प्रकाशक शोधताना!

Submitted by पराग र. लोणकर on 1 April, 2020 - 01:51

प्रत्येकच लेखकाने आपलं लेखन, कवींनी आपल्या कविता खूप मनापासून केलेल्या असतात. किंबहुना बऱ्याचदा त्यांच्यातील प्रतिभेनं हे सारं लेखन उत्स्फूर्तपणे कागदावर (किंवा आजकाल संगणकावर) उतरवलेलं असतं. पुढे हे लेखन विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक इत्यादींकडे पाठवल्यावर अनेकदा त्यास प्रसिद्धीही मिळालेली असते. मग या आपल्या लेखनाचं पुस्तक व्हावं असं साहजिकच आपल्या मनात येतं आणि मग सुरु होतो प्रकाशकाचा शोध. या शोधाची सुरुवात होते आणि आपण थोड्याफार स्वत:ला माहिती असलेल्या किंवा कुणी सुचवलेल्या प्रकाशकास संपर्क करतो किंवा तशी माहिती नसल्यास वर्तमानपत्रात परीक्षणे आलेल्या पुस्तकांवरून किंवा पुस्तक प्रदर्शनांत, वाचनालयांत पुस्तकं पाहून एखाद्या प्रकाशकास संपर्क करतो.

ही सारी आपल्या लेखनास प्रकाशक मिळवण्याची प्रक्रिया लेखकासाठी जास्तीत जास्त सुरक्षित व्हावी या उद्देशानं केलेला हा लेखन प्रपंच.

ही सुरक्षितता का आवश्यक आहे? प्रत्येकच क्षेत्रात जशी चांगली माणसं मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात तशी अगदी निवडक संख्येनं फसवी माणसंही असतात. तीच बाब अगदी अल्प प्रमाणात प्रकाशन क्षेत्रातही आहेच. त्यामुळे खबरदारी घेणं येथेही आवश्यक आहेच. सुरुवातीस गोड गोड बोलून लेखकाकडून अपेक्षित ते पदरात पाडून घेणं आणि नंतर त्या लेखकाचे फोनही न उचलणं, पुस्तकच प्रकाशित न करणं किंवा अगदी हलक्या दर्जाचे पुस्तक प्रकाशित करणं असं या मंडळींकडून केलं जातं. कोणत्याही लेखकाच्या बाबतीत असं होऊ नये म्हणूनचा पुढील सर्व विचार.

प्रकाशक शोधताना, लेखकाने सर्वप्रथम आपण केलेल्या लेखनाशी मिळतीजुळती पुस्तकं (म्हणजे कथासंग्रह, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, नाटकं, चरित्र इ.) गेल्या एक-दोन वर्षांत कोणकोणत्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत याचा शोध घ्यावा. हा शोध वर लिहिल्याप्रमाणे वर्तमानपत्रांत आलेली परीक्षणे, ग्रंथ प्रदर्शनात दिसत असलेली पुस्तकं आणि वाचनालयांत आलेली नवीन पुस्तके, यांच्या मदतीने घेणे अवघड नाही.

असा शोध घेतल्यावर काही प्रकाशकांची नावं निवडून अश्या प्रकाशकांकडे आपल्या लेखनाबद्दल चौकशी करावी. आज नियमित पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या मराठी प्रकाशकांचा आकडा माझ्या अंदाजे दीडशेच्या आसपास असावा. (हा माझा अंदाज सपशेल चुकीचाही असू शकतो.) प्रत्येक प्रकाशकाचे व्यावसाईक गणित हे वरवर पाहता सारखे वाटले तरीही प्रत्यक्षात ते खूप वेगळे असते. प्रकाशकाची पुस्तक वितरण व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, प्रत्येक पुस्तकाची किती प्रतींची आवृत्ती किती कालावधीत विकण्याची त्याची क्षमता आहे, त्याचा ग्राहक वर्ग कोणत्या प्रकारचा आहे अश्या अनेक बाबींवर त्याचे संपूर्ण वर्षाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे पुस्तक रुपात प्रकाशनासाठी लेखन स्वीकारण्यासंदर्भात प्रत्येक प्रकाशकाचे काही नियम व अटी असतात.

वर म्हटल्याप्रमाणे एखादा लेखक जेव्हा प्रकाशकास आपल्या लेखनाबाबत विचारणा करतो तेव्हा प्रकाशक प्रथम त्याच्या वरील गणितात हे पुस्तक प्रकाशित करणे बसते का? याचा विचार करून लेखकास सकारात्मक अथवा नकारात्मक प्रतिसाद देतो. सकारात्मक प्रतिसाद आला तर काय करायचे हे पुढे लिहिले आहेच, मात्र सुरुवातीला एखाद्या किंवा अनेक प्रकाशकांकडून नकारात्मक प्रतिसाद आला तरी लेखकाने नाउमेद न होता पुढील प्रकाशकास विचारणा करणे चालू ठेवावे. कारण लक्षात घ्या, जितकी लेखकांना प्रकाशकांची गरज असते, तितकीच प्रकाशकांनाही लेखकांची गरज असतेच. आवश्यकता असते ती दोघांच्या गरजा भागवल्या जातील अश्या लेखकांचे आणि प्रकाशकांचे समोरासमोर येणे. ज्यास वेळ लागू शकतो.

प्रकाशकाचा शोध, प्रकाशकांस विचारणा चालू असताना एखाद्या प्रकाशकाकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर लेखकाने त्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित करण्यासंदर्भातील त्या प्रकाशकाच्या नियम व अटी काय असतील? (यात लेखकास किती व कसे मानधन मिळेल, पुस्तक प्रकाशित होण्यास किती कालावधी लागेल, आवृत्ती किती प्रतींची असेल? लेखकास किती प्रती मिळतील? पुस्तकांच्या वितरणाची व्यवस्था कशी असेल?) इत्यादींचा स्पष्ट खुलासा करून घ्यावा. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रकाशकाचे आर्थिक गणित वेगवेगळे असते. त्यामुळे जसे लेखकांना कमी-अधिक मानधन देणारे प्रकाशक असतात, तसेच लेखकांकडून थोडेसे आर्थिक सहकार्य घेऊन पुस्तक काढणारे प्रकाशकही असतात. अगदी लेखकाकडून सर्वच्या सर्व खर्च घेऊन पुस्तकं प्रकाशित करणारेही प्रकाशक असतात. यातील प्रत्येक प्रकाशक (अगदी अल्प फसवे प्रकाशक सोडले तर) त्यांच्या पुस्तक प्रकाशन करण्यासाठीच्या योजना (नियम व अटी) त्यांचे वार्षिक खर्च-उत्पन्न गणित बसवण्याच्या दृष्टीने ठरवत असतो. यात कुणीही चुकीचा नसतो किंवा लेखकाचा गैरफायदा घेण्याचाही त्याचा उद्देश नसतो.

वरील सर्व खुलासा प्राप्त झाल्यावरही लेखकाने प्रकाशकाच्या निवडीत घाई न करता आपला प्रकाशक शोध चालू ठेवावा. कारण यामुळे वेगवेगळ्या प्रकाशकांच्या पुस्तक प्रकाशित करण्याच्या योजनांची लेखकास तुलना करून निर्णय घेता येऊ शकेल.

वरील प्रकारे शोध घेतल्यानंतर जेव्हा लेखक स्वत: या शोधापासून संतुष्ट होईल तेव्हा त्याने वरील प्रमाणे तुलना सुरु करावी. ही तुलना करून अंतिम प्रकाशक निवडण्यापूर्वी लेखक अजूनही एक खबरदारीचे पाऊल उचलू शकतो. लेखकास ज्या ज्या प्रकाशकांची योजना पसंत पडली असेल त्या प्रकाशकांनी गेल्या काही महिन्यात ज्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित केलेली असतील त्या लेखकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायला हवा. (त्या लेखकांच्या पुस्तकांत त्यांचे पत्ते अथवा दूरध्वनी क्रमांक मिळू शकतात.) त्या लेखकांना या प्रकाशकाचा अनुभव कसा आला? हे त्यांना विचारता येऊ शकेल. (या चर्चेत फक्त एकूण अनुभव लेखकांना विचारला जावा. तुम्हाला किती मानधन दिले? किती प्रती दिल्या? असा तपशील विचारला जाऊ नये. कारण या बाबी सांगण्यास लेखक उत्सुक नसतात. शिवाय अनेकदा प्रकाशकाने लेखकांना दिलेले प्रस्ताव त्या त्या लेखकाप्रमाणे, लेखनाच्या दर्जाप्रमाणे, पुस्तकाच्या विषयाप्रमाणे व इतर अनेक बाबी लक्षात घेऊन वेगवेगळे असू शकतात.) आपण निवडलेला प्रकाशक त्याने लेखकास सुरुवातीला दिलेल्या आश्वासनांना पाळतो का, एकूण पुस्तक निर्मितीचा अनुभव लेखकास सुखावह ठरला कि मनस्ताप देणारा ठरला हेच जाणून घेण्यासाठी हा संवाद असावा. आपण short list केलेला प्रकाशक नेमका त्या (अगदी अल्प संख्येने या व्यवसायात असलेल्या) फसवणाऱ्या प्रकाशकांपैकी नाही ना हे जाणून घेण्यासाठी ही खबरदारी मोलाची ठरू शकते.

