शुद्ध सारंग!

Submitted by kulu on 28 March, 2020 - 10:26

आजवर अनेक शुद्ध सारंग अनुभवले! माझा अतिशय आवडता राग आहे. खरं तर एकापाठोपाठ एकाच स्वराच्या शुद्ध आणि कोमल श्रुती ज्या रागांत येतात ते सगळेच राग आवडतात, मग तो दोन गंधारांना वापरून रात्रीला जगवणारा जोग असो कि दोन्ही निषादांच्या ढगांवरून बरसणारा मिया मल्हार असो किंवा कोमल गंधाराच दुखणं शुद्ध गंधाराने संहत करणारी शिवरंजनी असो! ती शुद्ध स्वरावरून कोमल स्वरावर येणारी अलगद उतरण काही तरी करते काळजात एवढं नक्की!

पहिला शुद्ध सारंग ऐकला तो नेहमीप्रमाणे किशोरीताईंचा. खरं तर राग म्हणजे काय हे सुद्धा माहित नसण्याच्या काळात ऐकलेली "जा रे भंवरा दूर" ही द्रुत त्यावेळी रिपीट मोड वर ऐकली. मनाला गुदगुल्या करणारं कायतरी आहे हे, असं वाटलं. नंतर कधी तरी शुद्ध सारंग हा राग आहे आणि रागात ख्याल गातात असं थोडं कळलं तेव्हा मग विलंबित ऐकली! पण एकूण त्या २५ मिनिटांच्या रेकॉर्ड मध्ये मन काही भरत नव्हतं. पण मागच्याच वर्षी बहुतेक यु ट्यूब वर ४१ मिनिटांची शुद्ध सारंगाची ताईंची रेकॉर्ड आली आणि स्वर्ग मिळाल्याचा फील आला! ताई शुद्ध सारंगात काय कमाल करतात ते मला काही सांगता यायचं नाही! "प्राजक्ताची फुलं सुंदर का?" या प्रश्नाला उत्तर काय? त्याचा रंग, त्याचा गंध कि हे सगळं धरूनही त्यापेक्षा वेगळं काही? नाही सांगता येत! पण तिरप्या उन्हाच्या झोताने विरघळताना हिमालयातल्या स्फटिक-कणाला ज्या गुदगुल्या होत असाव्यात तसं काहीसं होतं ऐकताना! तीव्र मध्यमाला तीव्र म्हणण्यामागे काही कारण आहे, बाकी स्वरांच्या विकृत श्रुती कोमल असतात पण या मध्यमाला तीव्र आहे श्रुती. हा तिखट मध्यम आहे, जेवणाच्या ताटातल्या ठेच्याप्रमाणं! सांभाळून खाल्ला तर लज्जत वाढते जेवणाची आणि प्रमाण नाही सांभाळलं तर रया जाते. तसाच हा मध्यम सांभाळून वापरायचा आहे नाहीतर राग कर्कश्श व्हायला वेळ नाही लागत! ह्या तीव्र मध्यमालाच मुळात मऊ करण्यात ताई यशस्वी झाल्या आहेत.... गानसरस्वती हि काही उगीच मिळालेली उपाधी नव्हे! आणि कदाचित या ताईंच्या किमयेमुळे कि काय त्या सारंगाला उन्हाची झळ नाही पण कोमल शुभ्र आभा मात्र आहे!

आल्प्समधून प्रवास करताना असे बरेच सुंदर शुद्ध सारंग ऐकले, दिसले! थंडीत दुपारी आल्प्स मधल्या टेकड्या चढताना भीमाण्णांनी "सुंदर कांचन बरसे" म्हणून आजूबाजूच्या धवल नजाऱ्यावर सोनं वितळवलेलं आठवलं कि आजही फुलपाखरू व्हायला होतं! गंगुबाईंनी "तीव्र माध्यम लावू का?" असं श्रोत्यांना विचारून तीव्र मध्यम लावून आणलेली बहार काय वर्णावी! गंगुबाईंची मला कमाल वाटते. पुरुषालाही लाजवेल असा खडा आवाज बाईंचा. मुरक्या वगैरे प्रकार बाईंनी घेतलेले मला तरी आठवत नाहीत किंवा मला ते कळतही नसेल पण शुद्ध सारंग हा अखंड नाजूक राग असा गायलाय कि क्या केहने! अजून एक आपल्याला चीत करणारा शुद्ध सारंग म्हणजे कुमारांचा. "अलबेली नार सुहावे" ही अप्रतिम द्रुत आणि त्यात "हा" वर मध्यम आणि पंचमाने हातात हात धरून जी फुगडी घातलेय ती ऐकताना आपण पण तिथे फेर धरू लागतो! ती जी अलबेली नार आहे ती "सुहावे" म्हणजे नेमकी कशी ते फक्त त्या फुगडीवरून लक्ष्यात यावं, त्यात तिचा नखरा, तिची चाल, तिचा तोरा, तिचं सौंदर्य सगळं आहे! कुमार दाखवतात ते तुम्हाला.... स्वरचित्र उभं करतात! कुमारांनी गायचं आणि आपण काळीज खोलून त्यांच्यासमोर ठेवायचं याशिवाय दुसरी कुठली शक्यता कुमारांनी श्रोत्यांसमोर ठेवली आहे काय कधी?

अजून दोन माझ्या खास ठेवणीतले शुद्ध सारंग आहेत. एक विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचा आणि दुसरा पंडित बसवराज राजगुरू यांचा! दोघंही सरळ मुद्द्याला हात घालणारी माणसं, स्वरांचं दळण नाही, राग अख्खा उभा करून ठेवणार झटक्यात आणि हे कधी झालं ते आपल्याला कळत पण नाही! कोळणी माश्याचा काटा झटक्यात बाजूला काढून ठेवतात तसं! पद्मावतीबाईंचा शुद्ध सारंग अवघा १७ मिनिटांचा. तेवढ्या वेळात बाईंनी सूर्यनारायणाची अशी आराधना केली की त्याने आपली ऊन्हं कोमल केली! एकतर जयपूर च्या प्रथेप्रमाणेच म्हणता येईल अशी आवाजाला हवीहवीशी खरखर! ऐकताना रंध्रारंध्राचे कान व्हावेत असं वाटतं! जयपूरच्या बलाच्या चक्राकार ताना अशा घेतल्यात बाईंनी की त्या स्वरवर्षावात कितीही भिजलं तरी समाधान होत नाही! बसवराज पण असेच, एवढा चटकीला शुद्ध सारंग कुठेच ऐकला नाही, त्यात आपण स्थिर व्हायचं नाहीच. उलट कांगारू व्हायचं आणि स्वरांच्या मोकळ्या रानात उड्या मारत तो राग ऐकायचा. किंबहुना दुसरं काही करताच येत नाही! राजगुरूंच्या शुद्ध सारंगाचं ऊन खेळकर आहे, विंदांच्या थंडीतल्या शिरशिरणाऱ्या उन्हात आजीलाही झिम्म्याची स्वप्नं दाखवणारं ते ऊन आहे!

परवाच अगदी विदुषी ललित रावांचा शुद्ध सारंग ऐकला! खरंतर सांगायला पण लाज वाटते कि ललितजींना मी गेल्या दोन महिन्यातच ऐकायला सुरु केलं. अंडर-ऍप्रिशिएटेड कलाकार या प्रकारांत त्यांचा नंबर फार वरचा आहे! काय जबराट गायलाय त्यांनी शुद्ध सारंग, काय ते मींडकाम, काय ती सरगम, काय ती बोलबांट... कसं काय आहे बुवा हे एवढं सगळं चांगलं! मला नाही कळत, हरलो मी! हरण्यात मज्जा आहे या! एक मींड तर तार सप्तकातल्या तीव्र मध्यमावरून मध्य सप्तकातल्या रिषभावर येऊन विसावते आणि तेवढा वेळ आपण श्वास रोखून धरायचा! काय बाई आहे ही, दीड सप्तकाची मींड? असं असतंय का कुठं? किती अवघड आहे अशी मींड पेलायचं म्हणजे, पण त्यामुळे शुद्ध सारंग स्वतःच शुद्ध होऊन जातो एव्हढं खरं!

