`लेखक-प्रकाशक संवाद!`

Submitted by पराग र. लोणकर on 30 March, 2020 - 05:55

नमस्कार!

मायबोलीवर लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. माझा वरील विषयावरील चिपळूण येथे आयोजित दुसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलन प्रसंगी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी मी लिहिलेला लेख येथे देत आहे.

`लेखक प्रकाशक संवाद` या विषयावर मला चिपळूणहून लेख लिहून मागितला गेला, आणि हा विषय माझ्या अगदी हृदयाच्या जवळचा असल्याने, असे लिहिण्याचा सराव नसतानाही हा लेख लिहिला गेला.

आमची पुण्याला `मधुश्री प्रकाशन` ही प्रकाशन संस्था आहे. गेली ४३ वर्षे अगदी मनापासून साहित्य सेवा करत असताना जर मधुश्रीची कोणती ताकद असेल तर ते म्हणजे आमचे लेखक!

आमचे प्रकाशन हे नवोदित परंतु प्रतिभासंपन्न साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. या लेखकांचे प्रेम आम्हाला मिळाले आहे ते आमच्यातील संवादामुळे! त्यामुळे माझा हा लेख मुख्यत: अश्या लेखक-प्रकाशक संवादावर असणार आहे जो उगवत्या लेखकांचा प्रकाशकांशी होणे अपेक्षित आहे.

प्रत्येकच लेखकाने आपलं लेखन खूप मनापासून केलेलं असतं. हे लेखन अनेकदा विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक इत्यादींमधून प्रकाशितही झालेले असते. मग या आपल्या लेखनाचं पुस्तक व्हावं असं साहजिकच त्याच्या मनात येतं आणि मग एक तर हा लेखक थोड्याफार स्वत:ला माहिती असलेल्या, कुणी सुचवलेल्या प्रकाशकास संपर्क करतो किंवा तशी माहिती नसल्यास वर्तमानपत्रात परीक्षणे आलेल्या पुस्तकांवरून किंवा पुस्तक प्रदर्शनांत/वाचनालयांत पुस्तकं पाहून एखाद्या प्रकाशकास संपर्क करतो.

लेखक-प्रकाशक संवाद प्रथम सुरु होतो तो इथेच! अनेक वेळा लेखकाच्या पदरी निराशा येते ती इथेच. संवादाला पूर्णविराम मिळतो तो सुरुवातीलाच. `आमच्याकडे पुढील तीन-चार वर्षाचे साहित्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे सध्या साहित्य स्वीकारणे थांबवलेले आहे.` `आम्ही फक्त ठराविकच लेखकांचे साहित्य प्रकाशित करतो!` `आम्ही ललित साहित्य प्रकाशित करत नाही.` अश्या प्रकारची वाक्ये लेखकांस ऐकावयास मिळतात. अश्या प्रसंगी या लेखकांना दुसरा एखादा पर्याय सुचवणे प्रकाशकास अशक्य नसते. मात्र तसेही फारसे केलेले दिसत नाही. बऱ्याचदा तर ही उत्तरेही खुद्द प्रकाशकाकडून न मिळता त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मिळतात. असेच अनुभव अजून काही प्रकाशकांकडून आले की लेखक नाउमेद होतो.

संवादाच्या या पहिल्या पायरीवर `लेखक आहेत म्हणून प्रकाशक आहेत` ही जाणीव ठेवूनच प्रत्येक प्रकाशकाकडून लेखकाला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. संबंधित प्रकाशकाला हे साहित्य प्रकाशित करणे शक्य नसेल तर असे लेखन प्रकाशित करणाऱ्या दुसऱ्या काही प्रकाशकांचे संदर्भ लेखकास देणे कोणत्याही प्रकाशकाला अवघड नाही. `सुचवलेल्या कोणत्याही प्रकाशकाशी लेखकाने पुढील सारा व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावा` असा खबरदारीचा इशारा या प्रकाशकाने द्यावा फार तर!

लेखकाचे साहित्य प्रकाशकाने एकदा स्वीकारले की त्यापुढचा दोघांचा संवाद, हा ते पुस्तक प्रकाशित होऊन करारात ठरल्याप्रमाणे लेखकाच्या प्रती लेखकाला मिळेपर्यंत व्हायला हवा तो दोन्ही पक्षांना आवडेल असा. इंग्रजीत `विन विन सिचुएशन` म्हणतात तसा!

