दिवस: पक्ष्यांचा आणि माणसांचा!

Submitted by झुलेलाल on 22 March, 2020 - 13:34

सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजुबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या सांभाळत सायकल चालविताना रस्त्यावरच्या खड्ड्यात सायकल आदळून होणारा किटल्यांचा आवाजही उजाडल्याची वर्दीच देत नव्हता. बसगाड्यांचा धूरदेखील हवेत मिसळला नसल्याने जाग येण्यासाठी सवयीचा झालेला वासही अजून नाकात शिरला नव्हता ...
हे सगळं अचानक चाललंय काय, या शंकेनं जाणत्या वयस्कर पक्ष्यांनी घरट्यातूनच माना उंचावून बाहेर पाहिले, आणि त्यांना धक्का बसला. चक्क कधीचंच उजाडलं होतं... उन्हाची किरणं अंगावर येऊ पाहात होती, आणि दिनरहाटी सुरू झाल्याचा सांगावा देणाऱ्या सूर्याचा सोनेरी रंग फिका होऊन चकचकीत घासलेल्या चांदीच्या भांड्यासारखा मुलामा त्यावर चढू लागला होता...
मग एकाने हळूच चोच उघडून शीळ घातली, आणि तो दचकला... आपला आवाज एवढा मोठा आहे हे त्याला कधी माहीतच झालं नव्हतं. या महानगरात जन्माला आल्यापासून आपल्या आवाजाचा गोडवाही त्याने स्वत: कधी अनुभवलाच नव्हता. आसपासच्या गोंगाट, कोलाहलात आवाज कधी हरवून जायचा तेही त्याला कळत नसे. कधीकधी तर त्याला स्वत:चीच भीती वाटायची. आपण चोच उघडून, घशाच्या स्वरयंत्राच्या तारा ताणून ओरडतोय खरं, पण आवाज फुटतोय ना, या शंकेनं तो घाबराघुबराही व्हायचा...
आज ती शंका फिटली होती. आपल्याला आवाज आहे, तो मंजुळ आहे आणि त्याला सूरदेखील आहे हे जाणवल्याने त्याने देवाचे आभार मानले आणि पंख फडफडवत पुन्हा एक नवी मंजुळ शीळ घातली. लगेच तो दचकला. लांबवर कुणीतरी तशीच शीळ घातली होती... चार गल्ल्यांपलीकडच्या झाडावरून तो आवाज येत होता... त्याला तो स्पष्ट ऐकूही येत होता. त्याला कमालीचा आनंद झाला आणि पंखावर झुलत त्याने किलबिलाट सुरू केला. आसमंतात तो आवाज घुमू लागला आणि उठूउठू म्हणत घरट्यात आळसावलेल्या पक्ष्यांनी भराभरा उठून आपापले सूरही त्या आवाजात मिसळले. आसमंतभर फक्त पसरलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचा हा अनोखा आनंद अनुभवत महानगरीही मोहरून गेली...
दिवसाची सुरुवात अशी अनपेक्षितपणे अनोखी झाली होती.
नंतर सगळीकडे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या सुरांचेच संगीत घुमत होते, आणि चक्क दूरवरून एकमेकांना प्रतिसाद देत ते आकाशातही विहरत होते.
सकाळपासूनच्या शांततेत उमटणाऱ्या किलबिलाटाच्या आवाजांमुळे अनेक पक्ष्यांना आपल्या भाऊबंदांची नवी ओळख झाली. आपण एवढे जवळ असूनही एवढ्या वर्षांत एकमेकांचा आवाजही ऐकू शकलो नाही या जाणिवेने पहिल्यांदाच सारे पक्षीगण खंतावले, आणि आज पहिलयांदाच अनुभवाला आलेला शांत दिवस आपला आहे असे समजून त्यांनी दिवसावर सुरांचा साज चढविण्यास सुरुवात केली.
पक्ष्यांचे विश्व आज असे महानगरात मोहरून गेले...
दिवस चढत गेला तरी महानगरीत बाकी माणसांच्या अस्तित्वाचा आवाज कुठेच नव्हता. पक्षी आनंदले... आज आपले ऐक्य साजरे करायचे ठरवून आकाशात थव्यांनी विहार करू लागले...
दुपार टळली... आता सूर्य मावळतीला जाणार हे लांवलेल्या सावल्यांनी पक्षांना खुणावण्यास सुरुवातही केली. पण दिवस साजरा करण्याचा उत्साह अजूनही ओसरला नव्हता!
.... अशातच अचानक दणदणाट सुरू झाला. भांडी वाजू लागली. घंटांचा गजर सुरू झाला. दूरवरचा शंखध्वनी शांतता चिरून आवकाशात घुमला... थाळ्या बडवल्या जाऊ लागल्या, आणि टाळ्यांचा गरजरही त्यात मिसळून गेला... कुठेकुठे फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या तर कुठे डीजेचा दणदणाट घुमू लाला... अनपेक्षित झालेल्या या आवाजी हल्ल्याने थवे थिजले. आकाशात उडतानाच त्यांची चिमुकली ह्रदये धडधडू लागली, आणि दिशा बदलून सगळ्या भेदरलेल्या पंखांनी घरट्यांची वाट धरली... भराभर घरी पोहोचून सगळ्या पक्षिणींनी भीतीने घरट्यातल्या पिल्लांवर पंखांची पाखर धरली...
नेहमी तिन्हीसांजेला घरी परतणारे आपले आईबाप आज लवकर का परतले याच्या आश्चर्यात बुडालेली पिल्ले आईला बिलगली!
दूरवरून कुठून तरी, माणसाची घोषणा घुमली...
“गो, करोना गो!”
आणि माणसांचाच दिवस असल्याचे ओळखून पक्षी पुन्हा चिडीचूप झाले!!

