मी आणि धर्म

Submitted by राधानिशा on 5 April, 2020 - 05:58

हिंदू धर्मात भरपूर धर्मग्रंथ आहेत , त्यापैकी एकाच्याही वाटेला मी आजपर्यंत गेलेले नाही आणि पुढेही जाण्याची इच्छा नाही , साधी सत्यनारायण कथा ऐकताना माझ्या कपाळाला आठ्या पडतात की कोणी लिहिलं आहे हे , म्हणे प्रसाद खाल्ला नाही तर रागावून नुकसान करणारा देव ... तेव्हा पुराणातल्या अमुक कर्माला अमुक शिक्षा वगैरे वर्णनं करणारे ग्रंथ माझ्या पचनी पडणार नाहीत हे उघडच होतं .. मासिक पाळीच्या काळात स्त्रीला लांब बसवावी , तिचा स्पर्श अपवित्र इथपासून नवऱ्याच्या मृत्यूनंतर केशवपन आणि सती सारख्या प्रथा असलेल्या धर्माबद्दल मला आजवर कधीच आत्मीयता वाटलेली नाही .

खरं ते प्रामाणिकपणे सांगत आहे .. काहींना राग येईल कदाचित .. पण ते पूर्ण समजून न घेता लगेच निष्कर्ष काढणारे , प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावणारे आणि नेमका गैरसमजच करून घेणारे लोक असतात , तेव्हा मी त्यांच्या मताचा त्रास करून घेणार नाही .

खरं तर धर्म म्हणजे काय , लोकांना धर्माचा अभिमान का वाटतो इतक्या बेसिक प्रश्नांचीही उत्तरं मला आजवर समजलेली नाहीत ...

धर्म ही गोष्ट लोकांना एकत्र बांधून ठेवायला मदत करते , शक्ती देते , प्रेरणा देते वगैरे काही फायदे मला समजतात .. पण हे फायदे धर्म ह्या गोष्टीने आजवर जे नुकसान केलं आहे त्याच्याशी तुलना करता केली तर कुठलं पारडं जड होईल असा प्रश्न पडतो .. धर्मावर माझ्यापेक्षा खूप अधिक जाणकार विद्वानांनी याआधीच खूप काथ्याकूट केलेलं आहे , मी आणखी काय नवीन लिहिणार आहे ? ना मी जाणकार आहे ना विद्वान , मी अडाणी धोंडा आहे असं म्हणायलाही माझी हरकत नाही .. मी फक्त माझ्या दृष्टिकोनातून जग कसं दिसतं ही एकच नवीन गोष्ट लिहू शकते .

मला हिंदू धर्माबद्दल आत्मीयता नाही असं मी म्हटलं .. पण मुस्लिम राष्ट्रात किंवा कट्टर मुस्लिम कुटुंबात स्त्री म्हणून जन्म झाला नाही याबद्दल अनेकवेळा परमेश्वराचे आभार मानले आहेत .. . स्त्री म्हणूनच का तर पुरुष म्हणूनही मुस्लिम धर्मात जन्म व्हावा अशी इच्छा नाही . कारण त्यांच्यात ब्रेन वॉशिंगचा धोका मला वाटतो , माझे स्वतःचे असे विचार , मतं कदाचित तिथे डेव्हलपच होऊ दिले जाणार नाहीत , धर्मग्रंथ आणि धर्मगुरू सांगतात तेच खरं , बाकी सब झूठ अशी दुर्दैवाने 80 % पेक्षा जास्त मुस्लिमांची मानसिकता असते .. भारतासारख्या बहुधार्मिक राष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहिलेले किंवा शिकून युरोपीय राष्ट्रात सेटल झालेले कदाचित अधिक ओपन माइंडेड होत असतील , धार्मिक बाबतीत ग्रंथप्रामाण्य न मानता स्वतःच्या डोक्याने विचार करणारे ... पण एकूण मुस्लिम लोकसंख्येशी तुलना करता त्यांची संख्या फार कमी आहे ...