लेखकाच्या अपेक्षा दोन प्रकारच्या असतात.

पहिली म्हणजे लेखक-प्रकाशकात परस्पर संमतीने ज्या नियम व अटींचा करार झाला असेल, तो प्रकाशकाने तंतोतंत पाळणे. काही अपवाद सोडता ही लेखकाची अपेक्षा पूर्ण होते असे मला तरी वाटते.

दुसऱ्या प्रकारात मात्र बऱ्याचदा लेखकाच्या पदरी निराशा येते आणि इथेच विसंवादास सुरुवात होते.

प्रत्येक उदयोन्मुख लेखक त्याच्या लेखनाबाबत खूप भावूक असतो. त्याचे ते साहित्य त्याला अतिशय प्रिय असते. अनेकदा या लेखनात लेखकाने प्रचंड मेहनत घेतलेली असते. अनेक वेळा पुनर्लेखन केलेले असते. असंख्य तास यात घालवलेले असतात. हे लेखन प्रकाशकाने एकदा व्यवस्थित डोळ्याखालून घालावे, खरं तर ते संपूर्ण वाचावे अशी अनेकदा लेखकाची अपेक्षा असते. अर्थात अगदी शब्दन शब्द असे वाचन करणे बऱ्याच प्रकाशकांना शक्य नसले, तरी या लेखनावरून एक व्यवस्थित नजर प्रकाशकाने टाकायलाच हवी. अशी नजर टाकल्यानंतर साहजिकच एक प्रकाशक म्हणून या लेखनावर आपली पहिली प्रतिक्रिया, काही बदल आवश्यक वाटले तर त्यावर चर्चा प्रकाशकाने लेखकाशी करायला हवी. अश्या प्रकारची चर्चा लेखकाला प्रचंड समाधान देऊन जाते. ज्या प्रकाशकांस स्वत: हे करणे शक्य नसेल त्यांच्या कार्यालयातील संपादकांनी हे काम तितक्याच आत्मीयतेने करायला हवे.

पुस्तक निर्मितीची प्रक्रिया चालू झाल्यानंतरही टप्प्या-टप्प्यांवर प्रकाशकाकडून लेखकास संपर्क होत राहिला पाहिजे. कधी कधी काही प्रकाशकांकडून एकदा करार झाल्यानंतर थेट पुस्तकच लेखकाच्या हातात पडतं. अश्या वेळी जर ते पुस्तक मुद्रणदोषरहित व आकर्षक मुखपृष्ठाने सजलेले व सर्वार्थाने सर्वांगसुंदर असेल तर असे पुस्तक अचानक हातात पडणे हा लेखकासाठी सुखद आश्चर्याचा धक्का असतो. मात्र प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा दर्जा फारसा चांगला नसेल तर लेखकाच्या पदरी कमालीची निराशा पडते. असे घडू नये, म्हणून अचानक तयार पुस्तकच लेखकाच्या हातात देण्याऐवजी पुस्तक छपाईस जाण्यापूर्वी पुस्तकाचे शेवटचे प्रूफ लेखकाला पहाण्यास/तपासण्यास पाठवणे, लेखकाच्या मुखपृष्ठाबाबतच्या कल्पना जाणून घेऊन त्याप्रमाणे चित्रकाराकडून चित्र काढून घेऊन ते लेखकास संमतीसाठी पाठवणे या गोष्टी लेखकास या निर्मिती प्रक्रियेत सहभागाचा आनंद तर देतातच, शिवाय आपल्या साहित्य अपत्याची पुस्तक रूपातील जडणघडण योग्य होत आहे किंवा नाही यावर लेखकाची नजर रहाते. त्या पुस्तकाच्या उत्तम व दर्जेदार निर्मितीत लेखकाची ही नजर मदतीचीच ठरत असते.

