदलेन.
सध्यातरी माझ्या निर्णयावर ठाम आहे.

जोडीदार समान विचारांचा मिळणे महत्त्वाचे आहे. आणि पुढे मागे वेळेत निर्णय बदलला तरी हरकत नाही. त्यावेळी सुद्धा दोघांचंही मत एकच असावं. मला पूर्ण पटला हा निर्णय. आणि हजारात एखाद्या व्यक्तीने असा निर्णय घेतला तर लगेच काही कुटुंब व्यवस्था ढासळणार नाही. ज्यांना पाहिजे असून होत नाही त्याचं दुःख मोठे असते. मुळात तुम्हालाच नको आहे. मी तर म्हणेन जर पाहिजे तेव्हा हजार वेळा विचार करा. कारण जेव्हा कोणतीही व्यक्ती पालक होते तेव्हा तिचं स्वतःच अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकते. भले त्यात कितीही आनंद असेल वा स्वतःची इच्छा असेल. मग तुम्ही कितीही me time काढा. त्यामुळे जर पालक व्हायचे असेल तर संपूर्ण समर्पणाची तयारी हवी. जे जे इथे पालक आहेत त्यांनी मुल होण्याआधीच आयुष्य आणि नंतरच आयुष्य याची तुलना करावी. नंतरच्या आयुष्यातले सर्व निर्णय मुलांभोवती गोल गोल फिरत राहतात. जर तुम्ही या निर्णयावर ठाम राहिलात आणि जबाबदारी नसल्यामुळे मिळालेल्या वेळेचा आणि स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केलात तर गरुडभराऱ्या माराल यात शंका नाही.

मला स्वतःला मुलगा आहे. त्याच्यामुळे आयुष्यात अगणित आनंदाचे क्षण आले. जेव्हा जेव्हा कधी नैराश्य आले त्याच्यामुळे पुन्हा जगण्याची उमेद आली. घरातले वातावरण त्याच्यामुळे नेहमी आनंदी असते. मला वाटते लहान मुलांचा घराला बांधून ठेवण्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. तुमची पुतणी व्हायच्या आधीचं आणि नंतरच वातावरण याची तुलना करा.

थोडक्यात काय, कुछ पाने के कुछ खोना पडता है.. Happy

धाग्यावरची बरीच चर्चा वाचून काही प्रतिक्रिया लिहावी का नाही असे वाटतं होते. कारण माझा अनुभव वेगळा आहे.
हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यामुळे अर्थातच त्याच्या मागे इतर बाजू, मते, अनुभव, जडणघडण हे सगळं आहेच.
त्यामुळे कोणीही जो निर्णय मनापासून आणि विचारपूर्वक घेतला आहे, तो निभावला आहे तो त्या त्या व्यक्तीसाठी योग्यच. मग तो निर्णय नो अपत्य, नो लग्न, एक मुलं किंवा दत्तक मुलं असं काहीही असो Happy
मला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझा मुलगा हा biological child आहे आणि माझी मुलगी, ६ महिन्याची असताना दत्तक घेतलेली आहे. दोन्ही वेळेस आई होण्याचा इतका आनंद मिळाला आहे की त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. दत्तक घेणे यावर अनेकदा अनेक प्रश्न येतात, पण माझ्यामते स्वतःच मुलं वाढवताना तरी कमी प्रश्न असतात का? कुठलीही गोष्ट करताना मिळणारा आनंद, समाधान महत्वाचं.

आमचे लग्न झाले तेव्हा नवरा मूल नको या विचाराचा होता..मलाही तेच आवडले..आणि आम्ही ९ वर्षे ठाम राहिलो..मी होतेच पण नवर्याचे विचार बदलले..प्रेमापोटी मी तयार झाले..आता मुलगा २ वर्षान्चा आहे..if i have to reflect back on the decision..at back of mind I will always feel that he couldn't stay firm on what we decided. आणि मूल हवेच होते तर लवकर करायला हवे होते..पण मग मला जन्म दिल्याचा पश्चात्ताप होतो का? नक्कीच नाही.. You will be surprised to know your own caliber once you become parents. कधी मुलगा नसता तर किती केअरफ्री आयुष्य असते असेही वाटते पण जेव्हा तुमचा अन्श समोर दिसतो आणि जे प्रेम दाटून येते त्याची तुलना अशक्य असते..आणि पेरेन्ट्स आहोत म्हणून बाकी जगणे सोडून देतो का, नाही..you can still achieve what you want just that timeline changes.

