मन वढाय वढाय (भाग ३१)

Submitted by nimita on 1 April, 2020 - 21:26

अजयचा फोन येऊन गेल्यापासून स्नेहाला राहून राहून त्याचं बोलणं आठवत होतं. ' काय करू ? अजय म्हणतोय तसं खरंच फेसबुकवर अकाउंट उघडू का? सगळे मित्र मैत्रिणी परत भेटतील. किती वर्षं झाली सगळ्यांना भेटून. आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र यायला खरंच खूप मजा येईल. पण कामाच्या इतक्या व्यापात वेळच कुठे आहे या फेसबुक वगैरे साठी ! नाहीतर या फेसबुक च्या नादात सगळी कामं राहायची बाजूला....पण त्यासाठी किती वेळ द्यायचा हे तर माझ्याच हातात आहे ना ! काय करावं?' स्नेहा एकीकडे आपली कामं करता करता विचार करत होती. शेवटी एकदाचा तिचा निर्णय झाला आणि तिनी अजयचं ऐकायचं ठरवलं.

त्या रात्री जेवत असताना स्नेहानी अजय बरोबर झालेलं सगळं संभाषण रजतला ऐकवलं. तिच्या अपेक्षेप्रमाणे त्यानी फक्त सगळं ऐकून घेतलं. पण श्रद्धा मात्र आपल्या आईचं बोलणं ऐकून खूप उत्साहात होती. ती स्नेहाला म्हणाली, " आई, तुला अकाउंट ओपन करायला मी मदत करते.. Wow, how exciting ! Finally, आई फेसबुकवर येणार... माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींच्या आया आहेत फेसबुकवर. फक्त तूच नव्हतीस...आई, तुझा प्रोफाइल साठीचा फोटो मी सिलेक्ट करून देईन तुला." त्याच उत्साहात रजतकडे बघत ती म्हणाली," बाबा, तुम्ही पण उघडा ना अकाउंट !" पण तिच्या प्रस्तावाला मुळापासून रद्द करत रजत म्हणाला," नको गं, आपण सगळे त्या फेसबुक मधे अडकून बसलो तर घरातली कामं कोण करणार? " त्याच्या या वक्तव्यावर दोघींची जी रिऍक्शन होती ती बघून त्याला अजूनच गंमत वाटली. स्नेहाला उद्देशून तो पुढे म्हणाला,"त्यातली प्रायव्हसी सेटिंग्ज वगैरे एकदा नीट समजून घे. म्हणजे मग नंतर काही प्रॉब्लेम नाही येणार."

श्रद्धाच्या मदतीनी शेवटी एकदाचं स्नेहानी फेसबुक च्या दुनियेत तिचं पहिलं पाऊल ठेवलं. अजय नी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिच्या इतर मित्र मैत्रिणींना शोधायला सुरुवात केली. तिच्याही नकळत तिनी सगळ्यात पहिलं नाव टाईप केलं - Saleel.....

आणि पुढच्या क्षणी तिच्या समोर स्क्रीनवर चार पाच सलील अवतरले. तिची नजर ज्या सलील ला शोधत होती त्याचा फोटो जेव्हा तिनी बघितला तेव्हा क्षणभर ती थबकली. त्याचं प्रोफाइल चेक करायची खूप इच्छा होत होती. पण एक प्रकारचं दडपण जाणवत होतं मनावर! जणूकाही ती त्याच्या पर्सनल आयुष्यात डोकावून बघायला निघाली होती - आणि तेही चोरी छुपे....त्याच्याही नकळत ! 'हे असं करणं योग्य ठरेल का ?' तिच्या मनात पहिला प्रश्न आला. पण पुढच्याच क्षणी तिनी स्वतःच त्याचं निवारणही केलं..'ज्या अर्थी त्यानी हे अकाउंट उघडलं त्या अर्थी ते लोकांनी बघावं अशीच इच्छा आहे त्याची.. यात त्याला न सांगता , न कळवता वगैरे प्रश्नच उद्भवत नाही. आणि तसंही मी माझ्या इतर मित्र मैत्रिणींची अकाउंट्स पण बघणारच आहे की... हे पण त्यातलंच एक आहे !' पण शेवटचं कारण मात्र स्नेहाच्या मनाला फारसं पटलं नाही; कारण तिच्या मनातला पुढचा प्रश्न होता- ' खरंच, तसंच आहे का ? आणि जर असेल तर मग मला हे असं चोरट्यासारखं का वाटतंय? काय करू?' एकीकडे मनात विचारांचं द्वंद्व चालू असतानाच स्नेहानी सलीलच्या त्या फोटोवर क्लिक केलं आणि क्षणार्धात त्याची माहिती तिच्या स्क्रीनवर झळकली.

