राधा - स्फुट

Submitted by द्वादशांगुला on 12 April, 2020 - 15:16

अंधारलेलं होतं आकाश एव्हाना,
अगदी त्याच्या ह्रदयासारखं नि
त्याच जुन्या विशाल उंबराखाली,
अजूनही तशीच तेवत होती ती,
नाजूक थरथरत्या पणतीसारखी ;
त्याच्या विशाल ह्रदयाचा ठाव घेत...

कित्येक पर्णं अशी गळून गेली
निसटत्या काळाची साक्ष देत ;
पण ती तशीच राहिलीय थांबून,
त्याच्या वाटेकडे नजर लावून,
कधीतरी परतेलच तो पुन्हा,
तिला एकदा ह्रदयाशी धरण्यास,
या भाबड्या निरागस आशेला
तिच्याच अश्रूंनी ताजंतवानं करत!

सरकत्या मेघांकडे नजर असूनही
डोळ्यांत तरळतात त्याच आठवणी.
याच उंबराच्या थंड सावलीतल्या.
बोटं फिरणार्‍या बासरीच्या सूरात तो
अन् त्याच्या त्या मोहक रुपात ती,
दोघंही अगदी सारखेच धुंद झालेले!
कलत्या प्रहराने अलगद उघडणाऱ्या
नि तिचाच ठाव घेणाऱ्या त्या पापण्या!
अन् त्यामुळं लाजून आरक्त झालेले
तिचे देखणे मऊशार गौरवर्णी गाल!

नभातलं चांदणं नजरेत साठवत
विचार करत राहते ती भान हरपून.
चांदणं भरुन त्या निळ्या डोळ्यात
पहायचा तो तिच्याकडं एकटक.
सरत्या वेळेचं भान विसरुन अन्
मंदावत जायचे ते बासरीचे सूर,
अगदी खुद्द त्याच्याही नकळत!
तिच्यावरल्या त्याच्या निरभ्र प्रेमाची
मूक साक्षच असायची ती जणू!

तिला आठवते कपिलेच्या गळ्यातल्या
पितळी घंटीची मंजूळ किणकिण.
एखाद्या वेळी मायाळू कपिलेचा
तिला काहीसा मत्सरच व्हायचा!
त्याच्या इतक्या जवळ आपण नाही
हा सल तिला कायम छळायचा..
नेमकी तेव्हाच शुभ्र प्रेमळ कपिला
स्निग्धाळ जिभेने तिला चाटू लागायची!
नेमकी तेव्हाच तिने न सांगताही
आवडती धून बासरी वाजू लागायची!
अन् त्याची प्रेमळ नजर स्तब्धपणे
तिच्याच मुखड्यावर खिळून असायची,
तिला आपल्या नेत्रकटाक्षानं घायाळ करत!

तिला अगदी लख्ख आठवत आहे
तिनं 'खट्याळ' म्हटलेलं त्याला आवडायचं
जितकं लोणी आवडत असेल तेवढंच!
वेलींच्या झोपाळ्यावर झोका घेताना
कधीकधी मुद्दाम उंच झोका घ्यायचा तो,
नं घाबरून जायची ती पडण्याच्या भीतीनं,
त्याची निळी बाहू घट्ट धरायची हातानं;
तसा तो हसू लागायचा मोकळेपणानं ;
तशी ती लाडिक रुसून चेहरा फिरवायची;
केसांच्या बटा सावरत म्हणायची, 'खट्याळ!'
अन् तो विरघळत जायचा लोण्यासारखा!

पाऊस पडत जातो त्या उंबरावर..
अन् लख्ख होतात त्या जुन्या आठवणी.
मधल्या विरहाचा कोरडा काळ जणू,
वाहून जातो जमलेल्या धूळीसरशी!
आठवतं तिला कधीतरी रुसलेली ती.
त्याचं बासरीवरच प्रेम आहे या रुसव्यानं;
अन् त्यानं तिची काढलेली प्रेमळ समजूत,
'ही बासरी तुझ्याचसाठी झंकारते' म्हणून!
शब्दन् शब्द खरा केला त्यानं त्याचा,
तिच्यापासून दुरावता सारुन दिलं सुरांना
बासरीनं अडगळीत, त्याच्या सांगण्यावरनं ..
पण तिचं मन त्याला कधी कळलंच नाही !

