निर्भया

Submitted by Asu on 20 March, 2020 - 00:16

निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना आज दि.२० मार्च २०२० रोजी फाशी झाली. गेली सात वर्ष तळमळणारा निर्भयाचा आत्मा अखेर आज मुक्त झाला. निर्भयावर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या नराधमांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मात्र जीव तोडून धडपड केली. तरीही अखेर न्यायाचा विजय झाला.
पण, अशा निर्घृण बलात्कार प्रकरणी नराधमांना मी कवितेत म्हटल्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. जेणेकरून असं दुष्कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होऊ नये.

निर्भया

मद्यधुंद नयन अंगारे
जाळीत होते त्रिभुवन सारे
तशात दिसली सुंदर हरिणी
खेळत होती हिरव्या कुरणी

घेरूनि त्या अल्लड तरुणी
करिती लांडगे विपरीत करणी
पाहुनी असहाय, केविलवाणी
त्वेषे गाती बिभत्स गाणी

जाळ्यात कधी चुकुनि पडता
होती गरीब बापुडवाणी
फुशारक्याही तरी मारिती
निर्लज्ज, नराधम, दीड शहाणी

नकोच शिक्षा कैदेची
सुधारण्याची भिक्षा कैची !
वासनांध हे लिंग पिसाट
छाटा यांचे लिंग सपाट

पुरुषार्थाचे लिंग झडू दे
जखम लज्जेची तशीच सडू दे
अद्दल घडू दे दुष्कर्माची
जिवंत मरणे जगण्याची

पुरुषा नाही लिंग शुचिता
फिरती मोकाट, नारी भोगिता
नाही नारी भोग्य, पतिता
विसरा आता योनी शुचिता

सीता, सावित्री आणि उर्मिला
नका आठवू वंद्य अबला
निर्भया तू अवतार सबला
दानव वधण्या जगी प्रकटला

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults