लॉकडाऊनमध्ये घरात नक्की काय घडू शकतं? - भाग २ - समुपदेशन

Submitted by अतुल ठाकुर on 4 April, 2020 - 06:43

sulabhatai_1.jpg

सुलभाताईंनी आज लॉकडाऊनच्या काळात काय घडू शकतं यावर चर्चा केली जी व्यसनी रुग्णमित्र आणि सर्वसाधारण माणसे या सार्‍यांनाच उपयुक्त आहे असे मला वाटते. त्या म्हणाल्या हा लॉकडाऊन जवळपास अंगावर कोसळल्यासारखा आहे. आपण याला तयार नव्हतो. त्यामुळे सर्व माणसे एकाच वेळी चोवीस तास घरात ही अनेकांच्या बाबतीत कधीही न घडणारी गोष्ट असु शकते. अशावेळी नेहेमीच्या साध्यासुध्या गोष्टी करतानाही तणाव येऊ शकतो. याचे कारण एरवी कोण कधी येतं, जातं, काय काम करतं याच्या वेळा साधारणपणे ठरलेल्या असतात. त्यामुळे आपले जीवन सुरळीत सुरु असते. आता हे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेल्यासारखे होऊन जाते. यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. घरात सर्वच जण सर्वकाळ असताना काही कामं कोण करणार हे ही वेळापत्रक ठरवावं लागतं अन्यथा तो ही वादाचा विषय ठरु शकतो.

अनेकांना आपले स्वातंत्र्य नाहिसे झाल्याची भावना मनात घर करु शकते सुलभाताई सांगत होत्या. याचे कारण असंख्य ठिकाणांहून मिडियावर नाना प्रकारची माहिती येत आहे. लोक स्वतःहून ही माहिती मिळवत आहेत. पण नक्की काय ते कळत नाही. उलटसुलट बातम्या येत आहेत. अनेकदा आपल्यापासून लांब, आपल्या नजरेआड काहीतरी घडत आहे पण आपल्यालातर काही पाहता येत नाही. हे सारं कधी संपणार हे ही सांगता येत नाही. या सर्व अनिश्चित परिस्थितीत आपल्याला सक्तीने घरात डांबून राहावे लागत आहे आणि त्यामुळे आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आहे अशी भावना निर्माण होऊन माणसाची चीडचीड होऊ शकते. आणि त्याचे काही करता येत नसल्याने नैराश्याची, हतबलतेची भावना बळावू शकते. घरात सर्वजण एकत्र इतका वेळ असताना एकमेकांच्या स्पेसचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यातही तडजोड करण्याची तयारी नसेल तर परिस्थिती आणखीनच अवघड होऊ शकते. ही परिस्थिती वादविवाद आणि ताणतणावांना आमंत्रण देणारी ठरु शकते.

यानंतर सुलभाताईंनी काही घटनांचा हवाला देऊन सांगितले की अनेकदा घर लहान असते. माणसे कामाला जातात तेव्हा फारसे जाणवत नाही. पण सर्व माणसे जेव्हा चोवीस तास एकाच लहान खोलीत वावरु लागतात तेव्हा एरवी न जाणवणार्‍या समस्या जाणवू लागतात. त्यातही घरी वृद्ध माणसे असली आणि त्यांना नेहेमीचे किरकोळ सर्दी खोकला तापाचे आजार झाले तर माणसे कोरोनाच्या शंकेने गर्भगळीत होतात. अशावेळी शेजारीपाजारी वाळीत टाकतील का अशासारखे विचार मनात येऊ लागतात. एखाद्या साधारण घटनेने घाबरून गेल्यामुळे आणि भविष्यातील भयंकर परंतू कल्पित अशा परिणामांचा आधीच विचार करून माणसे वाहवल्यासारखी वागु लागतात आणि त्यातून काही टोकाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. या सार्‍यांचा परिणाम चीडचीड आणि राग वाढण्यात होऊ शकतो. हे झाले सर्वसाधारण माणसांविषयी. जेव्हा यात आपण व्यसन आणि व्यसनी माणसांचा विचार करतो तेव्हा समस्या जास्त गुंतागुंतीची होऊ शकते.

सुलभाताईंनी पुढे प्रामुख्याने व्यसनी लोकांना आणि त्यांच्या घरच्यांना या काळात ज्या समस्या येऊ शकतात त्याबद्दल बोलायला सुरुवात केली. व्यसनी व्यक्तीला हवे ते करता येत नाही. म्हणजेच हवे ते व्यसन हवे तेव्हा करता येत नाही त्यामुळे त्याची चीडचीड वाढते. त्यालाही आपले स्वातंत्र्य नाहीसे झाल्यासारखे वाटते. घरात चोरून पॉर्न वगैरे पाहण्याचे व्यसन असेल तर आता सर्वजण घरी असल्याने ते करता येत नाही. जुगाराचे व्यसन असेल तर हवे तेव्हा बाहेर जाता येत नाही. गेले तरी जुगाराचे अड्डे बंद असण्याची शक्यता असते. व्यसनी व्यक्तींचा तर मला हे हवं म्हणजे हवंच. मला ते मिळालंच पाहिजे असा खाक्या असतो. आणि या दिवसात ते मिळणं दुरापस्त होऊन बसल्याने ही मंडळी हवालदिल झालेली असतात. व्यसन न मिळाल्याने शरीर आणि मनाचे क्रेव्हींग सुरु होते. त्याचे शारिरीक आणि मानसिक परिणाम दिसु लागतात. याचा परिणाम नैराश्य, हतबलता आणि टोकाच्या अवस्थेत स्वतःला इजा करून घेण्यापर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुलभाताईंनी एका मुलाची हकिकत सांगितली जो लॉकडाऊनमध्येही रात्री बेरात्री बाहेर पडून गांजा मिळवत होता. म्हणजे त्याचे व्यसन कमी तर होत नव्हतेच पण आता घरच्यांना याला इन्फेक्शन होईल का, पोलिस पकडतील का ही धास्ती सुरु झाली होती. हा मुलगा फक्त पंचवीशीतला आहे. काहींनी घरात साठा केला असेल तर तो संपल्याने आता त्यांचा जीव कासावीस होत असेल. या सार्‍यांचा व्यसनी माणसाच्या शरीर मनावर तर परिणाम होतोच. पण घरच्यांनाही घोर लागून राहतो. व्यसनी माणसांच्या घरात भांडणे, वादविवाद तसेही होत असतात. या काळात मात्र ते विकोपाला जाण्याची शक्यता आहे. वादविवाद, भांडणे, हिंसेचे टोक गाठु शकतात. अशा परिस्थितीत कसे वागुन आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येईल याबाबतीत सुलभाताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

सुलभाताई स्वतः मैत्र हेल्पलाईनच्या फेसबुकपेजवर लिहित असतात. त्याची लिंक देत आहे.

https://www.facebook.com/Maitra-Emotional-Distress-Helpline-229722830395368

(क्रमशः)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users