नवी सुरूवात

Submitted by अजय चव्हाण on 8 April, 2020 - 02:08

लीकडे मसाणवट्यात प्रेत जळत होतं. लाकड्यांच्या त्या ढिगांतून प्रेताचा अस्पष्ट चेहरा अर्धवट जळालेल्या मानेमुळे खालच्या बाजूला थोडा झुकला होता. हारतुरे आणि कोरं करकरीत शुभ्र कफन केव्हाच जळून काळपट भासतं होतं. अग्निज्वाळाच्या उसळीतून काळा धुर हलकेच वर येऊन वातावरणात पसरू पाहत होता. त्या धुराबरोबर एक प्रकारचा तीव्र वास चहूबाजूला पसरून आपलं नव्याने उदयास आलेलं अस्तित्व दाखवून देत होता. आजूबाजूला जमलेली माणसं नाकातोंडाला रूमाल लावून मूकपणे थोडसं दुर निमूटपणे वाट पाहत उभी होती. तेवढ्यात पुढे असलेल्या म्हातार्या तात्यानं थोडसं राॅकेल शय्येवर झिडकारलं तशा अग्निज्वाळा आणखीनच उग्र होऊन वर वर उसळी मारत होत्या. जास्तीच्या पेट घेतलेल्या ज्वाळांमूळे वरच्या थरावर लावलेल्या कोवळया काटकुळयांचा जळतानाचा "कड् कड्" असा बारीकसा आवाज येत होता. एकाएकी ज्वाळांची गती वाढीस लागली. लाल-भडक, केशरी अशा त्या ज्वाळा जलद गतीने पसरू लागल्या. चेहर्यापर्यंत पसरलेल्या ज्वाळांमधून चेहर्यावरची कातडी वितळू लागली. हळूहळू संपूर्ण कातडी वितळून फक्त कवटी तेवढी शिल्लक राहीली. गरम भट्टीत लोखंड तापावं तसं कवटी आता तापू लागली. पांढरी, कळपटं,थोडीशी लालसर कवटी त्या आगीत धगधगत होती. आगीच्या वाढत्या दाबाने कवटीला तडे जाऊ लागले आणि एका क्षणात "फाट्ऽऽऽ" असा जोराचा आवाज येऊन कवटी फुटली. कवटी फुटली आणि सगळ्यांनीच निश्वास सोडला. जमलेली लोक शेवटचा नमस्कार करून उद्विग्न मनाने हळूहळू चालत गावात परतू लागली.

गावातल्या एका अरूंदशा वाटेवर डाव्या बाजूला कडूलिंबाचं झाडं होतं आणि त्याच झाडाच्यापल्ल्याड असलेल्या झोपडीत आज शोककळा पसरली होती. झोपडीत फारशी जागा नसल्याने लिंबाखाली माणसं जमा झालेली. झोपडीत आणि झोपडीबाहेर बाया जमल्या होत्या. झोपडीतल्या एका कोपर्यात "रज्जू" पाय दुमडून बसली होती. रडून रडून डोळ्यांतलं पाणी केव्हाचं आठलं होतं. आता नुसतेच सुकलेल्या ओठांतून सुके हुंदके दाटून येत होते. डोकं जडं होऊ लागलं होतं. मेंदूला झिणझिण्या येत होत्या. मनात येणारे असंख्य विचार थांबता थांबत नव्हते. तिच्या नशिबाचे भोग संपता संपत नव्हते. नवरा गेल्याच्या दुःखापेक्षा तिला भविष्याची चिंता सतावत होती. पदरात दोन मुली. त्यातली एक जन्मतः आंधळी. नवरा होता तो फक्त तो नावालाच.

