मन वढाय वढाय (भाग २९)

Submitted by nimita on 26 March, 2020 - 22:09

आठवड्याभरात रजत त्याच्या ट्रेनिंग साठी परदेशात रवाना झाला. गेल्या वर्षभरात त्याच्या 'असण्याची' इतकी सवय झाली होती स्नेहाला ; आता त्याच्याशिवाय तिला खूपच एकटं एकटं वाटत होतं. तसं पाहता दिवसभर ते दोघंही आपापल्या कामांत व्यस्त असायचे. एकमेकांबरोबर फार कमी वेळ मिळायचा दोघांना. पण तरीही रजत जवळपास असल्याची एक खात्री असायची स्नेहाला. त्याचं बोलणं, त्याचा घरातला वावर सगळं इतकं सवयीचं झालं होतं, इतकं अंगवळणी पडलं होतं की स्नेहाच्या ते कधी लक्षातच नव्हतं आलं. पण आता त्याच्या विरहामुळे तिला ती कमी जाणवत होती.

त्याचं ते मिश्किल हसणं ...ती खट्याळ नजर....घरच्यांचा डोळा चुकवून तिच्या सहवासाचे,प्रेमाचे काही क्षण चोरणं.... छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याचं तिच्यावर अवलंबून राहाणं...तिच्या कामाचं कौतुक करणं....त्याचा तो प्रेमळ पण तितकाच धुंदावणारा स्पर्श.... किती किती आणि काय काय आठवत होतं स्नेहाला! तिला एका हिंदी सिनेमातलं एक गाणं आठवलं....

ना जाने क्यूँ होता है ये जिंदगी के साथ

अचानक ये मन किसी के जाने के बाद

करे फिर उसकी याद

छोटी छोटी सी बात .. ना जाने क्यूँ ।

आता तर तिचं मन अजूनच उदास झालं.

शेवटी एकदाचा रजत घरी परत आला आणि स्नेहाचा विरह संपला. पुन्हा त्यांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं. पण एक गोष्ट त्या दोघांनाही जाणवली - नुसती जाणवलीच नाही तर मनोमन पटली सुद्धा.....'विरहानी प्रेम वाढतं'...खरंच ! आणि याहीपेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट स्नेहाच्या लक्षात आली होती- रजतच्या विरहात आणि त्यानंतरच्या त्यांच्या सुखद सहवासात एकदाही तिच्या मनात सलीलचा विचार आला नव्हता, त्याची आठवण आली नव्हती. तिचं सगळं विश्व जणू रजतमधेच सामावलं होतं; त्यात इतर कोणालाच जागा नव्हती- अगदी सलीलच्या आठवणींनासुद्धा ! जेव्हा स्नेहाला ही जाणीव झाली तेव्हा ती थोडी सुखावली. तो ब्रेसलेटचा प्रसंग झाल्यापासून तिच्या मनात जी अपराधाची, रजतला फसवत असल्याची भावना होती ती आता नाहीशी झाली होती.

लवकरच स्नेहा आणि रजत बडोद्याला रवाना झाले. नव्या जागी जम बसायला थोडा वेळ लागला ; पण लवकरच सगळं काही सुरळीत झालं...अपेक्षेप्रमाणे रजत नव्या फॅक्टरीच्या कामात व्यस्त झाला. आता त्याला दिवसाचे चोवीस तास देखील कमी पडायला लागले. स्वतःला सिद्ध करायची एवढी मोठी आणि महत्वाची संधी मिळाली होती त्याला. त्या संधीचं सोनं करण्यासाठी तो अहोरात्र मेहनत घेत होता. स्नेहासुद्धा तिच्या परीनी जमेल तशी मदत करत होती. रजतला त्याच्या कामाच्या व्यवधानात उगीच व्यत्यय नको म्हणून घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्नेहानी स्वतःवर घेतल्या होत्या. सुरुवातीच्या काळात रजतला याबद्दल खूप अपराधी वाटायचं. तसं त्यानी बोलूनही दाखवलं होतं स्नेहाला. आपण घरासाठी, स्नेहासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची जाणीव होती त्याला. अशावेळी नेहेमीसारखीच स्नेहा त्याची समजूत काढत म्हणायची," इतकं कशाला वाईट वाटून घेतोयस? थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे. एकदा का इथल्या कामाची घडी बसली की मग तू थोडा फ्री होशील. आणि मग तेव्हा आपण ही सगळी कसर भरून काढू. आत्ता तू या सगळ्याचा विचार करत बसू नको. I know, this is just a passing phase. लवकरच सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल."

पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच होत नव्हतं. उलट रजत त्याच्या कामाच्या दलदलीत अजूनच फसत चालला होता. त्याची एकंदर काम करण्याची पद्धत आणि हरहुन्नरी स्वभाव यामुळे लवकरच तो त्याच्या वरिष्ठांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याला एकामागोमाग एक महत्वाच्या assignments मिळत गेल्या. साहजिकच कंपनी साठी तो एक indispensable asset सिद्ध झाला. पण इतकं सगळं होऊनही त्याचे पाय मात्र जमिनीवरच टिकून होते.आपल्या या यशात आपल्याबरोबरच स्नेहाचाही वाटा आहे हे तो अगदी अभिमानानी सगळ्यांना सांगायचा. रजतचं असं बोलणं ऐकून स्नेहाच्याही अंगावर मूठभर मांस चढायचं.त्याची अशी उत्तरोत्तर प्रगती होताना बघून स्नेहाला आणि त्यांच्या घरच्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटायचा. पण रजतच्या या सतत वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे स्नेहा हळूहळू एकटी पडत चालली होती.

दुसऱ्या गावात असली तरी वंदनाला स्नेहाची होणारी कुचंबणा जाणवत होती. 'तू पुन्हा तुझं काम का नाही सुरू करत ? इथल्यासारखाच तिथेही तुझा स्वतःचा स्टुडिओ सुरू कर ना !" तिनी स्नेहाला सुचवलं. खरं म्हणजे स्नेहाच्या मनात पण हेच होतं. पण 'एकटीला सगळं झेपेल का नाही' अशी शंका होती तिच्या मनात. शेवटी तिनी रजतशी या विषयावर बोलायचं ठरवलं.नेहेमीप्रमाणे त्याचा तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा होता. लवकरच स्नेहानी पुन्हा आपलं काम सुरू केलं...घरातल्याच एका खोलीत आपला स्टुडिओ थाटला. हळूहळू तिच्या कामाचा व्यापही वाढायला लागला. पण तरीही इतक्या बिझी शेड्युल मधून सुद्धा स्नेहा आणि रजत एकमेकांकरता वेळ काढायचा प्रयत्न करायचे. रविवारचा सुट्टीचा दिवस हा फक्त त्या दोघांचा असायचा. त्यांचं असं सुखी, आनंदी वैवाहिक जीवन बघून दोघांच्याही आईवडिलांना पण खूप समाधान वाटत होतं. आणि लवकरच त्यांच्या या समाधानात आणखी भर पडली. त्यांच्या नात्याला आता बढती मिळाली होती. आता ते आजी आजोबा होणार होते.

रजत आणि स्नेहाच्या संसारात एका छोट्या जीवानी प्रवेश केला.... त्यांची दोघांची परिराणी- 'श्रद्धा' !! श्रद्धा च्या आगमनानंतर काही काळासाठी का होईना पण रजतनी घरासाठी - घरासाठी म्हणण्यापेक्षा त्याच्या छोट्या परी साठी वेळ द्यायला सुरुवात केली. रोज ऑफिसमधून घरी आल्यावरचा त्याचा सगळा वेळ श्रद्धा साठी राखून ठेवलेला असायचा. , तिच्याशी खेळणं, तिला कुशीत घेऊन तासंतास तिच्याशी गप्पा मारणं, तिचे छोटे मोठे हट्ट पुरवणं...अशा वेळी त्याच्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नसायचं !

श्रद्धाच्या शाळेचा पहिला दिवस अजूनही आठवत होता स्नेहाला ! त्या दिवशी श्रद्धा आणि स्नेहापेक्षा रजतचीच अवस्था बघण्यासारखी होती. त्या दिवशी मुद्दाम ऑफिसमधून सुट्टी घेतली होती त्यानी- शाळा सुटेपर्यंत पूर्ण वेळ श्रद्धाच्या शाळेच्या बाहेर बसून होता तो !

आणि जेव्हा श्रद्धाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा होत्या तेव्हासुद्धा रोज रजत तिला सोडायला जायचा. ऑफिसमधून इतक्या दिवसांची सुट्टी मिळाली नाही म्हणून....नाही तर रोज तिच्या exam सेन्टर बाहेर पेपर पूर्ण होईपर्यंत बसून राहायची इच्छा होती त्याची .... अगदी तिच्या शाळेच्या पहिल्या दिवसासारखी !

रजत आणि श्रद्धा मधलं हे असं गोड आणि अतूट नातं बघून स्नेहाला खूप बरं वाटायचं. आपल्या या सुखी संसारासाठी ती मनोमन देवाचे आभार मानायची.

तरी देखील ; इतक्या वर्षांनंतरही एखाद्या उनाड क्षणी तिच्या मनात सलीलचा विचार तरळून जायचा. पण आता तिच्या मनात त्याच्याबद्दल कोणतीही अढी, कोणताही आकस नव्हता. सुरुवातीच्या काही वर्षांत सलीलच्या विचारांनी तिच्या मनाची जी घालमेल व्हायची ती आता नव्हती होत. त्यामागचं नक्की कारण तिलाही उमगलं नव्हतं....अशावेळी तिला आजीचं बोलणं आठवायचं. सलीलनी नकार दिल्याचं कळल्यावर आजी म्हणाली होती -'आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. कितीतरी वेळा आपल्याला तडजोड करावी लागते. त्यावेळी खूप त्रास होतो, पण जे होतं ते नेहेमी आपल्या चांगल्यासाठीच होत असतं. या आत्ताच्या घटनांमधून पण नक्कीच काहीतरी चांगलं होईल...कदाचित आत्ता नाही कळणार तुला ते किंवा माझं म्हणणं पटणार नाही- पण भविष्यात जेव्हा तू मागे वळून बघशील ना, तेव्हा तुला कळेलही आणि माझं म्हणणं पटेलही.' आणि खरंच आजीच्या बोलण्यातला शब्द न् शब्द आता स्नेहाला पटला होता. रजत खरंच सर्वार्थानी स्नेहासाठी योग्य होता...अगदी तिच्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा....आजी म्हणाली होती ते खरंच होतं...' हरवलेल्या प्रेमाच्या बदल्यात पुन्हा प्रेम मिळू शकतं.' आणि रजतच्या रुपात स्नेहाला ते प्रेम मिळालं होतं. रजत आणि श्रद्धा मुळे स्नेहाचं आयुष्य पूर्णत्वाच्या शिखरावर जाऊन पोचलं होतं.

स्वतःचं असं तृप्त आयुष्य जगत असताना स्नेहाला कधीकधी सलीलची आठवण यायची...त्याच्यासाठी वाईट वाटायचं. अशा वेळी तिच्या मनात यायचं ,"माझ्याशी लग्न करता आलं नाही म्हणून तो एकटाच राहतो आहे. पण त्याच्या या निर्णयामुळे आयुष्यातल्या किती नात्यांना, किती सुखांना पारखा झालाय तो! किती अपूर्ण आहे त्याचं आयुष्य !! जर कधी भेटला तर नक्की सांगीन त्याला - भूतकाळात जे झालं ते सगळं विसरून जा. पुन्हा नव्यानी सुरू कर तुझं आयुष्य. तू पण स्वतःसाठी एक योग्य जोडीदार शोध ; लग्न कर."

पण त्यांच्यातलं नातं तुटूनही आता जवळजवळ सतरा अठरा वर्षं लोटली होती. काही वर्षांपूर्वी त्याच्याबद्दल शेवटची बातमी कळली होती त्यानुसार त्यानी जर्मनी मधेच स्थायिक व्हायचं ठरवलं होतं.पण सध्या तो कुठे होता, काय करत होता- काहीच माहीत नव्हतं स्नेहाला. औरंगाबाद सोडल्यापासून तिच्या मित्र मैत्रिणींबरोबरचा तिचा संपर्क हळूहळू कमी झाला होता... जवळजवळ तुटलाच होता ! बरेच जण औरंगाबाद सोडून दुसरीकडे स्थायिक झाले होते...कोणी तिच्यासारखे नोकरीनिमित्त तर कोणी मैत्रिणी लग्न होऊन परगावी गेल्या होत्या. काही जण तर परदेशात गेल्याचंही कळलं होतं तिला.

अशातच एक दिवस तिच्या मित्राचा -अजयचा फोन आला. त्याच्या आवाजात एक वेगळीच excitement जाणवत होती स्नेहाला.

" हॅलो स्नेहा ...."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ohhh ... छान.... आज एकाच भागात कथा खुप पुढे गेली. आता फोन कशासाठी आला होता याची वाट बघावी लागणार वाटत.

छान झालाय हा भाग. कथानक पुढे सरकल्याने मागील काही भागांची कसर भरून निघाली. आता reunion च्या प्रतिक्षेत
Happy

सुरुवातीला रजत स्नेहाच्या नात्यात जो एक दुरावा किंवा काही वर्षांनी येणारा एकमेकांना गृहित धरणारा अबोला आला आहे असम काही वर्णन होतं. इथे सगळं आलबेल आहे. ह्या भागात कथा रीयुनियन वर आली म्हणुन बरं झालं. जरा लांबत होती असं वाटत होतं.