आज हे लिहायला कारण म्हणजे मी आता डेकवर येऊन बसलोय! आज सॅम्पलिंग नाही माझं, त्यामुळे मला आरामात बसून बघता येतोय तो समोर नजर जाईल तिथवर निळा समुद्र, तो संपला कि निळं आकाश आणि मध्येच आमची लालचुटुक पदराची पांढरी साडी नेसलेली नौका! दिवस इतका मस्तंय, भास्करराव स्वच्छ प्रकाशाचं दान देतायत आणि या सगळ्यात मला शुद्ध सारंग दिसतोय! हे सगळं जरा आश्चर्यकारक आहे. कारण समुद्रावर मला शुद्ध सारंग दिसेल असं वाटलं नव्हतं! समुद्रावरचं ऊन हे नेहमी ओलं असतं आणि ओल्या उन्हाचा राग म्हणजे वृंदावनी सारंग! शुद्ध सारंगाची उन्हे कोरडी असतात, त्याला दमटपणा चालतच नाही. तोडलं तर कुरकुरीत वाटावं इतकं कोरडं ऊन असतं शुद्ध सारंगाचं! असं ऊन समुद्रावर कुठे मिळणार, पण आज पडलं! काय माझं भाग्य हे, सगळंच शुद्ध सारंग झालं आहे आज. लाटा दोन्ही मध्यमांच्या चढ-उतारावर नाचतायत, निषाद आणि धैवताचे पांढुरके कोरडे ढग त्या लाटांचं कौतुक करतायत, पंचमाचा सूर्य सगळ्या दर्याला गुदगुल्या करतोय आणि अविनाशी षड्ज फक्त निळा होऊन सगळीकडे भरून राहिलाय! शुद्ध सारंगाचं हे दर्शन मला पृथ्वीने काय म्हणून घडवावं? मला आवडतो म्हणून? मग त्यासाठी माझी कृतज्ञता पण शुद्ध सारंग, माझा नमस्कार पण शुद्ध सारंग आणि मी सुद्धा!

किशोरीताई: https://www.youtube.com/watch?v=ieZyT1CaB9k
भीमण्णा: https://www.youtube.com/watch?v=bp7MuG_nYXU
गंगुबाई: https://www.youtube.com/watch?v=SLar1ZWMblA
कुमार: https://www.youtube.com/watch?v=zQwt91IZ3bw
पद्मावती शाळीग्राम: https://www.youtube.com/watch?v=uSobJLnPyAs
पंडित बसवराज राजगुरू: https://www.youtube.com/watch?v=QgRK61cYyew
विदुषी ललित राव: https://www.youtube.com/watch?v=dYfy4YrPySo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे.

श्याम कल्याण म्हणजे शुद्ध सारंग आणि दुसरा कोण ?

मस्त लिखाण. ' तिखट' तीव्र मध्यम हे तर फारच आवडले.बाईंचे तीव्र सूर कधी कधी तिखट असतात. त्यांच्या स्वभावासारखे म्हणा किंवा वैषम्य, वैफल्य ओतून टाकल्यासारखे म्हणा.
सारंग आणि मासळीचा काटा ही निकट संबंध दाखवणारी उपमाही आवडली.

महानोरांची एक कविता आहे. ती ऐकताना तुम्ही म्हणता तसा रखरखीत उन्हाचा शुद्ध सारंग डोळ्यात भरून राहिला होता.
शब्दात गोठले दु:ख शब्द अलवार
ग्रासली उन्हे झाडाना हिरवा भार
हा अथांग दरिया दु:खाची बारात
आयुष्य उधडले लक्तरलेले हात
काळीज कुरतडे खोल मुका आ़कांत
घनघोर नभाच्या तळ्यात चंद्र विखार

नेहमी प्रमणे सुंदर चिंतन!

छानच लिहिलंय.
सारंग माझा पण आवडता राग पण गौड सारंग जास्त आवडतो. आता शुद्ध सारंग परत नीट ऐकून बघेन.

शब्दात न मावणारा अनुभव शब्दात मांडलास... धन्य- पुरंदरे काका केवढी मोठी शाबासकी ही.
पशुपत, सुंदर कविता!
सनव, गौड सारंग हा राग आहेच तसा, गोssड सारंग आहे तो!
वैषम्य, वैफल्य ओतून टाकल्यासारखे म्हणा--हीरा, बरोबर आहे तुमचं...... तीव्र दुःख, वेदना ताईंच्या स्वरात बऱ्याचदा दिसतेच!
>>श्याम कल्याण म्हणजे शुद्ध सारंग आणि दुसरा कोण ?>>BLACKCAT प्रश्न कळला नाही मला

अफलातून लिहिलस ___/\___
अशी अनुभूती मिळायला भाग्य लागतं अन तसं शुद्ध मनही! जियो

वा! शुद्ध सारंग माझा पण खूप आवडता राग आहे. अब मोरी बात मानले पिहरवा - ही चीझ पण मस्त आहे.
रामदास कामतांनी गायलेलं 'निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे' हे पण शुद्ध सारंगावर आधारित आहे. खूप छान आहे पहा.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy
श्याम कल्याण हा शुद्ध सारंग आणि अजून एक रागाचे मिश्रण आहे. दुसरा राग कोणता?>>>>> खरं तर तशा मिश्रणाने शाम कल्याण तयार झालाय असं मला वाटत नाही पण त्यात शुद्ध सारंगाचा भास होतो हे खरं आहे! कामोदच असावा तो दुसरा राग बहुतेक! शुद्ध सारंगात कमी आहेत गाणी खुप आणि जी आहेत ती पुर्ण शुद्ध सारंग फॉलो नाहीत करत त्यात श्याम कल्याण, कामोद असं मिश्रण असतच! किशोरीताईंचं अवचिता परिमळु पण शुद्ध सारंगात आहे बर्‍यापैकी! https://www.youtube.com/watch?v=URiwSFKeN3s

