गाभ्रीचा पाऊस - बावनकशी सोनं!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

रस्त्यातून चालताना हलकेच ठेच लागावी आणि ज्यामुळे ठेच लागली तिथे उकरुन पहावं तर बावनकशी सोन्याची वीट सापडावी असंच काहीसं माझ्या बाबतीत नुकतंच झालं. लॅास एंजेलिसच्या भारतीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट बघायला गेलो अन् जसजसा गाभ्रीचा पाऊस समोर उलगडत गेला तस तशी जाणीव होऊ लागली - हे काहीतरी विलक्षण आहे.

जेव्हा पहिल्यांदा गाभ्रीचा पाऊस हे नाव ऐकलं तेव्हा काहीच बोध झाला नाही. पण नंतर कळलं की गाभ्रीचा... ही वऱ्हाडीतील एक शिवी आहे. आपण गाढवीचा... किंवा रांxx म्हणतो तशीच. चित्रपटाची सुरुवातच होते ती एका शेतकऱ्याच्या आत्महत्येने. ती आत्महत्या पाहून शेजारच्या अलकाचा जीव टांगणीला लागतो. तीचा नवरा - किस्नाही कर्जबाजारी शेतकरी असतो. किस्नाही असंच काहीतरी करायला नको म्हणून ती आपल्या मुला आणि सासूकरवी नवऱ्यावर पाळत ठेवते. इकडे किस्नाचा संघर्ष चालू असतो. कापसाच्या दलालाच्या कर्जाखाली आधीच दबलेला किस्ना बायकोचे दागिन गहाण ठेवतो आणि बियाणे खरेदी करतो. पण पाऊस त्याला दगा देतो. केलेली पेरणी फुकट जाते. ईकडे त्याची बायको नाना तऱ्हेने त्याचं मन रिझवण्याचा प्रयत्न करते. त्या प्रयत्नात ती प्रेक्षकांना हसवतेही. आजूबाजूला आत्महत्या चालू असताना घरी उधार जिन्नस आणून पुरणपोळ्या करते. शेवटी नवऱ्याने काही बरंवाईट करुन घेऊ नये म्हणून स्वतःचे दागिने विकते आणि पुन्हा बियाणं खरेदी करते. पावसावर अवलंबून रहायला नको म्हणून किस्ना यावेळी बोअरवेलचं पाणी वापरायचं ठरवतो. मोटरने शेताला पाणी द्यायचा प्रयत्न करतो. पण १६ तास लोडशेडींगने ग्रस्त असलेल्या विदर्भात ते सुखही किस्नाच्या नशिबी नसतं. पुढे या किस्नाचं काय होतं हे पहायला मात्र हा चित्रपट बघणे आवश्यक आहे.

विदर्भातील एका खेड्यात चित्रीत केलेल्या ह्या चित्रपटाची फ्रेम न् फ्रम जिवंत वाटते. मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाबाबत वाचलंय, अनेक लघुपट बघितले आहेत. यापूर्वी मला ते पाहून वाईटही वाटलंय परंतु हा चित्रपट मात्र काळजाला हात घालतो. अजिबात न ररडवता आणि वेळप्रसंगी हसवून विनोदाचा आधार घेऊन हा विषय ईतका परिणामकारकरित्या मांडलेला मी आजपर्यंत पाहीलेला नाही. मुंबई-पुण्यात किंवा लॅास एंजेलिसमध्ये बसून ऐषआरामी आयूष्य जगताना केवळ ५००० रुपयांसाठी वणवण भटकणाऱ्या ह्या शेतकऱ्यांचं खरं आयुष्य कसं असेल ह्याची कल्पना ह्या चित्रपटामुळे आपल्याला येते.

सोनाली कुळकर्णी (अलका) आणि गिरीश कुळकर्णी (किस्ना) यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिली आहे. ज्योती सुभाष, वीणा जामकर आणि बालकलाकार अमन अत्तार यांनीही त्यांना छानच साथ दिली आहे. हा चित्रपट ज्यांच्या लेखणीतून उतरला आहे ते या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सतीश मनवर आणि चित्रपटाचे निर्माते प्रशांत पेठे यांच्याशी बोलण्याची संधी मला चित्रपट पाहील्यावर मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात - जिथे आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे - वाढलेल्या सतीशनी आपल्या अवतिभवतीचं विश्वच या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपुढे आणलं आहे. पुणे विद्यापीठातून नाट्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मनवरांनी सुरुवातीला आपले अनुभव नाटकाच्या माध्यमातून मांडले. आपल्या पूर्वायुषातील अनुभव गाठीला असूनही मनवरांनी या चित्रपटासाठी सुमारे बर्षभर संशाधन केले. विदर्भातील गावागावात फिरुन तेथील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांची गाणी, त्यांची बोली या चित्रपटात तशीच्या तशी यावी म्हणून प्रयत्न केले. सुमारे ४ वर्षापूर्वी पटकथा लिहून तयार असतानाही या चित्रपटाला हात लावायला निर्माते तयार नव्हते. ३ वर्षे सतत प्रयत्न केल्यावर सतीश मनवरांना प्रशांत पेठे भेटले. प्रशांत पेठ्यांनी यापूर्वी वळू या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पटकथा वाचून पेठ्यांनी हा चित्रपट करायला लगेचच होकार दिला.

मनवरांशी गप्पा मारताना त्यांनी या चित्रपटाविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट केली. भारताची आर्थिक प्रगती होत असताना एकाच देशात एक पिछाडलेला भारत आणि एक संपन्न भारत कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचं ते म्हणाले. या चित्रपटातील विनोद आपल्याला पहिल्यापासूनच गृहीत असून तो लोकांवर आघात करणारा असं ते म्हणाले. कुठलाही संदेश देण्यापेक्षा प्रेक्षकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलं.

