घर-बंदिवास आणि मुक्तचिंतन

Submitted by कुमार१ on 15 April, 2020 - 04:37

नमस्कार.
आज कर्दनकाळ कोविदने लादलेल्या टाळेबंदी आणि मर्यादित संचाराचा आपला २२ वा दिवस. अत्यावश्यक सेवक वगळता आपण बहुतेक जण घरच्या तुरुंगात बंदिस्त झालो आहोत. तसे आपण कधी ना कधी आजारी पडतो. त्या दरम्यान आपल्याला घरात सक्तीने रहायची सवय असते. पण ती तशी मोजक्या दिवसांची असते. असा आजार जर मध्यम स्वरूपाचा असेल, तर आपण औषधे घेऊन आपल्या कामावरसुद्धा जात असतो. सध्याचा प्रकार मात्र वेगळाच आणि गंभीर आहे. समाजातील बरेच जण त्या घातक आजाराने त्रस्त आहेत. हा आजार साधासुधा नसून तीव्र गतीने फैलावणारा आहे. त्यामुळे हा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण बंदिस्त झालेलो आहोत. गेल्याच आठवड्यात ७ एप्रिलला जागतिक आरोग्यदिन होता. त्या निमित्ताने जरा उशीराने मी आपणा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. कधी नव्हे इतकी सध्या आपल्याला अशा शुभेच्छांची गरज आहे.

सध्या आपण एक विचित्र प्रकारची सामाजिक शांतता अनुभवत आहोत. शहरी जीवनात तर ही अभूतपूर्व अशीच आहे. एरवी सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत आसमंतात असंख्य आवाज चालू असतात. ते मुख्यत्वे वाहनांचे असतात. छोट्या दुचाकीपासून ते ट्रकपर्यंत असंख्य वाहने रस्त्यावरून दौडत असतात. त्यांच्या इंजिनांचा आवाज स्वाभाविक आहे. पण गरज नसताना वाजवले जाणारे कर्कश हॉर्न, सिग्नलला थांबले असताना उगाचच बुंग बुंग करत accelerator ताणणारे वाहनचालक अशा अनेक कृतींतून बरेच ध्वनीप्रदूषण होत असते. रेल्वे आणि विमानांचे आवाजही सभोवतालचा परिसर दणाणून टाकतात. आपल्याकडे कुठे ना कुठे ध्वनिवर्धक लावून खाजगी, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रम नियमित चालूच असतात. अशा सर्व कार्यक्रमांना आवाजाच्या पातळीचे आणि वेळेचे निकष ठरवून दिलेले आहेत खरे. पण वास्तवात ते पाळले जातातच असे नाही. किंबहुना ते नियम मोडण्याकडेच काहींचा कल असतो. एकूण काय तर आपण सतत आवाजमय दुनियेत वावरत असतो. काही जण तर सतत कानठळ्या बसवणाऱ्या वातावरणात वावरत असतात. असे काही लोक ठराविक ध्वनीलहरींना बहिरे झालेले असतात.

आवाजाच्या जोडीला आपली दुसरी समस्या आहे ते म्हणजे प्रमाणाबाहेर गेलेले हवेचे प्रदूषण. हे होण्यात कारखाने आणि सर्व प्रकारच्या स्वयंचलित वाहनांचे योगदान आहे. या सगळ्यातून होणारी कर्बउत्सर्जन पातळी आज भयावह झालेली असून त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला आहे. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात पण, सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने खाजगी वाहनवापर प्रचंड वाढत गेला. आता त्याला आवर घालणे हे महाकठीण झाले आहे. तरी पण काही प्रमाणात आपण वाहन संयम बाळगावा असे आवाहन बरेचदा केले जाते. त्यानुसार अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही अत्यल्प खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो !
पण अशी कृती ही नियमित स्वरुपात सर्वांकडून झाली तरच त्याचा फायदा होईल. यासाठी एक सोपा उपाय मी बरेचदा सुचवतो. तो म्हणजे प्रत्येक वाहनचालकाने आपले वाहन आठवड्यातून फक्त एक दिवस रस्त्यावर आणायचे नाही. यासाठी समाजात विविध गट करून आठवड्याचे वार वाटून घेता येतील. मी गेली २० वर्षे हे आचरणात आणल्यावरच हे आवाहन करीत आहे. वाहनांवर कायद्याने सम-विषम योजना लादा, मग त्यात अपवाद आणि पळवाटा शोधा, असले काही होण्यापेक्षा हा संयम उत्स्फूर्तपणे व्हावा हे बरे. एकट्याने प्रवास करताना (अपवादा‍त्मक परिस्थिती वगळता) चारचाकी गाडी वापरावी का, यावरही आत्मपरीक्षण व्हावे. बाकी विमानांमुळे होणारे प्रदूषण तर अतिप्रचंड आहे. हे माहित असूनसुद्धा व्यक्तिगत मालकीच्या विमानांची संख्या जगभरात वाढतेच आहे, अशा बातम्या वाचल्या की मन उद्विग्न होते. अशा विमानांतून केवळ २-३ व्यक्तीच एका वेळेस प्रवास करतात हे पाहून मनोमन खिन्नता येते.

सध्या आपली कर्कश आवाज आणि प्रदूषण या दोन्ही समस्यांपासून काही काळ तरी सुटका झाली आहे खरी.
आताच्या शांततेत अजून एका महत्वाच्या मुद्द्यावर चिंतन केले. तो म्हणजे आपली जीवनशैली. याचा विचार करताना आपण विद्यार्थी आणि सेवानिवृत्तांना थोडे बाजूला ठेवू. म्हणजेच नोकरी वा व्यवसायात कार्यरत असणाऱ्यांचा विचार करू. चांगले आरोग्य आणि मनस्वास्थ्य हवे असेल तर जीवनशैली कशी असावी हा प्रश्न स्वाभाविक आहे. याचे एकच असे उत्तर असणार नाही याची मला कल्पना आहे. मतभिन्नता राहीलच. तरीसुद्धा या संदर्भात एक विचार नोंदवतो, जो मी काही समाज अभ्यासकांच्या लेखांत वाचला आहे. एका दिवसाचे तास २४. त्याची साधारण विभागणी अशी सुचवली आहे:

१. व्यावसायिक कामाचे तास ८ ( कामाच्या स्वरूपानुसार अधिक १)
२. झोपेचे तास ८ (वयानुसार अधिक/ उणे १)
३. उरलेले तास हे कुटुंबासाठी अर्थपूर्ण वेळ देण्यासाठी. त्यात काही घरकामे ही विरंगुळा म्हणून करता येतात.

थोडक्यात ८ x ३ = २४ अशी ही त्रिसूत्री सुचवली गेली आहे. सध्या विचार करायला वेळच वेळ मिळाला आहे. म्हणून सहज मी साधारण ३५ वर्षांपूर्वीचे चित्र मनात आणले. अत्यावश्यक सेवा वगळता ते असे होते:

१. बहुतेक नोकरदार सकाळी ९ ( किंवा १०) ते संध्या. ५ – ५.३० अशा वेळाच्या नोकऱ्या करत. त्यामुळे घरी सामान्य वेळेत पोहोचत. >> लवकर झोपी जाणे >> सलग छान झोप >>> लवकर उठणे >> व्यवस्थित व्यायाम वगैरे.

२. तेव्हाचे काही व्यावसायिक पहा. ९ ते १ काम >>> जेवायला घरी >>> तासभर झोप आणि घरासाठी वेळ >> ५ ते ९ काम >> व्यवसाय बंद व घरी >>> थोडे उशीरा झोपणे व थोडे आरामात उठणे; पण सलग झोप >> उत्साहात व्यायाम.
तेव्हा बहुतेक दुकानेही हक्काने साप्ताहिक सुटी घेत – साधारण सोमवारची. नोकरदारांना रविवारी सुटी असल्याने त्या दिवशी दुकानांचा व्यवसाय जोरात असे. त्यामुळे दुकानदार व त्यांचे सेवक यांनाही सोमवारी श्रमपरिहार म्हणून सुटी छान वाटे.

सध्याचे सर्वसाधारण चित्र आपणा सर्वांपुढे आहे. त्याचे आत्मपरीक्षण करूया इतकेच म्हणेन. मध्यंतरी एक राजस्थानी दुकानदार मला म्हणाले, “अहो, सुटी हा शब्द आमच्या जिंदगीतच नाही. माझे दुकान वर्षातून फक्त ३ दिवस बंद असते. कसला साप्ताहिक सोमवार अन कसले काय!”

अजून एक जुनी आठवण लिहितो. अंदाजे २० वर्षांपूर्वीची. प्रा. शिवाजीराव भोसलेंचा एक लेख वाचला होता. त्या दरम्यान औद्योगीकरणाने प्रचंड वेग घेतला होता. ‘नऊ ते पाच’ ही संकल्पना मोडीत निघत होती. काम, काम आणि काम हाच आयुष्याचा मूलमंत्र होत होता. या परिस्थितीवर त्यांनी लिहिलेले काही विचार माझ्या शब्दात लिहितो:

सध्या बघावे तिकडे आणि केव्हाही एकच दृश्य दिसतंय. प्रत्येक जण एकतर कुठून तरी निघालेला आहे, नाहीतर प्रत्येकाला कुठेतरी पोचायची तरी घाई आहे. कोणीही थांबलेला असा नाहीच. सकाळी ७ची वेळ असो अथवा रात्री १०ची, शांतपणे एखाद्याशी आपण फोनवर तरी बोलू शकतोय का? माणसे पळताहेत, वाहने धावताहेत .... वेग, वेग आणि वेग... बस्स हेच आयुष्य झालंय खरं”.

सध्याच्या बंदिवासात आपल्या अशा भरधाव वेगाला एक करकचून ब्रेक लागलाय खरा – एका नैसर्गिक आपत्तीमुळे. इथून पुढे तो वेग नियंत्रित करावा की नाही, यावर आपण शांतपणे विचार करू शकू. स्पर्धा आणि मनःशांती यांचा समतोल साधता आला तर आपण मनापासून आनंदी असू. मग जगातील ‘आनंदी लोकांचा देश’ या सारखी सर्वेक्षणे करायची गरजही संपू शकेल.

सन १९९९ संपून जेव्हा २००० सुरु झाले तेव्हाचा जागतिक जल्लोष आठवतो. तेव्हा अनेक उपक्रम राबवले गेले आणि प्रकल्प आखले गेले. तेव्हा मी फक्त एक छोटे काम केले. दुकानातून एक दैनंदिनी-वही घेऊन आलो. तिच्या एका पानावर एक दिवस अशी छापील आखणी आहे. पण मी ती वही वेगळ्या कामासाठी वापरायचे ठरवले. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला जे जे आवडेल ते त्यात लिहून ठेवायचा संकल्प केला. सुरवातीस ते अगदी विस्कळीत स्वरुपात झाले. पुढे त्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले. ती सदरे अशी आहेत:

१. आवडलेली वाक्ये
२. आवडत्या कविता
३. वाचलेल्या पुस्तकाचा सारांश
४. पाहिलेल्या नाटक वा चित्रपटाचा सारांश
५. भाषेतील मनोरंजक गोष्टी, आणि
६. संकीर्ण

अशा प्रकारच्या या आठवणी अधूनमधून वाचायला मजा येते. सध्या तर या वाचनाची पारायणे होताहेत. आता आपल्याला एका उदासीने व्यापलेले आहे. एकीकडे आपण घरकामे आणि छंदांत मन रमवित आहोत, पण तरीही मनावर मळभ दाटलेलेच आहे. सध्याचे संकट आज ना उद्या दूर होईलच, पण यानिमित्ताने आपण स्वसंवाद करायला शिकलो. आता आपण आयुष्यावर स्वतःशीच बरेच काही बोलत आहोत. “जगाचे कोणावाचूनही अडत नाही, कशासाठी ही धडपड, सगळेच मिथ्या आहे... वगैरे”, यासारखे विचार अधूनमधून मनात येत आहेत. किंबहुना असे वातावरण यासारख्या विचारांना भयंकर पोषक असते ! त्याला अनुसरून माझ्या वहीत लिहिलेला महाभारतातील एक संवाद लिहून या मनोगताचा समारोप करतो.

..... यक्षाने युधिष्ठिराला विचारलं,

“जगातली सर्वात मोठी विसंगती कोणती?”

युधिष्ठिर म्हणाला,

“सर्वत्र आणि कधीही पेटणाऱ्या चिता दिसत असूनही मी आणि माझे आप्तेष्ट चिरंजीव आहेत असं गृहीत धरूनच माणूस जगत असतो, हीच सर्वात मोठी विसंगती आहे”.
*******************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला कुमार1 सर,
किंबहुना असे वातावरण यासारख्या विचारांना भयंकर पोषक असते >>>>अशा वातावरणात मनाचे बरेच थर उलगडतात.
“सर्वत्र आणि कधीही पेटणाऱ्या चिता दिसत असूनही मी आणि माझे आप्तेष्ट चिरंजीव आहेत असं गृहीत धरूनच माणूस जगत असतो, हीच सर्वात मोठी विसंगती आहे”.>>> त्यामुळेच माणूस वेडा आणि आशावादी , दोन्ही आहे . ही विसंगती जाणीवेचा भाग असली असती तर अवघड झाले असते, थोडस असं वाटत मला ! मुलीच्या कंडीशनमुळे आलेल्या अनिश्चिततेमुळे इतके मानसिक चर्निंग झाले आहे की आता कळाले आहे प्रत्येक दिवस आनंदात घालावा फार दुरचा विचार करु नये .
या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा शिवाय काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे . बाकी परमेश्वरावर सोडावे , काळजी करत बसु नये.
काळजी घ्या Happy

आदिश्री,
चांगला प्रतिसाद. धन्यवाद.
तुमच्या मुलीला आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा ! तिच्यावर मूळ पेशींचे उपचार कसे झाले ?
काळजी घ्या.

केले नाही आम्ही, मला योग्य / सुरक्षित वाटले नाही. तिचे वाढत जाणारे अपंगत्व बघत आयुष्य काढत आहोत. चालणे दहाव्या वर्षी बंद झाले आता बाराची होईल. ती फार गोड, हुशार मजेदार आणि आशावादी आहे. त्यामुळे आम्हीही असतो बर्यापैकी. काही कुटुंबातील सर्व मुलांना हा आजार आहे त्यामुळे माझा मुलगा निर्व्यंग आहे याचे समाधान आहे. सतत दूर आणि एकटे असल्यामुळे या अनिश्चिततेत मी प्रो आहे Happy धन्यवाद .
हे इथे योग्य नसेल तर प्लीज सांगा.

आदिश्री,
तुम्ही मोकळेपणाने लिहीलेत ते योग्य आहे.
सध्याच्या परिस्थितीत आपण एकमेकाशी सुसंवाद करणे गरजेचे आहे. त्यानुसार तुमचा प्रतिसाद आवडला.

मन्या,
आभार व शुभेच्छा !

आदिश्री

तुमच्या भावना समजू शकते. माझी मुलगी ५ वर्षांची असताना गेली. ती सेरेब्रल पाल्सी विथ मेंटली रिटार्डेड होती. ती गेली तेव्हापासून एकही असा दिवस नाही की डोळ्यात पाणी आले नाही. तसंच सतत जाणीव असते की कधीही काहीही होऊ शकतं. जी अनिश्चितता लोकांना आता कोरोना मुळे जाणवू लागली आहे ती मला गेली दोन वर्षांपासून जाणवते आहे. सध्या प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी निसर्गाचे, परमेश्वराचे आभार मानायचे हेच ठरवले आहे.

लेख आवडला कुमार1 सर .
छान चिंतन.

>>>स्पर्धा आणि मनःशांती यांचा समतोल साधता आला तर आपण मनापासून आनंदी असू. >>> +१११

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
नौटंकी : तुमच्या दुख्खात सहभागी आहे.

प्रकाश,
आपल्या जैविक घड्याळासंबंधी काही चर्चा माझ्या ‘सुखी झोपेचा साथी’ या लेखात झालेली आहे:

https://www.maayboli.com/node/73074

सध्या लग्न समारंभ करायचा असल्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहायला परवानगी आहे असे वाचनात आले.

या निमित्ताने पुन्हा एकदा 1972- 73 मधली एक आठवण जागी झाली. तेव्हाच्या महादुष्काळानंतर लग्न समारंभांवर अशीच बंधने होती. एका मंगल कार्यालयाबाहेरच्या पाटीवर लिहिलेली एक पाटी मला अजून आठवते. त्यानुसार फक्त 40 लोकांना लग्नाचे जेवण द्यायला परवानगी होती.

प्रत्यक्ष समारंभाचे ठिकाणी एक सरकारी अधिकारी येऊन ही पाहणी करीत असे.