तेथे कर माझे जुळती

Submitted by nimita on 10 April, 2020 - 05:38

An apple a day keeps doctor away. हे वाक्य आपल्यापैकी प्रत्येकानीच ऐकलं आहे. आम्ही कॉलेज मधे असताना याच्या पुढे अजून एक वाक्य जोडायचो...If the doctor is handsome - keep the apple away. ...

यातला विनोदाचा भाग सोडला तर या जगात येणाऱ्या, आलेल्या आणि जायच्या मार्गावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 'डॉक्टर' नामक देवदूताची गरज भासते. तसं पाहता आपल्या प्रत्येकाच्या आत एक so called doctor लपलेला असतो. आणि जेव्हा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींपैकी कोणी आजारी आहे असं कळतं तेव्हा तो आपल्या आतला डॉक्टर खडबडून जागा होतो आणि न मागितलेले फुकटचे सल्ले द्यायला सुरुवात करतो... पण जर यदाकदाचित स्वतःला कधी डॉक्टर ची गरज भासली तर मात्र तो 'आतला' डॉक्टर अगदी सोयीस्कर रित्या कुठेतरी दडी मारून बसतो आणि आपण निमूटपणे खऱ्या खुऱ्या डॉक्टररूपी देवदूताकडे धाव घेतो.

आपल्या प्रत्येकाच्या घरात एक आजीबाईचा बटवा असतो; आणि त्यात हळद, मिरे, लवंगा, जिरे, हिंग, गाईचं तूप, मध, चंदन, कापूर या आणि अशा अगणित अनमोल औषधांबरोबरच आपल्या पूर्वजांचा अनुभव आणि त्यांचं अगाध ज्ञान देखील एकवटलेलं असतं. पण या बटव्याच्या देखील काही मर्यादा आहेत. आणि म्हणूनच आपल्याला डॉक्टर किंवा वैद्य यांची गरज भासते. माझ्या माहेरी माझे मोठे काका, माझी मोठी बहीण आणि माझा चुलत भाऊ असे तीन आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हणजेच वैद्य असल्यामुळे मी आयुर्वेद ऐकत ऐकत मोठी झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यात भर म्हणून- माझा मामा ऍलोपथी चा डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी माझा तसा जवळचा संबंध. आमच्या घरी सूतशेखर मात्रा आणि डिस्प्रिन ,त्रिफळा चूर्ण आणि परगोलॅक्स , बेनाड्रिल सिरप आणि अशोकारिष्ट अशी सख्खी चुलत भावंडं एकाच कपाटात अगदी गुण्यागोविंदानी नांदायची.

माझ्या बाबतीत डॉक्टरशी संबंधित पहिली आठवण अजूनही माझ्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे दिसते मला - तेव्हा मी पाच सहा वर्षांची असेन कदाचित... मी आणि माझा लहान भाऊ आमच्या सदाशिव पेठेतल्या जोशी वाड्यातल्या (दिवेकारांच्या) घरात स्वैपाकघरात बसून जेवत होतो. पूर्वीच्या काळचा दगडी वाडा होता तो. त्यामुळे आत्तासारखं 'ओट्याला जोडून सिंक आणि त्यातल्या नळाला चोवीस तास पाणी' असे लाड नव्हते तेव्हा. तर त्या दिवशी आम्ही जेवत असताना आमची आई बाहेरच्या मोरीत भांडी घासत होती. आणि आम्हांला आमची उष्टी ताटं तिला नेऊन द्यायची होती. काम खरं तर किती सोपं होतं. पण माझ्या सुपीक डोक्यातून एक भन्नाट कल्पना निघाली. मी माझ्या भावाला चॅलेंज केलं की आपण दोघं रेस लावू या ; जो आईपाशी आधी पोचेल तो जिंकणार. मग काय आम्ही दोघंही जीवाच्या आकांतानी पळत सुटलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी कोलांट्या उड्या मारत समोरच्या चौकातल्या अंगणात जाऊन पडले आणि त्या सगळ्या गोंधळात तिथे पडलेल्या एका तुटक्या शहाबादी फरशीवर माझं डोकं आपटलं. खूप मोठी खोक पडली होती... जखम अगदी खोलवर पोचली होती.... खूप रक्त वाहात होतं. माझी आई मला घेऊन थेट माझ्या डॉक्टर मामाच्या क्लिनिक मधे पोचली. त्यांचं दोघांचं काहीतरी बोलणं झालं... त्यातून मला एवढंच ऐकू आलं की 'जखम खूप खोल आहे... टाके घालावे लागतील.' मला स्ट्रेचर वरून आत नेत होते. अगदी सिनेमात दाखवतात तसा सीन अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे...माझी आई ऑपरेशन थिएटर च्या दारात उभी होती आणि मी तिच्यापासून लांब लांब जात होते ...एकीकडे 'आईकडे जायचंय ' चं पालुपद चालूच होतं. काही मिनिटांतच मामा माझ्या जवळ आला आणि म्हणाला," आईकडे जायचंय ना मग आता डोळे बंद करून झोप बघू." आणि मला काही कळायच्या आत त्यानी मला भूल दिली. बस्, ती आठवण तिथेच संपली. पण आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा माझ्या कपाळावर त्या टाक्यांचे व्रण अजूनही आहेत. In fact, कोणताही फॉर्म भरताना identification marks मधे मी 'stitch marks on forehead' असं अगदी अभिमानानी लिहिते.

आत्तापर्यंत आयुष्यात वेळोवेळी आणि पदोपदी डॉक्टर्सची गरज भासली... कधी स्वतःसाठी यर कधी जवळच्या जिवाभावाच्या लोकांसाठी. कितीतरी वेळा आणीबाणीच्या परिस्थितीतून बाहेर काढलंय या देवदूतांनी ! किती किती आणि काय काय सांगू ? पण इतक्या सगळ्या अनुभवांनंतर एक गोष्ट जाणवली...हे डॉक्टर्स आपल्यासाठी जरी देवदूत असले तरी शेवटी तेही आपल्यासारखेच आहेत, त्यांनाही मन आहे, भावना आहेत. एखादा पेशंट बरा होऊन जेव्हा घरी परत जातो तेव्हा त्यांनाही तितकाच आनंद होतो. पण जेव्हा त्यांना एखाद्या पेशंटच्या नातेवाईकांपाशी जाऊन 'I am sorry' हे तीन शब्द म्हणावे लागतात तेव्हा त्यांनाही तितकाच त्रास होतो, त्यांचेही डोळे पाणावतात. तेव्हा त्यांना वाटणारी असहायता त्यांच्या हताश नजरेतून समोरच्यापर्यंत पोचते.

मी अनुभव घेतलाय डॉक्टरच्या या अगतिकतेचा ! आपण आपल्या 'गेलेल्या' प्रियजनांच्या दुःखात सगळं काही विसरून जातो; पण त्या डॉक्टरला मात्र त्याचं दुःख बाजूला ठेवून इतर पेशंट्स साठी पुन्हा सज्ज व्हायलाच लागतं.

याउलट माझ्या दोन्ही डिलिव्हरीज च्या वेळी "बधाई हो। बहुत सुंदर बेटी हुई है।" असं म्हणत एका छोट्याशा जीवाला माझ्या कुशीत ठेवताना लेबर रूम मधल्या त्या डॉक्टर आणि नर्सेसना पण त्या नव्या जीवाच्या आगमनाची तेवढीच खुशी झालेलीही बघितलीये मी. माझ्या त्या अनमोल क्षणांचे साक्षी होते ते देवदूत !

तीन चार दिवसांच्या तान्ह्या बाळांना BCG चं इंजेक्शन देताना त्यांना 'सॉरी बेटा' म्हणणारे डॉक्टर बघितले आणि  ते डॉक्टर सुद्धा त्या बाळाइतकेच निष्पाप वाटले मला.

सृष्टी जेव्हा चार पाच वर्षांची होती तेव्हा तिला एका रात्री अचानक ताप भरला आणि बघता बघता तो इतका वाढला की आम्ही हॉस्पिटलमधे पोचेपर्यंत ती भ्रमात जाऊन चक्क चक्क nursery rhymes म्हणायला लागली. तिच्यावर तेव्हा इमर्जन्सी मधे उपचार करणाऱ्या डॉक्टरनी दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मुद्दाम फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी केली तेव्हा त्या दूर देशीसुद्धा मायेचं माणूस भेटलं मला!

ऐश्वर्या पहिलीत असताना एकदा तिच्या तळहातात पेन्सिलचं lead घुसलं होतं ... आणि तेही अगदी खोलवर. त्यावेळी तिच्याशी एखाद्या मित्राप्रमाणे गप्पा मारत, तिला गमतीजमती सांगत तिचं लक्ष दुसरीकडे वेधून हळूच तिच्या हातातलं ते lead काढणारा तो नर्सिंग असिस्टंट - मलाच काय पण ऐश्वर्यालाही आठवतो अजून ! त्या दिवशी तिच्या डोळ्यांतले अश्रू पुसत तो म्हणाला होता," आप तो अपने पापा के जैसी ही ब्रेव्ह हो।" त्याच्या त्या एका वाक्यानी ऐश्वर्या तिचं दुःख, तिचं रडणं विसरली होती. माझ्या मुलीचया चेहेऱ्यावर हसू फुलवणाऱ्या त्या देवदूताला कशी विसरू शकेन मी !

माझ्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट च्या काळात तर मी असे कितीतरी देवदूत बघितले... त्यात फक्त डॉक्टर्स नव्हते.. नर्सेस, लॅब टेक्निशियन्स, ward boys आणि तिथल्या आया ... ही सगळी पण तर देवदूतांचीच रूपं आहेत ! त्या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं मला .. हॉस्पिटल मधल्या एका नर्सच्या तीन चार वर्षांच्या मुलाला रेटिना चा कॅन्सर होता. एकीकडे त्याची केमोथेरपी चालू होती आणि त्या परिस्थितीत देखील ती नर्स माझी आणि माझ्यासारख्या अनेक पेशंट्स ची सेवाशुश्रूषा करत होती. आपलं दुःख बाजूला ठेवून इतरांचं दुःख कमी कसं करावं हे शिकवलं तिनी मला!!! ' निष्काम कर्मयोग ' म्हणतात तो हाच असावा बहुतेक !!!

"मेमसाब, डॉक्टर जितक्या केमोथेरपी घ्यायला सांगतील तेवढ्या सगळ्या घ्या तुम्ही....कितीही अशक्तपणा आला तरीसुद्धा....काळजी करू नका, मी राहीन प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर," असं पोटतिडकीनी सांगणारी वॉर्ड मधली आया अगदी आईच्या मायेनी माझी काळजी घ्यायची.

पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमधे मला आलेल्या बऱ्याच अनुभवांपैकी एक इथे सांगावासा वाटतो. मी माझं ब्लड सॅम्पल द्यायला तिथल्या लॅब मधे गेले असताना तिथे अजून एक माणूस होता, त्याला सुद्धा कॅन्सर डिटेक्ट झाला होता; आणि तो मनानी अगदी खचून गेला होता. त्याच्या चेहेऱ्यावर त्याची ती पराजित झाल्याची भावना अगदी स्पष्ट वाचता येत होती. तेव्हाचं तिथल्या टेक्निशियनचं बोलणं अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे माझ्या....in fact आत्ता लिहिताना सुद्धा त्याच्या आवाजात मला ते ऐकू येतंय- इतकं बिंबलं आहे ते माझ्या मनावर ...तो टेक्निशियन म्हणाला होता,"इस हॉस्पिटल में आके तुमने सबसे अच्छा काम किया है। अब सारी चिंता छोड दो.. सिर्फ यहाँ के डॉक्टर्स पे भरोसा रखो... ये लोग तुम्हे मरने नहीं देंगे।" त्याच्याही नकळत त्यानी तिथे असलेल्या प्रत्येकाला मनातल्या विश्वासाची ताकद समजावून सांगितली होती. त्याच्या तोंडून देवच बोलत असल्याचा भास झाला होता मला क्षणभर....'सारी चिंता छोड दो और डॉक्टर्स पे भरोसा रखो' ... म्हणूनच डॉक्टरच्या रुपात देव दिसतो का सगळ्यांना ?

त्याच दरम्यान मला जेव्हा severe dehydration होऊन माझी तब्येत ढासळत होती तेव्हा रात्रभर माझ्या उशाशी बसून राहिलेले माझे मेडिकल स्पेशालिस्ट आणि तेव्हाची ड्युटी वरची नर्स....

माझ्या सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी माझा हात धरून मला हळूहळू चालवत घेऊन जाणारे खुद्द माझे सर्जन....

किती किती रुपात भेटतो देव आपल्याला !

आपल्याला जसे आपले हे तारणकर्ते लक्षात राहतात तसेच त्यांना पण त्यांचे पेशंट्स लक्षात असतात बरं का ! आणि याचा अनुभव मी घेतलाय.. माझी ट्रीटमेंट २००६ साली संपली, त्यानंतर तब्बल बारा वर्षं माझ्या डॉक्टर्स बरोबर माझा काहीही कॉन्टॅक्ट नव्हता.. कारण त्यांचीही बदली झाल्यामुळे ते पुण्याहून कुठे गेले याचा शोध लावणं अवघड होतं. पण २०१८ मधे मला कळलं की माझे मेडिकल स्पेशालिस्ट (oncologist) पुन्हा पुण्यात आले आहेत. मीही तेव्हा पुण्यातच होते. मी त्यांना भेटायला जायचं ठरवलं. ते मला ओळखतील का याबद्दल शंका होती; पण मला बघितल्या बघितल्या त्यांनी मला ओळखलं आणि नुसतं ओळखलंच नाही तर त्यांना माझं नाव, माझी केस हिस्ट्री, माझी ट्रीटमेंट सगळं सगळं लक्षात होतं... आणि हाच अनुभव काही दिवसांनंतर माझ्या onco surgeon बरोबर पण आला. ती फीलिंग इतकी शब्दातीत होती .. जणू काही आमच्यात एक दैवी कनेक्शन असल्यासारखी!

तर असे हे देवाचा वरदहस्त लाभलेले दिव्यात्मे.... त्यांना माझे शतशत प्रणाम !!!

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.. आत्ताच्या कठीण परिस्थीतीत देखील कुटुंबापासुन दूर स्वतःचा जीव धोक्यात घालुन डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज, हॉस्पिटल्स मधे काम करणारे एकुण एक वर्कर ला सलाम करावासा वाटतो.

Masta lihilay!
आत्ताच्या कठीण परिस्थीतीत देखील कुटुंबापासुन दूर स्वतःचा जीव धोक्यात घालुन डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज, हॉस्पिटल्स मधे काम करणारे एकुण एक वर्कर ला सलाम करावासा वाटतो ->>>agdi khara