दुरून यमुनामाई पाहत असते तिच्याकडं,
उदासपणे डोळ्यांना लाटांचा पदर लावून..!
ओलेत्या यमुनेच्या निळ्याशार डोळ्यांच्या
पाणावल्या कडा कोणाला दिसतच नाहीत!
त्याच्या आठवणीत रमलेल्या तिला मात्र
ठळकपणे जाणवतात त्या कधीमधी..
मग उगाच हसते ती हताश केविलवाणी,
यमुनामाईकडं कोमेजला मुखडा करुन.

हिच्या निळ्या शालूच्या वालुमय काठी,
आठवतात तिला त्याची उमटलेली पावलं,
न् त्या पाऊलठशांवर गमतीने ठेवलेली
तिची नाजूक गुलाबी निमुळती पावलं..
आठवतं तिला ती वेडीवाकडी पावलं
धड कधी त्या ठशांवर पडलीच नाहीत!
अचानक मनात सलू लागतो तो प्रश्न
त्याचा माग घेणं इतकं कठीण होतं का?

जेव्हा गेला तो कायमचा सोडून,
अन् रुक्ष असा विरह मागे ठेवून,
तेव्हा निर्धास्त होती ती खरंतर....
तिच्या ओढीनं तो येईल लवकरच,
अशा निष्फळ कोरड्या आशेनं!
कारण देवत्व राखायला गेलेला तो
मागं वळून पाहणारच नाही कधी
याची तिला कल्पना नव्हती ना!

विरहानं सुकून गेलेल्या तिची
येते दया त्या भरल्या मेघांना,
अन् भरभरुन बरसतात तिच्यावर,
तिच्या मनातला विरहाचा अग्नी
तात्पुरता तरी शमवण्यासाठी.
क्षणभर येतो तिलाही जरा तजेला
अन् नजर ओलसर होत होत
दिसू लागते त्याची निळी आकृती
निळ्याशार पावसात धावत येताना...

युगानुयुगांचा विरह संपल्यासारखं,
तवानं होतं परत तिचं कोवळं मन,
होतो स्वर्गप्राप्तीसारखा निर्मळ आनंद,
अन् अंगात दडलेला जोश संचारुन ,
धाव घेते ती त्याच्या भेटीसाठी आतुरतेने.
पण थेंबांना कवटाळताना कळून चुकतं
हे पावसातलं काटेरी मृगजळ होतं!
परतलीय ती कैकवेळा अशीच हताशपणे
वैफल्यानं जडावल्या मंद पावलांनी
परत त्याच त्या मुक्या उंबरापाशी

त्याच्या मुखातून झरलेली वाणी,
सारखी घुमत राहते तिच्या कानात..
शंखात घुमणाऱ्या आवाजासारखी
एखाद्या स्तब्ध रात्री भास होतो,
न् तोच आवाज येतो, 'राऽधेऽ'
तर कधी घुमते तीच बासरीची धून,
क्षणभर बावरलेली ती सावरते,
अन् घालते समजूत स्वतःशीच,
मन मात्र भासानेही पल्लवलेलं असतं!

वर्षं, तपं, युगं ही उलटलीत आता.
त्याच्या लीलांनी भरभरुन जाणारी
इतिहासपानंही काळाआड गेलीत.
तरी वर्तमान भुलून चाळत बसते ती
तीच जुनी जीर्णावलेली फाटकी पानं;
कारण याच पानांवर आहेत विखुरलेल्या
त्याच्या निळ्या अस्तित्वाच्या आठवणी!

आठवणी उलगडताना पाखरु बनून
फुलांच्या ताटव्यांवर उडू लागते ती
आठवणीच पणतीतील स्नेहाप्रमाणं
तिच्या आशेला तेववत असतात!

म्हणतात सारे आताशा सावरलीय ती.
पण खरंतर पोकळ झालीय आतून,
याच विशाल कळाहीन उंबरासारखी!
तोही पोखरुन गेलाय त्याच्या जाण्यानं
अन् तिच्याबद्दलच्या आर्त काळजीनं.
कोमेजलंय तिचं ते गोड अल्लडपण,
ज्याच्यावरच तो खरा भाळला होता!
आता विखरुन गेलेलं तिचं अस्तित्व
साद घालत राहतं त्या बासरीला!