दुसर्या धाग्यामधे आलेला मुद्दा पटतो- जिथे मुले साम्भाळू शकत नाहीत तिथे भरपूर आणि सुशिक्शित लोकसन्ख्या कमी हा विरोधाभास आहे. आपल्याला सुजाण नागरिक बनवण्याची जास्त सन्धी आहे.
पण जो काही निर्णय असेल तो मनापासून असावा आणि ठाम रहावे..

विचारांवर ठाम राहिल्यास, आयुष्याच्या एका थांब्यावर तू एकटा/ दुकटा असताना, पश्र्चाताप झाल्यास दात आहेत पण चणे नाहीत अशी वेळ येऊ शकते. -> हे अगदी सत्य!

(सॉरी अर्धे मराठी आणि अर्धे इन्ग्लिश मधे लिहिलेय)

जेव्हा तुमचा अन्श समोर दिसतो आणि जे प्रेम दाटून येते त्याची तुलना अशक्य असते..आणि पेरेन्ट्स आहोत म्हणून बाकी जगणे सोडून देतो का, नाही..
>>>>>>>>>

+७८६
मला लहानपणापासूनच लहान मुलांची आवड होती. एकुलता एक आणि आईवडील जॉबला असल्याने घरात एकटाच. तर सर्व वयोगटातल्या मुलांना घरात जमवून बसायचो. फक्त मला सू शी करणारे रांगणारे बोलू न शकणारे दिड वर्षांपर्यंतचे मूल कसे सांभाळायचे किंबहुना त्यांच्यासोबत कसे खेळायचे हे समजायचे नाही. लग्नानंतर मी बायकोला किंबहुना लग्नाआधीच मी गर्लफ्रेंडला म्हणालेलो की मुलांचे पहिले दिड वर्ष तू बघ. त्यानंतर सारे माझ्यावर सोड... जेव्हा मूलगी झाली तेव्हा मी तिला काही दिवस हातात घ्यायलाही कचरत होतो. हातातून पडले तर हि भिती वाटत होती. आजीआजोबा मावश्या सगळ्यांचे तिला हातात घेऊन झाले पण मी घाबरतच होतो. अखेर बायकोने मला दम दिला. म्हणाली घे तिला. बाप आहेस तू तिचा.. तिला काही अपाय होऊ देणार नाहीस.. एका आईचा हा विश्वास, त्याने मलाही बळ आले. आणि तिचे शब्द खरेच होते. माझी भिती किती व्यर्थ होती आणि मी किती मोठ्या आनंदापासून वंचित राहणार होतो.. पुढे मग यथावकाश मला नवजात वा वर्षदिडवर्षापर्यंतचे मूल सांभाळता येत नाही हे सुद्धा माझे मीच फोल ठरवले.. दुसरा मुलगा झाल्यावर आता पुन्हा तो सुरुवातीचा काळ अनुभवायला मिळणार याचा मला कोण आनंद झाला. आपले मूल आपला अंश आणि त्याबद्दल आपल्या मनात उफाळून येणारे वात्सल्य ही खरेच एक उपजत नैसर्गिक भावना असते. जगात यापेक्षा सुंदर काही नाही. असूच शकत नाही ! Happy

>>>त्याबद्दल आपल्या मनात उफाळून येणारे वात्सल्य ही खरेच एक उपजत नैसर्गिक भावना असते. जगात यापेक्षा सुंदर काही नाही. असूच शकत नाही ! Happy>>> करेक्ट. आनि गंमत म्हणजे विचारपूर्वक वगैरे काहीही करावे लागत नाही. मला तर मूल होण्यापूर्वी भीतीच वाटायची की आपल्याला आपल्या बाळाबद्दल प्रेमच वाटलं नाही तर? पण सुदैवाने तसे काही झाले नाहीच उलट प्रेमातच पडले.

Pages