जेव्हा मूर्ख ट्रेकिंगला जातात ! - १

Submitted by शक्तिमान on 16 April, 2020 - 12:01

पहिलेच लेखन ! काही चुकलंच तर लहान बाळ समजून माफ करा ...

मला प्रवासाचा भयंकर नाद. पण फक्त नादच ,कधी प्रत्येक्ष कृती करण्याचा योगच नाही आला.
त्यात सबमिशन ,extra lectures मुळे अजूनच वैताग. पण अंगातला किडा काय मला शांत बसू देत नव्हता.
सेमिस्टर एन्ड होता.एकदा कि पेपर झाले कि कुठेतरी भटकून यायचेच असं मनाशी पक्के करून मी अभ्यासाच्या तय्यारीला लागलो.
इंजिनीरिंग विश्वात प्रवेश केल्या पासून कधीच अभ्यासाशी संबंध आला नव्हता. त्यात मी अभ्यास करायला लागल्यामुळे आईलाही संशय आला की आपल्या पोराच्या डोक्यात काहीतरी शिजतंय . पण तिने लक्ष नाही दिले. मरुस्तर अभ्यास केल्यावर आणि पेपर दिल्यानंतर सगळे विषय निघतील याची खात्री पटल्यावर आता कृती करण्याची वेळ होती.
गुगलबाबा वर खूप सर्च केल्यावर कळसूबाईला जाण्याचे पक्के केले. आता पहिलं काम "आईचा होकार मिळवणे ". तिला विचारल्यावर आधीतर ती नाहीच बोलली. पण नंतर आपलं एकुलतं एक पोरगं इतकं गयावया करतंय म्हणल्यावर तिनेही मला परवानगी दिली.
आतातर आईपण हो बोलली होती.
जायचं कोणासोबत हा प्रश्नच नव्हता. Midnight solo trek करू असं मनाशी मी पक्के केले. पण जशीजशी ट्रेकिंग ची तारीख जवळ यायला लागली तशीतशी माझी फाटायला लागली. शेवटी ego बाजूला ठेवून "कोणालातरी सोबत नेऊ ,तेवढंच बोर नाही होणार ",असं स्वतःला खोटं सांगून,न्यायचं कोणाला ह्यावर मी गंभीर विचार करायला लागलो. जास्त मित्र नसण्याचा हा खूप मोठा तोटा असतो. नेमकी वेळेस कोणी सापडत नाही.
तेव्हा मला आठवण झाली "हितेशची". हा हितेश मूळचा जम्मूचा,इथे हॉस्टेल वर होता. दिसायला शांत पण कॉलेजचे सगळे मोठे कांड करण्यात हा मला मदत करायचा. हा पोऱ्या तीनवेळा detain झालेला आणि मी स्वतः " अखिल भारतीय सतत detain असणारे स्टुडंट्स" चा सलग २ सेमिस्टर अध्यक्ष होतो. HOD ऑफिसमध्ये ह्याची आणि माझी भेट झालेली. दोघांमध्ये समान गुण असल्यामुळे मला हा खूप जवळचा वाटायचा. ह्याला बरोबर घेऊ असं ठरवून मी त्याला दूरध्वनी केला. काहीही आढावेढा न घेता तो यायला तय्यार झाला. पण त्याने "और किसीको साथ मे ले ,मज्जा आजाएगा" असं तारक मेहतांच्या दयाभाभी सारखं बोलल्यावर आम्ही तिसऱ्याचा शोध घेऊ लागलो. आता नेमकी घ्यायचे कोणाला ह्यावर आमची अशी चर्चा सुरु झाली जसं कि आम्ही एखाद्या raw agent ला कराची मध्ये deploy करणार आहोत. तेव्हा आमच्या ध्यानात एक नाव आले.
भाऊसाहेब तनपुरे उर्फ भाऊश्या...
भाऊश्या हे एक वेगळंच प्रकरण होतं. स्वतःचं नाव भाऊसाहेब आणि बापाचं नाव अजय असल्यामुळे पोरं भाऊश्याची उडवायचे.
