डोझम्माचे बारसे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

बंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील!! बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...

... आणि तिथल्या वास्तव्यानंतर परत एकदा बंगळुरुला येण झाल. तरी, ब्रिटनला जाण्याआधी साताठ दिवस बंगळुरुमधे राहिले होते. लवकर सकाळी ऑफ़िसला पळायचे अन उशीरा घरी... बर, मधे आठच दिवस होते म्हणून कंपनीने रहायची सोय केलेली होती. कारण राणीच्या देशात बरेच दिवस ठिय्या असणार होता, मग उगाच इथे मी घर भाड्याने घेऊन रिकाम्या घराचे भाडे भरणार नाही असे सांगितले होते कंपनीला आधीच!! पुणेरीपणा कामी येतो तो असा!! ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल!! ते नंतर.

तर तेह्वा, बंगळुरूमधे इतके सारे अनोळखी, अन रोज रात्री घरी जाताना इतका बदाबदा पाऊस कोसळायचा, की रस्त्यांच अनोळखी रुप अजूनच अनोळखी होऊन जायच... इतकी अफ़ाट तुंबलेली रहदारी असायची की खोलीवर पोहोचेपर्यंत, खूपच उशीर व्हायचा, मग कुठल जेवण अन कसल काय... इथे पाऊस पडायचा अन तिथे माझ्या डोळ्यातून बर्‍याचदा धारा... त्यामुळे एका अर्थी ब्रिटन मधे जाणार हे बरेच वाटले. सगळी सोय तर केलेलीच असते, रहायची, ऑफ़िसला ये जा करण्याची आणि आपापल्या टीमचे कलीग्ज असतातच. सगळेच घरच्या आठवणीने व्याकुळलेले.... त्यामुळे असेल, पण एकमेकांना अगदी सांभाळून घेत असतात. कालांतराने तिथलं काम संपल आणि परत एकदा बंगळुरुचा विमानतळ दिसला.

एव्हाना, रहायच्या जागेचा प्रश्न सुटला होता. लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खर तर घर बघितल आणि एकदम आवडलच!! अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही!! पण कधी कधी खूप कंटाळाही यायचा. किराणा आणि एक बेकरी घराजवळच होती म्हणून बर. पटकन काही हव असल तर जाउन आणायला वगैरे. तशी सोय लागली होती आता.

एके दिवशी अशीच नेहमीप्रमाणे, काही वाणसामान आणायला गेले होते, अन पहिल्यांदा ती दिसली. एकतर कुत्रा हा प्राणी फक्त लाड करायच्या योग्यतेचा आहे हे माझ मत!! मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू!! मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या!! अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत!! हिला मराठी समजेल का??

तरी म्हटलच तिला, काय ग सोने, कशी आहेस ग? आणि चक्क आली की बया शेपटी हलवत!! मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर? पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार? सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया!! मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी! बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या. परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा?? काय पण लोक असतात!! असो.

आणि मग एक दिवस बया चक्क अवघडलेल्या चालीने आणि बाळं भरल्या पोटाने हजर की!! तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर. अंगावर उड्या काय, पायातून मधूनच नाचायच काय अन असच बरच काय काय.... ऑफ़िसला जाताना ठराविक अंतरावर सोडायला यायची अन परत जेह्वा मी येत असे, तेह्वा एका ठराविक जागी बसून माझी वाट पहायची. मग जरा अंगावर उड्या अन मग इमारतीच्या खालच्या गेटपर्यंत सोडायला यायची. रिकाम्या अंधारभरल्या घरात शिरण पण सुखावह करून टाकल होत बयेन. मग गरोदर झाली तशी, अवखळपणा ही कमी झाला. मग, अगदी जबाबदार व्यक्तीप्रमाणे मला सोबत करत असे.

आणि मग एक दिवस आली की परत एकदा समोर, दोन छोटे छोटे लुटलुटणारे गोंडस गोळे घेऊन!! भलतीच धमाल मग!! बया आपली सतत पहुडलेली, पडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण वगैरे... बच्चे कंपनी पण अगदी आईचाच कित्ता गिरवत!! दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वाट्ट तिने!! ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम! तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते!! इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त. पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती, मग तसेच साजरे नाव नको का? आणि एकदम तिच्याच सततच्या डुलकण्याच्या सवयीवरून एक नाव सुचले, डोझम्मा!!

आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!!

आहे की नाही गंम्मत??

आता यांच्या गमती जमती अन डोझम्माचे आईपण परत कधी तरी.

विषय: 
प्रकार: 

सून्दर लीहीलेयस.

तशी कूत्र्यांची मला भिती वाटते पण डोझम्मची नाही वाटतेय.

लेखाची सुरुवात वाचली तेन्व्हा मला वाटल की ते प्रवास वर्णन लीहीतेयस. (तू खूप छान लीहीशील प्रवास वर्णन खात्री आहे माझी) पण लेख आवडला एकंदरीत.

अरेच्चा हे तिकडे बघितल होतं पण वाचलच नव्हतं, मस्त ग.

आय टी,
सुटलीच आहेस तू. मज्जा आली वाचून. डोझम्मा-नाव पण मजेशीर आहे.

छान लिहिलयस नेहमी प्रमाणे. मला वाटल कुणा बंगळुरी शेजारणीच्या मुलीच बारसं ... तिसर पिल्लु असत तर त्याच काय बर नाव ठेवल असतस.... डो.....?

मी सांगत्ये. तिसर्‍या पिल्लचं नाव.... डोसा, डोनट... डोपी... Happy
डोझम्मा- काय मस्तं नावय! लिहिलयस पण छानच.

केदार, श्यामली, चिन्नु, कांत थँक्स!! Happy
दाद, आता परत डोझम्माला पिल्ल झाली तर लक्षात ठेवीन मी ही नवी नाव!! मस्तच आहेत! ड ची बाराखडी!! Happy