प्रकाशन व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करत आहे. तरी आजही असे अनेक प्रकाशक आहेत, जे त्यांच्यात असलेल्या साहित्यविषयक प्रेमामुळे, पुस्तक निर्मितीत मिळत असलेल्या आनंदामुळे, समाधानामुळे, जिद्दीने या आव्हानांचा सामना करत या व्यवसायात ठामपणे उभे आहेत, लेखकांच्या लेखनास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.

वरील प्रकारे व्यवस्थित शोध घेऊन व जास्तीत जास्त खबरदारी घेऊन जेव्हा आपण अश्या प्रकाशकाकडे आपले साहित्य सोपवू, तेव्हा आपल्या लेखनाचा पुस्तक निर्मितीकडे होणारा प्रवास आपल्यासाठी निश्चित आनंददायी ठरु शकतो.

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही या संस्थळावर आलात याबद्दल अभिनंदन.

एक सुचवतो.
बहुतेक वेळा हौशी लेखकानेच प्रकाशकाच्या शोधात फिरायचे ( आणि निराश व्हायचे ) हा सार्वत्रिक अनुभव आहे.
तुम्ही स्वतःहून इथले काही चांगले लेखक हेरावेत. त्यातून काही उपयुक्त निष्पन्न झाल्यास तेही इथे लिहावे.

यामुळे नवोदित आणि हौशी लेखकांना प्रोत्साहन मिळेल.

धन्यवाद!

आपण सुचवल्याप्रमाणे नक्की प्रयत्न करू.

आपण लेखकांच्या निराश होण्याबद्दल लिहिले आहे. त्याबद्दल थोडेसे.

माझा लेखकांना कळकळीचा सल्ला आहे, की प्रकाशक संस्थांकडून नकार येण्याने लेखकांनी निराश होऊ नये. प्रत्येक प्रकाशन संस्थेचे एक वार्षिक अंदाजपत्रक असते. सर्व गणित लक्षात घेऊन किती पुस्तके वर्षाला प्रकाशित करणे - करावयास लागणारी आर्थिक गुंतवणूक व अपेक्षित परतावा या दृष्टीने - शक्य होईल तेवढीच पुस्तकं प्रकाशक स्वीकारू शकतात. शिवाय यात अनेकदा आर्थिक विचार करून काही विषयांना प्राधान्य द्यावे लागते. मग किती पुस्तकं ललित स्वीकारावीत व किती वाचकांना थेट उपयुक्तता प्रदान करणारी (थोडक्यात जास्त वेगाने विक्री होतील अशी) स्वीकारावीत याचाही प्रकाशक व्यावसाईक दृष्टीने विचार करतात.

म्हणूनच माझ्या लेखात लिहिल्याप्रमाणे लेखकांनी अजिबात निराश न होता प्रकाशकांना संपर्क करत रहावे. अनेकदा नेमक्या अशाच प्रकाशकांना संपर्क केला जातो ज्यांच्याकडे तीन-चार वर्षांचे साहित्य आधीच स्वीकारल्याने नवीन साहित्य स्वीकारणे थांबवलेले असते. मात्र त्याच वेळी असेही प्रकाशक असू शकतात, ज्यांच्याकडे नवीन साहित्याची गरज असू शकते, मात्र त्यांना लेखक मिळत नसतात. (प्रकाशकांना अश्या लेखकांबाबत माहिती होण्यापेक्षा लेखकांना प्रकाशकांची माहिती होणे तुलनेने सोपे असते असे मला वाटते. कारण प्रकाशकांची पुस्तकं सगळीकडे उपलब्ध असतात.) त्यामुळे लेखकांनी चिकाटीने प्रकाशकांचा शोध घेत राहून नवनवीन प्रकाशकांशी सतत संपर्क करत राहावे. (कारण लेखात म्हटल्याप्रमाणे प्रकाशकांनाही लेखकांची, त्यांच्या लेखनाची गरज असतेच असते!) योग्य वेळी योग्य प्रकाशक नक्की मिळू शकतो.