रामदास कामतांनी गायलेलं 'निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे' हे पण शुद्ध सारंगावर आधारित आहे. खूप छान आहे पहा.>>>> नक्की ऐकतो!

खूपच छान लिहिला आहेस लेख kulu.

@blackcat
श्याम कल्याण आणि शुद्ध सारंग या रागांत साम्य खूप आहे.
पण मुख्य फरक सांगायचा झाला तर 'रागांग' हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. रागांग म्हणजे त्या त्या रागात हमखास येणारे स्वरसमूह (त्या स्वरांच्या लागावासह, म्हणजे स्वर लावण्याच्या पद्धतीसह).
श्याम कल्याण हा कल्याण अंग आणि कामोद अंग या दोन रागांगांच्या मिश्रणातून तयार होतो. ग म(शुद्ध) प ग म्(शुद्ध) रे हे कामोद अंग. रे प म्(तीव्र) प रे... इथे कल्याण अंग डोकावते.

शुद्ध सारंग हा सारंग अंगाचा राग आहे. यात तीव्र मध्यम येत असला तरी रे म(शुद्ध) रे नी रे सा... हे सारंग अंग प्रामुख्याने येते.
अजून एक म्हणजे, श्याम कल्याणात येणारा तीव्र मध्यम हा पंचमाकडे अधिक झुकलेला आहे. याउलट शुद्ध सारंगातला तीव्र मध्यम हा नेहमीचा तीव्र मध्यम आणि शुद्ध मध्यम यांच्याही मधल्या श्रुतीचा असतो.

खुळा का काय... वेड लावशील... कुरकुरीत उन्हाचा तुकडा ही उपमा भयंकर आवडली... ललित रावांचा शुद्ध सारंग... तूच ऐकायला लावला होतास... काहीही कळत नसताना एकदा ऐकला आणि मग खूळ लागलं... अनेकदा ऐकला....

अप्रतिम. रागातलं काही कळत नाही पण तू काय लिहिलं आहेस रे, आहाहा. तू दिलेल्या लिंक सावकाश ऐकते.>>>>> + १

कुलू जी , शुद्ध सारंगाचे आपण रेखाटलेले रूप खूप आवडले. चढ्या मध्यमाचे वर्णन सुद्धा यथायोग्य झाले आहे.
मी विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचा आणि दुसरा पंडित बसवराज राजगुरू यांचे सारंग ऐकलेले नाहीत , आता उद्या दुपारी ही मेजवानी घेतो.

तसेच विदुषी ललित रावांचे काहीही ऐकले नाही , ह्यांच्या गाण्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद . असे तुलनेने अप्रसिद्ध गायक खूप आहेत . श्रोत्यांच्या आणि व्यासपीठाच्या आभावी ही कला रसिकांपर्यंत पोहोचत नाही हे आपले दुर्भाग्य.

मला आवडणारे सारंग आहेत पं. जसराज जी , व्यंकटेश कुमार जी आणि आश्विनितैंचे ! सारंग इतकेचे वृन्दावनी आणि मधमाद सारंग ही प्रिय आहेत. जसराज जी यांचा मधमाध प्रसिद्ध आहेच , पण कैवल्य कुमारांचा आर्जवून ऐकावा.

निर्गुणाचे भेटी रामदास जी यांनी अजरामर केले आहे तर नवोदित मुग्धा वैशंपायन यांनी ही सुंदर गायले आहे.

२ दिवसापूर्वीच येथे आलो आणि हा पहिलाच प्रतिसाद , सारंग सख्या साठी !

आपले सगळे लेखन वाचतो .

चैतन्य, उत्तम माहिती दिलीस आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद Happy
सर्वांचे प्रतिसाद वाचून छान वाटलं Happy
मनोज२८ मायबोलीवर पहिला प्रतिसाद सारंगावर यावरूनच तुमचं सारंगप्रेम दिसून येतं. तुम्ही सांगितलेले सारंग नक्की ऐकतो Happy

Pages