गाव ते पुन्हा कधी वसलेच नाही

Submitted by द्वैत on 24 March, 2020 - 15:32

चांदणे ह्या अंगणी पडलेच नाही
प्रेम ही माझे कुणा कळलेच नाही

लपवण्यासाठी स्वतःचे दुःख येथे
एवढे कोणी कधी हसलेच नाही

भावनेला व्यक्त करणे रोखले पण
आसवांना रोखणे जमलेच नाही

ह्या प्रवासातील ते नाजूक वळण मी
टाळतो म्हटले तरी टळलेच नाही

चल जरा बदलून पाहू काळजांना
मग म्हणूया आपले पटलेच नाही

एकदा वाहून नेले जे पुराने
गाव ते पुन्हा कधी वसलेच नाही

"द्वैत" सारे सोसल्यावर वाटते की
फारसे काही तसे घडलेच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users