सतीश मनवरांच्या या अपत्याला महाराष्ट्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला ६ व्ही. शांताराम पुरस्कारही मिळाले आहेत. पुणे, रॅाटरडॅम आणि लॅास एंजेलिसच्या चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटाला दरबान, डब्लिन, स्वित्झर्लंड येथील चित्रपट महोत्सवातूनही आमंत्रण आले आहे. या महोत्सवांमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकेल यात काहीच शंका नाही.

प्रशांत पेठे गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात आहेत. सामाजिक प्रश्नाची जाणीव करुन देताना उत्कृष्ट मनोरंजनात्मक मूल्ये असलेला हा चित्रपट आपल्याला लवकरच बघायला मिळो हीच सदिच्छा.

विषय: 
प्रकार: 

>सतीश मनवरांच्या या अपत्याला महाराष्ट्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला.
>प्रशांत पेठे गाभ्रीचा पाऊस हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात आहेत

आता हसावं का रडावं कळेना.. म्हणजे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच हे पुरस्कार कसे काय मिळतात बा..? ह्यो नक्की "कसला" पाऊस आहे...?

तळीराम
तुम्ही हा लेख पूर्ण वाचला नाही का? ह्यो नक्की कसला पाऊस हाय ते लेखात लिवल्यालं हाय.

हं मलाही पहायचा आहे. काही परीक्षण वाचली तेव्हापासूनच पहायचं ठरवलंय. तुमचं परीक्षण वाचून आता जायलाच हवं.
~~~~~~~~~

चित्रपटाला महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत. त्याचा रिलिजशी काहीही संबंध नसतो. काहीतरी खुसपटं काढू नका.
फिल्म बघायचीये अजून पण पटकथा वाचलीये मी आणि ती उत्तम आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

>काहीतरी खुसपटं काढू नका.
खुसपटं...? वेशभूषा लेखांवर प्रतिक्रीया हवी आहे का....? Proud
"गाढवीच्या" पावसावर कोण काय खुस्पट काढणार बा...?

>>खुसपटं...? वेशभूषा लेखांवर प्रतिक्रीया हवी आहे का....?<<
काही गरज नाही. आणि त्याचा इथे काही संबंधही नाहीये.
वैयक्तिक पातळीवर उतरू नका.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चित्रपट प्रदर्शित होणं वा न होणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं त्याचा पुरस्कारांशी काहीही संबंध नाही. बरेचसे चांगले मराठी चित्रपट वितरक न मिळाल्याने कधीच प्रदर्शित होत नाहीत वा अतिशय छोट्या विभागातच प्रदर्शित होतात.
बऱ्याच चित्रपटांना या आधी असे पुरस्कार (प्रदर्शित होण्याआधी) मिळतात. केट विन्सलेट ला नुकतंच मिळालेलं आॅस्करही न प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी आहे.

लेखक दिग्दर्शक सतीश मनवर आणि प्रशांत पेठे यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
http://mmla.org/Manthan/Manthan.html

वैभव सही लिहीलं आहे ! हा चित्रपट पहायला हवा असे वाटतेय! Happy

अवांतरः 'पिछाडलेला' हा हिंराठी शब्द चांगलाच रुळला आहे असे दिसते. 'पत्र नव्हे कुत्रं' च्या जालावर कमीतकमी चार वेळा वापरलेला पाहिला, त्याना त्याबाबत लिहिलेही, पण त्यानीही आपली परंपरा - दखल न घेण्याची - राखली.
'मागासलेला' हा शब्द फार मागास वाटत नसेल तर वापरायला हरकत नसावी, गेला बाजार 'मागे पडलेला' म्हटले तरी चालेल.

तसेच 'उंची प्राप्त करून दिली' ऐवजी 'उंचीवर नेउन ठेवतो' अशी वाक्यरचना अधिक मराठी वाटेल.

तसेच अभिनेत्रीचे नाव 'कुलकर्णी' असावे, 'कुळकर्णी' नाही, पण नक्की माहित नाही.

(काय करणार जुनी मास्तरकीची सवय : ( )

- (बिनशेंडीचा) शास्त्री.

>>तसेच अभिनेत्रीचे नाव 'कुलकर्णी' असावे, 'कुळकर्णी' नाही, पण नक्की माहित नाही.<<
सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी पण संदीप कुळकर्णी असे कुळकर्ण्यानेच सांगितले होते एकदा. कुलकर्णी म्हणे देब्रा आणि कुळकर्णी म्हणजे सीकेपी.
असो तो हा विषय नाही. सतीशने पटकथा उत्तम लिहिली होती.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नी,

आपल्याला जात बित काही समजत नाही आणि त्याची काही खंतही नाही. (कुलकर्णी की कुळकर्णी हा फरक जी. ए. ना ही अनेकदा लक्षात आणून द्यावा लागत असे. पहा. जी. एं. ची पत्रे. म्हणून इथे लक्षात आला इतकेच) आपण फक्त अचूकतावादी (कृपया मला 'अमीर' म्हणू नका हो, प्लीज प्लीज प्लीज). आमचे नाव रेल्वे रिझर्वेशन वर 'रघव' लिहिलेले पाहून आमचा रक्तदाब दुप्पट झाला होता.

(बिनशेंडीचा!!!)

-शास्त्री.

खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद!!!!!