हिंदू आणि इतर धर्मात ग्रंथप्रामाण्य इतका आटापिटा करून नवीन पिढीच्या गळी उतरवलं जात नाही ... स्वतः विचार करून प्रथा , परंपरा पाळायच्या की सोडायच्या , कुठल्या पाळायच्या , कुठल्या सोडून द्यायच्या हे स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणावर आहे .... त्यासाठी मला हिंदू धर्मियांचं कौतुक वाटतं .... अर्ध्यापेक्षा ब्राह्मणांनी संध्या आदीला केव्हाच रामराम ठोकला आहे , यज्ञयाग यांचं एकेकाळी असलेलं प्रस्थ खूप कमी झालं आहे , अनेक वाईट प्रथा बंद झाल्या आहेत ... मान्य आहे , सुरुवातीला कायदे करावे लागले , लोकांनी विरोधही केला .. पण आता ट्रेनमधून घरी आल्यावर बाजूला कोणत्या जातीचा माणूस बसला होता कुणास ठाऊक तेव्हा आंघोळ करून घेऊया असला क्षुद्र विचार करणाऱ्या माणसांची संख्या नक्कीच कितीतरी कमी झाली असेल , सुशिक्षित नवी पिढी मैत्री करताना जातीचा विचार करत नाही.. ज्या देशात लग्न करून देताना मुलीला आता तेच तुझं घर यापुढे इथे फक्त माहेरपणासाठी ... इथे आता तुझ्यासाठी जागा नाही तेव्हा जी काही परिस्थिती असेल तिच्याशी जुळवून घे अशी परिस्थिती होती त्या देशात लोक चक्क एकुलती एक मुलगी पुरे , जे काही आहे ते तिच्यासाठी , तिच्या सुखासाठी म्हणू लागले आहेत आणि तिला सपोर्ट देत आहेत , ( स्त्रियांचं वाढतं स्वावलंबित्व आणि त्याचे जुन्या व्यवस्थेवर होणारे चांगले वाईट परिणाम अनेकांना असह्य होत आहेत पण आता त्याला इलाज नाही ) अशा स्वावलंबी स्त्रियांचं प्रमाण सध्या कमी आहे पण ते वाढेल हळूहळू... सुनीता देशपांडेंच्या आहे मनोहर तरी मध्ये पाचवारी नेसायला घरातून झालेला विरोध वाचून गंमत वाटली , नऊवारी पासून पाचवारी , पंजाबी ड्रेस , जिन्स , केप्री , मिडीस्कर्ट हा बदल एक स्त्री म्हणून मला अतिशय सुखद वाटतो .... हे फक्त 70 वर्षात .. हिंदू धर्मियांची बदल स्वीकारण्याची आणि पचवण्याची क्षमता ग्रेट आहे .. त्याचं कौतुक वाटतंच .

शोषितांच्या कल्याणासाठी , रक्षणासाठी ज्यांनी कायदे केले त्यांनाही क्रेडीट आहेच ... त्यांच्याबद्दल मला वैयक्तिक मनापासून कृतज्ञता वाटते ... मला शिक्षणाचा अधिकार मिळाला , बाहेर पडून काहीतरी करण्याची संधी मिळाली याबद्दल मी अपार कृतज्ञ आहेच , पण याचं क्रेडीट 100 % हिंदू धर्माला आहे की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंना अधिक आहे असं एक कन्फ्युजन आहे डोक्यात .... कारण माझ्या जन्माने मिळालेल्या धर्माने तर कित्येक शतकं स्त्रियांना चूल मूल यांना जखडून ठेवलं होतं आणि समाजसुधारक नसते तर आणखी काही शतकं सुद्धा घरात डांबून ठेवायला अनमान मुळीच केलं नसतं .....

तरी हे समाजसुधारक शेवटी हिंदू धर्मातच जन्मले आणि समाजाची जरी अधोगती झालेली होती तरी बदल स्वीकारण्याची हिंदू समाजाची क्षमता संपलेली नव्हती ... सावित्रीबाईंंवर दगड , शेण फेकलं गेलं हे खरं पण मुस्लिम राष्ट्रात कदाचित कुठल्याकुठे गळे कापून नाहीसं केलं असतं... त्यामानाने हिंदू समंजसच म्हणायचे ... विरोध केला पण फायदे लक्षात येऊ लागल्यावर भराभर बदल आत्मसात केला ..... तेव्हा त्याबद्दलही हिंदू धर्मियांचा अभिमान आणि कौतुक वाटतच ...

पण धर्माचा बाय डिफॉल्ट अभिमान का वाटला पाहिजे हे अजून समजत नाही .. आणि धर्माचा म्हणजे नक्की कशाचा ? सणांचा ? नऊवारी / धोतर यांचा ? देवपूजा , रामायण महाभारत , वेद - पुराणं यांचा ? तुळशी वृंदावन , गुढीपाडवा यांचा ? देवळांचा ? जुन्या बांधकामाचा ? हिंदू राजांचा ?

जन्माने हिंदू म्हणून हिंदू म्हणवते एवढंच बाकी त्याचा अर्थ मला कळलेला नाही .. ज्यांना अभिमान आहे त्यांना तरी काय अर्थ कळला असेल असा प्रश्न पडतो कधीकधी ... आजवर मला हिंदू धर्माच्या आणि दुसऱ्या कुठल्याही धर्माच्या लोकांचा कशासाठीही राग आलेला नाही , इतिहास वाचताना ... दुःख मात्र होतं नेहमीच , माणसांनी माणसांवर केलेले अत्याचार वाचताना ... पण ती माणसं होती एवढ्याच ज्ञानाला माझ्यालेखी महत्व असतं ... ती स्वतःला काय म्हणवून घेत होती आणि दुसऱ्या माणसांना कोणत्या कारणामुळे परकी समजत होती ह्या ज्ञानाला माझ्यालेखी शून्य महत्व आहे .

बाकी हिंदू राष्ट्रात आहे म्हणून मी सुरक्षित आहे असं म्हणता आलं असतं तर फार आनंद झाला असता ... पण कुठलेच धर्म कुठल्याच राष्ट्रात स्त्रीला सुरक्षित फिल होईल असे संस्कार एकूण एक / किमान बहुसंख्य तरी पुरुषांवर करण्यात असमर्थ आहेत हे दिसून आलं आहे ... या देशाचे कायदे माझं आयुष्य सुसह्य करणारे , मला समान संधी आणि संरक्षणाचं आणि न्यायाचं निदान आश्वासन तरी देणारे आहेत हे एक सुख त्यातल्या त्यात .... पुन्हा स्त्री म्हणूनच जन्म मिळणार असेल तर मात्र मला अमेरिका किंवा दुसऱ्या एखाद्या युरोपियन राष्ट्रात घ्यायला आवडेल जिथे स्त्रीला जास्त स्वातंत्र्य आणि संरक्षण आणि न्यायाची अधिक उत्तम हमी आहे ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. या विषयावर जिथे पुर्ण लेखमाला लिहीता येईल तिथे कदाचित तुमच्या मनात आलेले विचार जसेच्या तसे मांडले म्हणुन मला आवडला असावा. Happy

एकंदर बराच गोंधळ दिसतोय तुमच्या मनात.

मी मला काय कळलं ते सांगायचा प्रयत्न करतो.
(सगळ्यांनी सहमत असण्याची किंवा नसण्याची काहीच गरज नाही, कुणालाही उपदेश देण्याचा हेतू नाही. )

कोणतीही व्यक्ती हिंदू असते म्हणजे काय?
तुम्ही परमेश्वरावर/वेदांवर/गीतेवर श्रद्धा ठेवली आणि देवाला हात जोडले तर तुम्ही हिंदू असा काही नियम नाही. तुम्ही हिंदू घराण्याचे म्हणून तुम्ही हिंदू असा सुद्धा नियम नाही. तुमचा जन्म हिंदू आई वडिलांच्या पोटी झाला किंवा तुम्हाला हिंदू संस्कारानी वाढवलं म्हणून तुम्ही हिंदू असा सुद्धा नियम नाही. म्हणजे आणखी सोप्या शब्दात सांगायचं, तर तुम्ही हिंदू आहात किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी इतर धर्मांच्या धर्तीवर कुठलाही संकेत किंवा नियम उपलब्ध नाही.
याचा मला समजलेला अर्थ असा कि तुम्ही माना किंवा मानू नका, तुम्ही मंदिरात जा, चर्च मध्ये जा, मशिदीत जा, गुरुद्वारा मध्ये जा किंवा आणखी कुठे जा, अथवा कुठेही जाऊ नका पण तुम्ही जर माणूस असाल, आणि माणुसकीवर श्रद्धा ठेवत असाल, जर तुम्ही इतरांशी चांगलं वागावं म्हणून स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही हिंदू आहात.