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय..
खरंच काल 5च्या सुमारास टाळ्यांऐवजी सुरवातीला थाळ्या, घंट्या, आणि शंखनादच ऐकु यायला लागले होते..

छान लिहिलंय.
पण आमच्या बाल्कनीत रोजच किमान ६ प्रकारचे पक्षी येतात ... छान गातात आणि त्यांना ठेवलेला खाऊ खात मस्त दंगा करत आकाश भरारी घेतात.

छान लिहीलयं !

सगळ्यात धमाल म्हनजे कावळे रस्त्यावर उतरुन कंबर हलवत ( जी काय असेल ती ) चालत होते. त्यांना आश्चर्य वाटले असावे की रस्त्यावर आज दोन पायाचा प्राणी / पक्षी नाही, तो ज्याच्य वर बसुन पळतो ते पंख नाहीत ( स्कुटर / मोटर सायकल ) . दिवसभर पक्षांची मस्त किलबील. पण जसा थाळी नाद सुरु झाला तसे रस्त्यावरचे निवांत बसलेले चार-पाच कुत्रे कावरे-बावरे होऊन सैरावैरा पळत सुटले. आमच्या घरासमोर चौक असल्याने एक कुत्रे स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालत फिरत असल्याचे दिसल्याने हसुन लोळायची वेळ आली आणी क्षणभर वाईट पण वाटले. कारण इतका वेळ स्माशान शांतता अनूभवल्यावर हा माणुस नावाचा प्राणी परत आपल्या विश्वात आल्याचे त्या पशु-पक्षांना कळले असावे.

"" च्यायला , दिवसभर ही माणसे दिसली नाहीत, यांना म्युन्सिपालटीच्या गाडीने उचलले की काय असे कुत्र्यांना वाटले असेल. "" कायप्पा साभार !

एक माणूस शंख वाजवतोय आणि त्याच्या समोरील कुत्रे तसाच हेल धरून ओरडतेय हा कायप्पावरचा व्हिडियो मस्त आहे.

एक्च्युली त्या शंखध्वनीने (ध्वनी कंपनाच्या फ्रीक्वेंसीने) कुत्र्याला त्रास होतोय म्हणून तो बिचारा ओरडतोय Sad

छान