लॉकडाऊन , निसर्ग आणि मी

Submitted by डी मृणालिनी on 14 April, 2020 - 11:42

मनुष्य प्राणी सोडून सगळे प्राणी मुक्तसंचाराचा आनंद घेत आहेत. मनुष्य मात्र लोकडाऊनमुळे आपल्याच घरात जणू कैद झाला आहे. संपूर्ण भारतात लोकडाऊन आहे. पण तो सर्वाधिक जाणवतो तो सर्वसुखसुविधांनी युक्त अशा महानगरांमध्ये ! गावातल्या अर्थचक्रावर जरी फरक पडला असला तरी दैनंदिन जीवन मात्र नेहमीप्रमाणेच पशु -पक्षी झाडे -वेली यांच्या सान्निध्यात रमलेलं आहे. त्यातलीच मी एक . संपूर्ण जगाचं लक्ष आज कोरोनाकडे असताना मी मात्र आकर्षित होते बदलत्या निसर्गाकडे. कोरोनासारख्या एका गंभीर आपत्तीने आपल्या तथाकथित विकासाला आळा घातला . हे मान्य. पण मग व्हेनिसच्या कालव्यात डॉल्फिन आणि स्वान कुठून आले ? यमुना कोणतेही मशिनरी न लावता आपोआप शुद्ध कशी होते ? ओझोन लेयरची गुणवत्ता कशी काय सुधारते ? केवळ भारतानेच नव्हे , तर इतर अनेक लहान -मोठ्या देशांनीही नद्यांचे शुद्धीकरण , पर्यावरण रक्षणार्थ कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या . पण आजपर्यंत हेतू कधी साध्यच झाला नाही. तो साध्य झाला फक्त आपण घरात बसल्यामुळे ! शेवटी कोरोनासारख्या एका सूक्ष्म जिवाणूनेच गंगा , यमुनासारख्या पवित्र पण तरीही सर्वाधिक प्रदूषित नद्यांना शुद्धतेची वाट दाखवली. सध्या जगामध्ये काहूर माजवणारी ही आपत्ती मनुष्याला काहीतरी शिकवू पाहत आहे. ते हा प्राणी कितपत शिकेल यावर प्रश्नचिन्हच आहे. म्हणूनच मला असं वाटत निसर्गाला त्याची पूर्वस्थिती प्राप्त करून देण्यासाठी पैसा नव्हे तर मानसिकतेची गरज आहे. .
आजच्या मानवाच्या दयनीय स्थितीकडे बघून मला खरंच आश्चर्य वाटतं . सर्व सृष्टी आपल्या अधिपत्याखाली ठेवणारा हा बुद्धिजीवी प्राणी आज एका अतिसूक्ष्म जिवाणूपुढे झुकला ?माणसाचं विकास मोजण्याच्या एककात समाविष्ट असणारे नुक्लियर वेपन्स ,पेट्रो रिफायनरी ही संपत्ती ( ? ) या युद्धात कुचकामी आहे .आज खरंच 'विकास ' या गोंडस शब्दावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. एवढ्या वर्षांपासून या शब्दाखाली आपण नैसर्गिक संपत्तीची जी उधळपट्टी केली , तिचे परिणाम आपण आज भोगतोय. अशीच करत राहिलो तर पुढेही नक्कीच भोगू. आज काही महिन्यांच्या लोकडाऊनमुळे आपल्याला त्रास होती , गैरसोय होते. विचार करा , एवढ्या वर्षांपासून फक्त आपल्यासाठी निसर्गाने जे सोसलं , त्याचं काय ? सहनशीलतेलाही मर्यादा असते. युगायुगाने या समाजाला जशी पुनर्विचार ,प्रबोधनाची गरज भासली , तशीच ती आजही आहे . नेत्यांनी आपल्या विकासाची परिभाषा बदलणे गरजेचे आहे. आपण येत्या दोन वर्षात समाजाचे भावी मतदार असणार आहोत. कसा हवा आपल्या समाजाचा नेता ? यावर आत्ताच विचार करा. नाहीतर भविष्यासाठीही या लोकडाऊनची सवयच करून घ्या ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users