लेखकाच्या लेखनाचे पुस्तकात रुपांतर होण्याची प्रक्रिया चालू असताना अनेकदा लेखकाला आपले विचार, आपली मतं प्रकाशकाकडे मांडायची असतात. अश्या वेळी प्रकाशकाने आपले म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे, त्यावरील आपली मतेही सांगावी, एवढी माफक अपेक्षा लेखकाची असते. मात्र काही लेखकांच्या अशा वेळोवेळी होणाऱ्या संवादात पुनरावृत्ती (तीही वारंवार) होण्याचा अनुभव प्रकाशकास असतो. काही लेखक अगदी अर्धा अर्धा, एक एक तास बोलत राहतात असा माझा स्वत:चा अनुभव आहे. या संवादात ते अश्या अनेक गोष्टींचा उल्लेख करत राहतात, ज्या त्यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगून झालेल्या असतात. बऱ्याचदा मग अश्या लेखकांशी संवाद शक्य तितका टाळण्याचा काही प्रकाशक प्रयत्न करू लागतात. मग कार्यालयीन कर्मचाऱ्यावर लेखकांना प्रतिसाद देण्याचे काम सोपवले जाते. उत्तम लेखक-प्रकाशक संवादासाठी हे अतिशय मारक ठरते.

लेखक आणि प्रकाशक यांच्यातील संवाद हा उत्तमच असायला हवा! त्यासाठी प्रकाशकाने काय करायला हवे याचा आपण विचार केला.
अर्थात संवाद उत्तम होण्यासाठी दोनही बाजूंकडून प्रयत्न होणे गरजेचे असते.

लेखकाने आपल्या प्रकाशकाकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या जास्तीत जास्त खुलासेवार पहिल्या (अथवा दुसऱ्या) संवादाच्या वेळीच प्रकाशकापर्यंत पोहोचाव्यात. काही निवडक प्रकाशन संस्था सोडल्या तर बऱ्याचशा प्रकाशन संस्था या `एक खांबी तंबू` असतात. अश्या व्यवसायात प्रकाशक दररोज अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतो. अगदी मोजके कर्मचारी त्याच्याकडे असतात. बरीचशी महत्वाची कामे त्याला स्वत:ला करण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे लेखकांनी दूरध्वनीवर मुद्देसूद, कामापुरता संवाद ठेऊन बाकी सर्व (आवश्यक परंतु लिहून कळवता येईल असा) मजकूर पत्र, इमेल अथवा whatsappवर पाठवावा. असं केलं तर प्रकाशकही त्याला उसंत मिळताच हे सारं वाचून त्यावर शांतपणे प्रतिसाद देऊ शकतो. फोनवरच्या तुटक संवादापेक्षा असा उसंतीनं दिलेला सविस्तर प्रतिसाद लेखकांच्याही अधिक पसंतीस उतरतो असा माझा स्वत:चा अनुभव आहे.

कधी कधी खूप प्रयत्न करूनही लेखकास सांगितलेल्या वेळेत पुस्तक तयार होणार नाही याची प्रकाशकास कल्पना येते. इतरही एखादं आश्वासन पूर्ण करणं बदललेल्या काही परिस्थितीमुळे कठीण झालेलं असू शकतं. असं काहीही झाल्यास प्रकाशकाने लेखकाला सर्व परिस्थिती समजावून द्यावी. हा संवादही प्रकाशकाकडून जितका पारदर्शी होईल तितकाच लेखकही प्रकाशकाची अडचण समजून घेऊन सहकार्य देऊ करतो.

प्रत्येक प्रकाशक व लेखकाने वरील साऱ्या गोष्टी जर पाळल्या, तर या परस्पर उत्तम संवादातून ही पुस्तक निर्मिती प्रक्रिया दोघांसाठीही एक आनंद सोहोळा बनून जाते. वर्षानुवर्षांचे स्नेहसंबंध त्या दोघांत निर्माण होतात.

