अलास्का आणि अलेक्झांडर

Submitted by www.chittmanthan.com on 3 April, 2020 - 23:49

भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक बकेट लिस्ट असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे...हो हो नक्कीच..तुम्ही जर "जिंदगी ना मिलेगी दोबारा" बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.).
तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण? हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते. याला समाजाने माणसावर लादलेल्या जबाबदाऱ्या, आईवडिलांच्या अपेक्षा म्हणजे माणसाला स्वतंत्र न होऊ देनारे साखळदंड वाटतात. त्याला वाटतं की माणसाचा खरं आनंद त्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यात असत.
तुम्हाला त्याच अलेक्झांडर सुपरट्राम्प हे नाव थोडंसं विचित्र वाटलं असेल ना? त्याच खर नाव ख्रिस अस होत. पण पदवी मिळवल्यानंतर नोकरीचा शोध घेण्याऐवजी स्वप्नांचा शोध घ्यायचा निश्चय झाला तेव्हा आई वडिलांच्या घरासह त्यांनी दिलेली ओळख सुध्दा त्यानं मागे सोडली.
कधी चालत तर कधी लिफ्ट मागून अनेक रस्ते जंगलं पायाखालून घालत होता. जंगलातल्या ओढ्यावर कान टवकारून अतिशय सावधपणे पाणी पिणारे हरीण कदाचित त्याने आयुष्यात पहिल्यांदाच बघितले असेल.हे दृश्य बघताना त्याचे डोळे अगदी विस्फारून गेले होते. ह्या दृष्याला पक्ष्यांचा किलबिलाट उत्तम पार्श्वसंगीत देत होता.
त्याच्या आयुष्यात आलेल्या विलक्षण व्यक्तींपैकी जान आणि रेनी हे जोडपं त्याला कुटुंबाचाच भाग मानत होत. त्यांच्याशी अलेक्स खूप वेळ गप्पा मारतो.जान जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर येरझाऱ्या घालत असते तेव्हा तिला सोबत घेऊन तो लाटांच्या सोबत खेळतो उड्या मारतो. समुद्राच्या लाटा तेव्हा आपल्या शरीरावर जोरदार प्रहार करत असतात तेव्हा त्या आपल्याला एक संधी देत असतात स्वतःला ताकदवर समजण्याची....! अॅलेक्स च्या मते तुम्ही किती बलवान आहात याच्यापेक्षा तुम्ही किती बलवान समजता हे खूप महत्वाचे आहे.जान ला वाटायचे की अलेक्झांडर आपल्यासोबत काही दिवस राहील पण स्वतःच आयुष्य नदिसारख समजणाऱ्या त्याला आपल्या प्रवासाला नातेसंबंधांचे बांध घालायचे नव्हते म्हणून तो जान आणि रेनी ला न सांगताच पुढच्या प्रवासाला निघाला.
अमेरिकेतली विस्तीर्ण गव्हाची शेती पार करत जाताना कधी तिथं लावलेल्या तुषार सिंचनाच्या कारंज्यात दाढी करण्याचा मोह आलेक्स ला कधी आवरायचं नाही.तिथली गहू काढणी यंत्र चालवणारा वेन त्याचा मित्र बनला.त्याने त्याला यंत्र चालवायला शिकवली. वेन स्वताला मिस्टर हॅप्पी अस सांगायचा.तो होता देखील तसाच पांचट जोक मारणारा, मित्रांची खेचणारा आणि पोलिस धरून न्यायला आले तरी शांत डोक्याने आपल्या मित्रांना पुढचे नियोजन सांगणारा..! त्याच्याच एका मित्राने केविनने अलेक्सला मास जास्त काळ कसं टिकवून ठेवायचं याच्या टिप्स दिल्या ज्या आलेक्सला पुढील प्रवासात कामी येणार होत्या.