वैयक्तिक माझ्या बाबतीत माझ्या आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे अनेक लेखकांना ते अनेक प्रकाशकांकडे अथक चौकशा करत असताना त्यांचा मधुश्री प्रकाशनशी संपर्क झाला आणि त्यांच्या लेखनास आमच्या प्रकाशनाचे व्यासपीठ मिळाले. जर काही प्रकाशकांकडे नकार मिळाल्याने ही मंडळी निराश झाली असती, त्यांनी आपले प्रयत्न थांबवले असते, तर त्यांची पुढे जी अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, त्यांच्या लेखनास जो महाराष्ट्रभरचा हजारोंचा वाचकवर्ग मिळाला तो मिळाला नसता.

एक प्रामाणिक प्रश्न.
लेखकांना प्रकाशकाची गरज का वाटते? आजच्या युगात लेखक/लेखिका स्वतः:च पुस्तक प्रकाशित करून थेट वाचकांना विकू शकतात.

दुसरा मुद्दा: वाचक म्हणून मी आजतागायत एकदाही प्रकाशक, मुद्रक कोण आहे हे बघून पुस्तक खरेदी केलेले नाही.

वाचक प्रकाशक, मुद्रक कोण आहे हे बघून पुस्तक खरेदी करत नाही, हे आपले म्हणणे बहुतांशी बरोबर वाटते.

लेखकांना प्रकाशकाची गरज असते का? किंवा का वाटते? याबाबत माझी मते व्यक्त करण्यापेक्षा मला लेखकांची, विशेषत: आपण म्हणता त्याप्रमाणे स्वत:च पुस्तक प्रकाशित केलेल्या लेखकांची मते, त्यांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल.

खूप छान माहीती आहे.
माझी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. उन्मेष प्रकाशनतर्फे ’मेल्टिंग पॉट’ आणि मेहता प्रकाशनतर्फे गेल्यावर्षी ’रिक्त’. मेहता प्रकाशनचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.
प्रकाशक कोण आहेत हे पाहून पुस्तक विकत घेणार्‍यांची संख्या माझ्यामते लक्षणीय आहे. जसं राजहंस म्हटलं की वेगळे विषय, मेहता म्हटलं की अनुवाद असंच डोळ्यासमोर येतं.
लेखकाला प्रकाशकाची गरज असते असं मला वाटतं कारण स्वत: पुस्तक काढणारे बहुतांशी हौस म्हणून काढून नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेट देतात. वितरण हा मोठा भाग प्रकाशकामुळे साध्य होतो. आज देशापरदेशांतून हमखास मला कुणीतरी वाचनायलयात, दुकानात माझा ’रिक्त’ कथासंग्रह पाहून फोटो पाठवतात तेव्हा ते मेहतांमुळे साध्य झालं याची खात्री वाटते.

@ पराग र. लोणकर,

तुम्ही प्रकाशन व्यवसायाची दुसरी बाजू दाखवलीत आणि अगदी 'हॅन्ड्स ऑन' सल्ले दिलेत, अनेक आभार.

प्रकाशकांचे अनुभव फारसे वाचण्यात येत नाहीत.

मी या क्षेत्राशी संबंधित अजिबात नाही परंतू. तुमचा लेख आवडला.
जे यशस्वी प्रकाशक आहेत ते कोणत्या लेखकाचे कोणत्या विषयावर पुस्तक( किती प्रती) खपेल याचे गणित करून लेखकाकडून ते पुस्तक हक्कासह विकत घेतात. या मोबदल्याच्या तडजोडीत नवोदित लेखकास तो प्रसिद्ध नसल्याने कमी पैसे मिळतात. मग एक पुस्तक गाजले आणि विक्री तडाखेबंद झाली की त्या लेखकाचे बाजारात नाव होते आणि पुढच्या पुस्तकासाठी अधिक रक्कम मागू शकतो.