थोडक्यात तुमची जीवपद्धती तुम्ही मनुष्य आहात कि नाही ते ठरवते, आणि तुम्ही मनुष्य असाल तर तुम्ही आपोआपच हिंदू असता, त्यासाठी कुठलेही नियम नाही, अटी पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कुठल्या देवतेची आराधना करता किंवा करत नाही याला हिंदू धर्मात महत्व कधीच नव्हतं, नाही, आणि नसेल. बाकी कालौघाने काही बऱ्या वाईट प्रथा पडल्या, तश्या बंदही पडल्या, आणि काही इतक्या पसरल्या कि त्या बंद करण्यासाठी संघर्ष करावा लागला. अनेकांनी आपापल्या कुवतीनुसार धर्म विशद करण्याचा प्रयत्न केला. तो सुद्धा कधी टिकला तर कधी विरून गेला. पण ह्या धर्माची लवचिकता इतकी प्रचंड आहे, कि अशा असंख्य बदलांना पचवून हा धर्म आज अभिमानाने उभा आहे. भविष्यात अश्या अनेक प्रथा पडतील आणि मोडतील सुद्धा धर्माला त्याचा काहीही फरक पडणार नाही.

कर्मकांड, पूजाअर्चा, देवळात जाण, देवळात न जाण अश्या कुठल्याही गोष्टींनी हिंदू धर्माची व्याख्या करणं म्हणजे सध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या आकाशाला संपूर्ण जग समजण्याइतकं मूर्खपणाचं आहे. मुळात माणसाचं असणं हेच त्याच्या हिंदुत्वाचे प्रतीक आहे. आणि म्हणून मला माझ्या हिंदुत्वाचा, धर्माचा, जीवनपद्धतीचा अभिमान आहे

मला हिंदू धर्माबद्दल आत्मीयता नाही असं मी म्हटलं>>> हिंदू संस्कृती आणि अध्यात्म हा एक महासागर आहे आणि त्यातील खरी रत्ने त्यात खोल डुबकी मारल्यावरच सापडतील परंतु वरवर माहितीवरून संशयरूपी किनाऱ्यावर उभे राहिल्यास फक्त वाळूच मिळेल. सर्व पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा खोल शिरण्याचा प्रयत्न करून बघा आत्मीयता नक्कीच वाटेल

हिंदू धर्मात भरपूर धर्मग्रंथ आहेत , त्यापैकी एकाच्याही वाटेला मी आजपर्यंत गेलेले नाही आणि पुढेही जाण्याची इच्छा नाही >>>> ज्यावेळी अशी इच्छा होईल आणि तुम्ही योग्य ग्रंथ वाचाल किंवा गुरुलाभ होईल तेंव्हा तुम्हाला भारतात आणि हिंदू संस्कृतीत जन्मल्याचा खरा अभिमान वाटेल. तो दिवस लवकरच येवो अशी ईश्वरचरणी इच्छा

या निमित्ताने राजयोग पुस्तकात स्वामी विवेकानंदानी केलेली धर्माची व्याख्या आठवली. ते म्हणतात -
"प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म है। बाह्य एवं अन्तःप्रकति को वशीभूत करके अपने इस ब्रह्मभाव को व्यक्त करना ही जीवन का चरम लक्ष्य है।
कर्म, उपासना, मनःसंयम अथवा ज्ञान, इनमें से एक, एक से अधिक या सभी उपायों का सहारा लेकर अपने ब्रह्मभाव को व्यक्त करो और मुक्त हो जाओ।
बस, यही धर्म है। मत, अनुष्ठानपद्धतियाँ, शास्त्र, मन्दिर अथवा अन्य बाह्य क्रिया-कलाप तो उसके गौण ब्योरे मात्र हैं। "

काही सांस्कृतिक कार्यक्रमाकरता ( स्टेज शोज) धोतर नेसण्याचा प्रसंग आला होता ( त्या आधी प्रॅक्टिस म्हणून) - उष्ण हवामानाला अतिशय यथायोग्य असा हा पोशाख आहे. सुटसुटीत, हवेशीर, कम्फर्टेबल. भारतीय पुरुषांनी हा का बरे सोडला असावा असा प्रश्न पडला.
मी पुरुष असते तर मी आनंदाने हा पोशाख परिधान केला असता. Happy
नउवारी , सहावारी त्यामानाने सुटसुटीत वाटत नाहीत तितक्या. कामकरी बायकांची नौवारी नेसून पाहिली पाहिजे.
बाकी विचार वाचून अगदी अगदी झाले. विशेषतः दुसर्‍या धर्माबद्दल राग नाहीये पण माझे विचार स्वातंत्र्य कितपत राहिले असते ह्या शंकेबद्दल.