तिच्या चेहऱ्यावरचं गुलाबी हास्य
पुन्हा एकवारही उमललंच नाही
अगदी त्या भकास आम्रवृक्षाप्रमाणं
जे त्याच्या जाण्यानं मोहोरलंच नाही!
त्या वृक्षाकडं एकटक पाहता पाहता
नजरेवर पसरणारं धुकं दाट होत जातं..
सूर्यास्तानंतरच्या कभिन्न काळोखाप्रमाणं.
मग तिची ती रिती पाण्याची घागर
बघत राहते तिच्या अश्रूथेंबांकडे.
डोक्यावरच्या सोनेरी केसांसारखी
अशी अगदी विस्कटून जाते ती.
विस्कटून गेलेल्या तिला सावरायला
त्याच्या बासरीची स्वर्गीय धूनच हवी!

केव्हातरी जातील त्याच्या मनावरची
देवपणाच्या कर्तव्याची रुक्ष पुटं,
अन् कधीतरी आठवेल त्याला ती,
देवत्वाचं ओझं जरा बाजूला सारुन,
येईल तो तसाच अवखळ धावत..
तशीच ती बासरी ओठांना लावून
तिला अशी आतून साद घालेल,
' राऽऽधेऽऽ मी परत आलोय! '

कित्येक युगांचा दुरावा संपल्यावर
अशी मनातून मोहरुन जाईल ती!
त्याच्याकडं धाव घेईल ती वेगात.
विरहदुःख असं झटकून टाकील ती
मधला काळ झटकन विसरेल ती न्
कालच भेटल्यासारखी त्याला म्हणेल,
' कान्हा, हळू झोका घे खट्याळा! '
मधाहून मधाळ हसेल तो एकदा.
तशा नीलपापण्या समाधानात मिटून
फिरु लागतील बासरीवरची निळी बोटं
वाजू लागेल ते प्रेमळ संगीत पुन्हा.
नं आसमंत हळवा होईल त्या क्षणानं.
पशुपक्ष्यांच्या आल्हादमय नृत्याची
अन् तरारल्या पानांची साक्ष असेल.

तृप्तीच्या आनंदानं डोळे वाहतील,
न् अश्रू निळ्या पावलांवर शिंपडत,
विलीन होऊन जाईल ती त्याच्यात;
परत कधीच न विलग होण्यासाठी!!
याच सुखद क्षणासाठी तर झुरते ना ती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
द्वादशांगुला, आदिसिद्धी, तुम्ही खूप दिवसांनी दिसलात इथे.

धन्यवाद अज्ञा, सिद्धु, अज्ञानीजी, एस जी, सिद्धिताई, किल्लीतै Happy Happy

अज्ञा >> हो जिओच वापरते, शतक लोटलं Proud

एस जी >> हो बरेच दिवस झाले इथे येऊन, म्हणजे आठवण आहे आमची कोणालातरी, वाचून बरं वाटलं Happy

आदिश्रीजी >> राधा-कृष्ण आवडता विषय आहे. >> धन्यवाद! माझाही आवडीचि विषय! आपलं मेतकूट चांगलं जमणार Lol

खूप धन्यवाद अनघाजी, तृप्तीजी, वेडोबा जी, साद जी, सामो जी, संशोधक दादा Happy

हळवं, तरल >> म्हणजे जे मला मांडायचं होतं ते नीट मांडलं गेलं Happy

आदिश्रीजी >> राधा-कृष्ण आवडता विषय आहे. >> धन्यवाद! माझाही आवडीचि विषय! आपलं मेतकूट चांगलं जमणार >>
जी नको गं...अगं तुगं कर प्लीज. नक्कीच जमेल आपलं. Happy . विपु पहा .
राधाकृष्ण विषय असेल तर माझा प्रतिसाद पक्का. धन्यवाद. असेच लिहीत रहा. Happy

विरहातली एक वेदना सर्वांग व्यापून राहते . अतिशय सुंदर वर्णन केले आहे. व्याकुळ मनाची वेदना फार उत्कटतेने व्यक्त केली आहे ..