आज आमच्या मधुश्रीचे लेखक महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात पसरलेले आहेत. यामध्ये अक्षरश: असंख्य लेखक आहेत. काही लेखकांची उदाहरणे सांगण्यासारखी आहेत. मधुश्रीशी संपर्क होण्यापूर्वी अनेक प्रकाशकांकडून नाउमेद होऊन आपले तीस वर्षांहून अधिक काळ विविध मासिकांतून प्रसिद्ध झालेले अतिशय दर्जेदार कथा साहित्य शेवटी निराशेत जाळून टाकण्यास निघालेल्या आमच्या एक लेखिका आहेत. आमच्याच एका दुसऱ्या लेखिकेच्या सुचवण्यावरून त्या आमच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित केली. सध्या सोळावे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आमच्या नियमित चालणाऱ्या पत्रोत्तरातील एका पत्रात `तुम्ही पुण्याचे प्रकाशक असूनही इतके गोड कसे बोलता?` असा त्यांचा मला प्रश्न आला होता. माझ्या अनेक ज्येष्ठ लेखिकांनी मला त्यांच्या मुलांपैकी एक मानले आहे. आमच्या अनेक लेखकांना इतर प्रकाशकांनी संपर्क केल्यावर, `माझी पुस्तके फक्त मधुश्री प्रकाशनच प्रकाशित करणार,` असं त्यांनी आमच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मियतेमुळे सांगितलेलं आहे. मधुश्रीनं पुस्तकं प्रकाशित केल्यानंतर पुढील पुस्तकं इतर प्रकाशनांनी प्रकाशित केलेलेही काही लेखक आहेत. परंतु त्या प्रत्येक लेखकाशी त्यानंतरही आमचे संबंध पूर्वीइतकेच सौहार्दाचे राहिले आहेत. अनेकदा अश्या दुसऱ्या प्रकाशकाबाबतीत काही समस्या निर्माण झाली तर अश्या लेखकांनी मला संपर्क करून याबाबत मला काही करता येईल का? असं अगदी हक्कानं विचारलेलं आहे. त्या प्रकाशकांचा आणि माझा काही परिचय असल्यास मीही त्या प्रकाशकाशी बोलून त्या लेखकाच्या बाबतीत निर्माण झालेली समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मधुश्रीचे असे अनेक लेखक, लेखिका आहेत ज्यांनी लिहिलेली सर्वच्या सर्व पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. एका लेखकाची तर आम्ही पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित केलीत. यातील अठ्ठावीस पुस्तकं ही एकामागून एक अशी सलग प्रकाशित झालेली आहेत. गेल्या ४३ वर्षांमध्ये आमच्या मधुश्री परिवारात सामील झालेल्या असंख्य लेखकांपैकी अगदी एकाही लेखकाशी असलेल्या संबंधात कटुता आलेली नाही, ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट मला वाटते. ही सारी घनिष्ट नाती, अतूट बंध निर्माण होण्याचं एकमेव कारण म्हणजे `उत्तम परस्पर संवाद!` माझ्याइतकंच याचं श्रेय त्या साऱ्या लेखकांना आहे.

माझ्या मते, साहित्य क्षेत्रात चर्चेत घेतल्या जाणाऱ्या विषयांत बऱ्यापैकी दुर्लक्षित केला जाणारा विषय म्हणजे लेखक-प्रकाशक संवाद! आज असंख्य उदयोन्मुख लेखक, कवी आपले दर्जेदार साहित्य प्रकाशात आणण्यास प्रयत्नशील आहेत. असे लेखक आणि प्रकाशक यांचा, या दोन अतिशय महत्वाच्या घटकांचा परस्पर संवाद जर उत्तम राहिला तर या लेखकांचे हे साहित्य आणि हे साहित्यिक लवकरच प्रकाशात येऊन साहित्य विश्वात मान्यताप्राप्त बनू शकतील एवढं नक्की!

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं पहिलं वहिलं पुस्तक 'एक होता कॅन्सर' मधुश्री प्रकाशन तर्फेच प्रकाशित झालं आहे. श्री लोणकर यांनी वरील लेखात लिहिल्याप्रमाणे पुस्तक छपाईच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला त्यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं. मी वेळोवेळी विचारलेल्या शंका आणि प्रश्न यांचं श्री लोणकर यांनी अगदी शांतपणे आणि व्यवस्थित निरसन केलं. एकंदरीतच माझा हा पहिला अनुभव खूपच पॉझिटिव्ह होता. आणि याचं सगळं श्रेय जातं ते श्री लोणकर आणि त्यांच्या टीमला . Happy लवकरच माझं दुसरं पुस्तक- 'माझी सैन्यगाथा' देखील प्रकाशित करायची तयारी त्यांनी दाखवली आहे. Wishing him every success in life and looking forward to working with him in future. Happy