नपुसंक साला! बाईलवेडे चाळे करायचा. गावभर हिंडण आणि कुठल्यातरी दारूड्याखाली झोपणं इतकंच काय त्याचं कर्तृत्व. पदरात दोन मुली दिराकडून झालेल्या.
दिर समजूतदार होता पण त्याखाली झोपणं म्हणजे..?
पण काय करणार रोजची "त्या"साठी होणारी मारहाण आणि शरीराची भूक सहन होईना म्हणून कशीबशी तयार झालेली. दिराच मन भरलं तसा तोही निघून गेला मुंबईला. शिकून मोठा ऑफिसर झाला म्हणे. ह्या पाच वर्षात कधी फिरकलाच नाही. ना त्याचा ठाव ना ठिकाणा. नवरा कसाही होता तरी कुंकवाचा धनी होता आणि कसंबसं घर तरी चालवत होता.
आता कुणाकडे पाहायचं?? विचारांच्या गर्दीत "रज्जू" हरवत चालली होती. कसलं हे आयुष्य आणि कुठे घेऊन जाणार आहे हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक.

हळूहळू जमलेली माणसं पांगू लागली. इतकावेळ माणसं जमली होती म्हणून थोडा दिलासा मिळालेला. आता ही रात्र नुसतीच भकास आणि उदास वाटतं होती. शेजारची पारू बेसन आणि चार भाकर्या देऊन गेलेली. खायची इच्छा जरी नसली तरी काहीतरी ढकलावं लागणारचं होतं. दोन्ही पोरींना खायला घालून कशीबशी तिने अर्धी भाकर खाल्ली आणि नुसतीच जमिनीवर पडून राहीली. पोरी लगेचच झोपल्या. पडलेल्या आढ्याकडे एकटक बघत पुन्हा ती विचारगर्तेत हरवत चालली होती आणि ह्याच विचारात कधी थकून तिचा डोळा लागला हे तिचं तिलादेखिल कळलं नाही.

पंधरा दिवस असेच लोटले. पंधरा दिवसासाठी का होईना गावाने तिला सांभाळून घेतलं. घरात अन्नाचा कण नसताना ती उपाशी राहीली नव्हती. नातेवाईक काय, शेजारी काय किंवा संपूर्ण गावं काय? किती दिवस करणार होते? आयुष्याचा मार्ग तिलाच काढावा लागणार होता. हे बोजड आयुष्य फेकून द्याव त्या वेशीवरच्या विहीरीच्या खोल डोहात.. असं कितींदा तरी वाटलं असलं तरी मुलींसाठी का होईना जगावं तर लागणारचं होतं. सकाळच सगळं आटपून दोन्ही मुलींना पारूकडे सोपवून "रज्जू" कामाच्या शोधात निघाली.

दिवसभर हिंडूनही कुठलचं काम हाती लागलं नव्हतं. पार तालुक्यातदेखिल जाऊन आलती. तालुक्यातल्या बाजारात जात असताना शाळेतला "म्हादया" भेटला. करतो काहीतरी बोलला. तेवढीच काय ती आशा. रात्री परतताना तालुक्याच्या मुख्य रस्त्याच्या कडेला अस्पष्ट उजेडात रांडा उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांना पाहून सरकन काटाच आला अंगावर. काही नाही मिळालं तर हेच करावं लागेल बहुदा ह्या विचारानेच तिला शिरिशिरी आली. कसलं शीलं आणि कसलं आलयं पावित्र्य पोटासाठी सगळचं माफ आणि कुर्बान. त्यांच्यात नि माझ्यात काय फरक आहे? मी तरी काय केल? दिरासोबत...?? नुसत्या त्या आठवणीनेच हुंदका आला तिला. कसंबसं भराभर चालतं तिने झोपडी गाठली.

आठवडा झाला. सरपंचाच्या ओळखीने आंधळ्या पोरीला बाफना स्कूलमध्ये टाकलं. राहायचं, खायचं , शिकायचं सगळचं संस्था पाहणार होती. धाकटीला पण तालुक्यात कन्या आश्रमात टाकलं. थोडा भार हलका झाला. नक्की भार हलका झाला होता? नाही! अजून वाढला होता. ह्याबदल्यात सरपंचाने पुरेपुर किंमत वसूल केली होती. सगळेच साल्ले हपापलेले लांडगे..

गावात परत म्हाद्या भेटलेला. एक काम हाय म्हटला पण काय काम आहे सांगाया तयारच नव्हत बेणं. उद्या तालुक्याला सरकारी हास्पिटलात भेट असं सांगून निरोप घेतला. आज पाटलाकडे कापणी केलती. कंबरडं पार मोडून गेलेतं. त्या वेदनेसमवेत रज्जू तशीच झोपी गेली

हाॅस्पिटलमध्ये एका बाकड्यावर रज्जू मुकाट बसली होती. येणारे जाणारे बाॅर्डबाॅय तिच्या पदराआड बघण्याचा प्रयत्न करायचे. अशा नजरा तिने कित्येकदा झेलल्या होत्या. सवयीने तिने पदर सारखा केला नि हाताची घडी घालून शांत बसून राहीली. मनात येणार्या असंख्य विचाराने काहूर माजलेलं. घड्याळाचे काटे आपल्या वेगाने सरकत होते. हळूहळू वेळ जरी सरकत असली तरी मनातले विचार आणि प्रश्न काही सरत नव्हते.

"साहेबांनी तुला आत बोलावलय"

म्हाद्याचा आवाज कानी पडला तशी ती भानावर आली. उठून तिने चोळामोळा झालेली साडी व्यवस्थित केली आणि म्हाद्याबरोबर आतमध्ये गेली.

साहेबांनी काही जुजबी प्रश्न विचारले. तिच्या उत्तरांनी साहेबांना एकंदरीत तिची परिस्थिती आणि गरज दोन्ही लक्षात आल्या पण ज्या कामासाठी तिची मुलाखात होतेय ते काम ती करू शकेल याची बहुदा त्यांना खात्री नव्हती पण म्हाद्यानी केलेली विनंती आणि तिची गरज दोन्ही गोष्टी लक्षात घेता काम तर तिला मिळायला हवं पण असलं काम? साहेब स्वतःशीच काहीतरी विचार करत होते इतक्यातच -

"सायब कणचं काम हाय? म्हणजे म्या बगा लादी, कपडे, भांडी वा असली समदी समदी काम करायला रेडी हाय"

हाती येत असलेलं काम जाऊ नये म्हणून हुशारीने रज्जूने विचारलं आणि त्यातूनच कुठलही काम ती करू शकते हे दर्शवलं.

साहेबांनी एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि चाचरतच विचारलं

"प्रेतांची चिरफाड करशील?"

साहेबांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नांने रज्जू अवाक झाली. क्षणभर तिच्या मनाची घालमेल झाली. नुसतं रक्त पाहून तिला शिशारी यायची. कधी कधी तर उघड्या जखमा पाहील्या तरी तिला उलट्या व्हायच्या पण शिशारी काय किंवा उलट्या काय? तोंड आणि पोट साबूत असल्याशिवाय येणार नाहीत आणि म्हणूनच चेहर्यावर कोणतेच भाव किंवा भिती आणू न देता तिने होकार दिला. साहेबांच्या मेहरबानीमुळे डीग्री किंवा कुठलाही डिप्लोमा नसताना तिची नियुक्ती करण्यात आली. प्राथमिक प्रशिक्षण आणि काही दिवसांच्या सरावांनी ती कामावर रूजू झाली.

पहिल्यांदा चिरफाड करताना प्रचंड भिती नि किळस वाटलेली पण निर्जीव देहाचं पोट समोर पाहिल्यावर तिला तिचं आणि तिच्या पोरीचं पोट आठवायचं मग येणारी शिशारी, भीती, किळस किंवा मनात उमटणार्या अशाच कितीतरी भावना दुर सारत ती पोटं फाडायची. भूकेपुढे संवेदना, सहनशीलता, भावना सगळंच नगण्य. आयुष्याच्या ह्या रहाटगाडग्यात कुणाचं तरी पोट फाडून ती तिचं पोट भरतं होती. जिथे कुणाचं तरी आयुष्य संपत तिथे तिने आयुष्याची नवी सुरूवात केली होती.

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशासाठी? पोटासाठी.

रच्याकने, असाच एक लेख वाचला होता सकाळच्या सप्तरंग पुरवणीमधे.. तो आठवला.

धन्यवाद ताई..
ही कथा आधी लिहली होती " माझ्यातली ती" ह्या अंकात प्रकाशित केलेली...

माझ्यासुद्धा वाचण्यात आली "ती" पुरवणी..योगायोगच म्हणावा लागेल.. मी कल्पलेली कथा..कुणाची तरी खरी कथा निघाली...

छान. नाईलाजाने देहविक्री करण्यापेक्षा प्रेतांची चिरफाड करून पोट भरण्याचा निर्णय आवडला.

चांगली आहे कथा.
पोस्ट मॉर्टेम ला मेडिकल प्रोफेशनल लागत नाही?म्हणजे कोणालाही ट्रेनिंग घेऊन काम करता येतं?(जेन्यूईन शंका आहे)

बापरे ! किती भयानक परिस्थिती असते काही काही जणांच्या आयुष्यात Sad
कथेचा शेवट दारुण न होता नव्या उमेदीने जीवनाकडे पाहायला लावणारा ठरला हे आवडले.

agadi shevat paryant mhadya var hi vishwas navhata.... hapaplelya landagyan madhye hi ekhada rakhandar bhetu shakto hech khare!
apratim katha.

धन्यवाद नौटंकी, अज्ञानी, पद्म, Queen उर्मिला ताई..

@me_anu प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
पी. एम. करण्यासाठी स्पेशल डिप्लोमा किंवा डिग्री असणं अनिवार्य आहे पण अजुनही काही गावात तत्सम डिग्री किंवा डिप्लोमा नसलेली लोक चिरफाड करताना पाहण्यात आली आहेत.. बहुतेक हे लोक Body Examiner च्या हाताखाली काम करतात..

@Mi_anu
डॉक्टर च तपासतात मृतदेह व internal organs . Medical knowledge शिवाय कसं काय समजणार कुठल्या अवयवात काय विकृति आहे ते! (आठवा डॉक्टर सालुंखे/डॉक्टर तारिका! ) फक्त skin cut करून organ che block dissection साठी डॉक्टर ला देणं व काम झाले की मृतदेह जैसे थे शिवणं यासाठी मदतनीस लागतो
माझ्या माहितीप्रमाणे जे बाँडी open करतात त्यांंच्याकडे कुठली degree/ diploma नसते. शिक्षणही धड नसते.
मी MD करत असताना autopsy साठी बाँडी open करून देत ते खूपच कमी शिकलेले होते. आणि त्यांना degree or diploma करायचाच असता तर logically अन्य white collar diploma केले असते..परन्तु त्या बाबतीतही बेफिकीरी. त्यामुळे गोष्टीत लिहिल्याप्रमाणे गरजू / एखाद्या विशिष्ट community मधले लोकं च हे काम स्विकारतात
एक diploma in forensic medicine अस्तो पण ते diploma धारण करणारा technician body open करून block डॉक्टर ला तपासणीसाठी देणे हे काम नाही करत. आणि BMC hospital मध्ये तर त्यांना vacancy ही नसावी.
सध्याची परीस्थिति माहीत नाही.

ओह ओके.
इतकी वाईट अवस्था आहे या प्रोफाईल ची?निदान पोटापुरते पगार तरी आहेत का?

खरचं खुप सुंदर... शेवट अनपेक्षित होता, त्याच कारण मध्यंतर मध्ये जो सरपंचाने रक्कम वसूल केली आहे तो. म्हणजे सगळे सारखे नसतात ही गोष्ट पूर्ण पटली... दोन माणसांमध्ये खूप फरक असतो हे स्पष्ट कळतंय...

मागे एका film festival मध्ये short film बघण्यात आली होती, PM वर आधारित... जे अगदीच group level ला काम करतात, चिरफाड करायचं त्यांच्यावर आधारित, तेव्हा पहिल्यांदा ह्या लोकांच्या मानसिक अवस्थेविषयी कळालं होतं.
आणि मी लहान असताना आमच्या चाळीत राहायचे एक काका ते हे काम करायचे, सो फिल्म बघितल्यावर त्यांच्यासाठी चा respect खूप वाढला होता...
पोटासाठी काय काय करावं लागत हे कोण सांगणार...

धन्यवाद अज्ञातवासी, च्रप्स, मेघा, जयश्री..

च्रप्स - रिअल लाईफमध्ये जसे अनपेक्षित अप्स -डाऊन असतात त्या हिशोबाने कथा लिहली होती.. त्यामूळे तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे...