मन वढाय वढाय (भाग २८)

Submitted by nimita on 23 March, 2020 - 21:50

पुढचे काही दिवस घरात जणूकाही लगीनघाई होती. एक तर रजतची ट्रेनिंग ला जायची तयारी आणि नंतर बडोद्याला शिफ्ट होण्याच्या दृष्टीनी करायला लागणारी प्लॅंनिंग. आपल्या मुलांच्या या पहिल्यावहिल्या संसाराबद्दल वंदना आणि नीलाला खूपच कौतुक होतं. त्या दोघांना तिकडे नव्या घरात काही त्रास होऊ नये, कुठलीही अडचण येऊ नये म्हणून दोघींची धडपड चालू होती. रोज नव्या घरात लागणाऱ्या सामानाच्या नव्या नव्या लिस्ट्स बनत होत्या. दोघीही जसं आणि जेव्हा लक्षात येईल तेव्हा रजत आणि स्नेहाला सूचना, उपदेशाचे डोस पाजत होत्या.

त्या सगळ्या गडबडीत एक दिवस नीला स्नेहाला म्हणाली,"अगं, इकडे तुझ्या काही वस्तू आहेत तुझ्या कपाटात. आज संध्याकाळी आणून देते तुला. त्यांचं काय करायचं ते बघ - बरोबर नेणार आहेस का इकडेच राहू दे- ते ठरव तू!"

म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी नीला त्या सगळ्या वस्तूंची बॅग घेऊन आली. "आत्ता राहू दे, नंतर बघीन शांतपणे," असं म्हणत स्नेहा दुसऱ्या कामाला लागली. पण रात्री जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा त्या बॅगकडे तिचं लक्ष गेलं. स्वाभाविक कुतूहलापोटी ती एक एक वस्तू काढून बघायला लागली.... तो सगळा आठवणींचा खजिना बघताना तिला स्वतःचीच मजा वाटत होती- 'काय काय साठवून, जपून ठेवलं होतं मी ... शाळेत मिळालेलं 'बेस्ट स्टुडन्ट' चं सर्टिफिकेट आणि मेडल, बाबांनी सोळाव्या वाढदिवसाला भेट म्हणून दिलेला walkman, आईनी स्वतः विणून दिलेला स्कार्फ, गोव्याच्या ट्रिप मधे मैत्रिणींबरोबर गोळा केलेले शंख शिंपले....' एक ना अनेक!

रजत खोलीत केव्हा आला ते कळलंच नाही स्नेहाला....ती तिच्या आठवणींच्या दुनियेत हरवून गेली होती. तिच्या पाठीमागून येऊन तिला आपल्या कवेत घेत रजत तिच्या कानात हळूच म्हणाला," आज राणीसरकारांचा मूड काही औरच दिसतोय. सेवकाकडे लक्ष द्यायलाही फुरसत नाहीये !"

रजतच्या या अशा अचानक येण्यानी स्नेहा क्षणभर दचकली पण मग अलगदपणे त्याच्या मिठीत विसावत हसून म्हणाली," तसं काही नाहीये रे! पण आज आई या सगळ्या वस्तू देऊन गेली.. तेच बघत होते... या अशा वस्तूंच्या रुपात किती आठवणी साठवून ठेवतो नाही आपण !"

"हं, खरं आहे. आणि प्रत्येक वेळी त्या आठवणी तेवढ्याच सुखकर असतात." स्नेहाबरोबर आता रजत पण तिच्या त्या आठवणींत रमला. स्नेहा त्यातल्या प्रत्येक वस्तू बद्दलच्या तिच्या आठवणी त्याला सांगत होती. अचानक रजतची नजर एका छोट्या डबीवर गेली. "यात काय आहे गं?" त्या डबीकडे इशारा करत त्यानी स्नेहाला विचारलं. पण ती डबी बघताच स्नेहाच्या चेहेऱ्याचा रंग उडाला. "लक्षात नाही रे, असेल काहीतरी..." असं पुटपुटत स्नेह ती डबी उचलायला पुढे वाकली; पण तेवढ्यात रजतनी ती डबी घेतली आणि उघडली सुद्धा!

आत सलीलनी स्नेहाला दिलेलं ते निळ्या रंगाचं ब्रेसलेट होतं!

ते बघून त्याची पहिली प्रतिक्रिया होती.." Wow, मस्त आहे गं हे! आवडलं मला. पण आजपर्यंत कधीच तुला वापरताना नाही पाहिलं ! कोणी दिलंय?" स्नेहाला काय उत्तर द्यावं हेच सुचेना; पण तिच्या उत्तराची वाट न बघता रजत पुढे म्हणाला," ज्यानी कोणी दिलंय त्याचा चॉईस मस्तच आहे हं !"

त्याच्या हातातून ती डबी घेऊन बाजूला ठेवत स्नेहा म्हणाली," लक्षात नाही रे नक्की कोणी दिलंय ते.तसंही मी तर नाहीच वापरणार हे..."

त्यावर आश्चर्यानी रजत म्हणाला," का ? वापर की तू... छान दिसेल तुला ...Blue colour suits you.. तुझ्या त्या निळ्या ड्रेसवर एकदम मॅचिंग होईल हे ब्रेसलेट !"

त्या रात्री उशिरापर्यंत स्नेहा जागीच होती. मनात विचारांची गर्दी होत होती. खूप प्रश्न होते, पण काही केल्या स्नेहाला त्यांची समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. तिला स्वतःलाच स्वतःचं वागणं समजत नव्हतं. - 'ते ब्रेसलेट सलीलनी दिलंय हे मी का नाही सांगितलं रजतला? त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. लग्नाआधी सलील बद्दल रजतला सगळं काही सांगायला तयार होते मी.. मग आज ही गोष्ट का लपवावीशी वाटली मला ? याचा नक्की अर्थ काय आहे? अजूनही माझ्या मनात कुठेतरी सलील आहे का? आणि हे रजतला समजू नये, त्याच्यासमोर माझं बिंग फुटू नये म्हणून मी त्याच्यापासून सत्य लपवलं का ? पण मी हे असं का वागतीये? सलीलचं माझ्या आयुष्यातलं, माझ्या मनातलं अस्तित्व मी रजतपासून लपवायचा प्रयत्न का करतीये?

जर हे सत्य रजतला समजलं तर काय होईल ? त्याच्या मनात सलीलची एक नकारात्मक प्रतिमा तयार होईल..नक्कीच ! कदाचित सलीलमुळे मला इतका त्रास झाला म्हणून रजत त्याचा तिरस्कार करेल का? शक्य आहे.... माझ्यावर खूप प्रेम करतो रजत...आणि म्हणूनच मला त्रास देणाऱ्या व्यक्तीला तो कधीच माफ करणार नाही. पण मग म्हणूनच मी सलीलचं नाव घ्यायला घाबरतीये का? मला असं का वाटतंय की सलीलला कोणी दोष देऊ नये ! त्याच्याबद्दल कोणी काही वाईटसाईट बोलू नये !!

म्हणजे अजूनही सलीलबद्दल माझ्या मनात कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर आहे.....इतकं सगळं होऊनसुद्धा !याचा अर्थ मी इतका प्रयत्न केला तरी माझं पहिलं प्रेम पूर्णपणे विसरू शकले नाहीये मी .... म्हणजे ....म्हणजे मी रजतच्या प्रेमाचा अपमान करतीये का ?' नकळत स्नेहानी शेजारी झोपलेल्या रजतकडे बघितलं. किती शांत झोपला होता तो .. किती समाधानी दिसत होता ! अगदी एखाद्या छोट्या मुलासारखा निरागस भाव होता त्याच्या चेहेऱ्यावर. रजतचं ते रूप बघून स्नेहाला एकदम अपराधी वाटायला लागलं. ' किती मनापासून प्रेम करतो हा माझ्यावर ; आणि मी मात्र आज त्याच्यापासून सत्य लपवलं.' स्नेहाच्या डोळ्यांतून दोन अश्रू तिच्या गालांवर ओघळले. ती स्वतःच स्वतःच्या वागण्याचं समर्थन करायचा प्रयत्न करायला लागली. 'खरं सांगायचं तर इतके दिवस हे ब्रेसलेट माझ्या आठवणीत सुद्धा नव्हतं. मी अगदी साफ विसरून गेले होते त्याबद्दल.' स्नेहा बेडवर उठून बसली. आज काही केल्या झोप लागत नव्हती. मनातले विचार आणि त्यांची गुंतागुंत अजूनच वाढत चालली होती.

स्नेहाचं मन पुन्हा भूतकाळात गेलं. जेव्हा तिनी सलील बरोबरचे सगळे बंध तोडून रजतला होकार द्यायचं ठरवलं होतं तेव्हाच सलीलच्या सगळ्या आठवणी पण नष्ट करायचं ठरवलं होतं.त्याच उद्विग्न मनस्थितीत एक दिवस तिनी सलीलची सगळी पत्रं, त्यांच्या दोघांच्या फोटोज चा तो अल्बम, सलीलनी दिलेली कार्ड्स आणि गिफ्ट्स- सगळं सगळं अक्षरशः फेकून दिलं होतं. तिच्या नव्या आयुष्यात तिला काहीही जुनं नको होतं... अगदी आठवणीसुद्धा ! पण मग हे एक ब्रेसलेटच कसं बरं राहून गेलं ?' कदाचित तेव्हा रागाच्या भरात माझ्या लक्षात नसेल आलं.' स्नेहा स्वतःचीच समजूत काढत म्हणाली.' काही हरकत नाही....आता सापडलंय ना ... मग आता देईन फेकून! पण जर रजतनी विचारलं की- का फेकून दिलंस- तर काय सांगू त्याला? त्याची इच्छा आहे की मी ते वापरावं.

काही हरकत नाही; त्याला इतकं आवडलंय तर त्याचं मन राखण्यासाठी म्हणून वापरीन...तसंही आता माझ्यासाठी ते ब्रेसलेट म्हणजे फक्त एक वस्तू आहे... इतर अनेक वस्तूंसारखी! आता माझ्या भावना नाही गुंतलेल्या त्यात!' विचारांच्या नादात स्नेहानी साईड टेबल वर पडलेली ती ब्रेसलेट ची डबी उचलून आपल्या कपाटात ठेवली.

ती डबी आणि त्यातलं ते ब्रेसलेट असं जपून ठेवण्यासाठी तिनी जरी रजतचं कारण पुढे केलं असलं तरी ते कारण खरं नाहीये याची तिला जाणीव होत होती. आणि त्या जाणीवेतून निर्माण होणारी अपराधी बोच तिला अजूनच बेचैन करत होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान