मन वढाय वढाय (भाग ३५)

Submitted by nimita on 13 April, 2020 - 22:01

औरंगाबाद मधले ते सात आठ दिवस कसे आणि कुठे उडून गेले कोणालाच कळलं नाही. श्रद्धाचा वाढदिवस अगदी थाटात साजरा केला तिच्या आजी आजोबांनी...एकुलती एक नात आणि तीही अधूनमधून भेटणारी- त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या उत्साहाला अगदी उधाण आलं होतं. श्रद्धा देखील अगदी हक्कानी आपले सगळे लाड पुरवून घेत होती. रजतनी जरी बोलूम दाखवलं नसलं तरी त्यालासुद्धा सगळ्या मोठ्यांच्या सहवासात खरंच खूप छान वाटत होतं. शाळा कॉलेजच्या मित्रांना भेटून जुन्या आठवणी ताज्या झाल्यामुळे एकदम refresh, recharge झाल्यासारखं वाटत होतं त्याला. स्नेहाची अवस्था काही फारशी वेगळी नव्हती. 'रात्र थोडी आणि सोंगं फार' अशी गत झाली होती तिची. एक दिवस तिच्या एका मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारत असताना अचानक तिची मैत्रीण म्हणाली," अगं स्नेहा, तुला कळलं का? आपल्या वर्गात तो सलील होता ना; त्याचे वडील वारले अगं मागच्या महिन्यात... त्यामुळे सध्या सलील औरंगाबाद मधेच आहे." ही बातमी ऐकून स्नेहाला खूप मोठा धक्का बसला. 'अरे देवा! हे काय झालं?' तिच्या डोळ्यांसमोर सलीलचा चेहेरा आला. त्याच्यासाठी तर त्याचे बाबा म्हणजे दैवत होते - त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती! केवढा मोठा धक्का बसला असेल त्याला! जाऊन भेटून येऊ का त्याला एकदा? पण इतक्या वर्षांत कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता आमच्यात... भेटणं तर दूरच पण साधा पत्रव्यवहार किंवा फोनवर बोललो सुद्धा नाही कधी... आणि आता असं एकदम त्याच्या घरी गेले तर ?? त्याला नाही आवडलं तर? काय करू? रजतला घेऊन जाऊ का बरोबर? पण रजतची आणि सलीलची साधी तोंडओळख पण नाहीये. अशा प्रसंगी रजतला घेऊन जाणं योग्य ठरेल का? नको, मी एकटीच जाऊन येते. आई नेहेमी म्हणते- एक वेळ आनंदाच्या क्षणी भेटायला गेलं नाही तरी चालेल पण दुःखाच्या प्रसंगी नेहेमी हजर असावं ; समोरच्याला एक मानसिक बळ मिळतं- आजच जाते त्याला भेटायला.' स्नेहानी रजतला आणि इतर घरच्यांना सगळं सविस्तर सांगितलं आणि ती सलीलला भेटायला गेली.

स्नेहा घरातून निघाली खरी ; पण तिला खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं. आज इतक्या वर्षांनंतर ती आणि सलील एकमेकांना असं प्रत्यक्ष बघणार होते. काय बोलू त्याच्याशी? कशी सुरुवात करू? त्यानी जर मला ओळखलंच नाही तर ? छे, भेटलो नसलो म्हणून काय झालं.... मला विसरला नसेल तो ! आधी त्याला फोन करून सांगायला हवं होतं का? अजय कडे नक्की असेल त्याचा नंबर .. हो, चुकलंच माझं... मग आता परत जाऊ का घरी? नको, अर्ध्या रस्त्यात आलीये- आता भेटूनच जाते. आणि तसंही तो एकटा नसेल .. त्याची आई,बायको, मुलगी सगळेच असतील की ! त्यांची पण भेट होईल. '

विचारांच्या या अशा 'हो- नाही' च्या आवर्तनांत शेवटी एकदाची ती सलीलच्या घरी पोचली. सलीलच्या बहिणीनी दार उघडलं. स्नेहाला बघता क्षणीच तिनी ओळखलं...' तू सलीलच्या वर्गात होतीस ना ? सॉरी, मला तुझं नाव लक्षात नाहीये, पण कॉलेजमधे असताना तू घरी यायचीस ना ? आणि सलीलच्या कॉलेजच्या अल्बम्स मधे तुझे एक दोन फोटो पण बघितलेत मी. त्यावरून ओळखलं." तिला मानेनीच होकार देत स्नेहानी आपली ओळख करून दिली. "मला आजच तुमच्या बाबांबद्दल कळलं... I am very sorry. मी बडोद्याला असते त्यामुळे आत्ता इतक्या उशिरा कळलं. म्हणून मग आत्ता लगेच भेटायला आले. सलील आहे का ? "

"हो आहे सध्या इथेच. बस ना तू, मी सांगते त्याला तू आल्याचं." स्नेहाला बसायला सांगून ती आतल्या खोलीत गेली. पुढच्या काही मिनिटांतच सलील बाहेर आला. स्नेहाला असं अचानक आपल्या समोर बघून त्याच्या चेहेऱ्यावर एकाच वेळी आनंद, उत्सुकता, अविश्वास, आश्चर्य असे अनेकविध भाव तरळून गेले. आज इतक्या वर्षांनंतर स्नेहाला असं समोर बघून त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याचा विश्वासच बसत नव्हता... काही क्षण दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. शेवटी स्नेहानी सुरुवात केली," आजच कळलं तुझ्या बाबांबद्दल ! I am so sorry. " तिच्या समोरच्या सोफ्यावर बसत सलील म्हणाला, "Thanks for coming. कशी आहेस तू? आणि तुझी फॅमिली ? तुझे आई बाबा ? आता बडोद्याला असतेस ना तू? अजयनी सांगितलं होतं मला. एकटीच आलीयेस औरंगाबादला - का नवरा आणि मुलगी पण आलेत?" बोलता बोलता सलील अचानक थांबला... ओशाळलेल्या स्वरात म्हणाला,"सॉरी, मी खूप प्रश्न विचारतोय ना !! पण आज इतक्या वर्षांनंतर भेटतोय तुला..त्यामुळे गोंधळून गेलोय. काय बोलावं सुचतच नाहीये," त्यानी प्रांजळ कबुली दिली.

स्नेहानी शांतपणे एक एक करत त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. तिला आज स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं. घरातून निघताना तिला वाटलं होतं की इतक्या वर्षांनंतर सलीलला भेटल्यावर ती गोंधळून जाईल, कदाचित जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील .…. आणि त्याला कारणही तसंच होतं. गेले काही दिवस सलील बद्दल तिच्या मनात चालू असलेलं विचारांचं, तिला गोंधळात टाकणाऱ्या त्या मिश्र भावनांचं एक गहिरं सावट तिचा पाठलाग करत होतं. त्यामुळे आज तिनी जेव्हा सलीलला भेटायचं ठरवलं होतं तेव्हा ती स्वतःच साशंक होती. आपल्या मनाची अवस्था काय होईल याबद्दल आलटून पालटून वेगवेगळे विचार मनात येत होते. पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नव्हतं. स्नेहा स्थितप्रज्ञ राहून त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. त्याच्याशी संवाद साधत होती. पण हे सगळं करत असताना तिच्या मनात खोल कुठेतरी एक प्रश्न हळूच डोकं वर काढत होता....स्वतःची ही अशी स्थितप्रज्ञ अवस्था बघून आनंद व्हायला हवा.... पण खरंच तसा आनंद होतोय का? आता सलीलच्या अस्तित्वामुळे आपल्याला काही फरक पडत नाही...ही जाणीव झाल्यामुळे जी खुशी व्हायला पाहिजे ती होते आहे का?

स्नेहाच्या मनात एकीकडे ही विचारांची आवर्तनं चालू होती ; पण तिची नजर मात्र सलीलच्या बायकोला, त्याच्या मुलीला शोधत होती.

"कसला एवढा विचार करतीयेस, स्नेहा?" सलीलचा प्रश्न ऐकून स्नेहा भानावर आली. स्वतःला सावरत तिनी विचारलं," अजून किती दिवस आहेस भारतात?" त्यावर सलील म्हणाला, " आता मी परत नाही जाणार जर्मनीत.आता आईला इथे एकटं ठेवणं पटत नाहीये मनाला. आणि ती काही जर्मनीला यायला तयार नाहीये. त्यामुळे आता मीच इथे शिफ्ट व्हायचं ठरवलंय. तसंही बाबा त्यांच्या आजारपणात म्हणाले होते मला-' सलील, तू आहेस म्हणून मला तुझ्या आईची काळजी नाहीये.' त्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी खोटा कसा ठरू देईन ? मी आता नोकरी सोडायचं ठरवलं आहे. स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करणार आहे. पुढच्या काही महिन्यांत सगळ्या formalities पूर्ण होतील. पण आता मी आणि आई इथेच राहणार हे मात्र नक्की."

'मी आणि आई ? म्हणजे....' स्नेहाच्या मनात पहिला प्रश्न आला...तिनी न राहवून विचारलं, "आणि तुझी फॅमिली?" तिचा हा प्रश्न ऐकून खिन्न हसत सलील म्हणाला,"फॅमिली असायला आधी लग्न करावं लागतं ना! आणि तुला तर माहितीच आहे - मी लग्न न करायचा निर्णय घेतलाय." आता स्नेहा पुरती गोंधळली. तिला सलीलचा आणि त्याच्या मुलीचा तो फोटो आठवला. 'विचारावं का सलीलला त्या फोटोबद्दल- फोटोतल्या त्या परी बद्दल .... त्याच्या little angel बद्दल ?' स्नेहा विचारात पडली. तेवढ्यात आतून एक नऊ दहा वर्षांची मुलगी ट्रे मधे पाण्याचे ग्लासेस सांभाळत बाहेर आली. मधल्या टीपॉय वर तो ट्रे ठेवत तिनी सलील ला विचारलं,"मामा, आई विचारतीये- चहा करू का कॉफी?"

स्नेहाच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह वाचलं असावं सलीलनी. त्या मुलीला आपल्या शेजारी बसवून घेत सलील म्हणाला ," ही माझ्या बहिणीची मुलगी आहे... आमची सगळ्यांची 'परी' !!!"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन वढाय वढाय (भाग ३)
Submitted by nimita on 8 January, 2020 - 07:40
"मॅम, प्लीज मला फाईव्ह स्टार रेटिंग द्या हं.."एअरपोर्ट वर पोचल्यानंतर स्नेहाचं सामान तिला काढून देत तो कॅब ड्रायव्हर म्हणाला. त्याला 'थँक्स' म्हणत, मानेनीच होकार देत स्नेहा एअरपोर्ट च्या एन्ट्री गेट च्या दिशेनी निघाली. मनात एकामागून एक विचारांची, आठवणींची आवर्तनं चालू होती. नेहेमीच्या सवयीमुळे तिनी अगदी यांत्रिकपणे सगळ्या formalities पूर्ण केल्या आणि तिच्या फ्लाईटच्या डिपार्चर गेट जवळच्या एका खुर्चीवर जाऊन बसली. अजून औरंगाबादच्या तिच्या फ्लाईटला अवकाश होता.पण तिचं मन मात्र कधीच पोचलं होतं तिकडे... तिच्याही नकळत ती तिच्या भूतकाळात पोचली होती....

>>>>>
माफ करा पण माझा जरा गोंधळ उडालाय. ३ र्‍या भागात स्नेहाच्या मनात फ्लॅशबॅक चालू झालेला एअरपोर्टवर .
आणि त्यानंतर ती रियुनिअन करून आली का?
कि अजूनही कथा स्नेहाच्या मनातील फ्लॅशबॅक मध्येच चालू आहे.

आसा
अजून ती भूतकाळाच्या आठवणीतच आहे. पण लवकरच जाईल reunion साठी. Happy

मन्या,
कथेमधे पुढच्या भागांत सलीलच्या मनाचा ठाव घ्यायचा प्रयत्न केलाय... Happy keep reading Happy