अलेक्सने केलेलं सगळ्यात जीवघेणं धाडस म्हणजे कुठल्याही अनुभवाशिवाय वादळाला स्वताच्या प्रवाहाबरोबर बांधून वाहणारी कॉलोराडो नदी कुठल्याही रिव्हर राफ्टिंग चे प्रशिक्षण नसताना आणि कुठल्याही सुरक्षा रक्षक उपकरणांशिवाय पार केली होती. तो हे करू शकला कारण माजोर दगडांना सहज उध्वस्त करणाऱ्या कॉलोराडोपेक्षा अलेक्झांडर चा वेडेपणा आणि इच्छाशक्ती जास्त मोठी होती. बक्षीस म्हणून टेहाळणी करणारे पोलीस त्याच्या मागावर देखील लागले होते. पण त्यांनी पकडायचा आत नदिकाठला फिरायला आलेल्या जोडप्याकडून नदिमार्गे मेक्सिको ला जाण्याचा पत्ता विचारून अलेक्स् त्या मोहिमेवर निघतो.
जेव्हा तो देशाची सीमा पार करत असतो तेव्हा त्याला पोलीस अडवतात.निर्वासितांच्या कॅम्प मध्ये जाऊन अलेक्झांडर सुपरट्राम्प नावाचे ओळखपत्र बनवावे असे वाटते पण हा विचार काही क्षणापुरताच राहतो. सामान उचलून मालगाडी मध्ये बसून जाण्याच्या प्रयत्नात तो पोलिसांना सापडतो व खूप मार खातो.अगदी डोळे सुजेपर्यंत फटके पडलेले असतात.
अलेक्झांडर चालत,लिफ्ट मागत स्लॅब सिटी मध्ये येऊन पोचतो.ह्या शहरात मात्र त्याच्यासाठी एक सुखद धक्का बसतो जेव्हा त्याला जान आणि रेनी पुन्हा भेटतात.त्यांच्यासोबत पुन्हा गप्पांचा फड रंगतो.समोरच्या फिरत्या घरात राहणाऱ्या गिटार वाजवणाऱ्या मुलीच्या डोळ्यात अलेक्झांडर बद्दलचे आकर्षण रेनी ओळखतो .पण अलेक्स तिला भाव देत नव्हता किंबहुना तो आत्ता कोणत्याही नात्याच्या बंधनासाठी तयार नव्हता. अलेक्सला जान ने सांगितले की तिचाही मुलगा असाच स्वातंत्र्य जगण्यासाठी तिला सोडून गेला होता तेव्हा त्याच्या लक्षात येत की ती त्याच्यामध्ये स्वताच्या मुलाला शोधत होती. अलेक्स ला पण वाटायला लागलं होत की शेवटचा अलास्का ची धाडशी सफर पूर्ण केली की परत यांच्याकडे यावं. म्हणून तो लवकरच निरोप घेतो.
ह्या जगात असे खूप लोक असतात ज्यांचा आयुष्य नियती नावाच्या वादळान उध्वस्त करून टाकलेलं असत .आयुष्यभर ते त्या अवजड न पेलणाऱ्या नात्यांचे ओझे घेऊन जड मनाने जगत असतात.त्यांच्या आयुष्यात अलेक्स सारखा भटक्या येतो तेव्हा ते आपली गमावलेली नाती त्यांच्यात शोधायचा प्रयत्न करतात.त्यातलाच एक सैन्य दलातला निवृत्त अधिकारी श्रीयुत फ्रांज हा भेटतो. त्याने आपल्या बायको आणि मुलाला एका भयानक अपघातात गमावलेले असते. निवृत्तीनंतर त्याने चामाड्यावर कोरीव काम करण्याची कार्यशाळा सुरू केली होती. अलेक्स त्याच्याकडून ही कला शिकला. त्याच्याबरोबर मासेमारी केली.जेव्हा जास्त वयाच कारण सांगून फ्रांझ टेकडी चढायला नकार देत होता तेव्हा त्याला प्रेरणा देऊन टेकडी चढायला भाग पाडले.दोघंही जर वेगळे झाले तर एकमेकांना खूप मिस करणार होते पण तरीही अलास्का साठी निघण्याची वेळ आल्याने फ्रांजचा निरोप घेणं भाग होत आणि त्याप्रमाणे पाणावलेल्या डोळ्यांनी ते वेगळे झाले.
अलेक्स आता अलास्का ला पोचला होता. तिथं जाताना त्याच्यासोबत फ्रांज ने दिलेले उबदार कपडे, जान ने दिलेली लोकरी टोपी , केविन ने दिलेल्या मास साठवण्याच्या टिप्स होत्याच. सोबत ०.२२ ची एक बंदूक आणि निसर्गात जगण्यासाठी उपयोगी पडतील अशी खुप सारी पुस्तके होती.तिथं गेल्यावर सर्वात प्रथम हे सर्व सामान ठेवायला आणि रात्री वन्यप्राण्यांपासून त्याच रक्षण करेल असा निवारा बनवावा लागणार होता.पण त्याच्या नशिबाने कुणीतरी सोडून दिलेले फिरत घर त्याला सापडले. हे घर जुनाट असल तरी त्याच्या निवाऱ्याची सोय होणार होती.
तिथल्या बॅरेल चा वापर त्यानं शेकोटी बनवण्यासाठी केला.छोट बॅरल पाणी भरून झाडाला टांगल व त्याच्या खाली छिद्र पाडून त्याचा शॉवर सारखा वापर केला. तिथं त्याने एक छोट्या वातीचा दिवा चालू केला ज्याच्या उजेडात त्याला पुस्तकं
वाचायची होती. सगळ्या सोयी झाल्या पण जेवणाची सोय कारण थोड अवघड होत. प्रत्येकवेळी शिकार करावी लागणार होती. त्याने सुरवातीला छोट्या प्राण्यांपासून सुरूवात केली. सष्यासारके छोट्या कोल्ह्यासारखे प्राणी त्याच्या जेवणाचा भाग बनू लागले.
अलेक्सच ह्या समाजाने , शिस्तप्रिय वडिलांनी कैद केलेलं बालपण अाता मुक्त झालेलं. रेनडिअर च्या कळपामागे धावताना, तिथल्या टेकडावरून घसरत खाली येताना तो स्वतःचे अस्तित्व विसरायचा. पण रेनडिअर आणि तीच पिल्लू पाहिलं की त्याची बंदूक आपोआप खाली जायची.एके दिवशी मात्र त्याने एक मोठं जनावर ठार केलं. त्या प्राण्याचं मास वेगळं करताना त्याची खूपच दमछाक झाली आणि ते मास पण खाता आल नाही कारण त्याला अळ्या लागल्या.
दिवसामागून दिवस जात होते अलास्का मधल वातावरण बदललं. आता त्याच्या घराजवळ प्राणी येईनासे झाले.आत्ता उपाशी राहण्यापेक्षा निसर्गातल्या खाण्या योग्य वनस्पती शोधणे आणि त्यावर उदरनिर्वाह करणे हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता . त्याच्याजवळ असलेल्या पुस्तकातली चित्रे पाहून त्याने दोन चार वनस्पतीची फळ काढली आणि अधाष्यासारखी खाल्ली आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा जाग आली तेव्हा मात्र आपण चुकीचं फळ खाल्ले अस जाणवायला लागलं. त्याला कमालीचा अशक्तपणा जाणवत होता.त्यानं पुस्तकात जाऊन परत वाचलं तर त्यात लिहलेले भयानक परिणाम वाचून त्याला आता मृत्यू समोर दिसत होता.तो रडायला लागला. तो वाचण्यासाठी हालचाल करू लागला पण ती हालचाल नसून ही शेवटची तडफड आहे हे एव्हाना त्याला जाणवायला लागलं.
आयुष्यातली प्रत्येक प्रिय अप्रिय व्यक्ती, प्रसंग समोर फिरायला लागले आपण त्या सगळ्यांना कायमचे मिस करणार ही भावना सुद्धा आली असेल मनात.पण सोबत स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आणि प्रत्येक अनोळखी व्यक्ती बरोबर घालवलेल्या क्षणांनी त्याला खऱ्या आनंदाचा साक्षात्कार घडवला. त्याला जाणवलं की खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा तो इतरांशी वाटला जातो आणि असा खूप सारा आनंद तो त्याच्या प्रवासात वाटत आला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Uhoh हा लेख गुलमोहर प्रकाशचित्रण मधे का टाकलाय?? चित्रपट आहे का हा? काहीच कळत नाहीये.
कृपया योग्य गृपमधे तुमचा लेख हलवा.