लेख आवडला .सर्वच धर्मात काही अयोग्य, कालबाह्य गोष्टी आहेत. शेवटी माणसाने बनवला, माणूस पर्फेक्ट होऊ शकत नाही. But if you want to explore spirituality Hindu religion is the BEST.
मी तर आभार मानते देवाचे ह्या बद्दल. अभिमान नाही बहुतेक पण अपार समाधान आहे एक हिंदू असल्याचे Happy .

खग्या , खूप सुंदर प्रतिसाद आहे . मलाही हिंदू धर्म म्हणजे कर्मकांड , देवळात जाणं एवढंच नाही , यात आणखी खूप काहीतरी आहे .. शोध घेतला तर सापडण्यासारखं असं वाटत होतं पण काय ते नक्की समजत नव्हतं .. तुम्ही फार छान मांडलंत ..

सर्वांचे आभार अभिप्रायाबद्दल ... विवेकानंद वाचायला घेणार आहे आणि भगवद्गीताही .. अजून खूप शिकायचं आहे , नुकती तर कुठे सुरुवात आहे असं वाटतं ..

{जर तुम्ही इतरांशी चांगलं वागावं म्हणून स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही हिंदू आहात.}
आणि याचा व्यत्यास?

मला वाटतं जसा सुगंध देणे, सहनशीलता हा पृथ्वीचा, शीतलता हा जलाचा, अलिप्तभाव हा वायूचा धर्म आहे तद्वत - दिलेल्या बुद्धीचा वापर करणे हा मनुष्याचा धर्म आहे.
बाकी सारे पूरकच ...............

धर्माबद्दल काहीच ठरवता येत नसेल तर तुम्हाला जसं जगायचं तसं जगा.. कोणी तुम्हाला धर्माभिमान नाही म्हणून कोसणार नाही आणि नसेल काय वाटतं तर इतका विचार कशाला करता?

हिंदु राष्ट्रात सुरक्षित नसेल वाटतं तर आताही जिथे सुरक्षित वाटेल तिथे जाऊ शकता.. अगदी पुढच्या जन्माची वाट पाहायची गरज नाही... आणि बाय दे वे.. पुर्नजन्म ही संकल्पना हिंदु धर्माच्या अगदी जवळची आहे आणि जी पोसिटीव्हिटी आणि नव्या जन्माची आशा आहे ना त्या आशेसाठी किमान तुम्ही हिंदूविषयी अभिमान बाळगू शकता...

मलाही काही गोष्टी खटकत आहेत.(असे वाटण्यास जागा आहे की मी प्रत्येक धाग्यावर तेच तेच बोलत असते पण नाईलाज आहे. क्षमस्व.)
जसे की आत्ता रामायण पुन्हा सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने राजा जनक आणि त्यांची पत्नी राणी सुनयना यांचे संवाद ऐकून मी"मुलगी"असल्याबद्दल मला क्षणभर प्रचंड guilt आले. असे वाटले की आपण आणि आपल्या पालकांनी खूप मोठे गुन्हे केले ज्याची आपल्याला शिक्षा मिळत रहाणार आहे. जरी दशरथ यांनी स्वतःला जनकांच्या दारचा याचक म्हणवले,तरीही जनक मात्र लाचारीची पराकाष्ठा करत होते. म्हणे आमच्या मुलींना तुमच्या दासी समजून काही चुका झाल्या तर माफ करा. त्यांना तुमच्या चरणाकडे थोडीशी जागा दिलीत तरी अनंत उपकार होतील. मी तुमच्या पायांचा दास आहे(कारण मी वधुपिता आहे आणि तुम्ही वरपिता आहात).तिकडे सुनयना राणींनी चौघींना उपदेश केला:पती के चरणों की एकनिष्ठ समर्पित सेवा करना ही स्त्री का परमकर्तव्य है।उससे वह देवताओं को भी वंदनीय बन जाती है।ससुराल में पती के परिजनों की सेवा करो।अब वहीं आपका घर है।ससुराल में मायके की स्तुती नहीं करनी चाहिए।अब आपका जनकपूर से संबंध समाप्त हो गया है।

असे जे काही आपल्याला सांगितले जाते की पत्नीची जागा पतीच्या पायाजवळ,पती परमेश्वर,चांगला पती मिळवण्यासाठी उपास मग तोच पती सात जन्म मिळावा म्हणून उपास,(त्या दिवशी काही खाल्ले तर अमुक होईल तमुक होईल अशा धमक्या कहाण्यांमध्ये वाचायला मिळतात.) ,मुलगी परक्याचे धन,कार्येषु मंत्री सारखे श्लोक, वधुपिता म्हणजे कोणीतरी खालच्या दर्जाचा व्यक्ती, त्याच्याशी कसेही वागले पाहिजे, मंगळसूत्र, बांगड्या इ.ची सक्ती, विधवा म्हणजे अशुभ,इ.स्त्रियांवरील बंधने वगैरे वगैरे अनेक गोष्टी सांगता येतील ज्या स्त्रियांना एक माणूस म्हणून न पाहता वस्तू म्हणून पाहतात,त्या सर्व गोष्टींचा धिक्कार असो.

म्हणे प्रसाद खाल्ला नाही तर रागावून नुकसान करणारा देव ... तेव्हा पुराणातल्या अमुक कर्माला अमुक शिक्षा वगैरे वर्णनं करणारे ग्रंथ>>अगदी अगदी.

माझ्या मते, हिंदू धर्म खूप चांगला आहे मात्र अजूनही काही सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे.

इथे मात्र मी हे एक आनंदाने नमूद करेन की त्याच मालिकेतील दशरथ, कौसल्या, कैकेयी,यांचे संवाद:वो बहु बनकर नहीं अयोध्या की बेटी बनकर आयेगी।इ. खूप चांगले होते.

वरच्या पोस्टमुळे कोणाला राग आला तर क्षमस्व.

इथे मात्र मी हे एक आनंदाने नमूद करेन की त्याच मालिकेतील दशरथ, कौसल्या, कैकेयी,यांचे संवाद:वो बहु बनकर नहीं अयोध्या की बेटी बनकर आयेगी>>>

म्हणजेच दोन्ही पक्षांनी लीनता व सर्वसमावेशकता हा आपला प्रमुख गुण मानला. सगळ्यांनीच हा गुण आचरणात ठेवला असता तर आजची वेळ आलीच नसती ना...

सगळ्यांनीच हा गुण आचरणात ठेवला असता तर आजची वेळ आलीच नसती ना...

नवीन Submitted by साधना
सहमत.
पण ते आदर्श होते ना.प्रत्येक जण असा विचार नाही करत.आणि ते चरणों की दासी वगैरे खूपच अन्यायकारक वाटते मला. असे खरे मानून मुलींंनी लग्नच केली नाहीत तर.... म्हणून मग पती चरणों की सेवा के बिना आध्यात्मिक प्रगती होणार नाही असे पिल्लू सोडले असेल.(लग्न हे सर्व समस्यांचे मूळ आहे हे माझे एकट्याचे वैयक्तिक मत झाले आहे आजवरच्या जगाच्या अनुभवातून.)
एकीकडे पतिव्रता महानची टिमकी आणि दुसरीकडे कुंतीने स्वतः च पाच मुलांना सांगितले की द्रौपदीला वाटून घ्या. आणि त्यांनी तसे केले. हे स्त्रीचे वस्तूकरण वाटते मला.
सीतात्याग झाला हे जर खरे असेल तर जणू एक स्वतः ची वस्तू, दुसऱ्याने नेली,प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला, ती परत आणली आणि टाकून दिली अशासारखे वाटते. तिला सर्वांसमोर पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यायला लावणे, तरीही परत कोणीतरी"ती इतके दिवस दुसऱ्याकडे राहिली तरी तिला कसे स्वीकारले" मग परत भर दरबारात शुद्धता सिद्ध करायला सांगणे.भयंकर आहे हे.

मुलगी परक्याचे धन,हुंडा,वंशाला दिवा हवा,इत्यादी मधूनच स्त्रीभ्रूणहत्या सुरू झाली हेमावैम.

@कमला - हे तेव्हाचे झाले. आता सरसकट लागू होत नाही ना? धर्म काळाप्रमाणे बदलतो ना? हेच त्याचे बलस्थान.
सध्या जे रिग्रेशन चालले आहे त्याचे वाईट वाटते मात्र.

सध्या जे रिग्रेशन चालले आहे त्याचे वाईट वाटते मात्र.

Submitted by नानबा
सहमत.
शेवटी आपण जास्त काय करू शकतो म्हणा.आपल्या परीने माणुसकीने वागणे इतकेच आपल्या हातात आहे.