एखादी प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसं स्नेहानी चमकून आजूबाजूला पाहिलं. 'रजत किंवा श्रद्धा नी बघितलं तर नाही ना !' ... श्रद्धा केव्हाच तिच्या खोलीत निघून गेली होती. आणि रजत त्याच्या ऑफिसच्या फाईल्स मधे डोकं खुपसून बसला होता. एरवी त्याला तसं बघितलं की स्नेहाला त्या फाईल्स चा खूप राग यायचा; पण आज मात्र तिला हुश्श झालं... ' पण जरी त्यांनी दोघांनी बघितलं असतं तरी काय झालं असतं? मी कोणतंही चुकीचं काम करत नाहीये. मग मला कशाची आणि कोणाची भीती वाटतीये ?' स्नेहाची त्या वेळची अवस्था अगदी 'चोराच्या मनात चांदणे' अशी झाली होती.

स्वतःच्या कृतीचं समर्थन करत तिनी आता सलीलच्या प्रोफाइल वरची त्याची माहिती बघायला सुरुवात केली. 'फोटो बघून तरी वाटतंय की इतक्या वर्षांत फारसा बदल नाही झाला सलील मधे. फक्त वयोमानानुसार जे काही थोडेफार बदल अपेक्षित आहेत ते सोडले तर अजूनही आधीसारखाच दिसतो. पण त्याचं हसू आता पूर्वीसारखं नाही वाटत !!निदान या फोटोमधे तरी !! आधी कसा दिलखुलास हसायचा... त्याचा तो आनंद त्याच्या डोळ्यांतूनही झळकायचा. पण आता अगदी ओढूनताणून हसतोय असं वाटतंय.... ' हा विचार मनात आला आणि स्नेहाला स्वतःचंच हसू आलं.... 'या म्हणण्याला काहीही अर्थ नाहीये स्नेहा ..' तिनी स्वतःच्याच मनाला दटावलं...' रजत म्हणतो तसं उगीच स्वतःच काहीतरी विचार करतेस आणि नको ते निष्कर्ष काढत बसतेस - नको ते म्हणण्यापेक्षा - तुला स्वतःला पटतील असे निष्कर्ष तू स्वतःच ठरवतेस !'

रजतचा विचार आल्यावर तिनी नकळत त्याच्या दिशेनी बघितलं. त्याला तर झोप लागली होती. बेडवर बसून फाईल्स चेक करता करताच डोळा लागला असावा त्याचा. समोर फाईल्सचा ढीग तसाच होता आणि रजत हेड बोर्डला टेकून झोपला होता. किती दमल्यासारखा दिसत होता तो ! स्नेहाच्या मनात रजतबद्दल खूप प्रेम दाटून आलं....' बिचारा! किती थकून जातो दिवसभराच्या कामांनी. मागच्या दोन तीन वर्षांपासून जरा जास्तच वाढलंय त्याच्या कामाचं प्रमाण. सतत कामाचेच विचार- थोडासुद्धा विरंगुळा नाहीये रुटीनमधे .... किती वेळा समजावलं .. हे असंच चालू राहिलं तर तब्येतीवर परिणाम होईल म्हणून! पण बायकोला कुठे काय कळतं!' स्नेहा रजतच्या शेजारी बसली आणि हळूच त्याच्या हातातली फाईल काढून इतर फाईल्स बरोबर उचलून बाजूच्या टेबलवर ठेवली. त्याच्या अंगावर पांघरूण घालत असताना न राहवून तिनी त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकले आणि हळूच म्हणाली," Love you ." तिच्या त्या स्पर्शानी रजतची झोप चाळवली. समोर स्नेहाला बघून तो हसला आणि अर्धवट झोपेतच "Love you too," म्हणत कुशीवर वळून पुन्हा झोपेच्या अधीन झाला.

त्यानंतर बराच वेळ स्नेहा रजत बद्दल, त्याच्या workoholic स्वभावाबद्दल विचार करत होती. आणि तिच्या विचारांत रजतबद्दल वाटणारी काळजीच जास्त होती. फेसबुक आणि त्यातल्या सलीलचा केव्हाच विसर पडला होता तिला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान