मला विलगीकरण नकोय

Submitted by मंगलाताई on 12 April, 2020 - 01:36

शासणाकडून एवढ्या सुट्टया मिळाल्यात. कधी नव्हे ते आम्हाला घरी बसायला मिळालं.आता कळलं की बसणं आणि चालत रहाणं, काम करत रहाणं यात किती फरक आहे .मला सुट्टी मिळत नाही असे मी मनातल्या मनात कितीदा तरी म्हणत होते . मला सुटट्या मिळाल्या , घरातल्या सगळ्यांना च सुटट्या मिळाल्या. शाळेतली मुलं दिसत नाहीत, हातांना काम नाही, परीक्षा नाही, मुलांचा गोंगाट नाही, रागवायला मुलं नाहीत, शाबासकी द्यायला कुणीही नाही. हे सर्व नाही नाही किती नकारात्मक आह. हा एकटेपणा, एकांत किती करंटा आहे. मुलं आहेत म्हणून शाळा आहे, शाळा आहे म्हणून नोकरी आहे, नोकरी आहे म्हणून शिकवणं आहे, शिकवणं आहे म्हणून मला व्यक्त होता येत. व्यक्त होता येणं हा किती मोठा भाग आहे आयुष्यातला. वर्गखोलीत विद्याथ्यांसमोर मी शिकवते, बोलते, नाचते, गाते, संवाद करते,अभिनय करते .कधी विद्यार्थी मला न्यायाधीश होण्याची संधी देतात, कधी चित्रकार ,कधी नटाची तर कधी आईची एवढी सम्रुद्ध संधी आहे का विद्यार्थ्यांशिवाय माझ्या आयुष्यात नाही.
‌मला या एकटेपणाने आत बघायला शिकवलं. काय आहे आत.मला कळतयं की, इतरांशिवाय माझ्या एकटीच्या आयुष्याला काय अर्थ आहे. ज्याला आपण दूषण देत होतो तेच आपल्याला हवेहवेसे वाटतात, ज्या परिस्थिती चा कंटाळा आला होता तीच परिस्थिती पुन्हा यावी असे वाटायला लागले. इतराच्या मान्यतेशिवाय मला महत्त्व नाही. इतरांनी मला दिलेल्या भूमिकेविना माझी काही भूमिका च नाही. मी कोण आहे हे इतरांनी दिलेल्या दूषणांवरून, विशेषणांवरून, संबोधनांवरून आहे. माझा माझा मी एकटा काय आहे? काहीच नाही. या नाही मुळे मला काय कळलं जे जे आहे ते योग्य आहे, जी परिस्थिती आहे तिला योग्य मानू या. आपला हेका चालवून इतरांनी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावे यापेक्षा सगळे आपल्याला जागी योग्य आहेत. योग्य तो बदल माझ्यातच करावा लागेल. माझा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन जसा असेल त्यावर सारे काही अवलंबून आहे.
‌ मी बघतेय की लोक या वेळी एकमेकांना आठवूण आठवूण फोन करताहेत ,एकमेकांशी बोलताहेत. मला मानवी ह्रदयातली संवेदना सुंदर आहे हे सहज जाणवतयं. वाईटापेक्षा सज्जनतेचा अंश जास्त प्रमाणात असतो हे दिसतयं . नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकता कशी प्रभावी ठरते हे कळतयं. पैशापेक्षा, सत्तेपेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा मानवातली सह्रुदयता किती आवश्यक आणि कल्याणकारी आहे हे जाणवतयं. मजुरांचे लोंढे स्वगृही परतीच्या प्रवासाला निघाले, सातशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात, खिशात पैसे नाहीत पण कुणी तरी अन्नदाता उभा होतो मजूरांना पोटभर खाऊ घालतो यापेक्षा नर्मदा परिक्रमा काही वेगळी नाही .
‌ कोणत्याही तिर्थक्षेत्राला जायच गरज संपली आहे. आपल्या सभोवती अनेक मार्ग आहेत पूण्य पदरात घेण्याचे. त्यापैकी कुठल्याही मार्ग निवडून आपल्याला परमेश्वरजवळ पोहचता येईल. व्रुक्ष बोलताहेत, पक्षी कुजन करताहेत, पर्यावरण सुधारतय , मानवाला घरी असणाऱ्या अल्प सामग्रीवर गूजरान करता येते हे शिकतो व हे चित्र आशादायी आहे. आपल्या सभोवती एखादा दानवी अंश असेल पण मानवी अंश अधिक आहेत म्हणू हे जग उत्तम चाललयं.परंतु हा एखादा दानव मोठा पराक्रम करू बघतोय मानवाला संपविण्यचा. तरीही मानवाजवळची शक्ती मोठी आहे ती शक्ती आहे भूतदया,परोपकार हे अवजड वाटणारे शब्द असले तरी या संकटसमयी त्याचा अनुभव येतोय .
‌मी एक व्हिडिओ बघितला त्यात एक शेतकरी म्हणतो या परिस्थितीत शेतकरी श्रीमंत आहेत. शेतकरी कुणाच्या दारात मागायला जात नाही. इतर नोकरदार मंडळी स्वगृही परत गेली पण शेतकरी गेला नाही. त्यांच म्हणंन काही अंशी खरे आहे. परंतु नर्सेस, डॉक्टर, औषधं, वेंटीलेटर्स, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतलेल्या आरोग्य वर्धक तपासण्या, चाचण्या, शस्त्रक्रिया या सर्वांसाठी तंत्रज्ञानाचे शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, नवे मेडिकल सायन्स हे ही गरजेचे नाही का? मग विद्यार्थी परदेशात शिकायला जाणार नाही का? वैश्विक देवाणघेवाण, व्यवहार, आयात निर्यात सर्व गरजेचेच आहे.
‌ मात्र अतिरेकी वापर हा घातक आहे. कुठलाही अतिरेक हा विनाशकारी आहे . मग तो विचार असो, वापराचा असो, भौतिक सुखसुविधांचा असो, धर्माचा असो वा राजकारणाचा. सद्भावनेचा अतिरेक विश्व जवळ आणू शकतो, विश्वात प्रेम निर्माण कररू शकतो .
‌विश्व जवळ येणे म्हणजे प्रवासाचे अंतर कमी करणे नव्हे, देशाच्या सीमा जवळ येणे नव्हे, प्रवासाची साधने उपलब्ध होणे नव्हे तर विश्वातील मानव सम्यक विचारांनी, आशावादी विचारांनी जवळ येणे असा आहे. कदाचित हे शिकण्यासाठीच असेल ही संधी आपल्याला तर जरूर शिकून घेऊया.
‌मी म्हणजे पूर्ण नव्हे तर जग आहे म्हणून मी आहे हेच वास्तव आहे. या क्वारनटाईन मध्ये मला काय समजले असे जर कुणी विचारले तर मी हेच सांगेन की मला सगळ्यांची गरज आहे. निसर्गाची, आप्तांची, समाजाची, देशाची, जगाची . या सगळ्यांशिवाय मला काही मूल्य नाही. मला हे विलगीकरण नकोय .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

+1

+ve

आवडले.

आत्ता एक विचार करायला लावणारा व्हिडिओ पाहिला.ज्यामध्ये सांगितले आहे की निसर्गाला आपली अजिबात गरज नाही.आपण फक्त पाहुणे आहोत.पण माणसाने सर्व मर्यादा ओलांडल्या मुळे निसर्गाने आपल्याला शिक्षा म्हणून घरात डांबले आहे.

The W S A F E are fine without you.
W - Water
S - Sky
A - Air
F - Fire
E - Earth
We are Guests to this world.