भाऊश्या आतून जितका मुक्या माजाचा होता तितकाच तो वरूनही दिसायचा. भाऊश्याला मित्र खूप होते. आणि त्याचे academics रेकॉर्ड पण चांगले होते. Coding मध्ये जबरदस्त असलेला भाऊश्या एका पोरीच्या नादापायी येडा होता. नुकतंच झालेला प्रेमभंगामुळे त्याचीही हवापालट होईल ह्या अनुषंगाने आम्ही त्याला दूरध्वनी केला.
त्याला कॉन्फरेन्स कॉल वर घेऊन आम्ही त्याला आमचा प्लॅन सांगितला आणि तोपण तय्यार झाला. पण आम्हाला माहित नव्हते कि हे बेणं काय कुरापत करणार आहे.
आमचा दूरध्वनी झाल्यावर भाऊश्याने १०-१२ पोरांना आमचा प्लॅन सांगितला. आणि कळसूबाईच्या ऐवजी हरिश्चंद्रगडावर जाण्याचा प्लॅन ह्या बहाद्दराने स्वतःच ठरवला. नंतर त्याने आम्हाला दूरध्वनी करून "मी आपला प्लॅन बदलला असून आपण हरिश्चंद्रगडावर जाणार आहोत आणि अजून १०-१२ पोरं येणार आहेत", असं काहीच लाज नसल्यासारखे सांगितले.
जेठालाल सारखं "a nonsense ", ओरडून झाल्यावर आम्ही त्याची इच्छा सन्मानपूर्वक फेटाळली.
हितेशलाही कळून चुकले कि आपण ऊगाच त्याच्या नादी लागलो आणि आमचे ठरले कि आता आपण दोघेच कळसूबाईला जाऊ .
कधीही ट्रेकिंग चा अनुभव नसलेले आम्ही गूगलबाबा वरून ट्रेकला कायकाय न्यायचे त्याची लिस्ट गोळा केली आणि बॅकपॅक मध्ये सगळे सामान रात्रीच भरून उद्या कायकाय करायचे ह्याचे स्वप्न रंगवत निद्रावस्थेत गेलो.
पहाटे मला भाऊश्याचा मेसेज आला कि "अरे अभ्या,मी जेवढे पोरं जमवले होते तेवढ्या सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केलाय ,मी तुमच्यासोबत कळसूबाईला येऊ का ?"
आधीच हसू का रडू ह्या अवस्थेत असलेल्या भाऊश्याला येथेच्छ शिव्या घालून मी होकार दिला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूर्ख लोक ( = अननुभवी) गूगलकडे धावतात. हा पहिला मूर्खपणा. दुसरा म्हणजे मित्रांवर (एक/अधिक ) विसंबणे.
-----
सोलो ट्रेक उत्तम. सोलो म्हणजे आपण एकटेच निघणे आणि योग्य गावाच्या पायथ्याशी पोहोचणे. तिथे एका गाववाल्याला गाइड म्हणून घेणे. अगदी रास्त दरात फार घासाघीस न करता सौदा पटकन ठरतो. सगळ्या चिंता मिटतात. घरचे लोक निश्चींत, आपण निश्चिंत, कुठेही न भरकटता ट्रेक फत्ते. महागडे क्याम्रे, वस्तू नेणार असल्यास फिकिर नाही. दोन तीन ट्रेकनंतर जो सह्याद्रीचा अनुभव मिळतो तो पुढे कामाला येतो.

कोणी मूर्ख नसतो, फक्त आपली आवड हीच त्याची आवड नसते किंवा त्या वेळी नसते. उगाच हातापाया पडून कुणालाही ट्रेकला नेऊ नये.

बाकी अनुभव लिहाच.

सह्याद्रीतल्या कठीण कातळ खडकांपेक्षाही पायवाटेवरची खडी, शेवेसारखे गवत, शेवाळे हेच सर्वात धोकादायक. डोंगर चढण्यापेक्षा उतरणे फसवे निघते.

पहिलेच लेखन ! काही चुकलंच तर लहान बाळ समजून माफ करा ...>>
Rofl
अहो इथे सगळीच लहान बाळं आहेत. तुम्ही लिहा बिनधास्त.

सुरूवात भारीच!

मुका माज >>>>> खुप दिवसांनी हा शब्द ऐकला Lol